तपस्वी | मराठी रहस्य कथा - MARATHI HORROR STORY

तपस्वी |  मराठी रहस्य कथा - MARATHI HORROR STORY


marathi horror stories
 marathi suspense stories 

                                                    -: तपस्वी  :-

                                              लेखक :- योगेश वसंत बोरसे . 

         

 ऋषी, मुनी, साधू हिमालयात तपश्चर्या करून सिद्धी मिळवतात, असं ऐकलं होतं. पण आज समोर जी व्यक्ती होती तिला पाहून खात्री पटली होती, की हे एक निखळ सत्य आहे. 

  तो महान पुरुष, महात्मा समोर बसला होता. चेहेऱ्यावर तेज एवढं होतं की पाहाताक्षणी माणूस नतमस्तक व्हावा. नजर अशी होती की आरपार वेध घेत होती, व मन शांत करणारी होती. एका गावाबाहेरील मोठ्या वृक्षाखाली बसून ध्यान धारणा चालली होती. चेहेऱ्यावरील तेज पाहून बोलता बोलता गावात बातमी पसरली व काही वेळात तिथे गर्दी वाढायला लागली. लोकांच्या कुजबुजण्याने वातावरण बदललं होतं. जो तो महात्माकडे बघून प्रभावित झाला होता. पायावर डोकं टेकवायचा मोह आवरत नव्हता. 

  साधना संपली असावी. महात्म्याने अलगद डोळे उघडले व आपली शांत, स्निग्ध, द्या असलेली नजर समोरच्या समूहावर फिरवली. प्रेमाने त्यांचा हात आशीर्वाद देण्यासाठी  उठला. सर्वांनी मनोभावाने हात जोडले. महात्म्याच्या तोंडून शब्द निघाले, " या गावातील मुख्य माणसांनी मला भेटून जावे. " काही वेळ इतर गोष्टी सांगितल्यावर महात्मांनी हात वर केला, " आजच्यासाठी एवढं पुरेसं आहे, आपण पुन्हा लवकर भेटू. " 

     आणि डोळे बंद केले. गावातील चार - पाच मुख्य लोकं मागे थांबले. बाकी गर्दी निघून गेली. ते चार - पाच जण तिथेच बसले. स्वामींची साधना संपण्याची  वाट पाहत. बराच वेळ झाला, दुपार झाली, संध्याकाळ झाली. हे कंटाळले. आपल्याला बसवून हे डोळे लावून बसले म्हणजे काय ? एक दोन जणांनी आवाज देण्यास सांगितले, पण तसं कुणी केलं नाही.  स्वामींच्या तेजापुढे ते हतबल झाले होते. मन शांत होते, शरीर थंडावले होते. 

     

 रात्र व्हायला सुरुवात झाली व काही क्षणात स्वामींनी डोळे उघडले व समोर नजर टाकली. पाच व्यक्ती बसल्या होत्या. त्यांनी स्मितहास्य करून त्यांच्याकडे बघितलं व विचारले, " कंटाळला असाल वाट बघून ? " उत्तर कुणी दिलं नाही. " तुम्ही थांबलात, मला आनंद वाटला. मी काही सांगण्यासाठी तुम्हाला इथे बोलावलं आहे. " " बोला स्वामी ! " पाटलांनी तितक्याच शांतपणे सांगितलं. 

  काही क्षण शांततेत गेले. " या गावावर संकट येऊ घातलं आहे, भीषण संकट ! " पुन्हा शांतता. पाटील, सरपंच एकमेकांकडे पाहू लागले. पाची जणांची नजरानजर झाली, चेहेऱ्यावर चिंता जमा झाली. पाटलांनी पुन्हा स्वामींना हात जोडून नमस्कार केला व विनंती केली, " स्वामी काही ही करा, मार्गदर्शन करा व गावाला या संकटातून मुक्त करा ! " सरपंचांनी हात जोडून विचारलं, " स्वामीजी असं नेमकं काय संकट येणार आहे ? " 

