लागीर - मराठी भयकथा - MARATHI HORROR STORY

                             लागीर - मराठी भयकथा - MARATHI HORROR STORY        

marathi bhaykatha
 MARATHI HORROR STORIES

 लेखक : योगेश वसंत बोरसे.


  निशा मोठ्या घरची मुलगी होती. परदेशात  जाऊन शिक्षण घेऊन आलेली. पुढे शिकायचं होतं. PHD करायची होती. विषय तिच्या आवडीचा होता. त्यासाठी भटकंती करणार होती. भारतात आली, व दोन - तीन दिवस राहिली घरी. घरी कोणत्याच गोष्टीची कमतरता नव्हती. 

  गाडया तीन - चार होत्या. त्यातील एक जीप घेतली व पप्पा - मम्मी चा निरोप घेतला. तसं तिच्या पप्पांनी विक्रमसिंगने विचारलं, " बाळा कुठे जातेस ? कुणी सोबत आहे का ? " " पप्पा मला एका विषयाचा अभ्यास करायचा आहे. " निशा म्हणाली. तसं विक्रमसिंगने तिला बसवून घेतलं व विचारलं, " कोणत्या विषयाचा ? " 

  " आपल्या कडे काही अंध्दश्रध्दा आहेत, खूप प्रचलित आहेत. जादूटोणा, भूतप्रेत आणि अशा बऱ्याच गोष्टी. यातलं खरं काय, खोटं काय ? हे मी बघणार आहे. " विक्रमसिंगने विचारलं, " त्याने काय होईल ? " निशाने तिच्या पप्पांकडे बघितलं व हसून विचारलं, " याचा अर्थ तुमचा ही विश्वास आहे ! " " हो ! " विक्रमसिंगने ठाम उत्तर दिलं. 

  " आणि त्यासाठी तुला तुझा जीव धोक्यात घालायची काही गरज नाही. हे अमेरिका नाही, भारत आहे.इथे बऱ्याच गोष्टी जगावेगळ्या घडल्या आहेत. आणि मुख्य गोष्ट, आपण विश्वास ठेवला, नाही ठेवला याने काही गोष्टींना फरक पडत नाही. तुला शिक्षण घ्यायचं होतं, मी अडवलं नाही, पुढे काही नीट करणार असशील तरी मी अडवणार नाही. पण ज्या गोष्टी आपल्या कंट्रोलमध्ये नाहीत, आपण कंट्रोल करू शकत नाही त्यात न पडलेलंच बरं. " 

  निशाने तिच्या मम्मीकडे ,रमाकडे बघितलं. रमाने तिच्या खांदयावर थोपटलं ती शेजारीच बसली होती व पप्पांचं म्हणणं बरोबर असल्याचं सांगितलं. निशा त्यांना नाराज करू शकली नाही. ती एकुलती एक होती. आई - वडिलांचा प्राण होती. तिच्या  काळजीपोटी सांगत होते. ती म्हणाली, " ठीक आहे. तुम्ही म्हणता ते खरंही असेल, मी जास्त खोलात जाणार नाही. पण मला थोडी भटकंती करायची आहे. एकटीला फिरायचंय तुमची हरकत नसेल तर मला दोन - तीन दिवस फिरायला जायचंय, जाऊ ? " दोघांना नाही म्हणता आलं नाही. 

  निशा निघाली. तोवर दुपार टाळून गेली होती. विक्रमसिंगची हवेली मोठी होती. काही अंतरावर जंगल व आदिवासी पाडे होते. शेकडो एकर जमीन होती. घरात नोकर,चाकर, विश्वासू माणसं यांची कमतरता नव्हती. पण निशा एकटं जायची म्हटल्यावर त्यांचा नाईलाज झाला. ते सोडायला बाहेर आले व निशा भर्रकन निघून गेली. 

