फट्टू - भाग - ६ वा - मराठी भयकथा - HORROR STORY MARATHI STORY

     फट्टू - भाग - ६ वा - मराठी भयकथा - HORROR STORY MARATHI STORY

BHAYKATHA
MARATHI HORROR STORY 

        सूचना :- ही  एक काल्पनिक  भय कथा असून , वाचकांच्या सोयी साठी ही  दीर्घ भयकथा २० भागात विभागली आहे ! प्रत्येक भाग ,प्रत्येक प्रसंग भयचकित करणारा ,हूर हूर लावणारा ,आपल्याशी जवळीक साधणारा , गूढ गोष्टींकडे आकर्षित करणारा , आपल्या अवती भवती बघायला भाग पाडणारा आहे . वाचकांना विनंती आहे की  त्यांनी पूर्ण कथेचा आनंद घ्यावा . तुम्हाला नक्कीच आवडेल !

 पूर्वार्ध :- तेनसिंगने दार उघडलं . बाहेर कुणी होतं ! त्यांना पाहून का कोण जाणे ? तेनसिंगच्या मनावरील ,शरीरावरील ,बुद्धीवरील ताण बराच कमी झाला . आणि ... तेनसिंग काही बोलायच्या आधी त्या व्यक्तीने घरात प्रवेश केला ! ....... 

 आता पुढे :- त्या व्यक्तीने घरात प्रवेश केला . आणि तेनसिंग सारखाच अनुभव सगळ्यांना आला . प्रत्येकावरचा ताण क्षणार्धात कमी झाल्यासारखा वाटत होता . यांना असं वाटलं की  जे शोधायला निघणार होतो ते घरबसल्या मिळालं . देवालाच काळजी होती यांची . 

            ती व्यक्ती सरळ समशेर कडे गेली . समशेर झोपला होता . तेनसिंगच्या काळजात धस्स झालं ! " एक मिनिट ! कोण आपण ? असं रात्री अपरात्री दुसऱ्याच्या घरात घुसता ! थांबा ! " 

"बाळा ,मी कोण आहे ,ते महत्वाचं नाही ! आणि थांबायला वेळ नाही ! थांबलात तर अनर्थ होईल ! हे शैतानाचं पोर आहे ! " तेनसिंग संतापला . " तुमच्याकडे पाहून वाटलं की तुम्ही कुणी सिद्ध पुरुष आहात ! पण एवढ्याशा पोराला शैतानाचं पोर म्हणताय ? काहीच वाटत नाही ? तो माझा पोरगा आहे ! माझा ! " 

           "  बाळा ,थोडा शांत हो ! हा तुझा मुलगा आहे यात शंका नाही ! पण हा शैतानाचा अंश आहे . याच्या रूपावर जाऊ नकोस . या लोभस रुपामुळेच तू याचं संरक्षण करतोयस . धृतराष्ट्र होऊ नकोस !" "नाही ! याचं संरक्षण करणं माझा धर्म आहे , माझं कर्तव्य आहे ! " "बाळा ,देवाने तुला थोडी बुद्धी दिली आहे तिचा वापर कर ! " "पण बाबा ,हे पोर शैतानाचं कसं असेल ? " 

      " ते तुझ्या बायकोला विचार ! " "काय ?" " हो ,नाहीतर हिला विचार ! " त्यांनी काशीबाईकडे खूण  केली . तेनसिंगला हा आश्चर्याचा धक्का होता . " लग्न होऊन तीन चार वर्ष झाली ,तरी मूल होत नाही ,म्हणून यांनी काय काय केलं होतं ते आठवतं का विचार  यांना  ! " 

     सावित्री त्या सत्पुरुषाकडे रोखून बघत होती . तिच्या नजरेतील भाव बदलत होते . दिलीप आणि संजय नख शिखांत  हादरले . असा प्रकार कधी कुठे पहिला नाही ! ऐकला  नाही ! वातावरणातील फरक ,बदल त्या बाबाना जाणवला . त्यांनी पटकन शबनम मध्ये हात घातला . जी त्यांच्या खांद्याला लटकत होती . 

         "थांब ! " सावित्रीचा आवाज ! मुळात तो सावित्रीचा आवाजच नव्हता . ती फक्त माध्यम होती ." तो माझा अंश आहे ! त्याला हात लावशील तर तुम्ही सगळे मराल ! म्हातारे तुला सांगितलं होतं ! यालाही सांगितलं होतं ! तुम्ही ऐकलं नाही ! आता परिणाम भोगायला तयार राहा ! " आवाजाच्या प्रभावाने सर्वजण हतबद्ध झाले होते . अगदी बाबाही ! त्यामुळे सावित्री बाहेर पळाली तरी हे फक्त बघत राहिले ! 

           सर्वात पहिले दिलीप भानावर आला ." वहिनी  ! " त्याच्या आवाजाने तेनसिंग ,संजय ,बाबा व काशीबाई सर्व जण भानावर आले . तेनसिंग सावित्रीच्या मागे पळाला ! पण अघटित घडलं होतं ! काही क्षणांचा फरक झाला पण तेवढ्यात सावित्री हातातून गेली होती . तिघं बाहेर पळाले . तेनसिंग चारी बाजूला सैरावैरा धावत होता . आवाज देत होता . पण व्यर्थ ! 

      तेनसिंग प्रचंड घाबरला ! आणि चिडलाही ! हा सगळा गोंधळ त्या बाबामुळे झाला . नाहीतर सावित्री घराबाहेर गेली नसती . तो रागाच्या भरात घरात आला . दिलीप आणि संजयला अंदाज आला असावा .तेनसिंग तेनसिंग करत ते त्याच्या मागे आले . 