  स्वामींचा चेहेरा गंभीर झाला. " संकट एकदम येणार नाही, तुम्हाला काय कुणालाही कळणार नाही. तुम्ही आजपर्यंत जे बघितले, अनुभवले तसे काही नाही, हे अमानवी संकट आहे, त्यामुळे चिंतेचा विषय आहे. " 

  " स्वामी तुम्ही असताना आम्ही काळजी का करावी ? " देशमुख बोलले. " तुमच्या सारखी मोठी व्यक्ती असताना आम्हाला कशाची भीती नाही. " " तुमचं म्हणणं बरोबर आहे, मी साधना करून सिद्धी प्राप्त केल्या ते लोककल्याणासाठीच. पण काही सिद्धी प्राप्त करतात ते त्यांच्या स्वार्थासाठी, स्वतःच्या स्वार्थासाठी. जगाला वेठीस धरणारे कितीतरी महाभाग  आपण पाहिलेत. त्याने सर्वमानवी शक्तींना त्याच्या ह्यात ठेवलं आहे. व ती शक्ती अजून वाढावी म्हणून तो तुमच्या गावात येणार आहे. " 

  " पण आमच्याच गावात का ? " काही वेळ पुन्हा शांततेत गेला. " तुमचं गाव चारही बाजूंनी वेढलेलं आहे. एका बाजूला जंगल, एका बाजूला नदी, डोंगर - दऱ्या त्यामुळे त्याला या गावावर कब्जा करणे सोपे जाणार आहे. " " पण तो आहे तरी कोण ? " पुन्हा शांतता. थोड्या वेळाने आवाज आला, " तस्मक ! " " तस्मक ? काय विचित्र नाव आहे, पण त्याला गाव पाहिजे असेल तर आम्हाला त्याने त्रास का द्यावा ? " 

    " कारण त्याला गाव म्हणजे संपूर्ण गाव ताब्यात घ्यायचंय, म्हणजे अगदी दगड - धोंडे, जंगल, डोंगर, नदी, लता - वेली , झाडं - झुडुपं, माणसं - बाया, मुलं - मुली, पशु - पक्षी एक अन एक गोष्ट तो कब्जात करणार आहे. त्याच्या सिद्धी प्राप्त करण्यासाठी तो हे सर्व करतोय. " 

  " मग आपल्याला काय करता येईल ? " कुल्कर्ण्यांनी विचारलं. " आपल्याजवळ किती वेळ आहे ? " पुन्हा शांतता, रात्र बरीच होत होती. जवळपास मध्यरात्र होत आली होती. चंद्र डोक्यावर होता. स्वामींनी स्मितहास्य केलं समोर नजर फिरवली पुन्हा सांगितलं, " तुम्हाला काही करता येणार नाही व वेळ ही नाही. " 

  " स्वामीजी असं का म्हणता ? " स्वामीजींच्या चेहेऱ्यावर गूढ हास्य तरळलं. " कारण तो तस्मक दुसरा कुणी नसून मीच आहे ! व बघता बघता स्वामींचा कायापालट झाला व समोर तस्मक अवतीर्ण झाला ! त्याचे भीषण रूप पाहून सर्वांची बोबडी वळाली पण काही क्षणात तस्मकने पाचही जणांच्या, मनाचा, शरीराचा, बुद्धीचा, आत्म्याचा कब्जा घेतला होता, ते त्यांचे राहिले नव्हते ते आता तस्मकचे हस्तक म्हणून काम करणार होते. त्यांच्याही नकळतपणे. 

  बोलण्याची, सांगण्याची गरज नव्हती. बोलणे - सांगणे ही संभाषणाची मानवी पद्धत झाली. पण जे अमानवी होतं ते या सर्वांपलीकडचं होतं. स्थळ, काळ, वेळ या पलीकडचं होतं. कारण या सर्व गोष्टी मानवाने आपल्या सोयीसाठी बनवल्या. नाहीतर काळ अनंत आहे. तो थांबत नाही आणि सुरू ही होत नाही. 

