शाळा - SHALA - MARATHI HORROR STORY

                           शाळा - SHALA - MARATHI HORROR STORY


MARATHI HORROR STORIS
 मराठी भयकथा 

                                              लेखक :योगेश वसंत बोरसे. 

        एक छोटंसं  गांव . गावाजवळ टेकडी होती . टेकडी मोठी होती . व त्यावर एक मंदिर होतं .     टेकडीच्या पायथ्याशी थोडं  चालून गेल्यावर एक शाळा होती . शाळा ! जशी गावातील असते    तशीच . एक छोटं लोखंडी गेट . व कमान . कमानीवर शाळेचं नांव लिहिलेलं व शाळा क्र  . ३.     टेकडीवरचं मंदिर बाहेरील येणाऱ्या  लोकांना आकर्षित करायचं . निसर्ग रम्य वातावरण व हवीहवीशी वाटणारी शांतता . पण ज्यांना शांततेची सवय नसते त्यांना हि शांतता अंगावर येते . 

    
      असाच एक जण . जवळच्या शहरातून आलेला . शाम नांव होतं त्याचं . सरकारी नोकर . आणि फिरायची भारी आवड . त्यामुळे सुट्टी असली कि नवीन ठिकाणी फिरायला जाणे ठरलेले . या गावाबद्दल ऐकलं होतं ,मंदिराबद्दल ऐकलं होतं ,म्हणून आज वेळ काढला . व शाम निघाला . शाम गावात पोहोचला तसं दुरूनच मंदिराचं दर्शन झालं ,नकळत हात छातीजवळ गेला . व देवाचं स्मरण केलं ,प्रसन्न वाटलं . देवा ! हा प्रसन्नपणा , हि शांती कायम राहू दे . मिटलेल्या डोळ्यांपुढे देवाची प्रतिमा उमटली व अदृश्य झाली . 

  श्यामने एका टपरीवर चहा पाणी केलं ,तशी गावातल्या गावकऱ्यांनी आस्थेने चौकशी केली . येण्याचं कारण विचारलं , श्यामने आपला बेत सांगितला ,कि टेकडीवर जायचं , दर्शन घ्यायचं ,मनसोक्त हिंडायचं . तसे गावकऱ्यांच्या चेहेऱ्यावरचे भाव बदलले . ते श्यामच्या लक्षात आले . त्याने विचारलंही ,'' काय झालं ?'' "काही नाही ." "काही प्रॉब्लेम आहे का ?" गावकरी म्हटले ,"साहेब टेकडीवर जाताय खरे पण जास्त वेळ थांबू नका . म्हणजे अंधार व्हायच्या आत गावात येऊन जा . आणि या समोरच्या रस्त्याने जा ,व इकडूनच खाली या . पलीकडे शाळा आहे तिकडे फिरत बसू नका !" "शाळा ?" "हो ." "का ? तिकडे का नाही जायचं ?"       

      "साहेब , तुम्ही शहरातील माणसं ,तुमचा विश्वास नाही बसणार . जाऊ द्या ." "पण सांगा तर खरं !" "तिथे रात्री शाळा भरते . तिकडे नका जाऊ !" शामला समजत नव्हतं यांना नेमकं काय म्हणायचं आहे . "रात्री शाळा भरते ? मग  चांगलं आहे कि !ते शहरात पण नाइट स्कुल चालतात ". " साहेब शहरातलं माहित नाही ,पण इथे काही वेगळच चालतं . तुम्ही तिकडे नका जाऊ . " आणि ते गावकरी निघून गेले . 

   
शाम एकटक टेकडीकडे पाहत राहिला . लक्ष मंदिराकडे होतं . पण मनात विचार शाळेचे चालू होते . मगासचा शांतपणा कुठल्याकुठे पळाला होता . एक अस्वस्थता मनात घर करायला लागली . मनात एक विचार आला ,जाऊ दे . इथूनच नमस्कार करू व परत जाऊ . पण लगेच दुसरा विचार हजर. इथपर्यंत आलोच आहोत तर वर जाऊनच येऊ . विचारांची शृंखला . एकामागे एक विचार . 