  बाहेरचा निसर्ग तिला साद घालत होता. जवळ बोलवत होता. काही अंतरावर गेल्यावर ती थांबली. सभोवतालचं वातावरण बघितल्यावर तिला मोह आवरता आला नाही. तिने आपला लेन्सचा कॅमेरा काढला व फोटो काढायला सुरुवात केली. फोटो काढून झाले तशी तिने गाडी जंगलात घातली. पुन्हा फोटो काढले. बराच वेळ हा प्रकार चालू राहिला.  असं करता करता संध्याकाळ झाली व निशा जंगलाच्या आत जात राहिली....... 

  रात्री १० च्या सुमारास निशा घरी परतली. तिच्या पप्पा - मम्मीला नवल वाटलं व आनंद ही झाला. जीव भांड्यात पडला. तीन - चार दिवसांनी येणारी मुलगी काही तासांमध्ये घरी परत  आली होती . निशा आल्या आल्या तिच्या रूममध्ये गेली . रमा आवाज देत राहिली. " निशा जेवण तर कर ! " पण तिने काही उत्तर दिल नाही. रमाला वाटलं पोरगी थकली असेल, भूक लागेल तेव्हा खाईल म्हणून रमा जास्त काही बोलली नाही. 

  काही वेळ गप्पा मारून झाल्यावर दोघं पती - पत्नी झोपायला गेले. बाहेर चौकीदार पहारा देत होते. भररात्री एका चौकीदाराची आरोळी ऐकू आली. तसे विक्रमसिंग व रमा उठून बसले. तेवढ्यात एक चौकीदार त्यांना आवाज देत त्यांच्या रूमपर्यंत पोहोचला होता. त्यांनी दरवाजा उघडला. " शंकर काय झालं ? " " मालक लवकर चला. " शंकर घाईघाईत म्हणाला तो घाबरला होता. " ताईसाहेब कसं तरी करतायेत. " " कोण निशा ? " " हो. " 

   " काय केलं तिने ? " काही  वेळापूर्वी त्या हातात सूरा  घेऊन आल्या. त्यांना हवेलीच्या बाहेर जायचं होतं. आम्ही काही पाहिजे का विचारलं तर आम्हाला सांगितलं बाहेर जायचंय. आम्हाला शंका आली. आम्ही सांगितलं मालकांना सांगावं लागेल तोवर थांबा पण त्यांनी ऐकलं नाही. मी इकडं यायला निघालो तसा त्यांनी शेजारी उभ्या असलेल्या सुजितवर सुऱ्याने वार केला व एकामागे एक करत राहिल्या तसा मी इकडे सांगायला आलो. " 

  विक्रमसिंग, रमा व शंकर घाईघाईत खाली आले. समोरचं दृश्य पाहून हादरले. निशा हातातील सुऱ्याने अजूनही सुजितवर वार करत होती. तिच्या तोंडावर, अंगावर रक्त उडालेलं होतं. केस मोकळे होते. ती भयानक दिसत होती. अचानक उठली व बाहेर पळाली. विक्रमसिंग व शंकर बाहेर पळाले. पण ती हातात येणार नव्हती. 

  विक्रमसिंगने शंकरला इतर लोकांना बोलवायला सांगितलं व ते तिचा शोध घेऊ लागले. काही वेळात अजून चार - पाच नोकर आले. समोरचं दृश्य पाहून हैराण झाले होते. घाबरले होते, पण मालकाचा हुकूम होता. 

  सुजीतचं प्रेत उचलणं गरजेचं होतं, दोघातिघांनी ते काम केलं व इतरांनी साफसफाई केली. काही वेळात सर्वजण निशा शोधू लागले. निशा तिथल्या एका झाडावर चढली होती ती कुणाला दिसत नव्हती. रामा नावाचा गडी 'ताईसाहेब, ताईसाहेब' करत झाडाखाली आला तशी तिने त्याच्या अंगावर उडी मारली व खचाखच सुऱ्याने वार केले. 

