झेंगाट - मराठी भयकथा - MARATHI HORROR STORY

                  झेंगाट - मराठी भयकथा - MARATHI HORROR STORY


BHUTACHYA GOSHTI
मराठी भयकथा 

                                          लेखक : योगेश वसंत बोरसे. 

     सिव्हिल हॉस्पिटलची  रुग्ण वाहिका ,शव वाहिका ,ज्यावर काम करणारा एक ड्राइवर . नांव गणेश . पण त्याला  'गण्याच' म्हणायचे . गण्या बोलघेवडा होता . म्हणजे त्याला बोलायला आवडायचं. ओळख लागायची नाही. इथं नोकरी लागल्यापासून कधीही फोन यायचा, रात्री अपरात्री  जावं लागायचं इमर्जन्सी. इच्छा असो की नसो. 

       कधी कुणी सोबत असायचं कधी नसायचं, सुरुवातीला त्रास झाला, नंतर सवय होतं गेली. इतकी की गाडीत चार प्रेत असली तरी पठ्ठया एकटा घेऊन जायचा. कधी घाबरला नाही. भीती हा काय प्रकार आहे हे माहित नसल्यासारखा. 

       असाच एके रात्री डेड बॉडी घेऊन चालला होता. एका बाईची व माणसाची. दोघे शेतात मरून पडले होते. पोलीस आले होते, पंचनामा झाला व प्रेतं पोस्टमार्टम ला पाठवली. पाठवली म्हणजे घेऊन जाणारा हाच होता. याच्या  अँब्युलन्स मध्ये  ठेवली. पोलिसांना याचा रेकॉर्ड माहीत होताच. व याला पण आपल्या हिमतीवर गर्व होता. त्यामुळे गण्या बेदरकारपणे निघाला. जवळ चपटी होतीच. थोडी मारली व निघाला शिट्ट्या मारत, गुणगुणत. 

           गण्याला काही सोयरं सुतक नव्हतं. तशी म्हण आहेच.' रोजचं मढं त्याला कोण रडं?' सिव्हिल हॉस्पिटलपासून गाव बराच लांब होतं. रस्ता एकपदरी होता. खराब होता. त्यामुळे हळूहळू जावं लागत होतं. बाई चांगली होती. गण्या विचार करत होता म्हणजे दिसायला चांगली होती, गडी बी बरा होता.कशे काय मेले काय माहीत ? जाऊ द्या आपल्याला काय ? पण बाई चांगली होती. 

           बरेच अंतर गेल्यावर एका ठिकाणी गण्याने अँब्युलन्स थांबवली.  रस्ता निर्मनुष्य होता. गावाकडचा रस्ता त्यात रात्र. एवढ्या रात्री कोण मरायला येतंय इथं ? जरा मोकळं व्हावं म्हणून जाऊन आला तोवर एकजण गाडीजवळ उभा होता. 

         " काय ड्रायव्हर रस्ता तुझ्या बा चा हाय का ? " " च्यायला हा कोण म्हणायचा ," " काय पावणं काय झालं ? " " काही न्हाई. तुमची अँब्युलन्स रस्त्यात दिसली. म्हनलं कीं कोण  हुशार आहे ते पाहून घ्यावं ." गण्या काही बोलला नाही. " एकटाच आहेस का ? " " हो. "  " मी येऊ का सोबत ? " " न्हाई मला सोबत लागत न्हाई मी एकटाच फिरतो. " " नावं काय म्हनला ? " गण्याने नाव सांगितलं.

       " सोबत लागत न्हाई म्हणतो मग काय गाडी रिकामी हाय आज ? " " न्हाई दोन बॉड्या आहेत. " "म्हणजे सोबत हायेच की ! " " मुडद्यांची कसली  आलीय सोबत ! " " का ? " " आओ सोबत काठी असली तरी माणसाला सोबत वाटते. " " अन तू म्हणतो सोबत न्हाई ?  "

         " आओ काठी हत्यार आहे, संरक्षण करते मुडदे काय करणार ? " काय करणार म्हंजी ? तुमाले काहीच माहीत नाही वाटतं ? " कशाबद्दल ? " गण्याने विचारलं. " आओ इथं एक गाव हाये. तिथं स्मशानाच्याजवळ एका झोपडीत एक म्हातारा राहतो तो मुडदे उठवतो म्हणे.

