गजर - मराठी भयकथा - HORROR STORY MARATHI
MARATHI HORROR STORIES |
लेखक :- श्री . योगेश वसंत बोरसे .
पुंडलिक वरदेचा गजर करत पालखी पुढे पुढे जात होती . टाळ मृदूंगाच्या नादात सर्व तल्लीन झाले होते . पालखी झपाझप पुढे जात होती .त्यात ज्यांच्यात ताकद होती ते वेगाने पुढे जात होते ,काही विलक्षण थकव्याने मागे राहत होते .
दुपार टळून संध्याकाळ झाली होती . व लवकरात लवकर मुक्कामी पोहोचणे गरजेचे होते . घाट ओलांडला की घाटाच्या पायथ्याशी छोटं गाव लागत होतं. त्या गावात मुक्काम होता पालखीचा. पण घाट बराच मोठा होता. डोंगर-दऱ्यांनी वेढलेला. भरगच्चं झाडं, झुडुपं. जंगली श्वापदं त्यामुळे घाट रात्रीचा जास्त वापरात नसे. त्यामुळे मागच्या मुक्कामावरच थांबायचं बऱ्याच वारकऱ्याचं मत होत. पण सूर्य तेव्हा डोक्यावर होता, आपण काही वेळात घाट पार करून पुढच्या मुक्कामी सहज पोहोचू असं काही उत्साही वारकऱ्याचं मत होतं.
त्यामुळे सगळ्यांचं मत विचारात न घेता ते उत्साहाने निघाले. काहींची इच्छा नव्हती. पण ते विरोध करू शकले नाही. घरून निघताना बरेच जण उत्साहाने निघाले होते. पण आता शारीरिक क्षमता उघडी पडली होती. पायात पेटके यायला लागले.
उत्साह कमी व्हायला लागला. पण देवकार्य असल्याने त्यात सहभागी झाल्याने नाही कसे म्हणणार ?मारून मुटकून आणल्यासारखे चालत होते, रेंगाळत रेंगाळत.
असं करता करता सर्व जण पांगत गेले. एकमेकांपासून दूर होत गेले. काही ठराविक वारकरी पालखीसोबत जात होते. त्यांना मुक्कामी पोहोचायचे होते. नामाच्या गजरात इतके तल्लीन होते की आपल्या सोबत कुणी आहे कुणी नाही हे सुद्धा कुणी लक्षात घेतले नाही.
सूर्य मावळायला लागला तसा घाटातला अंधार वाढायला लागला. जाणकारांच्यामते दोन तास चालल्यावर घाट संपणार होता. हे समजल्यावर काही जण हताश झाले, निराश झाले. काहींनी अक्षरशः गुडघे टेकले. एखादी गाडी आली तर देवाची माफी मागू, नाक घासणी करू व गाडीतून निघून जाऊ असा विचार करून कुणी मागे थांबले.
पण गाडी येईल तर शपथ ! बघता बघता अंतर वाढत गेलं काहीजण एकटे पडायची वेळ आली. त्यांना पुढे जावं कि मागच्यांसाठी थांबावं कळत नव्हतं. असाच एक गडी एकटा पडला, सखोबा नाव त्याचं. मूळचा भित्रा स्वभाव. कधी कुठे एकटं फिरणं माहीत नाही. कि कुणामध्ये मिसळणं माहीत नाही. अबोल, एकलकोंडा. त्याची आई रखमाबाई, तिचा सखोबामध्ये खूप जीव.
आपला मुलगा चारचौघात मिसळावा त्याची हिंमत वाढावी, म्हणून तिने जबरदस्ती त्याला वारीला पाठवलं. सखोबाचा पण आपल्या आईमध्ये जीव होता. त्यालाही तिचं मन मोडवेना. म्हणून तो ही निघाला.
बरं इथे काही कुणाशी बोलायचा प्रश्न नव्हता. देवाचं नामस्मरण करत करत पुढे जायचं. मुक्काम असेल तिथे दोन घास पोटात ढकलायचे . व पुढे निघायचं. दोन दिवस काही वाटलं नाही.
तेहेतीस कोटी देव आपले. एकेकाचं नाव आठवून घ्यायचं म्हटलं तरी आयुष्य संपून जाईल. पण पिढ्यानपिढयांच्या संस्काराने म्हणा, अनुवांशीकतेने म्हणा किंवा रक्तातच ते भिनलंय म्हणा. माणूस घाबरला तर शक्यतो जिभेवर एकच नाव येतं. सखोबा नकळतपणे राम राम राम राम........ करायला लागला.
पोटात भीतीने गोळा येत होता. काय करावं कळत नव्हतं. शरीर, मन, बुद्धी प्रचंड थकलं होतं. पण इथे थांबायचं म्हणजे ?............... नकोच.
