अनपेक्षित - मराठी भयकथा - MARATHI HORROR STORY

MARATHI HORROR STORIES
 मराठी भय कथा

                                    लेखक :रोहित योगेश बोरसे / योगेश वसंत बोरसे .  

     अमित एका कंपनीत सुपरवायझर होता . कंपनीत जायची वेळ फिक्स होती . पण बाहेर पडायचा काही भरवसा नव्हता . 

    त्या दिवशी सेकंड शिफ्ट होती . ३:३० ते १२:०० पण सर्व कामाची लिंक लावून , कामपूर्ण करून बाहेर पडता पडता रात्रीचा एक तरी वाजायचा . पण बाईक असल्याने काही वाटायचे नाही . एक वाजता निघाला तरी पंधरा मिनिटात घरी पोहोचायचा . त्यादिवशी सेकंड शिफ्ट सुटली. अमितने सर्व डेली वर्क पूर्ण केले कामाची लिंक लावून नाईटच्या सुपरवायझरकडे चार्ज दिला. व बाहेर आला. गाडीला किक मारली गाडी चालूच होईना. 

    पेट्रोल संपलं होतं. दुपारी लक्षात आला नाही. नाहीतर लेवल करून घेतली असती. तो स्वतःशीच बोलला ,पाच मिनिटं तिथेच थांबला. घड्याळात बघितलं. १:१५  मिनिट झाले होते . विचाराच्या नादात बाहेर पडला.  कुणी भेटलं तर लिफ्ट घेऊ. मेनरोडपर्यंत जाऊ. व तिथून एखादी रिक्षा करू. असा विचार करून अमित बाहेर आला. 

   गेटच्या बाहेर येऊन दोन्हीकडे नजर टाकली. सुनसान रस्ते. दिवसा सुंदर दिसणारे रस्ते, झाडं रात्री अंगावर येतात. त्याच्या नजरेतून काहीतरी सुटलं होतं असं अमितला जाणवलं. त्याने पुन्हा नजर फिरवली. काही अंतरावर झाडाखाली अंधारात बस उभी होती. प्रायव्हेट बस असावी. 

   मनात विचार आला, ' या वेळेस तर कुठलीच बस नसते. कंपन्यांच्या बस भराभर निघून जातात. बहुतेक काही बिघाड झाला असावा. त्याने नकळतपणे चालायला सुरुवात केली. काही वेळात अमित बसजवळ पोहोचला. त्याला वाटलं बस रिकामी असेल. अंधारात उभी असल्याने समजत नव्हतं. त्यात स्ट्रीट लाइटही बंद होते. 

   आरामात बसच्या जवळ पोहोचला. खिडकीतून एक एक चेहेरे अंधारात डोकावत होते. काय शोधत होते त्यांनाच माहीत. पुढे सरकत सरकत तो ड्रायव्हरपर्यंत पोहोचला. " बस कुठली आहे ? " त्याने ड्रायव्हरला विचारलं. ड्राइवरने  तोंडातून  एकही शब्द काढला नाही. एकटक त्याच्याकडे पाहत राहिला. त्याची नजर अमितला विचित्र वाटली. 

  हा काही बोलत नाही म्हटल्यावर वळसा घालून दरवाज्याकडे आला. कंडक्टर सीटकडे पोहोचला. " बस कुठं चालली आहे ? मला मेनरोडपर्यंत सोडा ना ! " तो मुलगा काही बोलला नाही. अमितला कळलं की अजून काही नजरा आपल्याकडे रोखून बघताएत. असं का होतंय त्याला कळत नव्हतं. 

  शेवटी त्याने मनातले विचार झटकून टाकले. जाऊ दया ! दुसरी गाडी बघू एखादी नाहीतर वन टू वन करत मेनरोडपर्यंत जाऊ. असं ही  रोज गाडीवर फिरतो. आज वातावरणही छान आहे. ढगाळ वातावरण, थंडगार हवा. पाऊसही येऊ शकतो. हू केअर्स ! आज एन्जॉय करायचं. 

          व तो निघाला. तेवढ्यात ड्रायव्हरने बस स्टार्ट केली व अमितकडे बघितलं. याचा अर्थ         अमितला कळाला व तो निमूटपणे बसमध्ये चढला. त्याला वाटलं बस रिकामी असेल,           थोडीफार तरी असेल, पण अमितचा अंदाज चुकला. बस पूर्ण भरलेली होती. सर्वजण                 त्याचाकडे पाहत होते. कुणी एक शब्द बोलत नव्हतं. शांतता, भयाण शांतता. 

  अमितला विचित्र वाटलं मनात विचार आला. उतरावं खाली पण तेवढा वेळच मिळाला नाही. बस लगेच निघाली. भरधाव वेगाने. अमितला आश्चर्य वाटलं, ' म्हणजे हे आपली वाट पाहत होते की काय ? '

   जाऊ दया. पाच मिनिटांचा तर प्रश्न आहे. वरच्या दांडीला धरून उभा राहिला. बसचा स्पीड पाहून आश्चर्य वाटलं, ' याला कसली घाई आहे एवढी ! रस्ता मोकळाय म्हणून एवढा स्पीड ! ' तसा तो ओरडला, " ओ  हळू ! काय मरायचंय का ? " ड्रायव्हरवर काही परिणाम झाला नाही. तो बस पिटाळत राहिला.

