शाबासकी - भाग - २ - मराठी भयकथा MRATHI HORROR STORY

         शाबासकी -  भाग - २ - मराठी भयकथा MRATHI HORROR STORY 

MARATHI HORROR STORIES
 MARATHI HORROR STORIES

PART -2-                 

 लेखक : योगेश वसंत बोरसे. 

  " तू कोण आहेस ? आणि तू कोण सांगणारा ? " " गुरुजी मी तुमच्या भल्यासाठीच सांगतोय. तुम्हाला वाटतं तेवढं प्रकरण सरळ नाही. तुम्हीच विचार करा, ८ ते १० वर्षांचा मुलगा मसणवटीत एकटा कसा राहीला ? "

   त्याच बोलणं ऐकून गुरुजी विचारात पडले. ' आपल्या डोक्यात हा विचार आलाच नाही. ' " अरे हा खरोखर एकटा राहतो तिथं, बापरे ! पण मग खरं काय ते कळणार कसं ? " " गुरुजी तुम्हाला कळून काय करायचंय ? आणि जास्त हौस असेल तर रात्री जाऊनच या ! " " पण तू कोण ? आणि तुला कुणी सांगितलं की मी त्याला भेटायला जाणार आहे म्हणून ? " " तुम्ही परत सुरु झाले ! मरा तिकडं ! मला काय करायचंय, " असं म्हणून तो चालला गेला. ' काय बावळट आहे, याला काय आपली एवढी काळजी ! माझा मी समर्थ आहे काळजी घ्यायला. '

  रात्र वाढली तशी गुरुजींची धडधड वाढायला लागली. घड्याळ्यात बघितलं, ११ वाजून गेले होते. निघावं आता, तयारी केली पाहिजे पण तयारी काय करणार ? गुरुजी विचारात पडले. त्यांना कुठे अनुभव होता या गोष्टींचा. त्यांनी भक्तिभावाने देवाला हात जोडले, नमस्कार केला. थोडा अंगारा लावला, कपाळाला, जिभेला व घशाला. " देवा  रक्षण कर ! " 

  व निघाले. हातात एक काठी घेतली. तेवढाच आधार ! चला ! अंतर फार काही नव्हतं. फार तर १० मिनिटे गुरुजी चालले असतील पण ते १० मिनिटं त्यांना युगासारखे वाटले. मसणवटीजवळ पोहोचले. स्मशान शांतता, चिडीचूप शांतता. दोन - तीन मोठी झाडं होती. अजागळासारखी. चारही बाजूला वाढलेली. त्यांची  सळसळ सोडली तर इतर काहीही आवाज नाही. 

  स्मशान शांतता काय असते याची गुरुजींना आज प्रचिती आली. शाळेत शिकवणं वेगळं , अनं प्रत्यक्ष अनुभवणं वेगळं. ज्यांना अनुभव घ्यायचा असेल त्यांनी रात्री खुशाल जावं स्मशानात. त्यांच्या मनाने कौल दिला, इथून निघावं, इथे धोका आहे.

  आपल्यामागे कुणीतरी येऊन उभा आहे ही जाणीव एवढी भयानक होती की गुरुजींच्या कानामागून घाम यायला लागला. धोतर ओलं होतं की काय ? असं वाटायला लागलं पण ते चुकीचं ठरेल असं वाटून ते पटकन एका बाजूला गेले व आपला कार्यभाग उरकला. तेवढे काही क्षण म्हणजे पृथ्वीचा अंत जवळ आला आहे असं वाटतं होतं गुरुजींना कारण आता त्यांची खात्री झाली होती नक्की कुणीतरी मागे उभं आहे. 

  म्हणजे आपण आता परत जाऊ शकत नाही ? आं ! कधीच नाही ? हे काय आहे आपल्यामागे ? पण वळून पाहायची हिंमत नव्हती. आणि ते घर ! ते तर पूर्ण अंधारात होतं. हेच गणेशचं घर आहे ? पण इथं तर काहीच हालचाल नाही. ते हिंमत करून त्या जुन्या पडक्या घरापर्यंत पोहोचले. घर तर प्रशस्त वाटतंय मग हा झोपडी का म्हणाला ? आणि आपल्याला ही लांबून तसंच वाटलं, काय गौडबंगाल आहे, कळत नाही !