       तेनसिंग सरळ बाबाजवळ जाऊन उभा राहिला . " माझी  सावित्री कुठे आहे सांग ! " " बाळा शांत हो ! तिला काहीही होणार नाही ! ती काय आणि तो काय ,तुला फक्त घाबरवत आहेत . " " सावित्री कुठे आहे सांग !" तेनसिंग ऐकण्याच्या मनस्थितीत नव्हता . " हे बघ ,शांत हो ! " बाबाने शबनम मध्ये हात घातला . आणि अंगारा बाहेर काढून तेनसिंगच्या दिशेने फुंकला . तो तेनसिंगच्या डोळ्यात गेला . तो डोळे चोळ्त मागे सरकला . 

          " बाबा ,काय फेकलं ? " " पोरा ,माफ कर मला ! या मुलाला घेऊन जाणं गरजेचं आहे . नाहीतर अनर्थ होईल . हा साक्षात काळ आहे ! याच्या रूपावर जाऊ नकोस ! " बाबा समशेरच्या दिशेने सरकले  . समशेर त्याच्या कडे एकटक बघत होता . त्याच्या  चेहेऱ्यावरील भाव बदलले . तिथे तुच्छतेचे भाव आले, " मला माझ्याच जागेवरून घालवणार ? एवढी तुझी हिंमत ! बाबाने त्याला उचलायचा प्रयत्न केला. पण तो जागचा हालला ही  नाही.  त्याने एक लाथ मारली. बाबा दूर जाऊन पडले .

   काशीबाई रडण्यापलीकडे आणि बघण्यापलीकडे काही करू शकत नव्हती . कुठून बुद्धी झाली आणि काशी केली ,असं तिला झालं . यापेक्षा मूलबाळ नसतं झालं तरी  चाललं असतं . पण पोरगी डोळ्यासमोर तर राहिली असती ! त्या नुसत्या थरथरत होत्या . डोकं बधिर झालं होतं काही सुचत नव्हतं . 

            "तू या कुटुंबाला संकटात पाडलंस ! आता कसं बाहेर काढशील यांना ? या शैताना पुढे माझी मात्रा चालत नाही  ,तर तू आणि हे काय कराल ? " बाबानी तेनसिंगसमोर हात जोडले ,"पोरा ,काहीही कर ,पण या पोराला रात्र संपायच्या आत इथून बाहेर काढ ! नाहीतर सकाळपर्यंत तुम्ही संपून जाल ! तुमच्या भल्यासाठी सांगतोय ! " 

     तेनसिंगला काय बरोबर काय चुकीचं कळत नव्हतं . बाबांनी उठायचा प्रयत्न केला . पण त्यांना जागचं हलता ही  येत नव्हतं . ते तोंडाने मंत्र पुटपुटत राहिले . समशेर कॉट वरून खाली उतरला . एकेक पाऊल टाकत बाबाच्या दिशेने गेला . सर्वजण बघत राहिले . त्यांची विचारशक्तीच कुंठित झाली होती . समशेर बाबांजवळ पोहोचला त्यांचे केस हातात धरले व फरफटत दारापर्यंत घेऊन गेला . बाबा ओरडत राहिले पण त्याने सोडलं नाही . दारापर्यंत जाताच एखाद्या बाहुलीसारखं बाहेर भिरकावलं . 

            सर्वजण डोळे फाडून पाहत राहिले ! आता समशेरचा मोर्चा यांच्याकडे वळाला . " तुम्ही जाता ,की असेच जाल ! यांच्यासारखे ! दिलीप व संजय ला हीच संधी होती ,इथून बाहेर पडण्याची ! त्यांना कळून चुकलं होतं की  हे काही वेगळंच प्रकरण आहे . जगलो वाचलो तर तेनसिंगला मदत करता येईल ! नाहीतर इथेच समाधी व्हायची आपली ! 

          त्यांनी एक क्षण ही  वाया घालवला नाही ,बाहेर आले व इकडे तिकडे पाहू लागले . त्यांची अपेक्षा होती की बाबा आसपास असेल , पण बाबाच काय ,बाबाची सावली ही  त्यांच्या हाती लागली नाही . 

           ' कमाल आहे ! पहिले तेनसिंगची बायको गायब ! आता बाबा गायब ! हे गेले कुठे ? '

           तेनसिंगला कळेना ,काय करावं ते ! सावित्रीला कुठे शोधावं ते ?  "मामी ,तुम्ही दोघीनी नेमकं काय केलंय ?काय झालंय ? सांगाल का ? सावित्रीला कुठे शोधावं ? " काशीबाईला काय बोलावं कळेना सुरुवात कुठून करावी ते कळत नव्हतं . 

       त्या भूतकाळात हरवल्या . सावित्री आणि तेनसिंगचं लग्न होण्या अगोदरचे दिवस आठवले आणि त्यांच्या अंगावर शहारे आले . 

     "  मामी ,काय विचारतोय ? सांगणार आहात का ? " आणि काशीबाईने सांगायला सुरुवात केली . 

           

                                                TO BE CONTINUED....... 

FATTU - PART - 7 WATCH HERE


WATCH MUSICAL COVER SONGS ON OUR YOU TUBE CHANNEL 'MUSICAL RAITA '




                                  💗💗💗💗💗💗💗💗💗💗💗💗💗💗💗💗 

   

        

   








Previous
Next Post »