घाट वळणा वळणाचा होता. एका बाजूला उंच डोंगर, एका बाजूला खोल दरी. पण दोन्ही भरगच्च, एका वळणावर जाऊन सखोबा थांबला. मागे पुढे नजर फिरवली काहीच दिसेना. चिटपाखरूही नाही. म्हणजे या भयाण वातावरणात आपण एकटे आहोत. आता काय करायचं ? आजूबाजूला बघितलं एका बाजूला थोडी बसायला जागा आहे असं दिसलं तसा सखोबा विचार करू लागला, थोडा वेळ बसावं, मागची मंडळी आली की पुढे जाऊ. त्याच्या विचारांनी तोच चरकला. मागची मंडळी ? मागे कुणी थांबलंय का ? कि आपणच मागे पडलोय. आणि तो भीतीने थरथरायला लागला.
पुन्हा राम...... राम चा जप सुरु झाला. रात्र बरीच झाली होती. त्याला आपल्या मोबाईल ची आठवण झाली. त्याने थरथरत्या हातांनी खिशातून मोबाईल काढला . वेळ बघितली ,साडेआठ? म्हणजे अजून काही फार रात्र झाली नाही .पण तरी साडेआठ ?कुणी तरी मघाशी बोललं होतं ,तास दोन तास सतत चाललं कि घाट संपतो म्हणून ,पण असं तर काही वाटत नाही .याचा अर्थ एकतर तो खोटं बोलला होता ,नाहीतर त्याला माहित नसावं .किंवा लोकांना दिलासा देण्याकरता बोलला असेल .
बराच वेळ झाला ,एवढ्या वेळात एक ही गाडी येऊ नये .तो झाडाच्या जवळ उभा राहिला ,कधी फांदीला धरून दोन्ही बाजूला झुकून बघायचा ,एखादी गाडी येतेय का ?
तेवढ्यात बस सारखं काही तरी येतांना दिसलं याला आनंद झाला !
सखोबा तसाच भान हरपून नाम स्मरण करायला लागला व फांदीला धरून डोलायला लागला .बस जवळ जवळ येऊ लागली ,तास हा हातवारे करायला लागला . याचे विचित्र हातवारे पाहून बस मधील एक बाई जोरात किंचाळली !आणि याच्या दिशेने हातवारे करून ,बोट दाखवून भूत ..भूत म्हणून ओरडायला लागली .
ड्राइवर ने करकचून ब्रेक मारला . तसा बाकीच्या प्रवाश्यांनी विरोध केला . थांबू नका म्हणून !या घाटात अमानवी शक्तींचा वावर आहे ,हे आज प्रत्यक्ष अनुभवलं ,चला बस काढा . ड्रायव्हरचा नाईलाज झाला व राग ही आला . या बावळटाला जर यायचं होतं तर डाव्या बाजूला उभं राहायचं ,हात द्यायचा ,गाडी थांबली असती की ! पण नाही .मर म्हणा आता असाच !
व बस भर्रकन निघून गेली. तसा सखोबा बसच्यामागे पळायला लागला. ते कुणी पाहिलं. बसमध्ये गोंधळ उडाला. इकडे सखोबा धाप लागून थांबला व बस पुढे जाऊन थांबली पण ते सखोबाला समजलं नाही. तो पुन्हा त्या झाडाच्या दिशेने गेला. तिथे थांबला दुसऱ्या गाडीची वाट पहात.
इकडे बस मधील काही बहाद्दर उतरून खाली आले. दोघे- तिघ उतरले होते. चारी बाजूला याला शोधू लागले. पण हा दिसेल तर शपथ...... पण एकाला तो दिसलाच. आणि तो उलट्यापावली बसकडे पळाला. काय झालं ते दोघांना कळेना पण बस सुटली तर घाटात पायपीट करावी लागेल म्हणून तेही पळायला लागले. या तिघांना पळताना पाहून बसमधील लोकांना वेगळंच वाटलं त्यांच्या कल्ल्याने ड्रायव्हर वैतागला त्याने बस चालू केली. बसचा आवाज ऐकून हे तिघे जीव खाऊन पळाले व धापा टाकत बसमध्ये चढले. तसा कंडक्टरने धाडकन दरवाजा बंद केला व बेल मारली.
तसं प्रवासी यांना विचारायला लागले. दोघांना काही सांगण्यासारखं नव्हतं पण जो पळाला त्याला सगळे विचारायला लागले. काय झालं काय झालं म्हणून. तसं त्याला आपलं महत्व वाढल्यासारखं वाटलं व तो जे बघितलं ते तिखट मीठ लावून रंगवून रंगवून सांगायला लागला.
त्याने केलेलं वर्णन असं - " अहो काय सांगू तुम्हाला. आम्हाला वाटलं घाटात बिचारा एकटा राहायला असेल म्हणून बस थांबवली. म्हटलं हा येईल पण नाही. त्याची हद्द त्या झाडाजवळच होती. थोडा पळत पळत आला. व हद्द संपली तसा गायब झाला.
आम्ही शोधलं पण दिसेचना. आणि माझं अचानक लक्ष गेलं तर त्या फांदीला तो उलटा लटकला होता. व खिदळत होता, मला खुणावत होता पण मला असे बरेच अनुभव आले आहेत. त्यामुळे मी त्याला न जुमानता बसकडे पळालो. कारण त्याच्या हद्दीतून निघणं गरजेचं होतं."
