फट्टू - भाग - ५ वा - मराठी भयकथा - MARATHI HORROR STORY

फट्टू - भाग - ५ वा - मराठी भयकथा -  MARATHI HORROR STORY 

MARATHI BHAYKATHA
मराठी भयकथा 

फट्टू - एक अकल्पित - भाग - ५ वा - मराठी भयकथा 


सूचना :- ही  एक काल्पनिक  भय कथा असून , वाचकांच्या सोयी साठी ही  दीर्घ भयकथा २० भागात विभागली आहे ! प्रत्येक भाग ,प्रत्येक प्रसंग भयचकित करणारा ,हूर हूर लावणारा ,आपल्याशी जवळीक साधणारा , गूढ गोष्टींकडे आकर्षित करणारा , आपल्या अवती भवती बघायला भाग पाडणारा आहे . वाचकांना विनंती आहे की  त्यांनी पूर्ण कथेचा आनंद घ्यावा . तुम्हाला नक्कीच आवडेल !

पूर्वार्ध :- .... आणि काहीतरी अमानवी येऊन खिडकीवर धडकलं, असं वाटलं ! व तेनसिंग मागे फेकला गेला आणि त्या सोबतच काशीबाईची किंकाळी हवेत विरली........ 

      पुढे :-
            तेनसिंग मागे फेकला गेला ,पण लक्ष समोरच होतं . खिडकीच्या बाहेर कुणी दिसलं नाही पण जाणीव खूप तीव्र होती ,कुणीतरी असल्याची ! समशेर आता खिडकीजवळ नव्हता . तो जाऊन पलंगावर बसला होता . तेनसिंग कसातरी उठला . त्याचं कंबरडं दुखायला लागलं . त्याने ठरवलं ,उद्या काही झालं तरी ही खिडकी बंद करायची . भले इथे भिंत घालून देऊ ! 
       सावित्री व काशीबाई तेनसिंगच्या मागे उभ्या होत्या . सावित्रीने पुढे होऊन त्याला हात दिला . आधार दिला . काशीबाईला नेमकं समजेना ? हे काय चाललंय ते ? "जावईबापू लागलं का ?" काशीबाईने काळजीने विचारलं . प्रश्न असा होता कि उत्तर काय द्यावं ? ते तेनसिंगला कळालं नाही . काही प्रश्नच असे निरर्थक असतात कि समोरचा निरुत्तर होऊन जातो . 
      पण समजा त्यांनी नसतं विचारलं तरी प्रश्न राहिला असता कि याना काळजी नाही म्हणून ! अर्थात प्रश्न चुकीचा होता . पण गरजेचं होता . आणि तेनसिंगला लागलं असलं तरी तो हो म्हणू शकत नव्हता . बरोबर आहे सासूपुढे कसं कबुल करणार ? कमीपणा नाही का येणार ? 
      कदाचित त्यामुळेच तो उत्तरला ,"फारसं नाही लागलं !पण या खिडकीचा बंदोबस्त करावा लागेल ! उद्याच इथे भिंत घालतो ! "
      "भिंत घालून काय होणार ? " सावित्री अचानक बोलली . बरं बोलली अशा पद्धतीने की  तेनसिंग व काशीबाई पहातच राहिले ." खिडकी आहे ,होती म्हणून तुम्हाला येणारं संकट समजलं ,दिसलं ! नाहीतर काय कळालं असतं ? आणि संकट तर येणारच ! आलेलंच आहे ते तुम्हाला आत्ता समजणार नाही ! " सावित्री आपल्या वाढलेल्या पोटावरून हात फिरवत म्हणाली . 
     काशीबाईला पुन्हा धडकी भरली ! 'याचा अर्थ काय ? हिच्या पोटी कोण जन्माला येणार आहे ? म्हणजे आत्ता जे काही खिडकीवर आदळलं ,त्याने थेट सावित्रीच्या गर्भात प्रवेश केला कि काय ? आत्म्याच्या रूपाने ? कोण असावं ? जवळचा की  परका ? चांगला कि वाईट ? चांगला तर नक्की नसणार ! मग त्याचा उद्देश काय ?' काशीबाई विचार करत राहिली . 
     "म्हातारे ,जास्त विचार करू नकोस ! आणि इथे थांबू ही नकोस ! आजची रात्र आहे तुला ! उद्या नीट निघायचं ! जर थांबलीस तर उद्या रात्री जिवंत राहायची नाहीस ! " सावित्री जशी काय गरळ ओकत होती . "हे बघ !" तिने समोर हात केला आणि काशीबाईला आपल्या मृत्यूची झलक समोर दिसली .
       "आणि तू !" आता सावित्रीचा मोर्चा तेनसिंगकडे वळाला होता . " हे सर्व माझं आहे . हे घर ! ही  जागा ! तू बळकावून बसलास ! आणि लक्षात ठेव ! समशेर ही  माझाच अंश आहे ! आणि आता जन्म घेईल तो ही !" तेनसिंग खाड्कन भानावर आला . त्याला लाजल्यासारखं झालं . 
