फेरा - मराठी भयकथा - MARATHI HORROR STORY

                       फेरा - मराठी भयकथा - MARATHI HORROR STORY   

MARATHI RAHASYA KAHTA
 MARATHI  BHAYKATHA

                                            लेखक : योगेश वसंत बोरसे .

           दिवसभर काम करून थकलेलं शरीर . परत सायकलवर १५ ते २० किलोमीटर जायचं म्हणजे ,काय होणार हे वेगळं सांगायचची गरज नाही . पायांचा पाठीचा पार भुगा व्हायचा . गावच्या बाजाराला जायचं म्हणजे एवढं अंतर कापावच लागायचं . कधी काही वाटायचं नाही ,कधी कधी रात्र होऊन जायची .  

     तसं आमचं गांव आडबाजुचं , शहरासारखे मोठं मोठे रस्ते नाहीत कि रस्त्याने लाईट हा प्रकार नाही . आजूबाजूच्या गावांना जायचं तर कच्चे रस्ते . काही ठिकाणी रस्ते होते ते हि सिंगल  रोड , खड्डे पडलेले खराब  झालेले . म्हणजे प्रवास आदळत आपटतच व्हायचा .  

             असाच एक दिवस रात्री येत होतो . रस्त्याने चिटपाखरू नाही . सभोवताली शेती आणि झाडी . हवा पण थोडीशीच . पानांची सळसळ होईल एवढीच . सगळीकडे चिडीचूप शांतता . मी माझ्या धुंदीत पायडल मारत निघालो होतो . चैन उतरली ,तसा मीही खाली उतरलो . अंधारात सवयीनेच चैन बसवली . पाच दहा मिनिटांनी पुन्हा उतरली .  

       मनात आलं ,पायीच जावं . उद्या बघता येईल . म्हणून पायीच निघालो . तोंडात गाणं आलं ,.... ... एक इन्सान हूं ,मै तुम्हारी तरह .....  मी विचारात पडलो ,असं गाणं यावेळी का सुचावं ?माझं मलाच नवल वाटलं . जाणीवपूर्वक तोंड बंद केलं व दुसरं गाणं आठवायला लागलो . मागून आलेल्या आवाजाने दचकलो . 

"ए बाबा !" मागे वळून बघितलं ,"कुठं चाललास ? "   

      नऊवारी साडी नेसलेली जवळजवळ ४५ ते ५० वयाची बाई असेल , डोक्यावर बाचकं , व हातात काहीतरी .... नाही लहान मूल होतं , ६ते ७ वर्षाचं असेल . मी विचार केला ,हि मागून अचानक कशी आली ? आपलं लक्षही नाही . जाऊ द्या . 

मी विचारलं ," मावशी एवढ्या रात्री कुठं निघालात ? सोबत कुणी नाही ?"

" आरं बाबा , लेकींकडं गेलते ! लेक वारली ! हे पोरगं एकटं पडलं ! बाप पहिलेच मेला याचा . तो बायकोला बी घेऊन गेला ! "

     " आता हे एवढंसं लेकरू कुणाच्या भरवशावर सोडायचं ?म्हणून सोबत आणलं !"

" पण तुम्हाला  गावात कधी पाहिलं नाही ?" 

"कसं पाहशील ? पहिलाच टाइम हाये या गावाला यायचा ! सकाळ पर्यंत गावात पोहोचू . बहीण हाय एक लांबची . दिवसभर थांबील अन संध्याकाळी , नाहीतर रातच्याला परत निघून जाईल . " 

      मी विचारात पडलो , ' सकाळपर्यंत गावात पोहोचू ,म्हणजे काय ? मी तर रोज जातो  ! थोडा उशीर होतो ,पण तास दोन तास ! जाऊ दे .' 

"पायीच निघालास व्हयं  ?" 

मी दचकलो . भानावर आलो . "हो ! चैन सारखी उतरती ! म्हटलं जावं पायीच ! पाया खालचा रास्ता हाए . थोडा उशीर होईल ,एवढंच. "

" फिरायची लय हौस दिसते. रात्रीचं असं फिरू नये. येळकाळ  सांगून येत नाही. "

    " म्हणजे ? " आरं बाबा रात्रीचा वक्त खराब असतो. कोण कसं कोण कसं ? काई कमी जास्त झालं, मग माणूस गुंतून जातुया, फेरा पडतुया. " 

" म्हणजे ? "

 " आरं म्हंजे काय लेका ! तू बी पक्का येडाच हायेस. जाऊ दे. " 

" मावशे ते बाचकं सायकल वर मागे ठेव, अन पोराला बसावं पुढं  ! "

        मावशीने पोराला विचारलं " कां रं पोरा बसतू का ? " पोरगं बोललं नाही. नुसतं     माझ्याकडे पाहिलं व मान हलवली. तसं मी त्याला उचलायला गेलो. 

 नाई म्हणलं , मी बसतो !

 अनं कधी बसलं मलाही कळलं नाही !

 मला काहीतरी विचित्र वाटायला लागलं. पण नेमकं काय, कळत नव्हतं. मावशीने बाचकं मागे ठेवलं होतं. पण सायकल एकदम जड झाली होती. समजं ना ? कशाने जड झाली ? एवढंसं पोरगं आणि एक बाचकं ! सायकल लोटून घामेघूम झालो , पार थकलो. पण गाव काही जवळ येईना. 

