भ्रम - मराठी भयकथा - marathi horror story

                                    भ्रम - मराठी भयकथा - marathi horror story



marathi horror stories
 marathi bhaykatha 

                                               लेखक :योगेश वसंत बोरसे .

         रात्रीची वेळ होती , कंदिलाच्या प्रकाशात दोन व्यक्ती काहीतरी बोलत बसल्या होत्या . त्यातील एक व्यक्ती उठली व निर्णायक स्वरात म्हणाली . "२१नखांचं कासव घेऊन ये मी तुला पैशांचा पाऊस पडून देईन ! " त्याच्या आवाजात इतका आत्मविश्वास होता कि कोणालाही खरं वाटेल .त्यात समोर जो बसला होता ,तो याचा निस्सीम भक्तासारखा  होता .त्याला ते खरं पटलं नसतं तरच नवल होतं . पैशांचा पाऊस पडण्याची भाषा करणारा मांत्रिक होता ,तर त्याच्या समोर बसलेला खंडेराव होता . पण सगळे त्याला खंड्या म्हणायचे . 

    खंड्याचा मांत्रिकांवर खूप विश्वास होता . त्याचं वाचन ऐकून खंड्या प्रभावित झाला . मांत्रिकाच्या पायावर डोकं ठेऊन म्हणाला ,"महाराजा ,अजून  लागल तर सांगा ,ते बी आंतु ! "मांत्रिक हुशार होता ,लोभी होता ,लालची होता . "जितक्या जास्त वस्तू आणशील तितका जास्त पाऊस पडल !" 

    खंड्याचे डोळे चकाकले ,"जास्त म्हणजे किती ?" "तू कल्पना करू शकत नाही इतका !""बरं .मला सांगा .मी जास्तीत जास्त वस्तू आणतो . " 

    " एक काळं कोंबडं आणायचं ! पण पूर्ण काळं पाहिजे ,अगदी अंधारासारखं !एक ठिपका पण दुसरा चालणार नाही ,एक काळी बाहुली आणायची , आणि कुवाऱ्या पोरीचे केस ,पण लक्षात ठेवायचं ,पोरगी कुवारी पाहिजे अन तिचेच केस पाहिजे !"

        "आता ते कसं कळायचं ,पोरगी कुमारी आहे कि नाही ?" "ते तू बघ पन पोरगी कुवारीच     पाहिजे . एक डझन अंडं ,एक डझन धारीचे लिंबू ,पाच नारळ , नारळ मोठं पाहिजेत ,लिंबू धारीवालच पाहिजे . लाल कुकू ,एक सुरा ,अन ..... " आणि मांत्रिकाची यादी वाढत गेली . खंड्या लोभी होता ,पण लिहिता वाचता येत नव्हतं . पण पैशांचा पाऊस पडणार म्हटल्यावर थोडा पैसा खर्च करायला तयार होता .जेवढं जमेल तेवढं लक्षात ठेवायला तयार होता. जेवढं जमेल तेवढं लक्षात ठेवायला लागला. मांत्रिकाची यादी संपली ,तो पुन्हा गरजला . 

   " शनिवारी अमावास्या आहे, तेव्हा हे सगळं सामान घेऊन गावाजवळच्या स्म्शानात यायचं. एकटं यायचं, एकटं जायचं कुणाला काहीबी बोलायचं नाही. माझं नाव कुठं आलं नाही पायजे. तू जवळचा म्हणून तुझ्यासाठी हे करतोय. नाहीतर मला कशाला पैसा लागतोय ? हे सगळं फक्त तुझ्यासाठी. "

       खंड्या त्याच्या बोलण्याने प्रभावित झाला. पुन्हा पायावर डोकं टेकवलं. मांत्रिक निघून गेला. खंड्या त्याच्या शेतातील झोपडीत बसला होता व स्वप्न रंगवू लागला. काही वेळाने त्याच्या लक्षात आलं, ' आज सोमवार आहे म्हणजे हातात फक्त चार - पाच दिस हाय. सगळं कसं करणार ? ' त्याच्या चेहेऱ्यावर चिंता दिसायला लागली. त्याने आभाळाकडे पाहिलं, हात जोडले, ' देवा मदत कर रं बाबा ! मी एकवीस कोंबडं कापीन ! " विचार करत करत झोपी गेला. 

