पित्तर - मराठी भयकथा - MARATHI HORROR STORY

                     पित्तर - मराठी भयकथा - MARATHI HORROR STORY                          

MARATHI BHAY KATHA
 मराठी भयकथा 

                                        लेखक :योगेश वसंत बोरसे 

      पाटलांचा वाडा. वाडयात गर्दी झाली होती. वातावरण गंभीर होतं. शांत होतं. काही जणांची कुजबुज चालू होती. पाटलांच्या वडिलांचा देहांत झाला होता. वय असेल ८५ ते ९० पर्यंत. पण माणूस कणखर होता. सगळे त्यांना आबा म्हणायचे. तसं त्यांचं नाव भिकाजी होतं पण त्यांच्या आईशिवाय त्यांना कुणी नावाने हाक मारली नव्हती. सर्वांना आबाच माहीत होतं. तर हे आबा आज वारले होते. मागे मोठा  परिवार होता. 

   स्वतः पाटीलसाहेब सर्वात मोठे होते. त्यांच्या पाठचे तीन भाऊ व एक बहीण. बहीण सर्वांची लाडकी. घरात कोणत्या गोष्टीची कमतरता नव्हती. एक गोष्ट सोडून. पाटीलसाहेबांना मुलबाळ नव्हतं. लग्न होऊन बरीच वर्षे झाली होती. सर्व उपाय करून झाले होते पण व्यर्थ. काही उपयोग होत नव्हता. पाटीलसाहेबांमध्ये आबांचा खूप जीव होता. अक्षरशः जीव की प्राण होते. पण आपल्या या लाडक्या मुलाचा वंश पुढे वाढत नाही, ही एकच गोष्ट त्यांना खात होती. व त्यासाठी ते काहीही करायला तयार होते. अगदी काहीही !

     आणि अशातच ही घटना घडली. आपल्या परिवाराला पोरकं करून आबा देवाघरी गेले होते. वाडाही त्यांच्यामागे पोरका झाला होता. रात्री आबा फेरफटका मारायला शेतात जायचे. काल ही गेले होते. बरं प्रकृती धडधाकट होती. आणि रोजची सवय असल्याने घरच्यांना पण काही वाटत नव्हतं. पण आबा काल  गेले, ते परत आलेच नाही. बराच वेळ वाट बघून मुलं रात्री शोधायला निघाली. गडी माणसं होतीच. सालदार होते. सर्वांनी शोध घेतला पण आबांचा पत्ता नव्हता. आणि सकाळी सकाळी ५च्या सुमारास एक गडी बोंब मारत वाडयात आला. त्याला शेतातील विहिरीत आबा दिसले होते. तो काही विचार न करता तसाच पळत सुटला. व पाटीलसाहेबांना येऊन सांगितलं तसं आख्ख गाव आख्खा वाडा जागा झाला. सर्व जण शेतात पोहोचले.

       ज्यांना पोहोता येत होतं त्यांनी विहिरीत उड्या मारल्या. व काही वेळात आबांना बाहेर काढण्यात आलं. आबांची प्राणज्योत विझली होती. घटना घडून गेली होती. मान्य करणं भाग होतं. पण एक गोष्ट पाटीलसाहेबांसकट सर्वांनाच खटकली होती. आबा पट्टीचे पोहणारे होते. त्यामुळे ते विहिरीत बुडून मरतील हे शक्यच नव्हतं. एकतर दुसरीकडे मारून विहिरीत टाकण्यात आलं असावं किंवा काहीतरी अगम्य, अतर्क्य घडलं असणार होतं जे आता रहस्य बनून राहणार होतं. पोलीस आले,  पंचनामा झाला. व्यक्ती वयस्कर होती गावात दरारा होता. त्यामुळे चिरफाड करणं टाळलं होतं. घरातील सर्वांना त्यांचं अकस्मात जाणं खटकत होतं. पण  इलाज  नव्हता. 

        अंत्यसंस्कार झाले. जो तो आपापल्या घरी गेला. फक्त पाटलांची नातेवाईक मंडळी तेवढी वाडयात होती. आणि पाटीलसाहेब ओसरीवर खांबाला टेकून बसले होते. हे कसं काय झालं ?विचार करून उपयोग नव्हता. पण मन आणि बुद्धी ऐकणारे नव्हते. जे घडलं त्याच्या मुळाशी जाणं गरजेचं होतं. 

       
 बघता बघता दिवस मावळला. रात्र झाली व पाटीलसाहेब काही ठरवून घराबाहेर पडले. पाटीलबाईंनी त्यांना समजावलं, एकटे जाऊ नका. कुणाला तरी सोबत न्या. पण पाटलांना ते मान्य नव्हतं. एकटे असले म्हणजे व्यवस्थित शोध घेता येईल. ते एकटेच निघाले. हातात एक काठी घेतली व टॉर्च घेतला. शेताकडे गेले. त्यांना जाणवलं की आपला पाठलाग कुणीतरी करतंय.  

