शाबासकी - PART - 1 - मराठी भयकथा - MARATHI HORROR STORY

शाबासकी - PART - 1 - मराठी भयकथा - MARATHI HORROR STORY 

marathi horror stories
 MARATHI BHAYKATHA

       PART - 1 - लेखक : योगेश वसंत  बोरसे 

 " शाब्बास ! " शिक्षकांची शाबासकीची थाप गणेशच्या पाठीवर पडली, तसा गणेशचा उर अभिमानाने भरून आला. एका छोटयाश्या गावातील छोटी प्राथमिक शाळा.

  इयत्ता पहिली ते चौथीपर्यंतची. तेवढी एकच शाळा होती गावात. पुढे शिकायचं तर पाच किलोमीटर वर दुसरं मोठं गाव होतं. तिथं जावं लागायचं. वार्षिक परीक्षेचा निकाल लागला होता. गणेश सर्व तुकड्यांमध्ये पहिला आला होता. डोळे गुरुजींचा तो लाडका विद्यार्थी.

  आपलं नाव हाच मोठं करेल याची डोळे गुरुजींना पूर्ण खात्री होती. अडचण एकच होती, गणेशच्या घरची परिस्थिती. परिस्थिती एवढी खालावलेली होती की दोन वेळा हाता - तोंडाची गाठ पडणं मुश्किल झालं होतं. अशा परिस्थितीत हा दुसऱ्या गावी जाऊन शिक्षण घेऊ शकेल, असं गुरुजींना शक्य वाटत नव्हतं. 

  अर्थात गणेशच्या घरच्यांशी बोलणं गरजेचं होतं. शाळा सुटली. सर्व मुले वर्गाबाहेर पळाली. पण गणेश ? त्याची पावलं शाळेतून निघत नव्हती. तो रेंगाळत रेंगाळत शाळेच्या भिंतीकडे पाहत त्यावर हात फिरवत चालला होता.जसा काही तो निरोप देत होता, दगड, माती, दारं, खिडक्या, कौलं, घंटा सर्वांना. 

  घंटा ! शाळेची घंटा. वाजली की अंगात चैतन्य निर्माण होतं, रक्त सळसळतं ! मग शाळा सुरु व्हायची घंटा असो की शाळा सुटायची. आता आपल्या आयुष्यात पुन्हा घंटा वाजते की नाही या आशंकेने तो घंटेजवळ पोहोचला व घंटेवरून अलगद हात फिरवला. तसा मागून गुरुजींचा आवाज ऐकू आला. 

  " गणेश... " गणेशने वळून बघितलं. त्याच्या डोळ्यात आसवांनी गर्दी केली होती. गुरुजी जवळ आले तसा त्याने वाकून नमस्कार केला, तसे दोन थेंब त्यांच्या पायावर पडले. गुरुजींनी त्याला मायेने जवळ घेतलं. " हे बघ, रडू नकोस, मी तुझ्या आई - वडिलांशी बोलतो. तू कुठे राहतोस ? " गणेशला काय बोलावं कळेना. " अरे सांग ना कुठे राहतोस ? " " गुरुजी मसणवटीजवळ छोटी झोपडी आहे, तेच माझं घर. गुरुजींचा हात नैराश्यानेखाली आला. ' एवढा बुद्धिमान, चुणचुणीत मुलगा. याला राहायला साधं घरही नाही. स्मशानात राहतो ? काय हे दुर्देवं ?' 

  " गुरुजी मी जातो. " गणेशच्या बोलण्याने त्यांची विचार शृंखला तुटली. " अरे थांब आपण सोबत जाऊ. " " का ? " " का म्हणजे काय ? मला तुझ्या घरच्यांना भेटायचंय. " गणेश शून्यात पाहत म्हणाला, " काही उपयोग नाही. कुणी भेटणार नाही. " " अरे का भेटणार नाही ? " " कारण कुणीही जिवंत नाही. " गुरुजींना हा मोठा धक्का होता. याचे घरचे गेले आणि आपल्याला माहीत ही नाही ! की हा  वेगळ्या अर्थाने बोलतोय, हो तसंच असावं. " बाळा असं बोलू नये, गरीब असले तरी आपले आई - वडील आहेत ते. सांग कधी भेटतील ? " " रात्री ! " " रात्री का ? आता नाही भेटणार ? " गुरुजींनी विचारलं. " नाही. मला तरी रात्रीच भेटतात, मसणवटीत. जर तुम्हाला भेटायचं असेल तर रात्रीच यावं लागेल. " गणेश उत्तरला.

  " बरं रात्री येतो मग तर झालं ! पण किती वाजता येऊ ? " गुरुजी म्हणाले. गणेश पुन्हा शून्यात पाहत म्हणाला, " रात्री १२ नंतर कधीही या,पण येणार ना ! मी तुमची वाट पाहीन. आणि शक्यतो एकटेच या ! " गुरुजींना काय बोलावं कळेना. ' एकटे या ! हा एकटं यायला का सांगतोय ? आपण याच्या भल्यासाठी याच्या आईवडिलांना भेटणार होतो पण ते वारले आहेत हे आपल्यालाही माहित नाही ! आणि मेलेल्या माणसांना कसं भेटणार ? असं कुणी भेटतं का ? पण गणेश सांगतोय म्हटल्यावर असू शकेल. ' 

  गुरुजी संभ्रमात पडले. आणि पुढच्या क्षणी त्यांच्या डोक्यात सुज्ञ विचार आला, ' जर मेले आहेत तर त्यांना भेटायची गरज काय ? एकतर याचे कुणी नातेवाईक ठरवतील किंवा स्वतः गणेशच ठरवेल, काय करायचं ते ? आपण कशाला यात पडायचं ?' 

