शाबासकी - भाग ३ रा - MARATHI HORROR STORY
मराठी भयकथा |
Part - 3
" गुरुजी ,अहो गुरुजी !" गुरुजीनी डोळे उघडले. सूर्य उगवला होता . गावकरी त्यांच्या अवती भोवती जमा झाले होते. त्यांना कळेना गुरुजी इथे कसे आले? गुरुजी उठून बसले. एकाने त्यांना पाणी पाजलं , "आता बरं वाटतंय का?" गुरुजी चारी बाजूला बघायला लागले. " गुरुजी काय झालं ? बरं वाटतंय ना ?" ते काही बोलले नाहीत.
उठले व सरसर चालायला लागले. मागून आवाज आला, "गुरुजीला प्रसाद भेटला दिसतोय!" त्यांनी वळून बघितलं व परत आले. "कसला प्रसाद?" नेमकं कोण बोललं त्यांना कळालं नव्हतं म्हणून ते सर्वांकडे पाहत म्हणाले. "अरे बोला ना . कसला प्रसाद?" पण कोणी बोलेल तर शपथ! गुरुजींना त्यांचा शांतपणा सहन होत नव्हता त्यांनी सरळ एकाच्या कॉलरला हात घातला. "अरे बोला ना, कसला प्रसाद?" अरे बोल ना!" "गुरुजी हात काढा ." त्याने दम दिला. "मला दम देतोस ? तुझी लायकी आहे का ?" "गुरुजी तोंड आवरा." "नाही तर काय करशील?" "रात्री कमी झालं वाटतं?" गुरुजींचा डोक्यात लख्ख प्रकाश पडला . 'अरे हा तर हा तर.. काल रात्री... गणेश च्या घरात होता . गुरुजींचे हात आपसुकच खाली आले, त्याच्या डोळ्यात चमक दिसली.
'सांगू का तुम्ही रात्री माझ्या घरी आला होता ते !' तो काही बोलला नाही तरी गुरुजींना कळलं होतं व त्यांची नजर आपोआप खाली झुकली . त्यांना खूप थकल्यासारखं वाटत होतं, अंगातलं त्राण हरवलं होतं, मेंदू शिणला होता. जे घडलं होतंते अगम्य होतं,अतर्क्य होतं,सध्यातरी !
याचा छडा लावायचाच. आपण अजून जिवंत आहोत याचा अर्थ आपलं मरण एवढ्या लवकर नाही,व आपण भित्रे ही नाहीत. कालचा धक्का पहिला होता, तो नकळतपणे आपण पचवला होता. त्यांनी दात ओठ खाऊन प्रतिज्ञा केली.याच्या तळापर्यंत पोहोचेल, भलेही जीव गेला तरी बेहत्तर ! आणि ती ,जी कोणी होती गणेश आई नक्कीच नव्हती . तिची एकदा जिरवायला हवी . माझं तोंड गोड करायची फारच हौस आहे तिला ! 'आज रात्री येतो म्हणा , मग बघू तुझ्या मध्ये किती मस्ती आहे ते !'
या विचारांनी त्यांना बळ दिलं व अंतर्मनाने वेगळी साद घातली ते शाळेकडे गेले, तशी शाळेला सुट्टी होती, पण मुख्याध्यापक व कारकून ऑफिसमध्ये होते. गुरुजी तिथे गेले कारकुना कडून कागद-पेन घेतला ,कागदावर काही खरडलं व मुख्याध्यापकांच्या हातात कागद दिला आणि तडक बाहेर निघाले.
मुख्याध्यापकांना हा अनुभव नवीन होता . त्यांनी कागद वाचला ,राजीनामा ? "गुरुजी, गुरुजी" त्यांनी कारकुनाला त्यांच्या मागे पिटाळला ,तो पळत ओरडत त्यांच्या मागे गेला पण गुरुजींनी मागे वळून बघितले नाही, 'यांची तब्येत बरीय ना? अचानक राजीनामा? इथे लोकांना नोकऱ्या मिळत नाहीत आणि हे महाशय कागद खरडून मोकळे !