        ' म्हणजे ? ही आपली मुलं नाहीत ? मग आपण ? ' त्याला राहवलं नाही . तो दार उघडून बाहेर निघून गेला . काशीबाई मागून आवाज देत राहिली . पण तो थांबला नाही . काशीबाईचा संताप झाला . तिने खाड्कन सावित्रीच्या मुस्काटात मारली . तशी सावित्री भानावर आली . " चांडाळणी ! काय संसार नासवायला निघालीस  ? जावईबापू भर पावसात बाहेर गेले ,संतापाच्या भरात ! काही कमी जास्त झालं तर कुठे फेडशील हे पाप ? " 
    "आई ,पण मी काहीच केलं नाही ! " " काहीच केलं नाही ? अगं ,तुझ्या बोलण्याने जावईबापू निघून गेले . आता कुठे शोधायचं त्यांना ?" काशीबाई बाहेर पळाल्या !तेनसिंगला आवाज देत ! सावित्रीचं डोकं जड झालं ! तिला चक्कर यायला लागली . ती मटकन पलंगावर बसली . आणि समशेर तिच्या जवळ , तिला हालवत होता ! 
      ' काय बोलले मी असं ? की  हे घर सोडून गेले ? मला कळत नाही . आठवत नाही ! कालही घरात पसारा होता . खाल्लेलं उष्टं ,खरकटं घरभर पसरलेलं होतं तेव्हा आई , मी आणि समशेर तिघेच घरात होतो . व आजही आपल्यामुळेच गडबड झालीय ! म्हणजे कालही आपणच काही पराक्रम केला ? आजच्या सारखा ? पण आई होती तिने सहन केलं ! बिचारी काही बोलली नाही ,पण नवरा कशाला सहन करेल ! '
      ' पण आत्ता नेमकं काय झालंय ? ' तिने समशेरला विचारलं ," समशेर मी काय म्हटलं ? " समशेरच्या नजरेतील चमक पाहून ती शहारली .' हे काय भलतंच ? हा असा काय बघतोय ? हा आहे तरी कोण ? ' 
     काशीबाई भर पावसात जावयाला आवाज देत रस्त्याने पळत होत्या . रात्रीची वेळ लोकांना समजेना ? हि बाई असं काय करतेय  ते ? एक दोन जणांनी तिला थांबवून विचारलं ," बाई ,काय झालं ? " "अहो जावई रागाने घर सोडून गेलेत ,काही कमीजास्त नको व्हायला ! " "पण तुम्ही कोण आहात ?" काशीबाईने आपला परिचय दिला . 
     "ठीक आहे , मावशी तुम्ही घरी जा ! आम्ही तेनसिंगला शोधून आणतो . काळजी करू नका ,घरी वहिनी एकट्या असतील ! त्यांची काळजी घ्या ! " "अहो ,तिच्यामुळेच तर ... "  काशीबाईंनी शब्द आवरले . "का ? काय झालं ?" "काही नाही !  तुम्ही बघता का जरा ! जावईबापूना ? " "हो ,हो ! तुम्ही जा घरी ! आम्ही बघतो ! "
     इकडे तेनसिंग घराबाहेर पडला . पाऊस वेड्यासारखा कोसळत होता . पण तेनसिंगला त्याचं  काही वाटत नव्हतं . कारण त्याच्या डोक्यात वादळ उठलं होतं ! आधीच मुलं उशिरा झाली होती . आता ती पण आपली नाहीत ? नाही ! मुलं आपलीच आहेत ! कुणी काहीही सांगेल आणि आपण विश्वास ठेवायचा का ? 
        ' पण सावित्री तर असं बोलणार नाही ? ती बिचारी आज पर्यंत एक शब्द उलटून बोलली नाही ! मग आजच का ? पण ती तर बोललीच नाही ! तिच्या आत जे कोणी होतं ,जे काही होतं ते बोललं ! म्हणजे सावित्री संकटात आहे ? माझी सावू संकटात आहे ? तिचा जीव धोक्यात आहे ? आणि आपण मुर्खासारखे इकडे निघून आलो ! '
          ' नाही ! आपण घरी गेलं पाहिजे ! 'आणि तो पुन्हा घराकडे वळाला . "तेनसिंग ssss " त्याच्या कानावर हाक आली . त्याने आवाजाच्या दिशेने बघितलं . "तेनसिंग ,अरे घरी चल ! एवढ्या पावसात कुठे जातोयस ? " ते दिलीप व संजय होते ,तेनसिंगचे मित्र ," तुझी सासू तुला वेड्यासारखी शोधत होती . घर सोडून का आलास ? चल घरी चल ! " " एक मिनिट ! " तेनसिंग बोलला . " तुम्हाला आत्ता काही काम आहे का ? " "नाही रे , का ? " मग माझ्यासोबत चला ! कदाचित पूर्ण रात्र जाईल ! " 
