बाबा - मराठी भय कथा - MARATHI HORROR STORY
MARATHI BHAYKATHA |
लेखक :योगेश वसंत बोरसे.
"तू नहीं थी तो जिंदगी वीरान थी ,तेरे आने से बहार आ गयी ! "
राहुल ने तिच्या डोळ्यात डोळे घालून डायलॉग मारला . ती श्रावणी होती !
पाणीदार डोळ्यांची ,गोल चेहेऱ्याची श्रावणी , रंग गव्हाळी होता . पण सतेज कांती होती !
कुणीही पाहताच प्रेमात पडावं अशी श्रावणी होती . ती खळाळून हसली . व राहुलच्या टपलीत मारली व म्हणाली .
"महाशय ,बस झालं आता ,डायलॉग बंद करा . व घराकडे प्रस्थान करा ,नाहीतर तुमच्या आईसाहेब तुम्हाला घरात घेणार नाहीत ! "
आईचं नांव काढताच राहुलचा चेहेरा खाडकन उतरला . ते श्रावणीच्या लक्षात आलं ,तिला आपली चूक कळाली .
"sorry !" श्रावणी हळूच म्हणाली . पण तोवर उशीर झाला होता .
राहुल उठून चालता झाला .
"राहुल अरे थांब ! मला येऊ दे ! मी काय इथे एकटी थांबू का ?"
पण राहुलने लक्ष दिलं नाही ,त्याच्या डोक्यात एकच विचार होता ,
'आई ? हं ! हिला आई का म्हणायचं ?आई जर अशी असेल तर देवाने आई कुणाला देऊ नये !'
" राहुल अरे थांब ना !सॉरी म्हटलं ना मी ? " श्रावणीने मागून येऊन त्याचा हात धरला .
राहुल थांबला व खाली मान घालून उभा राहिला ,श्रावणी ने त्याच्याकडे बघितलं ,त्याच्या डोळ्यात अश्रुनी गर्दी केली होती .
"राहूल अरे काय झालं ?" आणि राहुलला राहवलं नाही . तो श्रावणीच्या खांद्यावर डोकं ठेऊन रडायला लागला .
"राहुल अरे असं काय करतोस ,लहान मुलासारखं ? जरा शांत हो ! हे बघ काय झालं ते नीट सांग !"
बऱ्याच वेळाने राहुल शांत झाला . त्याने रुमालाने खसखसून चेहेरा पुसला .
"sorry ! मी असं REACT नव्हतं करायला पाहिजे ! "
"IT'S OK ! होताय कभी कभी !" श्रावणी म्हणाली .
"तुला एक RIQUEST आहे . " राहुल थंड स्वरात म्हणाला .
" इथून पुढे मला आई आहे हे विसरून जायचं ! नाहीतर .... नाहीतर मला विसरून जायचं ! "
तो तिथून तडक निघाला ,श्रावणी मागून आवाज देत राहिली ,पण तो आता थांबला नाही . घर जवळच होतं ,काही वेळात घरी पोहोचला .
"या महाशय , आले का भटकून ? काही कामधंदे करा ! की श्रावणी खाऊ घालणार आहे लग्न झाल्यावर ?"
राहुलचं डोकं आधीच खराब झालं होतं . "आई ,श्रावणीचं नांव घेऊ नकोस !"
"का रे ? मिरच्या लागतात ?अरे तिला हि कळायला पाहिजे ,आपला होणारा नवरा काय लायकीचा आहे ते ! "
"आई ,प्लिज ,शांत बस !"
"अरे मला शांत बसवून काय होणार ?ओळखीचे लोक विचारतात ,'तुमचा मुलगा काम धंदा तर काही करत नाही !पण मुलगी असते एक बरोबर ! मग तिचा खर्च हाच करतो कि तीच याचा खर्च करते ? ' म्हणून . "
राहुल सुन्न झाला . "आई ,प्लिज ,शांत बस !"
"अरे एवढी लाज वाटते तर कुठे काम शोध ; नाहीतर जीव दे कुठे जाऊन !"
"आई ssss !" राहुल खवळला . त्याला घरात थांबवेना . तो घराबाहेर पडला .
" जा ,जा ,परत येशीलच फुकटचं गिळायला . काम करायला नको . तोरा बघा मेल्याचा !"
आईची बडबड चालूच होती . राहुल घराबाहेर पडला . रस्त्यावर आला . थंडगार वारा वाहत होता . वेळ रात्रीची होती .गार वारा लागल्याने डोकं थोडं शांत झालं . डोक्यात विचार चालू झाले .
'आई !आपली आई !' राहुल आपल्याच विचाराने दचकला .
