जत्रा - मराठी भय कथा - marathi horror story

                                  जत्रा - मराठी भय कथा  - marathi horror story


marathi horror stories
 मराठी भय कथा 

                                            संकल्पना : रोहित योगेश बोरसे. 

                                      विस्तार व लेखक :योगेश वसंत बोरसे. 

       अनेक घटना आपल्यासोबत कधी अशा घडतात, ज्या आपण आयुष्यभर विसरू शकत नाही. बऱ्याच घटना अश्या असतात की असं का घडलं, आपण सांगू शकत नाही. तर्क करून उपयोग नसतो. तेव्हा आपल्याला कळतं, की आपल्या आयुष्यावर आपलं कंट्रोल नाही. घटना घडत जातात आणि त्या अनुषंगाने  आपण वहावत जातो. असंच एक दिवस...............

     मी व माझा मित्र कामानिमित्त बाहेरगावी गेलो होतो. परत येता येत बरीच रात्र झाली. आमच्या बस चुकल्याने आम्ही ट्रकने परत आलो. गावाजवळच्या वेशीवर ट्रक थांबला व आम्हाला सोडून पुढे निघून गेला.

   
   
आकाश निरभ्र होतं.  चांदण्या व चंद्र यांनी आकाश झगमगत होतं. हे अल्हाददायक वातावरण बघून दिवसभराचा थकवा कुठल्याकुठे पळाला. मन प्रसन्न झालं. व घरी पायीपायी जायचं असं आम्ही दोघांनी ठरवलं. रात्री बारा - एक चा सुमार. गप्पा मारत, गाणी गुणगुणत आम्ही चाललो होतो. तेवढ्यात काही अंतरावर लहान मुलाचा रडण्याचा आवाज ऐकू आला. आम्ही दचकलो, एवढ्या रात्री छोटंसं पोरगं रस्त्यावर काय करत असेल ? 

       माझा मित्र नामदेव या बाबतीत खूप सेंसिटिव होता. तो जागीच थबकला व म्हणाला, " राजा, हे काही खरं नाही. बघ, आपण दुसऱ्या रस्त्याने जाऊ. " मी हसत म्हणालो, " काय नाम्या तू पण, लहान पोराला घाबरलास ! काही होत नाही चल. " 

        बरेच आढेवेढे घेऊन आमची पावलं आवाजाकडे पडायला लागली. आवाज एका झाडाखालून येत होता. आणि तो मुलगा ' मम्मी, मम्मी ' करत होता. आम्ही त्याच्याजवळ पोहोचलो. मुलगा पाच - सहा वर्षांचा होता. त्याने आम्हाला बघितलं व त्याचं रडणं बंद झालं. तो आमच्याकडे टक लावून पाहायला लागला. त्याचं बघणं अनैसर्गिक वाटत होतं.
  

      नाम्या बोललाच, " राजा हे काही खरं नाही, हे बघ चल इथून. " मलापण काहीतरी खटकत होतं, पण नेमकं काय ते कळत नव्हतं. तेवढ्यात तो मुलगा हातवारे करून मम्मी, मम्मी करायला लागला आणि त्या दिशेने जायला लागला. त्याने इशारा केला तिकडे जत्रेसारखं काहीतरी दिसत होतं. 

   
  मला त्या मुलाची दया आली. पण नाम्या म्हटला, "इथं जत्रा कुठून आली ? राजा काहीतरी गडबड आहे. आपण सकाळी गेलो तेव्हा इथे काही नव्हतं. आणि काही दिवसांपूर्वी इथं एका  जत्रेला आग लागली होती. सगळं जाळून भस्म झालं होतं. तेव्हापासून आपल्या गावात एकही जत्रा आली नाही. " मला पण हे माहित होतं. 

      इनफॅक्ट, आम्हीपण त्या घटनेचे साक्षीदार होतो. शॉटसर्किटमुळे आग लागली होती. आता तो मुलगा पळायला लागला होता, उजेडाच्या दिशेने व आम्ही त्याच्यामागे पळत होतो. तो मम्मी, मम्मी करत पळत होता व काही केल्या आमच्या हातात येत नव्हता. आम्हीपण ओढले जाऊ लागलो.

