शिदोरी | shidori - Fact of Life | Indian food culture

     शिदोरी  | shidori - Fact of Life | Indian food culture 


GREAT THOUGHTS
INDIAN FOODS 

                                 लेखक आणि प्रस्तुतकर्ता : - योगेश वसंत बोरसे.

   मित्रांनो , नमस्कार !              

     मी योगेश बोरसे ,तुम्हा सर्वांचं BORSE GROUP'S  SUCCESS MISSION  मध्ये स्वागत करतो . 
 मित्रांनो ,काही शब्द असे असतात ,जे काळाच्या ओघात हळूहळू नामशेष होत जातात . व नवीन पिढीला त्याचा अर्थही कळत नाही . किंवा त्या शब्दांचे सामर्थ्य ,त्यातली मजा कळत नाही . असाच एक शब्द  ' शिदोरी ' !

    आजच्या फास्टफूडच्या  युगात ,पिझ्झा ,बर्गर च्या युगात हा शब्द कानावर पडणे ,जवळ जवळ अशक्य आहे . 

 साधारण चाळीस ते पन्नास वर्ष पूर्वी पर्यंत हा शब्द अस्तित्वात असेल ,व घरोघरी वापरला जात असेल ,कारण पूर्वीच्या काळी बाहेर खाणे पिणे लोक टाळत असत . बाहेरचे खाल्ल्याने पोट बिघडते ,माणूस आजारी पडतो ,असे म्हटले जायचे . 

   घरात कुटुंब मोठे असायचे ,आठ दहा जणांचे ,त्यात कर्ता पुरुष ,आई असेल ,आजी असेल यांचा आदरयुक्त धाक असायचा . जेवायला बसतांना पुरुष मंडळी प्रथम जेवायचे . आई ,बहिणी ,आजी ,मावशी ,आत्या नंतर बसायच्या . 

    आपल्या महाराष्ट्रात ,मराठी कुटुंबात ,शेतकरी वर्ग असेल ,कष्टकरी वर्ग असेल ,यांचे खाणे पिणे , अगदी शिवाजी महाराजांचा काळ असेल ,किंवा त्या अगोदरचा काळ असेल ,चटणी - भाकरी ,मिरचीचा ठेचा ,किंवा खुडा ,कांदा ,भाकरी - लोणचं ,झुणका - भाकरी ,भाजी - भाकरी ,हे पदार्थ जास्त असायचे .

    भाकरी नागलीची ,नाचणीची ,ज्वारीची ,बाजरीची ,तांदळाची ,जोंधळ्याची ,कळण्याची ,ज्याला जी आवडेल किंवा उपलब्ध धान्य ,जे मुबलक धान्य असेल ,ती भाकरी ,ते जेवण असायचं ! बरं ,कळण्याची भाकरी म्हणजे ज्वारी मध्ये दळताना काळे उडीद व थोडे मीठ एकत्र करून दळायचे ,त्याची भाकरी करायची . चटणी बरोबर खा ,नाहीतर नुसती तेल ,तूप टाकून खा ,नाहीतर ठेच्या बरोबर ,अवीट गोडी ! 

    वांग्याचे भरीत भाकरी , भाजी भाकरी , तर प्रश्नच नाही ! हातात पूर्ण भाकरी घ्यायची ,मिरचीचा ठेचा किंवा चटणी घ्यायची ,एका बुक्कीत कांदा फोडायचा . कधी अक्खी मिरची खात ,घरची परिस्थिती चांगली असली तर भाकरीवर लोण्याचा गोळा किंवा तुपाची ,गावरानी तुपाची धार टाकायची . कधी दूध भाकरी खायची .

     एक भाकरी खाल्ली कि माणूस कामाला तयार ! मग तो शेतकरी असेल ,शेतमजूर असेल , धनगर ,मेंढपाळ , गुराखी असेल ,किंवा अगदी प्रवासी असेल ,त्यांच्या सोबत घरची मंडळी एका कॉटनच्या कापडात घरी बनवलेले जेवण बांधून द्यायचे . ज्याला 'शिदोरी ' म्हणायचे . 

    त्यात भाकरी ,ठेचा ,कांदा ,मिरची आवर्जून असायची . सोबत एक काठी असायची . त्या काठीच्या एका टोकाला हि शिदोरी टांगलेली असायची . तेव्हाचं हे जेवण ,हे खाणं पिणं , लोकांचं फिरणं, राहणीमान इतकं नैसर्गिक होतं की लोकांचं आयुष्यमान पण  जास्त होतं. शिदोरी बरोबर असायची व तहान लागली की विहिरीचं, वाहत्या झऱ्याचं, नदीचं पाणी पिलं जायचं.

      परिवर्तन होत गेलं, पहिले शिदोरी जेवण बरोबर असायचं,पाणी बाहेरचं प्यायचे. काळाच्या ओघात शिदोरी बंद झाली. उकळलेले पाणी  बरोबर घेऊन जाणे गरजेचे झाले, किंवा बाहेरचे बाटल्यांमधील शुद्ध पाणी पिणे सुरु झाले.