     रात्र सरली, सकाळ झाली. पाचही जण जणूकाही निद्रेतून बाहेर आले होते. त्यांना आदल्या       रात्री झालेलं काही आठवत नव्हतं किंवा असं ही म्हणता येईल की ते त्यांच्या आयुष्यातलं     एक भाग झालं होतं व त्यांनी ते सहज स्वीकारलं होतं. ते उठले. समोर झाडाखाली स्वामींची ध्यानस्थ मूर्ती बसली होती. चेहेऱ्यावरच तेज प्रचंड वाढलं होतं हे सर्वजण मांडी घालून हात जोडून बसले. 

      काही वेळात स्वामींनी डोळे उघडले. त्यांच्या चेहेऱ्यावर शांत भाव होते. त्यांनी पाचांकडे बघितलं. हे त्यांचे पाच पांडव त्यांच्यासाठी लढणार होते. फक्त लढाई दृश्य स्वरूपात नव्हती, सामान्य नजरांना कळणारी नव्हती. पाच पांडवांनी त्यांना नमस्कार केला. स्वामींनी खुणेनेच आशीर्वाद दिला व सहेतुक पाच पांडवांकडे पाहिलं. 

  त्यांची परीक्षा सुरु झाली होती. त्यांच्या यशस्वी होण्याने तस्मकची ताकद वाढणार होती व यश न मिळाल्यास मृत्यू अटळ होता. पाचही पांडव निघाले. पाटील, सरपंच, देशमुख, कुलकर्णी व तहाने ! ज्या गोष्टी आयुष्यात केल्या नाहीत त्या करण्याची वेळ आली होती पण त्यांना काही वाटत नव्हतं. जसं काही ते जे काही करणार होते तेच आजपर्यंत करत आले होते. त्यांच्या हाताचा मळ होता. 

           पाटील, सरपंच व देशमुख जंगलाकडे निघाले. कुलकर्णी व तहाने गावात. कुलकर्णी व तहाने गावात येऊन आपापल्या घरी गेले व आपण आजपासून स्वामींबरोबर राहणार, त्यांच्या सेवेत राहणार असे सांगितले. घरच्यांना काही वाटलं नाही. त्यांनी मान्य केलं जसं काही त्यांना माहित होतं. नंतर पाटील, सरपंच, देखमुखांकडे जाऊन निरोप दिला. मान्य एकदम मान्य. कुठूनही विरोध नाही.  हे काम झाल्यावर कुलकर्णी व तहाने नदीकडे व नंतर डोंगराकडे गेले. 

   

 डोंगरात एक गुहा होती. तिथे साफसफाई केली. आजूबाजूला काही औषधी वनस्पती होत्या. त्यातील काही वनस्पती बरोबर होत्या. त्यातील काही वनस्पती बरोबर घेतल्या. कुलकर्णी गुहेत थांबले. ध्यान लावून बसले. तहाने नदीवर आले. सर्व वनस्पती, मुळ्या स्वच्छ धुतल्या व आंघोळ केली व त्यातील एका वनस्पतीची मुळी तोंडात ठेवली. काही वेळात त्यांच्या चेहेऱ्यावर थोडी चमक आली. आज करता एवढं पुरेसं आहे, नाहीतर गोंधळ व्हायचा. तहान - भूक याच्या पलीकडे गोष्टी गेल्या होत्या. 