      "अरे का नाही ? मित्राला नाही ,मग कोणाला मदत करायची ? पण काय झालंय ? काही फॅमिली मॅटर आहे का ? " "नाही रे ! फॅमिलीचाच आहे ! पण वेगळा आहे ! चला ,पहिले घरी जाऊन येऊ ,मग बोलू ! " 
         काही वेळात तेनसिंग ,दिलीप व संजय घरी पोहोचले . दरवाजा उघडाच होता .तेनसिंगच्या काळजाचा ठोका चुकला . तो धावतच गेला . " सावित्री थांब ! जावईबापू गेले ,आता तू चाललीस अशा अवस्थेत ,हे बरोबर नाही ! त्यांचे मित्र त्यांना शोधायला गेलेत ! येतीलच इतक्यात ! ..... " काशीबाई सावित्री ला समजावत होत्या . पण ती घरात थांबायला तयार नव्हती . हे माझ्यामुळेच घराबाहेर गेलेत . त्यांना घेऊनच घरी येईन ! नाहीतर ... " "सावित्री .... " तेनसिंग जोरात ओरडला . 
      तश्या सावित्री व काशिबाई दोघी दचकल्या . तेनसिंगला पाहून त्यांना आनंद झाला . सावित्री तेनसिंगकडे धावली . "अगं , हळू ! " तेनसिंग पटकन पुढे गेला ,तशी सावित्री त्याला घट्ट बिलगली . आणि रडायला लागली . तेनसिंग तिला समजावत राहिला . तेवढ्यात सावित्रीचं लक्ष दारात उभ्या असलेल्या दिलीप व संजय कडे गेलं . 
     ती पटकन तेनसिंग पासून बाजूला झाली . दिलीप आणि संजयला अवघडल्या सारखं झालं . त्यांना घरात जावं कि बाहेर थांबावं कळेना ? सावित्री पटकन डोळे पुसत म्हणाली ," भाऊजी ,या ना ! आत या ! दोघे घरात आले . "बसा ! " दोघे सोफ्यावर बसले . " तेनसिंग ,नेमकं काय चाललंय ? कळेल का ? बरं ,ते राहू दे ! तू पहिले कपडे बदल ! ओला झालायेस , आजारी पडशील ! वाहिनी तुम्ही पण जरा .. ..... " 
         दिलीपला पुढचं बोलायची गरज पडली नाही . सावित्री लाजली ,व मध्ये गेली . तेनसिंगला बिलगल्याने ती पण ओली झाली होती . पदर छातीला चिटकला होता . कुणाचं ही मन विचलित व्हावं ,अशी दिसत होती ती ! पण दिलीप आणि संजय तसे नव्हते ! समजदार होते ! 
    तेनसिंग कपडे बदलून आला ,तोवर काशीबाईंनी चहा ठेवला . मस्त मसालेदार ,गरमागरम चहा पिल्यावर तेनसिंगला तरतरी आली . पण दिलीप व संजय ला अवघडल्यासारखं झालं . ' आत्ता चहा घ्यायचा ? ' त्याने घड्याळ बघितलं ! पर्याय नव्हता . जागरण करायचं तर चहा हवाच !  घेतला थोडा थोडा ! 
         " तेनसिंग ,बोल काय झालंय ? " संजय ने न राहवून विचारलं . तेनसिंगने आतापर्यंत जे काही झालं ते थोडक्यात सांगितलं . दोघांचा विश्वास बसेना ! पण या गोष्टींमुळे एक सुखी कुटुंब उध्वस्त होतंय म्हटल्यावर त्याचा बंदोबस्त करणं , काही उपाय करणं ,पर्याय शोधणं , गरजेचं होतं . 
     बराच वेळ चर्चा करण्यात गेला . काशीबाईच्या म्हणण्यानुसार जे काही करायचं ते यातील अधिकारी व्यक्तीच करू शकणार होती . आपण डोकं आपटून फायदा नाही . सर्वात महत्वाचं म्हणजे सावित्री आणि समशेरला एकटं सोडणं धोक्याचं होतं ! 
    पण ,अशी व्यक्ती शोधणार कुठे ? आणि या जीवघेण्या पावसात त्यांच्या पर्यंत पोहोचणार तरी कसं ? ' विचार करून करून मेंदू शिणला . आणि ..... दारावर टकटक झाली . रात्रीचा एक  वाजला होता ! अशावेळी ,एवढ्या पावसात कोण असणार ? सगळ्यांच्या नजरेत प्रश्नचिन्ह होतं ! दारावर पुन्हा टकटक झाली . 
     तेनसिंगने दार उघडलं . बाहेर कुणी होतं ! त्यांना पाहून का कोण जाणे ? तेनसिंगच्या मनावरील ,शरीरावरील ,बुद्धीवरील ताण बराच कमी झाला . आणि ... तेनसिंग काही बोलायच्या आधी त्या व्यक्तीने घरात प्रवेश केला ! ....... 


                                                   TO BE CONTINUED ....         
           



   


               💝💝💝💝💝💝💝💝💝💝💝💝💝💝💝💝💝💝














Previous
Next Post »