मुख्याध्यापक सद्गृहस्थ होते त्यांनी तो कागद सांभाळून ठेवला ,त्यावर सही न करता, ते विचार करत राहिले. काही तरी घडले आहे. कालपर्यंत चांगले होते एका दिवसात असं काय झालं? "सखाराम हे गुरुजी नेमके कुठे राहतात माहितीय का तुला? त्यांनी कारकुना ला विचारलं त्याने मुख्याध्यापकांना इत्यंभूत माहिती दिली व काही वेळात बडवे सर डोळे गुरुजींच्या घरी पोहोचले.
गुरुजींनी दरवाजा उघडला आणि बडवे सरांना समोर पाहून त्यांना आश्चर्य वाटलं त्यांची झोप कुठल्या कुठे पळाली. त्यांच्या चेहऱ्याकडे पाहून बडवे सर भांबावून गेले. एक दिवसात एवढा बदल ? "डोळे काय झालं ? तब्येत बरी नाही का ? अहो सरळ राजीनामा देऊन मोकळे झालात ?" डोळ्यांनी त्यांना आत घेतलं व दार बंद केलं .
चहापाणी विचारलं, पण बडवे सरांना कशातच रस नव्हता."अहो मी काय विचारलं?" डोळ्यांनी जास्त वेळ न घालवता त्यांना बसवलं व थोडक्यात सांगितलं. पण बडवे सर सरळमार्गी व्यक्तिमत्व होतं त्यांचं आयुष्य गेलं या शिक्षकी पेशा मध्ये व सावध सरळ आयुष्य जगण्यात, काही लोकांच आयुष्य असच असतं शांत संथ नदीसारखे, तर काहींचं उफ़ाळत्या समुद्रासारखे! हे दोघे याचे उत्तम उदाहरण होते. बडवे सरांना हे पचनी पडणे शक्य नव्हतं . आपल्या सारखच डोळेंनी साधं सरळ आयुष्य जगावं ,इतकी माफक व प्रांजल अपेक्षा होती त्यांची .
"डोळे एक सांगू ! हे रिकामे उद्योग कशाला करता ? आपली नोकरी सांभाळा ! राहिला प्रश्न गणेशचा ! शेवटी त्याचे प्रारब्ध !" डोळ्यांनी डोक्याला हात मारून घेतला , यांना सांगून काही उपयोग नाही त्यांच्या डोक्यात काहीच शिरलं नाही. इथे प्रश्न गणेशचा नव्हताच . तो कधीपासून बाजूला झाला होता. नाहीतर गोष्ट शुल्लक होती पण आता डोळे यात ओढले गेले होते व प्रकरण वाटतं तितकं सोपं नाही हे त्यांना कळालं होतं. हे प्रकरण संपले शिवाय त्यांची यातून सुटका नव्हती, त्यांनी भाग घेतला नाही तरीसुद्धा !
आणि मुख्य म्हणजे गणेश हा भास होता कि सत्य हे सुद्धा कोडंच होतं. इतकी विलक्षण बुद्धिमत्ता एका सामान्य मुलात असू शकत नव्हती एक तर ही दैवी देणगी होती आणि तसं नसेल तर काही अमानवी होतं, जे दृश्य स्वरूपात समाजात वावरत होतं. वाढत होतं. ते एखाद्या अमरवेली सारखं !जी आताच छाटणं गरजेच होतं, नाहीतर कदाचित पूर्ण गाव याला बळी पडणार होतं.
आणि मुख्याध्यापकांपेक्षा डोळे त्याच्या संगतीत जास्त वावरले होते त्यांना गणेशच्या एक एक आठवणी समोर येऊ लागल्या व कोडं अजून वाढलं. ज्या तत्परतेने गणेश प्रत्येक गोष्टीचे उत्तर द्यायला तयार असायचा ते केवळ अशक्य होतं मुख्य म्हणजे तो सगळं येत असून शाळेत येत होता. त्याचा शाळेत यायचा उद्देश काही वेगळा तर नव्हता आणि त्याने नेमकी ही शाळा का निवडली ?