   
    शनिवार उगवला. तसं खंड्याला टेंशन यायला लागलं. अजून बऱ्याच वस्तू आणायच्या बाकी होत्या. बाजारात मिळणाऱ्या वस्तू तो घेऊन आला होता पण ज्या बाजारात मिळत नाहीत त्यांच काय करायचं ते खंड्याला माहीत नव्हतं. विचार करता करता संध्याकाळ झाली. 

       रात्र झाली. मांत्रिकाने बोलवलं होतं जावं तर लागेलच. सामान जड होतं पन एकट्यालाच न्यायचं होतं त्यामुळे इलाज नव्हता. मनात आनंदाच्या उकळ्या फुटत होत्या. आज पैशाचा, पाऊस पडणार, मी श्रीमंत होणार. त्याच विचारात तो स्मशानात कधी पोहोचला त्यालाही कळलं नाही. 

       रात्र वाढत गेली पण मांत्रिकाचा पत्ता नव्हता. त्यात अमावस्या. सर्वत्र अंधार, चिडीचूप शांतता, रात किडयांची किरकिर, झाडांची सळसळ एवढं बरं होतं की आज कुणी मेलं नव्हतं. हे दोघांच्यहि टाळक्यात आलं नव्हतं. नाहीतरी रात्री कोण येणार इथं जाळायला. आता उद्याच. आपल्या विचाराने खंड्याने स्वतः ची पाठ थोपटली व मांत्रिकाची वाट पाहात बसला.

     

   मध्यरात्र झाली होती. खंड्याला चाहूल लागली. तसं त्यानं टवकारून पाहिले. कुणीतरी येत होतं. हातात काठी घेऊन कुणीतरी येत होतं. " महाराजा आलं बरं, शब्दाचं पक्क हाय ,आपल्यासाठी आलं ,एवढं रात्री आपल्यासाठी  आलं ! " 

        मांत्रिक आला. खंड्याने आल्या आल्या त्याचे पाय धरले. " महाराजा तुम्ही आला, मला वाटलं लई वेळ झाला आता नाई येणार ! " " अरे येडा हाईस का ! तुला सांगितलं होतं ना फकस्त तुझ्यासाठी. नाहीतर मला पैशाची काय गरज हाय ? "  

        याने परत पायावर डोकं ठेवलं. " आरं बस बस किती वेळा पाया पडशील ! बरं सामान आणलंय का ? " खंड्याचा चेहेरा खाड्कन उतरला. " आनलं, पण समदं नाही, भेटलं जे भेटलं ते घेऊन आलो. "

        मांत्रिक हुशार होता. त्याला माहीत होतं, याला काय मिळेल, काय नाही मिळणार ते. तो चेहेरा पाडून म्हणाला, " काय गड्या तू पन. अशा अपुऱ्या कामानं कसा पाऊस पडेल ? " खंड्या गयावया करायला लागला. " महाराजा काहीबी करा पन एवढं आपलं काम कराच. " नाईलाज झाल्यासारखं मांत्रिकाने म्हटलं, " ठीक आहे, बघू जमतंय का. पन मुश्किल आहे बाबा. समद्या वस्तू आणल्या असत्या तर झाले असते. "  " तुमी एकसावा करून तर पाहा ! " खंड्या गयावया करू लागला. 

       बराच वेळ पूजा चालली. शेवटी मांत्रिकाने कोंबडं कापायला सांगितलं. खंड्याने कोंबडं कापलं. मांत्रिकाजवळ एक डालकी होती. त्यात ते टाकलं ते बराच वेळ फडफडत राहिलं. मांत्रिकाने खंड्याला डोळे बंद करून बसायला सांगितलं. 

        आणि काही वेळात अघटित घडलं. तिथे आत्म्यासारखं काहीतरी आलं होतं. हात जोडून मांत्रिकाला म्हणाला, " महाराजा काय काम हाय ? " आवाजाने खंड्याला कापरं भरलं. बरं  झालं डोळे बंद होते आपले. मांत्रिकाने आज्ञा केली, " या गडयासाठी पैशांचा पाऊस पाडायचा हाय ते काम कर. " 

          " जशी आज्ञा. " असं म्हणून त्या आत्म्याने हात वर केले. अन काय आश्चर्य ! खणखण आवाज करत वरून पैसे पडायला लागले. खंड्याला राहावले नाही. त्याने डोळे उघडले व पैसे पडायचे बंद झाले.
 