 ' मुलगा हुशार आहे, चुणचुणीत आहे,ठीक आहे. पण म्हणून आपला जीव का टांगणीला लावायचा ? ' कदाचित गणेशने त्यांच्या चेहेऱ्यावरील भाव ओळखले असावेत किंवा गुरुजी काही बोलत नाहीत हे पाहून त्याला खात्री झाली, हे येणार नाहीत. 

  " गुरुजी एक बोलू, रागावणार तर नाही ना ? " " काय रे ? " " गुरुजी ज्या परिस्थितीत मी जगतोय त्याची कल्पनाही तुम्ही करू शकत नाही आणि सत्य पचवू शकत नाही. मग उगीच पोकळ आशा कशाला लावता ? तुम्ही नका येऊ, तुम्हाला ते जमणारही नाही ! " असं म्हणून गणेश शाळेतून बाहेर पडला व गुरुजी भानावर आले. क्षणभर आपण मसणवटीतच आहोत असं त्यांना वाटलं पण आपण शाळेतच आहोत हे समजल्यावर त्यांनी उपरण्याने घाम टिपला, वर्गाकडे वळाले आवरासावर केली व शाळेतून बाहेर पडले. 

  डोक्यात नेमके तेच विचार डोकावत होते. ' गणेश नेमकं काय बोलून गेला ? आपण भित्रे आहोत म्हणून ? की आपण स्वप्न दाखवतो म्हणून ? नाही त्याचा अर्थ आपण भित्रे आहोत असाच होता पण आपण खरंच भित्रे आहोत की बनले आहोत ? कारण वर्षानुवर्षे आपण ठरलेल्या दिनक्रमात अडकून पडलोय. शाळेच्या वेळेत शाळेत असतो, इतर वेळेस आपल्या घरी. वेळेचं इतकं मजबूत बंधन पडलंय की ठरवलं तरी मोडू शकत नाही. इतर गोष्टी कधी केल्या नाहीत. कधी एकटे फिरत नाही. मग असं थोडं वेगळं घडलं, वेगळं ऐकलं की धडधड वाढते. याचा अर्थ आपण भित्रे आहोत ? तो एवढासा पोरगा त्या भयाण वातावरणात जगतोय तो नाही घाबरत. कदाचित त्याने ते आयुष्य मान्य केलंय, म्हणून ? नाहीतर त्याच्या सोबत कुणी राहत असेल. ' 

  गुरुजी विचारांच्या नादात अभावितपणे गणेशच्या घराच्या दिशेने निघाले होते. पण पावलं लांबच थबकली. गणेशच्या घराजवळ, झोपडीजवळ कुणी होतं व गणेश त्यांना हातवारे करून काहीतरी सांगत होता, त्यांचे इशारे गुरुजींच्या दिशेने होते. 

  मे  महिन्याचा उन्हाचा तडाखा. गुरुजी घामाघूम झाले. या फंदात न पडलेलं बरं, असं ठरवून आपल्या घराकडे वळाले. डोक्यात विचार येत राहिले, ' आपण इतके स्वार्थी कधी झालो कळालेही नाही. बरं गणेशने काही आपल्याला सांगितलं नव्हतं मदत करायला. आपण स्वतः हुन पुढाकार घेतला होता. आता मागे सरकणं म्हणजे काय ? आपण जाऊ रात्री त्याच्याकडे पाहू काय होतं ते ? ' 

  आणि त्यांनी हा  विषय बाजूला ठेवला. दुपारचा आराम करणं गरजेचं होतं. रात्र झाली तसा गुरुजींनी निश्चय केला व ते तयारीला लागले. रात्री बारा नंतर जायचं होतं कुणाला सोबत न्यावं पण गणेश म्हणाला होता की शक्यतो एकटेच या म्हणून, पण एकटं जाणं गुरुजींच्या बुद्धीला पटत नव्हतं. पण आपण कुणाला बोललो ही नाही या विषयाबद्दल मग आता वेळेवर कोण तयार होईल ? असा कोण आहे ? जो लगेच ऐकेल ? असा धाडसी कोण आहे ?' आणि तितक्यात दारावरची बेल वाजली. 

  गुरुजींनी दरवाजा उघडला. दारात अनोळखी व्यक्ती उभी होती. त्याने सरळ सुरुवात केली. " गुरुजी स्वतः चा जीव प्रिय असेल तर गणेशपासून लांब राहा !................. " 

                           TO BE CONTINUED......   

      VISIT OUR YOU TUBE CHANNEL ALSO                                                                                  लेखक : योगेश वसंत बोरसे. 

➢➢➢➢➢➢➢➢➢➢➢➢➢➢➢➢➢➢➢➢➢➢➢➢➢➢➢➢➢➢➢➢➢➢➢➢➢

  
  

 

Previous
Next Post »