       नाम्या बोलला, " राजा फसवलंस तू, आता आपली याच्यातून सुटका नाही. " " अरे पण नेमकं चाललंय काय मलाही कळत नाहीये. " मी म्हटलो. नाम्या बोलला, " येडपटच हायस एवढी साधी गोष्ट , गोष्ट कळत नाही का ? ही  भुताटकी आहे. " पण माझ्या बुद्धीला ते पटत नव्हतं. " नाम्या गप बस, एवढंसं काय भूत राहतं का ? आपण पिक्चरमध्ये पाहतो ते  डेंजर राहतात ! हा एवढुसा पोरगा आपलं काय वाकडं करणार आहे चल. " 

     
  काही वेळात आम्ही त्या ठिकाणी पोहोचलो. तो मुलगा एका जागी थांबला व हात वर करून मम्मी मम्मी करत रडायला लागला. त्याचं रडणं अगदी भेसूर होतं, आवाज असह्य होता. आम्ही दोघांनी घाबरून हात कानावर ठेवले व लक्ष समोर गेलं. समोर एक मोठं जायंट  व्हील होतं. आणि वरच्या बाजूला कुणीतरी बसलं होतं. आम्ही लक्ष देऊन बघितलं तर तिथे एक माणूस व बाई बसल्यासारखी दिसली. आणि काही समजायच्या आत जायंट व्हील फिरायला लागलं. 

        लाईट नसतांना हे कसं काय फिरतंय, ही शंका आम्हा दोघांच्या मनात डोकावली आणि जायंट व्हील जसजसं फिरायला लागलं तसतसं तो मुलगा रडणं बंद करून नाचायला लागला, उडया मारायला लागला, टाळ्या वाजवायला लागला. 

         आणि एकएक करत जत्रेतल्या इतर गोष्टी सक्रिय झाल्या जणू काही जत्रा पुन्हा जिवंत होत होती. नाम्याने माझा हात जोरात ओढला, " राजा पळ आपल्या जीवाला धोका आहे. " 

         मी पण भानावर आलो व जत्रेपासून लांब पळालो. काही वेळात आम्ही थोडं लांब जाऊन थांबलो आणि जत्रेने पेट घेतला जायंट व्हील वरील ती बाई व तो माणूस होरपळायला लागले. तो मुलगा पुन्हा रडायला लागला व जायंट व्हीलच्या दिशेने पळाला आणि त्या बाईची आरोळी ऐकू आली. 

         " आर्यन थांब, इकडे येऊ नकोस. " पण आर्यन थांबणार नव्हता. तो आगीच्या दिशेने पळाला. त्याच्यासोबत वातावरणात इतर किंकाळ्या, आरोळ्या ऐकू यायला लागल्या. पळापळ सुरु झाली पण आग एवढी भयानक होती की सर्व जळून भस्म झाले. आता तिथे काहीही नव्हतं. 

       मी एकटक त्या दिशेने पाहत राहिलो आणि नाम्याला विचारलं, " याचा अर्थ काय ? " नाम्या म्हणाला, " याचा अर्थ एकच, त्या दिवशी आपण समोर होतो, तरी काही केलं नाही, करू शकलो नाही, बरेच लोकं जाळून मेले त्यातलं हे एक उदाहरण. " इतकं बोलून नाम्या शांत बसला. 

       मला काहीच कळालं नाही. मी मूर्खासारखं परत विचारलं, " म्हणजे ? " नाम्याने खांदयावर हात ठेवून म्हटलं, " राजा ही सुरुवात आहे आणि मला वाटतं यातून आपली सुटका नाही. जे लोकं मेले त्यांना आपल्याकडनं अपेक्षा होती, आपण काही करायला हवं होतं त्यांचे आत्मे इथंच घुटमळत असतील आणि आपल्याला पाहून त्यांनी साक्षात्कार दिला. " 

     माझ्या अंगावर भीतीने काटा उभा राहिला. मी म्हणालो, " पण नाम्या आजतर पौर्णिमा आहे मी असं ऐकलंय की अमावास्येला भीती असते. " नाम्या शून्यात एकटक पाहत राहिला. " राजा जरा आठवून बघ, त्यादिवशी पोर्णिमाच होती. " " म्हणजे ? " तेवढ्यात नाम्याचा आवाज बदलला, " राजा समोर बघ ते आपल्यादिशेने येता येत, पळ ! " आणि आम्ही तिथून पळ काढला. पण ही सुरुवात होती........................ 

                             

                              TO BE CONTINUED.... 

                                               संकल्पना : रोहित योगेश बोरसे.  

                                            विस्तार व लेखक : योगेश वसंत बोरसे.      

➤➤➤➤➤➤➤➤➤➤➤➤➤➤➤➤➤➤➤➤➤➤➤➤➤➤➤➤➤➤➤➤➤➤









 

Previous
Next Post »