'आपली आई ? हो ,आपलीच आई ! ' त्याच्या डोळ्यात पुन्हा आसवानी गर्दी केली . हि आपली आई आहे ? पण हि पूर्वी अशी नव्हती . आपल्याला किती जीव लावायची ?दिवस रात्र आपली काळजी घ्यायची . आपण हीचा जीव कि प्राण होतो . आपल्याला आईने व बाबानी फुलासारखं जपलं . शिकवलं ,मोठं केलं . आपलं शिक्षणात डोकं चाललं नाही ,पण त्यांनी कधी फोर्स केला नाही !
दहावी , बारावी , जेमतेम सुटलो . पुढल्या शिक्षणाचा प्रश्नच नव्हता . मग दिवसभर बाहेर राहायला लागलो . बाबांना काळजी वाटायला लागली . हा पोरगा पुढे काय करणार ?
शिक्षण नाही ,कामाची ओढ नाही ,मग आयुष्य कसं काढणार ? आपणच कमी पडलो याला तयार करण्यात . आपल्याला मुलगा ओळखता आला नाही !
आईशी बाबा एक दिवस बोलत होते . नेमकं राहुलने ऐकलं होतं . आईने सांगितलं
' करेल हो तो ! अजून लहान आहे ! काहींना समज उशिरा येते ! '
बाबा पुटपुटले ,
' जास्त उशीर व्हायला नको म्हणजे मिळवली .'
आणि ... एक दिवस..... बाबा गेले . ... सौम्यसा हार्ट अटॅक कारणीभूत ठरला ! व बाबा गेले ! आणि आईला धक्का बसला .' याच्या विचारानेच गेले ,' असा आईचा ग्रह झाला .
ती राहुलचा त्रागा करू लागली ,राग राग करू लागली . बाबा गेले तेव्हा ती रडली नाही . रडली असती तर मनातील राग निघून गेला असता . ती सर्वांसमोर राहुल ला बोलत राहिली . शिव्या शाप देत राहिली .
राहुल खाली मान घालून सर्व शांतपणे ऐकत राहिला . त्याचे ही बाबा गेले होते , तो खाली मान घालून रडत होता . कुणीतरी येऊन त्याच सांत्वन केलं . त्याला वाटलं आई असेल , आई आपल्याला जवळ घेईल , मन मोकळं करेल , पण तसं होणार नव्हतं , झालं नव्हतं .
आई रडत नव्हती .तिची बडबड चालूच होती . राहुलला राहवलं नाही तो उठून बाहेर गेला . 'जा ,चालला जा . अरे यांच्या जागी तू गेला असतास ,तर बरं झालं असतं . '
आईचे ते शब्द अजूनही राहुलच्या कानात गुंजत होते .
'यांच्या जागी तू गेला असतास तर बरं झालं असतं !'
'नाही ! आपला जगून उपयोग नाही .आपण आईला काहीच सुख देऊ शकत नाही . आपलं अभ्यासात डोकं चालत नाही . कामात मन लागत नाही . मग आईची जबाबदारी कशी घेणार ? तिला कसं सांभाळणार ? ती म्हणते ते बरोबर आहे , बाबांच्या जागी . आपणच जायला हवं होतं !'
राहुलची पावलं रेल्वे रुळांच्या दिशेने पडायला लागली . रात्रीची वेळ ,सामसूम रस्ते ,राहुल ताडताड पावलं टाकत चालला होता .
अचानक आवाज आला . ...
" बाळा ... ए बाळा ... "
त्याने मागे वळून बघितलं , त्याचे बाबा त्याला दिसले होते व त्याला हाक मारत होते . जवळ बोलवत होते .
' बाबा इथे ? बाबा तर .... '
तोपर्यंत बाबा त्याच्याजवळ पोहोचले होते . राहुलच्या खांद्यावर हात ठेऊन बाबा म्हणाले ,
" बाळा .. अरे असं काय करतोस ? वेडा आहेस का ? अरे तुझी आई घरी वाट पाहत असेल , ती बोलते रे फक्त ! पण तिचा तुझ्यात खूप जीव आहे . मी असा कमजोर मनाचा ,कमजोर हृदयाचा निघालो ,वेळेपूर्वीच exit घेतली . तिला तुझ्या काळजीने घेरलं , आता याचं कसं होईल ?
पण तिला रिऍक्ट करता येत नाही . ती भांबावून गेली आहे . हे बघ घरी जा , तिला समजावून सांग . विश्वासात घे . ती रडेल असं बघ . मी गेल्यावर ती रडली नाही रे ! त्यामुळे कदाचित अशी वागत असेल . जा घरी जा !"
बाबा निघून गेले .
" बाबा ssss ! "
राहुलने आवाज दिला पण बाबा आजू बाजूला नव्हते .
इकडे राहुल घराबाहेर पडला .तशी त्याच्या आईला काळजी वाटायला लागली .
' आपण मुलाला आजही नाही नाहीते बोललो , आपला पोटचा गोळा आहे तो , त्याची काय चूक ? एखाद्याचं डोकं नाही चालत . सुधरेल हळू हळू . पोरगा तसाच न जेवता गेला . कुठे गेला काय माहित ?'