        त्यांनी  मागे टॉर्च मारला. " कोण हाय रं ? पुढे ये ! " " आप्पा मी ए ! " आवाज ओळखीचा होता. त्यांच्या विश्वासातला होता. " का रं ? काय झालं ? " " थोडं बोलायचं होतं. " " मग बोल की ! " " थोडं थांबता का ? " पाटीलसाहेब थांबले. आणि तो भराभरा बोलायला लागला. काही वेळाने तो थांबला. " हे समदं खरं हाय का ? " " पोराची आन घेऊन सांगतो खरं हाय. " 

        पाटीलसाहेब परत फिरले. व त्याच्या बरोबर जाऊ लागले. काही वेळात ते एका झोपडी जवळ पोहोचले. झोपडीतून प्रकाश व धूर बाहेर पडत होता. बहुतेक काहीतरी पूजा चालली असावी. पाटीलसाहेब झोपडीच्या दारात जाऊन उभे राहिले व आत डोकावलं.
 

       आतल्या व्यक्तीने संमतीपूर्वक मान डोलवली. आप्पा मध्ये जाऊन बसले. मांडी घालून. पूजा संपायची वाट बघत. पूजा बरीच मोठी होती. काही वेळाने संपली. तसा तो मांत्रिक उठला व आप्पांना खूण  केली. तो मांत्रिक झोपडीच्या बाहेर पडला. आप्पा त्याच्या मागे मागे. मांत्रिक खूप वेगाने चालत होता. आप्पांना व त्यांच्या माणसाला जवळ जवळ पळावंच लागत होतं. मांत्रिक पाटीलसाहेबांच्या शेतातील विहिरीजवळ येऊन थांबला. तसे हे दोघेही थांबले. मांत्रिकाने हातातील रक्षा विहिरीच्या दिशेने फुंकली व मंत्र पुटपुटला. 

      आणि काय आश्चर्य ! खरं होतं की भास ! समोर एक आकृती प्रकट होत होती. वातावरण बदलत होतं. व काही वेळात आकृती स्पष्ट झाली. पाटलांना हसावं की रडावं कळेना. पण मांत्रिकाने त्यांना हाताने बाजूला केलं व शांत राहायला सांगितलं. आणि समोर आदल्या रात्रीचा प्रसंग उभा राहिला. 

       समोर दिसणारी आकृती क्षणात नष्ट झाली. तसे पाटीलसाहेब सैरभैर झाले. मांत्रिकाने त्यांना हाताने शांत बसायची खूण  केली.  शेताकडे इशारा केला. पाटीलसाहेबांनी तिकडे बघितलं आणि त्यांना आनंद झाला. त्यांचे आबा समोरून येताना दिसले. 

       
 सोबत कुणी होतं, ती व्यक्ती ओळखीची नव्हती. पण आबा ओळखत असावेत असं वाटत होतं. दोघं बोलत बोलत विहिरीजवळ आले. आणि आबांचा आवाज स्पष्ट ऐकू आला. " बुवा काही करा. काहीही करा, पण माझ्या आप्पाचा वंश वाढला पाहिजे. त्यासाठी मी काहीही करेल. अगदी काहीही. " 

         " हे बघ ! विचार करून बोल ! " " बुवा सांगा तुम्ही. " बुवांनी काही वेळात डोळे बंद केले. आबा अधीरतेने वाट पाहात राहिले. काही वेळाने बुवांनी डोळे उघडले. व गंभीर मुद्रेने आबांकडे पाहिले. आबा हात जोडून उभे होते. डोळ्यात अभिलाषा होती. लाचारी होती. थोडे वाकूनच उभे होते. बुवांसमोर नतमस्तक झाल्यासारखे. पाटील साहेबांकडून पाहावत नव्हते. त्यांना वाटलं आता जावं आणि आबांना मिठी मारावी.पण ते शक्य नव्हतं . मांत्रिकाने त्यांना पक्क धरून ठेवलं होतं . व आता त्यांच्याही लक्षात आलं , हे समोरचं दृश्य आपण बदलू शकत नाही . जर यावर विश्वास ठेवला तर पुढचं काही समजेल . नाहीतर आबा का व कसे गेले ?कधीच कळणार नाही . शांत बसणं गरजेचं होतं ,म्हणून ते थांबले होते . 

        आणि समोर बुवांनी आबांच्या डोक्यावर हात ठेवला . व काहीतरी मंत्र पुटपुटला . थोड्यावेळाने हात  काढला ,व विहिरीकडे चलण्याची खूण केली .विहिरीचा काठ मोठा होता . तिथे विसावले . आणि बुवा सांगायला लागले . " हे बघ ,तुझ्या घराण्यात पितृदोष आहे . त्यामुळे तुझ्या अप्पाला मुलबाळ होत नाही . " "पण नेमकं काय आहे ?" 