तो शाळेच्या भिंतीवरून हात फिरवत होता तसा काही त्याचा ऋणानुबंध होता त्या जागेशी ! कमाल आहे हे आपल्याला आता कळतंय ? मग तेव्हा का नाही कळालं ? आणि आपण पाचवीत कुणाला पाठवणार होतो ? गणेश तर म्हटलं हि होता,कि त्याचा काही उपयोग नाही म्हणून !सर्वजण मेले आहेत ! म्हणजे गणेश ही ....
"अहो डोळे ! कुठे हरवलात ?" बडवे सरांच्या आवाजाने ते भानावर आले ,"अहो मी काय म्हणतो ,हे सर्व विसरा ! राजीनाम्याचा खूळ डोक्यातून काढून टाका ! अहो तुमचं लग्नाचं वय आहे , लग्न करा ,संसार करा, तुमचं आयुष्य पडलय अजून ! चला येतो मी !आमच्या सौ . वाट बघत असतील शाळा सोडून कुठे हिंडता म्हणून !"
आणि ते मिश्किल पणे हसले . वातावरणातील ताण कमी करण्यासाठी ! पण डोळेंचं त्यांच्या बोलण्याकडे लक्ष नव्हतं . त्यांनी अचानक बडवेना विचारलं "सर ,हा गणेश आपल्या शाळेत पहिल्यापासून होता कि नंतर आला ?" "अहो डोळे तो मागच्या वर्षीच आला ! का हो ?""काही नाही ,त्याच्या सोबत कोण होतं ?" "अहो त्याचे वडील होते . " "तुम्हाला खात्री आहे कि ते त्याचे वडीलच होते म्हणून ?""काय डोळे ,काहीही काय ? अहो मला खात्री असणार तेच त्याचे वडील म्हणून ? ते तर त्याची आईच सांगू शकेल ना ! " बडवे सर मिश्किल पणे म्हणाले .
"काय सर तुम्ही ? मी विचारतो काय तुम्ही बोलता काय ? " बडवे सरानी डोळ्यांची पाठ थोपटत उत्तर दिलं. " जास्त विचार करू नका .हे बघा डोळे कुणाच्या वैयक्तिक आयुष्यात नाक खुपसणे योग्य नाही ,त्यात फक्त नुकसानच वाट्याला येणार !सरळमार्गी माणसं आपण ,आपल्या हे परवडणार नाही!" "आणि जर माझं अस्तित्वच धोक्यात असेल तर ! तरी नाही !" त्यांच्या बोलण्यानेबडवे सर चरकले . " डोळे अहो काय बोलताय ? एवढ काय झालंय ?" "सर मी मृत्यूच्या दाढेतून परत आलोय काल रात्री. आईवडिलांची पुण्याई म्हणून वाचलो . पण प्रत्येक वेळेस नशीब साथ देईल असं काही नाही, तसं काही व्हायच्या अगोदर हे प्रकरण संपवणं माझ्यासाठी तरी गरजेचे आहे! "
बडवे सरांना आता कुठे गांभीर्य कळालं होतं . "डोळे माझी काही मदत लागली तर सांगा. मला काही अनुभव नाही पण तरी माझ्या परीने शक्य ते नक्की करेन स्वतःची काळजी घ्या आणि लवकर शाळेत परत या . सुट्टी संपायच्या आत. अजून मी राजीनामा स्वीकारला नाही व स्वीकारणार हि नाही ." एवढे बोलूनबडवे सर निघून गेले व डोळे आपल्या विचारांत गुंग झाले. .....
TO BE CONTINUED...
- ALL RIGHTS RESERVED AT YOGESH BORSE & BGSM
- ABOUT US
- PRIVACY POLICY
➤➤➤➤➤➤➤➤➤➤➤➤➤➤➤➤➤➤➤➤➤➤➤➤➤➤➤➤➤➤➤➤➤➤➤➤➤➤➤➤➤➤➤➤➤➤➤➤➤➤➤➤
ConversionConversion EmoticonEmoticon