        गण्या खदाखदा हसायला लागला, हसून हसून पोट  दुखायला लागलं. हसता हसता थांबला व डोळे पुसून म्हटला, "  चला मी जातो उशीर झालाय " " न्हाई असं कसं ? आपला इशय आर्धवट राहिला ना ! आपण काय करू त्या म्हाताऱ्याकडे जाऊ हे मुडदे घेऊन. मंग पहा तो उठवतो का न्हाई ? " 

       गण्या विचारात पडला. काहीतरी करावं लागेल.  नसतं झेंगाट मागं लागलंय. हा काही जाऊ द्यायचा नाही. " असं करा, " गण्या म्हणाला, " गाडी धक्का स्टार्ट आहे. तुम्ही धक्का मारा मी चालू करतो. " " बरं ! पन मला येऊ द्या बरं का त्या म्हाताऱ्याकडे नाहीतर निघून जाशान. "

        तो मागच्या बाजूला वळला. गण्या अँब्युलन्समध्ये बसला व पळवली. " ओ भाऊ, असं काय करताय ? मला येऊ द्या ! " तो मागे पळायला लागला. गण्याला वाटलं की थोडा वेळ पळेल व थकून जाईल. पण नाही, तो गाडीमागे पळतच राहिला, आवाज देत राहिला.

       शेवटी एका जागी जाऊन अँब्युलन्स थांबली. तो पण थांबला.  " काय भाऊ ? शेवटी म्हाताऱ्याकडे पळतच आणलं ? " " म्हंजे ? " गण्याने विचारलं. " आओ ती काय झोपडी ! " तो म्हटला. " पण मी इथं कसा आलो ? कमाल करता भाऊ तुमी, आओ गाडी तुम्ही चालवत होतो की मी ? " गण्याचं डोकं गरगरायला लागलं. 

      ' हे काहीतरी वेगळंच चाललंय आज. इथून गेलं पाहिजे.' " बरं तुम्ही एक काम करा म्हताऱ्याला बोलावून आणा मी थांबतो इथं. " " पहा बरं ! नाहीतर परत पळून जाशाल. " " नाही रं बाबा तू जा तर खरं. " 

       तो झोपडीकडे गेला गण्याने अँब्युलन्स काढली व सुसाट निघाला. बराच वेळ गेल्यावर सावरला. नसतं झेंगाट सालं ! मुडदे उठवतंय म्हणे. गण्या त्याच्या धुंदीत गाडी चालवत राहिला. रस्त्यावर  काही अंतरावर एक बाई व माणूस उभा होता. हात देत होता. आता हे कोण म्हणायचे भूत का ? आपल्या विचाराने तो हसायला लागला.

 गाडी थांबली माणूस पुढं आला, ' याला कुठं पाहिलंय ? ती बाई त्याच्या मागे होती बाई चांगली होती. हिला पण...... तेवढ्यात त्या माणसाने आवाज दिला. " का ओ असं शोभतंय का ? " " मी काय केलं ? " गण्याने विचारलं. " आओ त्या म्हाताऱ्याच्या इथं आम्हाला सोडून इकडं पळून आला. "

        " ओ डोक्याचा भुगा करू नका ! मला टाइम झालाय आधीच बॉड्या न्यायच्या आहेत पोस्टमार्टमला. " टाइम झालाय ! " तो माणूस हसायला लागला.  " कोणत्या बॉड्या ? कोणता पोस्टमार्टम ? अवो बॉड्या तर पाहिजे. " " म्हंजे ? " " अरं येडछाप आमी तेच सांगतोय आम्हाला येऊ दे म्हणून. ती बाई पुढे येऊन म्हणाली.' हिला पण पाहिलंय बाई लय भारी आहे!' " तुमी येऊन काय करणार ? "

     " काय करणार म्हणजे ?  आरं तू आमाला घेऊन चालला होता ना, मंग फाडशील काय ? शिवशील काय ? अन दावशील काय ? " गण्याचं डोकं परत गरगरायला लागलं तो उतरला व मागच्या बाजूला गेला, दरवाजा उघडला. अँब्युलन्स रिकामी होती. व ती दोघे त्याच्याकडे पाहून खदाखदा हसत होती. 

        गण्या चक्कर येऊन खाली पडला. डोक्यात विचार आलाच. ' बाई चांगली होती पण जाता जाता मारून गेली ! ...............................................'


                                                            THE END 

VISIT OUR YOU TUBE CHANNEL

                                                लेखक : योगेश वसंत बोरसे. 

  ⇎⇎⇎⇎⇎⇎⇎⇎⇎⇎⇎⇎⇎⇎⇎⇎⇎⇎⇎⇎⇎⇎⇎⇎⇎⇎⇎⇎⇎⇎⇎









 

Previous
Next Post »