  त्याचं ओरडणं ऐकून सर्वजण तिथे पोहोचले होते. पण तोवर उशीर झाला होता. विक्रमसिंगने निशाला ताकद लावून बाजूला ओढलं पण ती ऐकायला तयार नव्हती. तिच्या नजरेत ओळख नव्हती. तसं बाकीच्यांनी पण तिला ताकद लावून धरलं. वीस - बावीस वर्षांची पोरगी, तीन - चार जणांकडून आवरली जात नव्हती.  

  विक्रमसिंगला हा प्रकार लक्षात आला. त्यांनी शंकरला काही सांगितलं. शंकर लगेच ' जी मालक ' करत तिथून निघाला व बाहेर गेला. निशाला धरून हवेलीत आणण्यात आलं. रमा रडत होती. तिला कळेना पोरीला अचानक काय झालं ? ती निशा, निशा करत राहिली. तशी निशा कडाडली, " ए गप, मी निशा नाही, सावित्री हाय सावित्री. " " कोण सावित्री ? " रमाला समजेना. 

  " तुझी पोर माझ्या हद्दीत आली होती मी तिला धरली. " " पण तू कोण आहेस ? " रमाने  पुन्हा भीत भीत विचारलं. " मी सावित्री, जंगलात राहायची. मध गोळा करायची व गावात जाऊन विकायची. जंगलात झोपडी करून राहायची. एक दिवस काही पोरं आली व मध काढू लागली. मी त्यांना विरोध केला तशी मला मारायला धावली. त्यांनी मला मार मार मारलं व नंतर सुरा खूपचला मी तडफडून मेले. माझा आत्मा भटकत राहिला, बदला घेण्यासाठी ! "

  " पण माझ्या पोरीनं काय केलं ? " रमाने विचारलं. " तुझ्या पोरीनं काय केलं ? काही नाही. तुझी पोर जंगलात फोटो काढत आली होती. त्यांनी पाहिली. संध्याकाळ होऊन गेली होती. ती पोरं हिच्यामागे लागली. ही पुढं व पोरं हिच्या मागं. तुमची पोर ना ! तुमाला काही बी वाटत नाही तिला एकटीला सोडताना ? मला राहावलं नाही. मी हिच्या अंगात शिरले. त्या पोरावर हल्ला केला. पोरांनी ओळखलं, हे काहीतरी वेगळंच हाय. गांडीला पाय लावून पळाले. पन मी  त्यांच्या मागे होते, तुझ्या पोरी बरोबर.

  ज्याच्या हातात हत्यार होतं तो खाली पडला तसं ते हत्यार उचललं व त्याला मारलं. पुढं अजून एक पळत होता त्यालाही कापला. बाकी दोन पळून गेले त्यांचा पाठलाग करत इथपर्यंत आले. " इतकं बोलून निशा धाडकन खाली कोसळली. रमेने  तिला जवळ घेतलं. ओल्या रुमालाने तिचा चेहेरा पुसला, तिचं अंग पुसलं. एवढी निष्पाप पोर पण एका दिवसात कशी झाली होती. 

  विक्रमसिंगला एक प्रश्न पडला, ' त्या पोरांना मारलं हे ठीक आहे पण सुजीतला व रामा गड्याला का मारलं ? आता ह्याचा पत्ता कसा लागणार ? आणि ती दोन पोरं कुठे शोधणार ? ' तेवढ्यात शंकर एका बाईला घेऊन आला होता. तिच्याकडे पाहून समजलं ती मांत्रिक आहे. जादूटोणा करणारी आहे.  विक्रमसिंगने निशाला उचलून तिच्या बेडरूममध्ये झोपवलं आणि रमाला तिथेच थांबायला सांगितलं. 

  आणि ते बाकीच्यांना घेऊन त्या बाईसोबत बोलण्यासाठी हवेलीच्या बाहेर आले. जे काही करायचं ते हवेलीच्या बाहेर राहून करणं गरजेचं होतं कारण तिथे निशा होती. ती एकदा हातात आली होती. पुन्हा काही चूक केली तर काय होईल सांगता येत नव्हतं. एका झाडाखाली एक मोकळी जागा होती. तिथं सर्वजण रिंगण करून बसले. विक्रमसिंगने त्या बाईला थोडक्यात सगळं सांगितलं. 