      मनाने कौल दिला . उठून उभा राहिला . टपरीवाल्याकडे बघितलं ,तो काही बोलेल असं वाटलं , काही सांगेल असं वाटलं . पण टपरीवाल्याला काही घेणं नव्हतं . त्याने शामची दखलही घेतली नाही . श्यामने चहा पाण्याचे पैसे दिले . व निघाला मंदिराकडे . टेकडीच्या पायथ्याशी पोहोचला . जमिनीला हात लावून नमस्कार केला . व टेकडीवर चढायला सुरुवात केली . टेकडी मोठी होती . नेहमीच्या वापराने पाऊलवाट पडली होती . तशा काही पायऱ्या पण होत्या . पण टेकडी चढण्याचा आनंद घ्यायचा होता . त्यामुळे  पायऱ्यांचा प्रश्नच नव्हता .

   वर मंदिराकडे बघत व आपली नवीन वाट काढत शाम चढत होता . आणि , अभावितपणे चढता चढता त्या बाजूला आला जिकडून शाळा दिसत होती . शाळा नजरेस पडताच शामला गावकऱ्यांचे बोलणे आठवले . ' साहेब तिथे रात्री शाळा भरते .' तसा  शाम थांबला व लक्षपूर्वक शाळेकडे बघू लागला . लक्ष कमानीकडे गेलं , गेटकडे गेलं , गेट जुनं लोखण्डी  होतं ,शाळेचा आवार  पण जुन्या पद्धतीचा . बांधकाम जुनंच होतं . कौलांनी शाकारलेलं ,आजच्या स्लॅबच्या जगात इथे अजूनही कौल आहेत ? इथे काय पाऊस जास्त पडतो  ? पण तशी तर काही चिन्ह नाहीत !

    पण आत्ता दिवस आहे ,कुणी दिसत नाही , आज शाळेला सुट्टी असेल आणि श्यामच्या चेहेऱ्यावर स्मित हास्य चमकलं . 'बिचारे गावकरी ,साधे भोळे ! कुणी काही ही  सांगतं हे विश्वास ठेवतात . इथे काय असणार ?' श्यामने मनातील विचार झटकून टाकले . व लक्ष मंदिराकडे केंद्रित केलं . आता पावलं वरच्या दिशेने झपाझप पडत होती . थोडं वर गेलं कि थांबायचं मागे वळून पाहायचं . आपण किती वर आलो ते . व खालचा निसर्ग ,खालचं दृश्य डोळ्यात साठून घ्यायचं . 

 
'मोबाईल आणायला हवा होता . कसा काय राहिला काय माहित ?' फोटो काढता आले असते , मोबाईल च्या आठवणीने मन उदास झालं . लक्ष परत शाळेच्या दिशेने गेलं . 'आपण सारखं शाळेकडे का पाहतोय ? शाम चमकला . काय कारण आहे ?' 'गावकऱ्यांनी  डोक्यात खूळ  घातलं काही तरी . मनाचे खेळ दुसरं काय ?'पाठ फिरवली व मंदिराकडे जाऊ लागला  . 

    शाम मंदिराच्या आवारात पोहोचला . मंदिर जुनं होतं, लहान होतं ,पण छान होतं . हातपाय धुवायची व्यवस्था होती . हातपाय धुतले , मंदिरात दर्शन घेतलं मूर्ती जुन्या काळातील होती . चेहेऱ्यावर उग्रभाव होते व गाभारापण अंधारला होता . एक वयस्कर व्यक्ती मंदिरात होती . त्याच्या असण्याने गाभाऱ्यातील गूढपणा वाढला होता . सोबत वाटत नव्हती . मनावर दडपण येत होतं . 