एकाने विचारलाच, " अहो दिसायला कसा होता ? " प्रश्न इतका विचित्र होता की याला बोलताच येईना. " कसा म्हणजे ? " " अहो दिसायला कसा होता ? " त्या तिघांनीं ज्यांनी ज्यांनी बघितलं होतं त्यांनी सांगायला सुरुवात केली. तशी याने बेल मारली " अहो तो आमचा सखोबा. आमच्याबरोबर वारीला आला होता. पहिल्यांदा आला होता चुकामुक होऊन अंतर वाढत गेलं. हा पुढे निघाला व मी मागे राहिलो थांबा, त्याला बरोबर घेऊ नाहीतर बिचारा खरंच भूत व्हायचा. "
परत बसमध्ये गोंधळ माजला काही क्षणांत बस थांबली व ती व्यक्ती खाली उतरली. उलट्यापावले लगबगीने जाऊ लागली. तो काही अंतर पुढे गेल्यावर बसची खरखर ऐकू आली. याने वळून बघितलं पण बस निघून गेली होती.
इकडे सखोबा घाबरून घाबरून कंटाळला होता. त्याला आता ग्लानी आली होती. तितक्यात त्याला काही अंतरावरून कुणीतरी हाक मारताय असं वाटायला लागलं.
व काही अंतरावर एक आकृती आपल्या दिशेने सरकताना दिसली. आणि सखोबाचा धीर सुटला. तो विरुद्ध बाजूला पळायला लागला. सखोबाला पळताना पाहून ती व्यक्ती आवाज देत सखोबाच्या मागे यायला लागली.
तसा सखोबा जीव खाऊन पळत सुटला. आणि पुढच्या वळणावरून एक ट्रक आला. ट्रक व सखोबा इतके अनपेक्षितपणे समोर आले होते की, सखोबाला स्वतः ला वाचवता आला नाही.
आणि ड्रायव्हर ? त्याच्या डोक्यात तर पक्कं फीट होतं.की असं कुणी समोर आलं तरी थांबायचं नाही. तो थांबला नाही उलट स्पीड वाढवला आणि ड्रायव्हरला आपले अनुभव किती खरे आहेत याचा विश्वास वाढला.
कारण आताच समोरून येऊन एकजण गाडीवर आदळला होता. तरी पुन्हा समोरून पळत येताना दिसत होता. हातवारे करत गाडी थांबवत. पण ड्रायव्हर आता अलर्ट होता. तो थांबणार नव्हता.
आणि तो ट्रक पुढे गेला ,आणखी एकाला चिरडत !एक गैरसमज पक्का करत व लोकांना सांगायला चुकीचा अनुभव गाठीशी बांधत ,कि या घाटात भुतांचा पिशाच्चांचा वावर आहे ,जे गाड्यांना हात देतात ,नाही थांबलं तर गाडीवर येऊन आदळतात व गायब होतात ...
लोकांच्या मुर्खपणामुळे ,भीती मुळे दोन जीव हकनाक गेले होते ..... दुसऱ्या दिवशी सापडलेल्या प्रेतांच्या अवस्थेने याच्या वर शिक्का मोर्तबच झाले . की काही अमानवी शक्ती इथे जागृत आहेत ,इथे रात्रीचे जाणे म्हणजे मृत्यूला आमंत्रण आहे .
सखोबाची आई अजूनही सखोबाची वाट पहाते . व सखोबा आपण नेमके कशाने मेलो या संभ्रमात इकडे जावं कि तिकडे जावं म्हणून फिरत राहतो .
आणि जे प्रवासी घाटातून प्रवास करतात ,ते काही दिसो ना दिसो पेपरला वाचलेल्या बातम्यांमुळे या गोष्टी किती खऱ्या ,किती खोट्या ,यावर एकमेकांचं डोकं खात बसतात .
आणि जे वारकरी पालखीसोबत पुढे गेले होते ,ते आपण आपल्या पुण्याईने वाचलो म्हणून अजून जोर जोरात देवाचा गजर करतात .......
THE END
लेखक : योगेश वसंत बोरसे.
नोट :( आपण आयुष्यात काही गोष्टी गृहीत धरून चालतो ,त्यामुळे कधी कधी कुणाचा जीव धोक्यात येतो ,तरी आपल्यावर मान्यतांचा पगडा एवढा आहे की आपणच कसे बरोबर हे सांगण्यातच आयुष्य खर्ची घालतो ,हे किती चांगले किती वाईट ज्याने त्याने ठरवावे ,पण असंच जर चालू राहिलं तर या मान्यता बदलणार कधी आणि बदलणार तरी कोण ? यावर प्रकाश टाकण्याचा हा छोटासा प्रयत्न या काल्पनिक कथेतून केला आहे . )
- ALL RIGHTS RESERVED AT YOGESH BORSE & BGSM
➣➣➣➣➣➣➣➣➣➣➣➣➣➣➣➣➣➣➣➣➣➣➣➣➣➣➣➣➣➣➣➣➣➣➣ ➣➣➣
ConversionConversion EmoticonEmoticon