     भाकरीची जागा पोळीभाजीने घेतली व शिदोरीची जागा डब्यांनी घेतली. डब्याला टिफिन म्हणू लागले व या टिफिन बॉक्समध्ये हळूहळू पोळीभाजीची जागा फास्ट फूडने कधी घेतली ते आपल्यालाही कळले नाही. लोकांना म्हणण्यापेक्षा आपल्याला बाहेरचे खाण्याची चटक लागली. व हळूहळू घरचा स्वयंपाक बंद होऊन आपण बाहेरचं जेवायला लागलो. जे पहिले कधीतरी व्हायचे ते अंगवळणी पडत गेले. व आपण घरच्यापेक्षा बाहेरचं खाऊ लागलो. 

           पाववडा, वडापाव, समोसा,कचोरी,पावभाजी,चायनीज,नूडल्स,पाणीपुरी,भेळपुरी,          फास्टफूड,जंकफूड खाऊ लागलो. पिझ्झा,बर्गर खाऊ लागलो. नागलीची भाकरी व ठेचा खाणाऱ्य  माणसांची व आपली बरोबरी कशी होणार ? शक्यच नाही. त्यांची ताकद जास्त ,कामाची क्षमता जास्त,फिरण्याची, पायी फिरण्याची क्षमता जास्त. त्यामुळे आयुष्यमान जास्त ! मानसिक व शारीरिक तयारी जास्त !

   आपण लहानपणी मुलांना नागलीचं सत्व,नागलीचे बिस्कीट खाऊ घालतो. व मोठे झालो की नागलीमध्ये,ज्वारीमध्ये, बाजरीमध्ये, गव्हामध्ये काय सत्व आहे हेच विसरून जातो. कुणी म्हणेल आमच्या कडे वेळच नाही. त्यामुळे आम्हाला या गोष्टी नाइलाजाने कराव्या लागतात. 

   पण आपण आपला वेळ नेमका कुठे खर्च करायचा हे, प्रत्येकाचे मत वेगळे असू शकते, तो प्रत्येकाचा अधिकारही आहे. अजूनही आपण घरच्यांसोबत पिकनिकला गेलो व सोबत घरचा डबा घेतला असेल,पोळीभाजी असो,पुरीभाजी असो, चटणी,लोणचं, दशमी,कांदा, मिरची असो. ते जेवण जेवण्याची व त्या जेवणाची मजा ते समाधान ते कुटुंबाचे एकत्र एकच पदार्थ खाणे ती भावना फास्टफूड किंवा जंकफूड खाऊन, हॉटेलचे खाऊन कधीच मिळणार नाही. 

   एकच जेवण जेवल्याने कुटुंबाची , बांधिलकीची , भावना एकजूट एकमत राहते. आपण हॉटेलला गेल्यावर प्रत्येकाला आवडेल ती ऑर्डर देतो. कुठून कुटुंब एकत्र एकजीव राहणार ? हे प्रत्येक जण मान्य करेल. पूर्वजांनी आपल्याला दिलेली ही शिदोरी आपण जर मुलांना देऊ शकलो,किंवा निदान ' शिदोरी' हा काय प्रकार आहे, होता हे जरी मुलांना सांगितलं तरी मुलं कौतुकाने,कुतूहलाने ऐकतात.

     माझा मुलगा लहान आहे. त्याने मला हा प्रश्न विचारला ' शिदोरी '  म्हणजे काय ? त्याला जेव्हा सविस्तर समजावून सांगितले तेव्हा त्याला पण आवडले. म्हणून तुमच्याशी या विषयी बोलावे असे वाटले म्हणून बोललो. यात कुणाला दुखावण्याचा किंवा कमी लेखण्याचा प्रपंच नाही, कोणत्याही संस्कृतीला,खाद्य संस्कृतीला कमी लेखावे असे नाही.

    कारण आपल्या संस्कृतीत ' अन्न हे पूर्ण ब्रम्ह ' म्हटले जाते. मग तो पाववडा असो की भाकरी दोन्हींचे महत्व सारखेच. कारण बरेच लोक पाववडा खाऊन पूर्ण दिवस काढतात. बघा विषय आवडला तर आपल्या घरातील मुलांना,लहान मुलांना नक्की सांगा. व आम्हालाही सांगा. लहान तोंडी मोठा घास घेतला असेल तर क्षमस्व ! पुन्हा भेटू लवकरच ! तो पर्यंत...... काळजी घ्या स्वतः ची, कुटुंबाची मुलांची व आपल्या संस्कृतीची ! 

                  HAVE A GOOD LIFE ! 

                                     THANK YOU ! 

                        ⇎⇎⇎⇎⇎⇎⇎⇎⇎⇎⇎

                               लेखक आणि प्रस्तुत कर्ता :- योगेश वसंत बोरसे 

VISIT OUR YOU TUBE CHANNEL ALSO

➣➣➣➣➣➣➣➣➣➣➣➣➣➣➣➣➣➣➣➣➣➣➣➣➣➣➣➣➣➣➣➣➣➣➣➣➣➣➣➣➣

Previous
Next Post »