  ती बोलली, " मालक निश्चिन्त रहा, ताईसाहेबांना काही बी होणार न्हाई  ! पण एक अडचण हाय, ती दोन पोरं परत जंगलात जातील असं वाटत नाही. अन या दोघांना का मारलं हे सावित्रीशिवाय कुणी बी सांगू शकणार न्हाई! पन  तिला बोलवायचं तर माध्यम लागेल. " विक्रमसिंगला कळेना, " म्हणजे ? " " म्हंजे असा कोणीतरी ज्याच्या शरीरात सावित्री प्रवेश करेल व आपल्याला सांगेल पण यात एक धोका आहे. त्या माणसाचा जीव जाऊ शकतो. " " मग काय करायचं ? " विक्रमसिंगने विचारलं. " आपण सावित्री राहायची तिथं जाऊ, तिथं लक्ष ठेवू. आजूबाजूला आदिवासी पाडे आहेत तिथं पोरं सापडतील. " 

  विक्रमसिंगला ते पटलं. इतरांनाही ते पटलं ते सर्वजण निघाले. गाडी घेऊन निघाले. जीप कुठे आहे ते निशाला माहित होतं पण ती सांगण्याच्या कंडिशन मध्ये नव्हती. आणि जीप नंतरही शोधता आली असती ते दुसरी गाडी घेऊन निघाले. 

  रात्र बरीच झाली होती. एवढ्या रात्री पाड्यावर जाणं  योग्य वाटत नव्हतं. पण इलाज नव्हता. तसं पण तिथे विक्रमसिंगला ओळखणारे लोकं होते. विक्रमसिंगने पहिले त्यांना भेटायचं ठरवलं व पाड्यावर पोहोचले. तिथे गर्दी होती. ती दोन पोरं मरून पडली होती. कुणीतरी त्यांना भोसकून मारलं होतं. पुढचं काही बोलायची वेळ आली नाही , ना काही सांगायची. सावित्रीने तिचा बदला पूर्ण केला होता. माध्यम तिनेच शोधलं होतं फक्त सुजीतला व राम्याला का मारलं याच उत्तर मिळणं शक्य नव्हतं. कदाचित ते आडवत  असल्याने, तिने तसं केलं असावं, अशी मनाची समजूत घालून विक्रमसिंग परत आले. 

  तोपर्यंत उजाडलं होतं निशा बाहेर वाट पाहात उभी होती. रमाने तिला सर्वकाही सांगितलं होतं. विक्रमसिंगला तिने पाहिलं व धावत त्यांच्याकडे गेली. त्यांनी विचारलं. " बाळ कशी आहेस ? " तिने पहिले विचारलं, " पप्पा सावित्री भेटली ? " विक्रमसिंगला आश्चर्य वाटलं व सर्व झालं ते सांगितलं. 

                  ती पोरं मेल्याचं सांगितलं. " पप्पा ती परत येईल ! " निशा म्हणाली. " काय ? "       विक्रमसिंगला आश्चर्य वाटलं. निशा ठाम स्वरात म्हणाली, " हो ! सावित्री परत येईल ! " निशाचं लक्ष शंकर कडे होतं , त्याच्याकडे पाहून ती बोलली, " सावित्री नक्की परत येईल कारण तिची अजून एक शिकार बाकी आहे ! " असं म्हणून ती निघून  गेली. विक्रमसिंग तिला आवाज देत राहिला पण तिने उत्तर दिलं नाही.................           

     

                                         लेखक : योगेश वसंत बोरसे .

VISIT OUR YOU TUBE CHANNEL ALSO 

➣➣➣➣➣➣➣➣➣➣➣➣➣➣➣➣➣➣➣➣➣➣➣➣➣➣➣➣➣➣➣➣➣➣➣                                                ➣➣➣➣➣➣➣➣➣➣➣





   

Previous
Next Post »