  आपल्या मागे कोण होतं मगाशी ? आता ! गुरुजींनी मागे वळून बघितलं इथं तर कुणी नाही. ते हिंमत करून त्या घरापर्यंत पोहोचले. दरवाजा बंद होता. ते आवाज देणार तोच दरवाजा उघडला. तरी त्यांनी आवाज दिलाच, " गणेश, ए गणेश, अरे मी आलोय. " प्रतिसाद काहीच आला नाही पण काही क्षणात एक तरुण स्त्री दरवाजातून बाहेर आली. गुरुजींनी तिच्याकडे बघितलं व त्यांचं काळीज खल्लास झालं ! 

  इथे असं पाहायला मिळेल असं त्यांना स्वप्नातही वाटलं नव्हतं. गुरुजींचं लग्न अजून व्हायचं बाकी होतं त्यांना समोर सत्य आहे की भ्रम कळत नव्हतं. बरं आपण आपल्या विद्यार्थ्याच्या घरी आलो आहोत हे भान सुद्धा त्यांना राहिलं नाही. 

  " तुम्ही ? " " मी  गणेशाची आई ! " गुरुजींची ट्यूब पेटली. त्यांच्या अंगात जेवढं रक्त होतं तेवढं उसळ्या मारून हृदयाकडे आलं. ' म्हणजे ? ही बाई जिवंत नाही ! पण गणेश कसा ही कशी ? ' " गणेश त्यांच्या   वडिलांवर गेलाय. " तिने सांगितलं व गुरुजी कानफटले. ' आपण तर काहीच बोललो नाही, हिला कसं कळालं ? ' " या ना आत या ! " " नाही, नको ! " " अहो भेटायलाच आलात ना, मग नाही काय म्हणताय ? " तिने हसत विचारलं. हसणं एवढं मोहक होतं की गुरुजीच काय कुणीही असतं तर घायाळ झाला असता. 

  " अहो भेटायचंय म्हणजे गणेशला भेटायचंय, तो झोपलाय का ? " हो ! " " ठीक आहे मग मी नंतर येतो. " " नंतर कशाला ? गणेश तर म्हटला होता की तुम्ही आम्हाला भेटायला येणार होते, मग आता काय झालं ? "

  " हो तुम्हाला म्हणजे दोघांना. गणेशचे वडील कुठे आहेत ? " " आहेत ना, पण मध्ये याल तर भेटतील का बाहेरच भेटायचं आहे ! घाबरू नका आम्ही काही खात नाही तुम्हाला ! " असं म्हणून ती घरात गेली सुद्धा. जसं काही तिची खात्री होती की गुरुजी मागून येतीलच. 

  गुरुजी बोलत बोलत घरात गेले, " अहो तुमचा गणेश सर्व तुकड्यांमध्ये पहिला आला, चौथीमध्ये ! म्हटलं तोंड गोड करावं घरी जाऊन. व त्याच्या पुढच्या शिक्षणाबद्दल बोलावं. " गुरुजींचं बोलणं ऐकलं व ती खळाळून हसली. " काय गुरुजी ! ही काही वेळ आहे तोंड गोड करायची ? " गुरुजी तिच्या मागे मागे गेले, मोहिनी पडल्यासारखे त्यांना हे कोडं उलगडत नव्हतं. ही बाई जिवंत नाही हे माहित पडूनही आपल्याला हिची भीती वाटत नाही, आसक्ती वाटतेय. सुंदर नाही म्हणता येणार पण एखादी सौंदर्यवती फिकी पडेल अशीही दिसतेय. सावळा रंग....... टंच बांधा...... गुरुजी पुढचा काही विचार करू शकले नाही. कारण तिने त्यांचे विचार ओळखले असावेत. ती पुन्हा खळाळून हसली. 