     'आज सुट्टीचा दिवस ! पण इकडे कुणी फिरकत हि नाही ? नुसती शांतता .' दर्शन घेतलं व तिथेच बसला . छान वाटत होतं , मंदिराबाहेर आला ,सभोवताली नजर फिरवली . फेरफटका मारला ,लक्ष मावळतीकडे गेलं . सूर्य मावळतीकडे झुकला होता . शाम दचकला , 'साहेब अंधार व्हायच्या आधी गावात येऊन जा .' गावकऱ्यांनी सांगितलं होतं .' त्या मंदिरातल्या बाबांना विचारावं, त्यांना नक्की माहित असणार.'शाम मंदिरात शिरला ,पण मंदिरात बाबा नव्हते .' हे गेले कि काय ?' शाम बाहेर आला . नजर खालच्या दिशेने गेली . कुणीतरी झपाझप खालच्या दिशेने जात होतं . आपण यांच्या सोबत जायला हवं होतं . उगाच टाईमपास केला .

           
आता अंधार पडायला सुरुवात झाली होती . शाम घाईघाईत निघाला . चप्पल पायात   अडकवली . व निघाला . आणि ! खचकन  पायात काटा घुसला . चपलेच्या  आरपार. 'आपण   बूट घालायला हवे होते आज .' मनात विचार आला 'पण एवढा मोठा काटा बुटातूनही घुसला असता , नसता घुसला ?' विचार करून उपयोग नव्हता . लंगडत लंगडत एका मोठ्या   दगडापर्यंत गेला . तिथे टेकून पायातला काटा काढला . भळाभळा वाहणारं  रक्त हाताला लागलं . आता काय करायचं ?रक्त कसं थांबेल ? वर पाणी आहे पाण्याने धुवून घेऊ . पण वर तर कुणीच नाही ? मग असं खालपर्यंत कसं जाणार ?वर जाऊ ,पाय धुऊ . जाऊ परत .

       शाम अंधारात लंगडत वर कसातरी पोहोचला . पाय धुतले ,रक्त वाहत होतं . तशी तिथे पाण्याची धार  धरली . काही वेळात रक्त थांबलं . पण पाय लंगडत चालल्याने दुखावले होते . थोडं बसावं म्हणून तिथेच टेकला . आपण पायऱ्यांनी  जायला हवं होतं ,लवकर खाली पोहोचलो असतो . आता अंधारात पायऱ्या कुठे शोधणार ? तरी गावकरी बोलले होते ,लवकर खाली या !आपणच हुशारी केली . आता थांबण्यात अर्थ नव्हता . जसं  जमेल तसं उतरून गावात पोहोचणं भाग होतं . 

     शाम  उठला .लंगडत ठेचकाळत घाईघाईत उतरू लागला . थोडं उतरल्यावर त्याला खालच्या बाजूला प्रकाशाची तिरीप दिसली . उजेड खालच्या दिशेने चालला होता . म्हणजे अजून कुणीतरी होतं ! कोण ?मग आपल्याला का भेटलं नाही ?पण मनाला हुरूप आला . चला सोबत झाली ,म्हणून शाम त्या दिशेने उतरू लागला . कुणीतरी कंदील घेऊन उतरत होतं . त्याला कुठे पोहोचायची घाई असावी . शामची पावलं झपाझप पडायला लागली . आपल्याला उतरायला वेळ लागतोय ! विचार करून उपयॊग नव्हता . कंदिलाचा मागोवा घेत शाम पायथ्याशी आला . 

      चला ! उतरलो एकदाचे ! कंदिलाच्या उजेडात समोर लक्ष गेलं . लोखंडी गेट उघडं होतं ,मध्ये लगबग सुरु होती . आतून आवाज येत होते , शाम दचकला . शाळा ! कंदील पुढे सरकत राहिला ,शाळेच्या आवारात ,आत ,आत . शाम त्याच्यामागे नकळतपणे जात  राहिला . शाळेची बैठी इमारत , इमारत म्हणण्यापेक्षा खोल्या म्हणणे चांगले . 