ती काळजीने बाहेर आली . कठड्यावरून खाली बघितलं राहुल दूर चालला होता ,
" राहुल , अरे राजा थांब रे ! राहुल , अरे थांब ना ! "
आई जिन्याकडे धावली ! जिना लाकडी होता ,पायऱ्या मोठ्या होत्या ,पण तिचं लक्षच नव्हतं , तिचं लक्ष तिच्या पोराकडे होतं ,तिला वाटलं आपण याला बोललो ,पोराची जात . नवीन रक्त ,याने काही कमी जास्त केलं तर ? ती घाबरून त्याच्या मागे पळाली .
" राहुल राजा थांब रे ! " आणि तिचा पाय घसरला , अडकला व ती दाणदाण डोकं आपटत जिन्यावरून खाली कोसळली . डोक्याला मार लागला . पण तोंडातून राहुल नावाचा जप चालला होता . चाळकरी धावत आले . आईला उचललं ,
"राहुल ,अरे राजा थांब ना !" शेवटच्या क्षणापर्यंत ती राहुलचं नाव घेत राहिली . व शेवटच्या क्षणापर्यंत तिची नजर राहुल गेला तिकडेच होती !
एकटक !
काही क्षणात नजर स्थिर झाली .
संपलं ,सगळं संपलं ! आई राहुल ला सोडून गेली होती !
इकडे बाबा भेटल्यावर राहुल बराच सावरला होता . त्याला आपली चूक लक्षात आली होती . आईची ओढ लागली होती . आज असं का होतंय ,कळत नव्हतं . पळतच घरी जावं असं वाटत होतं , हृदयाची धडधड वाढली होती . आईच्या आठवणीने कधी नव्हे ते डोळे पाणावले होते . त्याने आरोळी ठोकली , "आई ssss !"
आणि तो सुसाट धावत निघाला ,घरापर्यंत पोहोचला . घरासमोर गर्दी दिसली . चाळकरी जमा झाले होते , एकटक त्याच्याकडे पाहत होते . त्याला पाहून गर्दी बाजूला झाली . समोर जे दिसलं ते पाहून त्याने हंबरडा फोडला .
"आई sssss !"
त्याची आई त्याच्याकडे एकटक पाहत होती . पण फक्त बघत होती , त्या नजरेतील ओळख कुठेतरी हरवली होती . जी कदाचित कधीच परत मिळणार नव्हती !
काही वेळाने पहाट झाली , आईचं शव घरात ठेवलं होतं ,चाळकरी तयारीला लागले होते ,राहुल खाली मान घालून रडत होता ,
' पहिले बाबा गेले आता आई !.... आता आपलं या जगात कुणी नाही , आपण पण काल जायला हवं होतं ! बाबा नसते भेटले तर आपणही गेलो असतो .' तो रडत राहिला .
आणि पुढच्याच क्षणी त्याच्या खांद्यावर हात पडला . त्याला वाटलं ,कुणी सांत्वन करणारं असेल ,पण स्पर्श ओळखीचा होता . त्याने वर बघितलं .
श्रावणी ! त्याची श्रावणी ! त्याला राहवलं नाही . तो श्रावणीला बिलगला व लहान मुलासारखा रडत राहिला . श्रावणी त्याला थोपटत राहिली .
दूर उभे राहून राहुलचे आई बाबा हे दृश्य पाहून स्तब्ध झाले . त्यांना पण राहवलं नाही . ते तिथून निघाले .त्यांना आता आपल्या राहुलची चिंता नव्हती . त्यांचा लाडका राहुल श्रावणी सोबत सुरक्षित होता . राहुलला सुरक्षित हातांमध्ये सोपवून ते आपल्या मुक्कामाला चालले होते . डोळ्यात अश्रू घेऊन ! व लवकरच राहुलला पुन्हा भेटणार होते .
हो ! बाबा परत येणार होते ! पण आता राहुल त्यांचा बाबा असणार होता व श्रावणी आई !
-: THE END :-
लेखक :योगेश वसंत बोरसे .
- ALL RIGHTS RESERVED AT YOGESH BORSE & BGSM
- ABOUT US
- PRIVACY POLICY
➤➤➤➤➤➤➤➤➤➤➤➤➤➤➤➤➤➤➤➤➤➤➤➤➤➤➤➤➤➤➤➤➤➤➤➤➤➤➤➤➤➤➤
⇭⇭⇭⇭⇭⇭⇭⇭⇭⇭⇭⇭⇭⇭⇭⇭⇭⇭⇭⇭⇭⇭⇭⇭⇭⇭⇭⇭⇭⇭⇭⇭⇭⇭⇭⇭⇭⇭⇭⇭⇭⇭⇭⇭⇭⇭⇭⇭⇭⇭⇭⇭⇭⇭⇭⇭⇭⇭⇭⇭⇭⇭⇭⇭⇭ ⇭⇭⇭
ConversionConversion EmoticonEmoticon