        "हे बघ ,जास्त खोलात जाऊ नको ! तुला ते परवडणारे नाही . फक्त मी सांगतो ते करणार असशील तर पुढचं बोलण्यात अर्थ आहे . नाहीतर तुझ्या अप्पाला मुलबाळ होणे शक्य नाही . " "तुम्ही सांगा तर खरं काय ते ?" बुवा काही वेळ शांत बसले . त्यांना सांगावं  कि नाही कळत नव्हतं . कारण आबा त्यांच्याही जवळचे होते ."हे बघ एक बळी  द्यावा लागेल ! " आबांना आश्चर्य वाटलं "काय ?" 

     "हो !तो हि घरातलाच ! आप्पाच्या जवळचा . तरच ते शक्य आहे . तुझ्या वडिलांनी या विहिरीत एका गडी माणसाला मारून फेकलं होतं . ते कुणालाही कळालं नाही . त्यांची माणसं विश्वासू होती ,रातोरात प्रेत गायब केलं ..पण आत्म्याचं काय ? तो तर स्वतंत्र होता . त्याचा बंदोबस्त केला नाही . किंबहुना त्यांना गरजेचं वाटलं नाही . त्या आत्म्याचा शाप तुझ्या घराला लागला आहे . तुझ्या आप्पाला लागला आहे असे दिसते . "  

     "याला उपाय एकच ! एक बळी  देणे . किंवा त्या आत्म्याला पाचारण करून त्यालाच उपाय विचारणे  ! पण तो आल्यावर काय मागेल माहित नाही . ते घेतल्याशिवाय परत जाणार नाही !पण दोष मात्र खात्रीशीर निघेल . नाहीतर एक बळी देऊन समस्या दूर होऊ शकते . तू ठरव काय करायचं ते !" थोडावेळ कुणीच काही बोललं नाही . नंतर आबांचा निग्रही स्वर आला . त्यांनी हात जोडून बुवांना विनंती केली ,"बुवा ,त्या आत्म्याला बोलवा ! मला त्याची माफी मागायची आहे . तो देईल ती शिक्षा भोगायला मी तयार आहे . "

      "आबा ते इतकं सोपं नाही , परत विचार कर . तो काहीही मागू शकतो ! " आबा त्यांच्या विचारावर ठाम होते . बुवांचा नाईलाज झाला . त्यांनी विहिरीजवळची जागा थोडी साफ सुफ केली . व खाली ध्यान लावून बसले . तसे आबाही त्यांच्या बाजूला हात जोडून बसले .व काही वेळात समोर एक धुरकट आकृती अवतीर्ण झाली . आबा एवढे धडधाकट पण आयुष्यात प्रथमच असा प्रकार पाहत होते . त्यांचं अंग थरथरायला लागलं . बुवांचे डोळे बंद होते ,पण तरीही त्यांनी आबांना हाताने दाबून धरलं ,थोड्यावेळाने डोळे उघडले , समोर आकृती पूर्ण मानवी रूपात प्रकट झाली ,त्याच्याकडे पाहून आबांनी त्याला साष्टांग दंडवत घातला . 

     "ए बाबा ,तू कोण हायस मला माहित नाही . पण आम्हाला माफ कर ,माझ्या पोराला लेकरं बाळ होऊ दे . तुला काय पाहिजे ते मी देतो " व पुन्हा लोटांगण घातलं .पण समोरची आकृती एवढी सहज जुमानणार नव्हती . "तुला सोडून देऊ ! तुझ्या बापाने मला मारून मारून विहिरीत फेकलं ,आणि मेल्यावर पुन्हा बाहेर काढून तुकडे तुकडे केले . अन जमिनीत गाडलं . अन तुला सोडून देऊ ? ते शक्य नाही ! आणि एक लक्षात ठेव , हि तुझ्या पोरांची शेवटची पिढी राहील ,त्यानंतर एकही पिढी मी पुढे वाढू देणार नाही ! "

     त्याचा रुद्रावतार पाहून आबांची बोबडी वळाली . त्यांना समजेना काय बोलावं ? तेव्हा बुवा बोलले ,"हे बघ शांत हो !थोडं सबुरीने घे . तुलाही मुक्ती मिळणं गरजेचं आहे कि नाही ? शिवाय एका माणसाच्या कृतीची शिक्षा कुटुंबाने ,पुढच्या पिढ्यांनी का भोगावी ?" "ती तर भोगावीच लागेल ,माझं कुटुंब उध्वस्त झालं ,बायको मेली ,पोरं उघड्यावर आली ,याच्या बापामुळे !"त्याचा आवाज थरथरत होता . 