         

इकडे पाटील, सरपंच व देशमुख जंगलात शिरले. जंगल दाट  असल्याने पक्षी, प्राणी भरपूर होते. आजूबाजूला थोडा गवताळ प्रदेश होता. त्यामुळे तृणभक्षक प्राणी होते व त्यावर उपजीविका करणारे हिंस्त्र प्राणीही होते. पाटील जंगलात शिरले जंगलाच्या मध्यभागी जागा हेरली व साफसूफ केली व राहण्यायोग्य बनवली. काही वेळात तिथे छोटीशी पर्णकुटी उभी राहिली. मुख्य म्हणजे हे सर्व करताना एक शब्दही सकाळपासून कुणी बोललं नव्हतं त्यांना बोलण्याची गरज भासत नव्हती. 

       सर्वांनाच माहित होतं नेमकं काय करायचं ते ! सरपंच खोल जंगलात गेले. तिथे छोटं पाण्याचं तळं होतं जंगलातील हिंस्त्र प्राणी तिथे कधीकधी येत. तृणभक्षक पण येत पण हिंस्त्र प्राणी जास्त होते. सरपंच तळ्याजवळ गेले. पाण्यात उतरले व हात जोडून सूर्याला अर्ध्य दिलं व ध्यान धारणा करू लागले. काही क्षणात वाघाची डरकाळी ऐकू आली. पण सरपंच पाण्यात मध्यभागी उभे होते. ते कणभरही डगमगले नाहीत. 

 

काही वेळात वाघ तळ्याजवळ आला. त्याची व सरपंचांची नजरानजर झाली. वाघ शांतपणे पाणी प्यायला व परत निघाला. सरपंच पाण्यातून बाहेर आले. वाघाच्या डोक्यावर हात ठेवला व काही क्षणात वाघ जमिनीवर आडवा झाला. त्याचं जीवनकार्य पूर्ण झालं होतं. आता त्याच शरीर लोकांसाठी वापरलं जाणार होतं. सरपंचांनी ते धूड उचललं व खांद्यावर घेतलं व तरातरा स्वामींच्या निवासाच्या स्थानी पोहोचले. ते धूड स्वामींसमोर टाकलं. स्वामींच्या चेहेऱ्यावर स्मितहास्य तरळलं, नजरेतले भाव बदलले.

     सरपंचांना इशारा कळला काही वेळात ते मोठा सुरा घेऊन आले व निष्णात कसायासारखा वाघाला फाडला व त्याची कातडी काढायला लागले. काही वेळात त्यांचे काम पूर्ण झाले.  ती कातडी स्वामींना अर्पण केली. व नतमस्तक झाले. स्वामींनी आशीर्वाद दिला. 

 

इकडे देशमुख तृणप्रदेशात आले होते. हरणांचा कळप आपल्या कामात  व्यस्त होता. यांना पाहताच तो कळप जागच्या जागी उभा राहिला . देशमुखांनी जंगलातून येताना एक वनस्पती आणली होती . त्यांनी काही गवत उपटले . आणि ती वनस्पती गवतात एकत्र केली . व हरणांसमोर धरली . हरीण टक लावून पाहत होते . त्यातील एक पुढे आले व देशमुखांच्या हातातील गवत खाल्लं . आणि काही क्षणात आडवं झालं . इतर हरीण टक लावून पाहत होते . ते त्या हरणाजवळ आले ,वास घेतला आणि निघून गेले . दूर जाऊन पुन्हा गवत खाऊ लागले . 

    त्या हरणाचं कार्य संपलं होतं ,देशमुखांनी  ते धूड उचललं व स्वामींच्या निवासस्थानी घेऊन गेले . स्वामींसमोर नतमस्तक झाले .सरपंच शेजारी उभे होते . त्यांनी सूरा पुढे केला ,काही क्षणात हरणाची कातडी त्याच्या शरीरापासून वेगळी झाली . .......

                                             TO BE CONTINUED......

VISIT OUR YOU TUBE CHANNEL       

                                           लेखक : योगेश वसंत बोरसे . 

➤➤➤➤➤➤➤➤➤➤➤➤➤➤➤➤➤➤➤➤➤➤➤➤➤➤➤➤➤➤➤➤➤➤                                                  ➤➤➤➤➤➤➤➤