            मांत्रिक नाराज होऊन म्हणाला, " आरं काय रं गड्या ! अजून थोडं थांबायचं ? सगळं पाणी फिरवलंस बघ. " आपली चूक खंड्याला कळली होती. तो परत पाया पडायला लागला. " महाराजा काही करा, चूक झाली. " 

          मांत्रिकाने आत्म्याला उद्देशून विचारलं, " आता काय करायचं ? " " काही नाही. हे सगळं इथेच राहू दे. हे सर्व पैसे मांत्रिकाला दे. अनं लगेच शेतात जा तिथं विहिरीजवळ एक आंब्याचं झाड हाय तिथं खाली धन गाडलंय. सोन्याच्या मोहोरांचा हंडा हाय, पन दिवस उगवण्याच्या आत तो हंडा घेऊन घरात जा. नाहीतर त्याची माती होऊन जाईल. 

            खंड्या पळत सुटला व शेताकडे धावपळ करत विहिरीजवळ गेला तिथं फावडं पडलेलं होतं. आंब्याच्या झाडापाशी गेला. खड्ड करायला लागला. सूर्य उगवायला काही क्षण बाकी होते. खड्ड करता करता खन्न ! असा आवाज आला. खंड्याला आनंद झाला. त्यानं भराभरा खोदलं छोटी कळशी होती. तो काढायला लागला पण तोवर सूर्य वर आला होता. त्यानं घाईघाईत कळशी काढली व घराकडे पळाला. सूर्याची किरणं कळशीवर पडली होती. खंड्या धास्तावला. घामेघूम झाला. घरात पळाला दार लावलं अनं कळशी उघडून पाहिली. 

           कळशीत माती होती. खंड्याचा विश्वास बसेना. त्याने कळशी उलटी केली माती जमिनीवर टाकली. मातीत दोन - तीन नाणी चमकत होती. ते पाहून खंड्याचं अवसान गळालं तो मटकन खाली बसला डोक्याला हात लावून. 

           " महाराजानं पाऊस पाडला होता, पन आपण डोळे उघडले नंतर हंडाबी दिला पन आपलं नशीबच फुटकं, त्याची माती झाली. " अनं खंड्या डोकं धरून बसला. " चांगलं घबाड गावलं होतं पन आपल्या नशिबात नव्हतं. " म्हणून डोकं झोडायला लागला. केसं उपटायला लागला.  पळत पळत बाहेर विहिरीपाशी गेला. काठावर उभा राहिला. विहीर खोल होती खंड्याने केसं उपटत विहिरीत उडी मारली. 

          इकडे मांत्रिक व तो आत्मा खंड्याला पळताना पाहून खदाखदा हसायला लागले. " च्यायचं येडं ,असा कुठं पैशाचा पाऊस पडतो व्हय !" तो जो आत्मा होता तो म्हणाला "धनी अशे लोकं हायेत म्हणून आपलं बरं चाललंय .चला आवरा लवकर नाही तर तो परत येईल ". मांत्रिक म्हणाला ," तो न्हाई परत यायचा ,एकतर  येडा होईल नाहीतर जीव देईल . जाऊ दे !मरू दे ! ते त्याच लायकीचं होतं !" आणि परत खदाखदा हसायला लागले . हसतच राहिले . खंड्याला त्यांनी हातोहात फसवलं होतं .पण खंड्या आता ते सर्व समजण्या पलीकडे गेला होता ..... 

                                                          THE END 

लेखक योगेश वसंत बोरसे.
  

➤➤➤➤➤➤➤➤➤➤➤➤➤➤➤➤➤➤➤➤➤➤➤➤➤➤➤➤➤➤➤➤➤➤                  ➤➤➤➤➤➤➤➤➤➤➤➤➤➤➤➤➤➤➤➤➤➤➤     

               







    

Previous
Next Post »