  समोर एक छोटा मुलगा झोपला होता. त्याच्या शेजारी कुणी माणूस होता  ! हे आल्यावर तो उठला व यांच्याकडे रागाने बघत बाहेर चालला गेला. गुरुजींना काही कळत नव्हतं. " हे ? " " ते गणेशचे वडील. " " कुठे गेले ? " " येतीलच. कुऱ्हाड घ्यायला गेले. " " का ? " " अहो का काय ? " " तुमची व्यवस्था करायला नको ? " गुरुजींना घाम फुटायला लागला. 

  त्यांनी घाम पुसत विचारलं, " बरं गणेश कुठे आहे ? " " काय गुरुजी आल्यापासून गणेश गणेश करताय. हा काय झोपलाय. " " अहो काय वेडा समजलात का ? अहो तो आठ - दहा वर्षांचा आहे हा तर पाच वर्षांचाही वाटत नाही . " " गुरुजी,  तुम्हाला तोंड गोड करायचंय ना ! " तिच्या डोळ्यात वेगळीच चमक होती. गुरुजींना कससंच झालं. " मी जातो. " " कुठे ? " " कुठे म्हणजे माझ्या घरी ! " " अहो हे पण तुमचंच घर आहे. काहीही काय ? हे बघा ! " आणि त्या बाईने पडदा बाजूला केला. आपण स्वप्नात तर नाही ना ? कारण समोर त्यांची बेडरूम होती. 

  " मी जातो हे सगळं खोटं आहे, भ्रम आहे . तुम्ही जिवंत नाहीत ! गणेशाचे वडील जिवंत   नाहीत !" गुरुजी भ्रमिष्टासारखे बडबड करायला लागले व दरवाजाकडे पळाले आणि मागून तिचं मोहक हास्य, खळाळतं हास्य गुरुजींना मागे ओढत होतं. गुरुजींना दारापर्यंत पोहोचायला बराच वेळ लागला. त्यांनी धाडकन दरवाजा उघडला व बाहेर पळाले. धाप लागली  तसे गुरुजी थांबले. बाप जन्मात एका वेळेस एवढे पळाले नसतील. हापत हापत गुडघ्यांमध्ये वाकले व मागे वळून पाहिलं. 

  हा काय प्रकार आहे ? तिथे पुन्हा झोपडीसारखं काही दिसत होतं. गुरुजी  दोन्ही हातांनी केसं उपटायला लागले. " गुरुजी काय झालं, या ना ! " आवाज ओळखीचा होता. आवाज गणेशचा होता. गुरुजी गोंधळात पडले. हा गणेश आहे मग तो मध्ये झोपला तो कोण ? 

  " गुरुजी इथून निघून जा. हा गणेश नाही. मी तुम्हाला सांगितलं होतं या फंदात पडू नका म्हणून ! अजूनही वेळ गेलेली नाही. " तोच दुपारचा आवाज. पण फक्त आवाज येत होता कुणी दिसत नव्हतं. गुरुजी चारही बाजूला बघायला लागले. गोल गोल फिरायला लागले.  

  तसे चारही बाजूंनी आवाज यायला लागले. कधी गणेशचा, कधी त्या स्त्रीचा, कधी दुपारी ऐकलेला. गुरुजी या ना ! मधेच खिदळण्याचा. मधेच निघून जाण्याचा. गुरुजींचं डोकं गरगरायला लागलं.  त्यांनी दोन्ही हातांनी डोकं दाबून धरलं. कानावर हात ठेवले. पण आवाज वाढत गेला इतका की असह्य झाला. हळू हळू सर्व संवेदना बधिर झाल्या व गुरुजी तिकडेच कलंडले................   

                           TO BE CONTINUED..... 

       VISIT OUR YOU TUBE CHANNEL ALSO

                                                लेखक : योगेश वसंत बोरसे.  

⇼⇼⇼⇼⇼⇼⇼⇼⇼⇼⇼⇼⇼⇼⇼⇼⇼⇼⇼⇼⇼⇼⇼⇼⇼⇼⇼⇼⇼⇼⇼⇼⇼⇼⇼⇼⇼⇼⇼








   






























  
  
Previous
Next Post »