            इथे लाईट नाही ,काही नाही . मग प्रकाश कुठून पडतोय ? आणि आवाज हि येताहेत      घोकंपट्टीचे . पण हे नेमकं काय बोलतायत ?काहीच कळत नाहीय ? फक्त आवाज येतायेत . गोंधळ , मस्ती , दंगा . कंदील पुढे सरकत गेला , शाम त्याच्या मागेमागे . कंदिलाचा उजेड एका खोलीजवळ जाऊन थांबला . त्याने  फिरून शाम कडे बघितलं ,शाम मागेच होता . उजेडात पाटी दिसली . 'मुख्याध्यापक ' ! तो जो कोणी होता ,तो आत गेला . शाम मागे मागे .

    "साहेब , नवीन विद्यार्थी आणलाय ." समोरच्या खुर्चीत कुणी बसलं होतं .त्याचा हसण्याचा आवाज आला . " शाब्बास ! तू कंदील ठेऊन जा ." शामचं लक्ष समोर गेलं .अजून खुर्च्या होत्या . कुणीतरी बसलेलं होतं ,व सर्व एकटक पाहत होते शाम कडे . शाम ने त्यांना पाहिलं व त्याला पहिल्यांदाच जाणवलं ,चूक केली ! भयंकर चूक केली !

    या गावातच यायला नको होतं ,गावकऱ्यांचे ऐकायला हवं होतं . श्यामच्या काळजाचा ठोका चुकला . अंगाला घाम फुटला . त्यांचे चेहरे विचित्र होते , धडकी भरवणारे होते . पण ओळखीचे होते . यांना कुठेतरी पाहिलं आहे ! 

    डोक्यात लक्ख प्रकाश पडला . हे तर .... हे तर गावकरी जे सकाळी भेटलेले. मग हे इथे काय करताय ? व असे अंधारात आपली वाट का पाहात बसले होते ? यांना खात्री होती आपण येणार म्हणून. की आपल्याला इथे आणलं गेलं ? शाम चा धीर सुटला तो वर्गाबाहेर धडपडत आला. व गेटच्या दिशेने पळायला लागला. मागून हसण्याचे आवाज येत होते. धडपडत पायऱ्या उतरल्या व पळायला लागला. गेट बंद होते.

     शाम धडपडला. खाली पडला. डोकं दगडावर आपटलं होतं. रक्ताची मोठी धार लागली होती. हसण्याचे आवाज जवळजवळ यायला लागले. आणखी जवळ. श्यामच्या डोळ्यासमोर अक्षरे चमकली, ' शाळा क्र. ३ '  ' विदयार्थी क्र. ३०१ ' ' हजेरी क्र. १९ ' हसण्याचे खिदळण्याचे आवाज वाढत गेले . गर्दी वाढत गेली. प्रकाश कमी कमी होत गेला. आवाज कमी कमी होत गेला. व नंतर शांतता. 

    भीषण शांतता. जसं काही घडलंच नाही. शाम या जगात नव्हता. त्याचा दुसऱ्या जगात प्रवेश झाला होता. नवीन शाळा, नवीन विदयार्थी त्याचे लचके तोडत होते. मित्रांनो ही शाळा क्र. ३ होती. बाकी शाळा कुठे आहेत काहीच माहीत नाही. तुमच्या आजूबाजूला असली शाळा असेल तर जरूर सांगा तोपर्यंत सतर्क रहा ! सुरक्षित रहा ! आनंदी रहा ! 

                                    TAKE CARE AT NIGHT ! 
                         

                              HAVE A GOOD EVERY NIGHT !

                                           लेखक : योगेश वसंत बोरसे. 

   

⇎⇎⇎⇎⇎⇎⇎⇎⇎⇎⇎⇎⇎⇎⇎⇎⇎⇎⇎⇎⇎⇎⇎⇎⇎⇎⇎⇎⇎⇎⇎                                                                  ⇎⇎⇎





                      




 

Previous
Next Post »