        मावशीचा आवाज आला. " का रं बाबा थकलास ? अजून तर लई लांब जायचं हाय ! " 

" मावशी एक विचारू का ? बाचक्यात काय हाय ? "

 तशी मावशी चिडली व जोरात ओरडली, 

" तुझा मुडदा हाय बाचक्यात, पाहून घे ! अरं लेका काय असणार ? दोन - चार कापडं , अन शिदोरी हाय . लहान पोरगं हाय म्हणून लागतं सोबत.

        तुला जड होत असंल तर मी बाचकं उचलून घेतीया. पण मावशीने काही उचललं नाही व मी ही काही बोललो नाही. थोडया वेळाने पोराने आवाज दिला. 

" आजे... भूक लागलीय. काही खायला हाय का ? "

 " ए थांब की , पोराला भूक लागलीया, उपाशी हाय, दोन घास खाऊ दे की. "

 " पण इथं कुठं बसणार ? लाईट न्हाई, उजेड न्हाई. "

 " त्याला काय हुतंय ? बसू की झाडाखाली ! आम्हाला सवय हाय !"

" बरं मंग ,  तुमी आरामात बसा मी जातो. घरी वाट बघत असतील. "

 " अरं तुला काही लाजबीज ! बाईमाणसाला, पोराला एकटं सोडून कुठे जातुया ? थांब की जरा. " 

       मला संशय आला , हे काहीतरी वेगळंच हाय इथून निघावं. ते झाडाखाली जाऊन बसले. तसा मी हळूच सायकल कडे सरकलो. चैन कशीतरी लावली व जोरात पायडल  मारून जीव खाऊन पळालो. मागून पोराचा आवाज आला,

 " आजे, ते पळून गेलं ! " मावशीचा आवाज आला , 

" जाऊ दे कुठं जाईल. ईल परत. " 

     माझ्या जीवाचं पाणी पाणी झालं. पाच - दहा मिनिट झाली. आता आपल्या जीवाला काही धोका नाही असं वाटलं म्हणून उतरलो. म्हटलं जरा मोकळं व्हावं म्हणून थांबलो. काम उरकलं, म्हटलं निघू. तितक्यात आवाज आला , 

" ओ भाऊ ! " एक बाई होती. तिशीतली असंल. 

" माझं पोरगं सापडेना, तू पाहिलं का कुठं ? "

     ' च्या मारी ! आता ही कोण म्हणायची. अनं रात्री कुठं फिरतीया ? ' 

"अरं भाऊ माझं पोरगं सापडना. लहान लेकरू हाय. कुठं हाय काय मालूम ? " 

अनं रडायला लागली. तिचं रडणं चालूच. तिचं रडणं ऐकून जीव घाबरायला लागला. तसा सायकल घेऊन पळाया लागलो. बसायचं बी भान नाही ! रडणं चालूच !

        बराच येळ  पळालो . नंतर थांबलो. 

' आज काही खरं नाय ! काय चाललंय आज ? गाव पण येईना रस्ता पण संपेना ? एवढा येळ का लागतोय ?'

 समोर एका झाडाखाली कुणीतरी बिडी का काहीतरी पीत होतं. मी तिकडून जायला निघालो. तसा त्याने आवाज दिला, 

" ओ दादा ! " मी लक्ष दिलं नाही. 

" ओ  दादा....  काय हे , एकटं कुठं चालला ? " 

" कुठं म्हंजी ? घरी. " 

      " घरी जाल हो एवढी घाई काय हाय ? बसा वाईच ! " 

" नाय लई उशीर झालाय घरचं वाट पाहात असतील. "

 " उशीर झालाय ! आओ बसा की. बरं जा. " मी निघालो. 

" ओ दादा मी काय म्हणतो माझी बायको अनं पोरगं कुठं गावना ? तुम्ही पाहिलं का कुठं ? "

 " म्हंजी "

 " आओ म्हंजी काय ? माझं छोटं पोरगं अनं बायको कुठं गांवनां ? तुम्ही पाहिली का ? " 

       " हो ! "

 " काय ? "

 " एक छोटं पोरगं पाहिलं पण त्याच्याबरोबर एक वयस्कर मावशी होती. " 

" कुठं पाहिली ? "

 " ती झाडाखाली जेवण करतायेत अनं पुढे आलो तर एक बाई भेटली ती पोरासाठी रडत होती ! "

      " च्या मारी या थेरडीच्या ! ..... माझी बायको मारली, मला मारलं आता माझ्या पोराला मारते व्हय ! इला  जित्ता सोडणार न्हाय आज !"

 अनं तो सुसाट पळाला. दिसेनासा झाला. मला समजेना. 

' हा असा काय बोलला ? अनं गेला कुठे पळत पळत ? आणि मी नकळत त्याच्यामागे ओढला गेलो .......... त्याच्या मागावर..........................  

                                                             THE END 

VISIT OUR YOU TUBE CHANNEL  

                                  लेखक : योगेश वसंत बोरसे.   

    

➤➤➤➤➤➤➤➤➤➤➤➤➤➤➤➤➤➤➤➤➤➤➤➤➤➤➤➤➤➤➤➤➤➤➤➤➤➤➤


 




⇎⇎⇎⇎⇎⇎⇎⇎⇎⇎⇎⇎⇎⇎⇎⇎⇎⇎⇎⇎⇎⇎⇎⇎⇎⇎⇎⇎⇎⇎⇎                                                           ⇎⇎⇎⇎



 

Previous
Next Post »