  बुवा पुन्हा बोलले ,"हे बघ शांत हो ! जे झालं ते आपण बदलू शकत नाही . पण काही उपाय तर करू शकतो , माझ्या मते पहिले तुझ्या अस्थी उरल्या असतील  त्यांचं विसर्जन करणे गरजेचं आहे . "तसा  तो आत्मा थरारला ,स्वरात कंप आला . " या विहिरीशेजारीच त्या झाडाखाली याच्या बापाने माझे तुकडे करून पुरले होते " व तो आत्मा भेसूर स्वरात रडायला लागला . मी तेव्हा पासून भटकतो आहे मला शांती नाही . मला मुक्ती पाहिजे !मला मुक्ती पाहिजे !" तो पुन्हा कडाडला . बुवांनी त्याला मंत्र शक्तीने थोडं शांत केलं . 

       " ठीक आहे . होऊन जाईल ! " "आता यांना शापमुक्त कर व याचा वंश वाढू दे !" बुवा बोलले ." नाही ते शक्य नाही ! याच्या बापाने माझा बळी घेतला ,मी याला पुर्ण नीर वंश   करिन, नाहीतर याचा  बळी घेईन .बोल काय करायचं ?" तो रागाने थरथरत म्हणाला . आबांनी पुन्हा त्या आत्म्या पुढे लोटांगण घातलं . मी तयार आहे ,पण माझ्या मुलांना धक्का लावायचा नाही . मला निर्वांश करायचं नाही ,माझ्या मुलांचं वंश वाढला पाहिजे ,माझ्या आप्पाचा वंश वाढला पाहिजे . "

     काही वेळाने तो आत्मा शांत झाला त्याने सहमती दिली आणि त्याने आबांच्या शरीरात प्रवेश केला !आबा विहिरीवर उभे राहिले व शरीर विहिरीत झोकून दिलं . बुवा काही क्षणात अंतर्धान पावले . नाहीसे झाले . तसा पाटील साहेबांनी हंबरडा फोडला . ते रडायला लागले . व विहिरीकडे पळाले . पण उशीर झाला होता ,आता काहीही होऊ शकत नव्हतं . ते आबांच्या नावाने टाहो फोडायला लागले . व विहिरीच्या कठड्यावर रडत राहिले . मांत्रिक त्यांचं सांत्वन करत राहिला . 

     काही वेळाने ते शांत झाले . जे बघितलं ते खोटं असणं शक्य नव्हतं . त्यांनी चार गाडी माणसं बोलावली आणि त्या झाडाखाली खणायला सांगितलं . काही वेळात तिथे काही हाडांचे , अस्थींचे अवशेष सापडले . ते सर्व एका गोणीत भरून नदीमध्ये विसर्जन केले . व पहाटे पहाटे घरी पोहोचले . जे झालं ,जे पाहिलं होतं ,ते कुणाला सांगण्यासारखं नव्हतं  सांगून उपयोग नव्हता .त्यांनी विधिवत शांती केली ,जशी मांत्रिकाने सांगितली . दिवस जात राहिले. 

    आणि ,काही दिवसांनी ! वाड्यात गोड बातमी आली . पाटील साहेबांच्या पत्नी पाटलीन बाई आई होणार होत्या . पाटील साहेब बाप होणार होते . 

     ही  बातमी पाटील साहेबांना कळाली व त्यांच्या डोळ्यात अश्रू उभे राहिले . त्यांच्या वडिलांनी वंश वाढावा म्हणून बलिदान दिलं होतं त्यांचा शब्द खरा ठरला होता ,खरा केला होता .

     काही दिवसांनी पाटलीन बाईंनी एका मुलाला जन्म दिला . पाटील साहेब लगबगीने त्यांच्या जवळ गेले ,मुलाला बघितलं ,जवळ घेतलं व काही वेळात नजरा नजर झाली . नजर ओळखीची होती . पाटील साहेबांनी बाळाला हळूच छातीशी कवटाळलं . व अश्रू ढाळत राहिले . पण हे अश्रू आनंदाचे होते . 

   कारण त्यांचे आबा त्यांना परत भेटले होते ,त्यांच्याजवळ परत आले होते !.... 


                                                        THE END   

VISIT OUR YOU TUBE CHANNEL            

लेखक :योगेश वसंत बोरसे . 


  • ALL RIGHTS RESERVED AT YOGESH BORSE & BGSM

   ⇎⇎⇎⇎⇎⇎⇎⇎⇎⇎⇎⇎⇎⇎⇎⇎⇎⇎⇎⇎⇎⇎⇎⇎⇎⇎⇎⇎⇎⇎                                                          ⇎⇎⇎⇎







    


 

 

  

   

 

Previous
Next Post »