  अमितला याची चिन्ह ठीक दिसेनात. पाच मिनिटात गाडी मेनरोडवर आली होती. अमितला उतरायचं होतं पण ड्राइवर  थांबेल तर शपथ ! " अहो थांबा मला उतरायचंय. " पण तो थांबेना. गाडी अमितच्या घराच्या रस्त्याच्या विरुद्ध दिशेला निघाली. अमित बसच्या दारात जाऊन उभा राहिला. " ओ थांबा ना , मला उतरायचंय. " तो जोरात ओरडला. 

  " घाबरला ! ए फट्टू ! घाबरला ! " बसमधलं जोरात कुणीतरी ओरडलं. आवाज वेगळाच होता. तसे बाकीचे हसायला लागले, हसत राहिले. आवाज वाढत गेला. गोंधळ वाढत गेला, बसचा स्पीड वाढत गेला.  अमितला वाटलं कां बंद करून घ्यावे. आवज असह्य होत गेला. अमितने दोन्ही कानांवर हात ठेवले. टेकून उभा राहिला. डोळे बंद करून घेतले. 

   अन काही क्षणात बस धाडकन समोर जाऊन आदळली. अमित बाहेर फेकला गेला. सुदैवाने जिथे फेकला गेला तिथे मातीचा ढीग होता. तरी ही शुद्ध हरपलीच. 

    डोळे उघडले तेव्हा समजले आपण हॉस्पिटलमध्ये आहोत. क्षणात रात्री घडलेला प्रसंग डोळ्यापुढे येऊन गेला. तशी डोक्यात सणक गेली. त्याने डोकं गच्चं दाबून धरलं तशी डोक्याची पट्टी हाताला जाणवली. 

   तेवढयात आईजवळ आली, " अरे बाळा हळू ! जास्त दुखेल. " आईला पाहून त्याच्या जीवात  जीव आला. डोक्याला मार लागला होता. आईने सांगितलं टाके पडलेत पण जखम किरकोळ आहे.  तुझी बाईक कुठेय ? " 

  " बाईक.......... बाईक कंपनीत आहे. " " मग पडला कसा काय ? " " आमच्या बसचा ऍक्सिडन्ट झाला. अगं तो मूर्ख ड्राइवर  बस एवढी पळवत होता की त्याने एका ठिकाणी बस ठोकलीच व मी बाहेर फेकला गेलो. " 

   " अरे अमित कोणती बस ? तू पडला होतास तिथे बसच काय काहीही नव्हतं. तुला रात्री कुणीतरी पडलेला पाहिला व पोलिसस्टेशनला फोन करून इथे ऍडमिट केलं. रक्त वाहत होतं म्हणून डॉक्टरांनी टाके घातले. आता बरं वाटतंय ना ! "  आईने मायेने, काळजीने त्याच्या चेहेऱ्यावरून हात फिरवला. 

    क्षणात अमितचं लक्ष समोरच्या काचेवर गेलं. काही अक्षरं समोर चमकायला लागली. तो अर्थ लावत राहिला व आपण हे कुठेतरी वाचलंय असं त्याला जाणवलं. त्याच्या डोक्यात पुन्हा सणक गेली. 

     ती अक्षरं त्याने बसच्या काचेवर पाहिली होती.' Universal Bus ' युनिव्हर्सल बस ! येस. हेच नाव होतं बसवर. त्याने पुन्हा दोन्ही हाताने डोकं गच्चं दाबलं वेदना असह्य व्हायला लागल्या. त्याला रात्रीचा प्रसंग डोळ्यापुढे यायला लागला. 

    व त्या संबंधित बातमी स्मरणात आली. काही महिन्यापूर्वी एका बसचा ऍक्सिडंट झाला होता. भरधाव वेगात ड्रायव्हरने बस ठोकली होती. व बरेच लोकं मेले होते. तीच बस तेच नाव. मग लोकं, ड्राइवर  पण तेच असावेत. पण यात आपला काय संबंध ? काहीही नाही. दूरदूरपर्यंत काही संबंध नाही. 

  दिवस जात राहिले. काही दिवसात बरं वाटून अमित ड्यूटीवर जॉईन झाला. सेकंड शिफ्ट आली. तेच शेड्युल. बाहेर पडायला रात्रीचे १.२० झाले. अमित बाहेर पडला. गाडीला किक मारली व गेटमधून बाहेर पडला. तशी अंधारात ती बस उभी दिसली. अमितला पुन्हा सर्व आठवलं काही क्षणात तो बसजवळ पोहोचला. गाडी साईडला स्टँडला लावली. व बसजवळ गेला. तोच ड्रायव्हर, तेच लोकं त्याच्याकडे एकटक पाहात होते. 

   " मूर्ख साले ! जाऊ दे ! " म्हणून अमित निघाला. लगेच बस सुरु झाली. ते अमितला समजलं, बस त्याचा पाठलाग करायला लागली. अमित भरधाव वेगाने बाईक पळवत राहिला वाचण्यासाठी. व बसचा वेग वाढत राहिला. त्याला उडवण्यासाठी. बराच वेळ पाठलाग चालू राहिला. 

     अमितने बाईक घराकडे वळवली. पण बस त्याच्यामागे न येता विरुद्ध दिशेला गेली. व थोड्याच वेळात दाणकन आदळल्याचा आवाज आला. म्हणून अमितने वळून बघितलं. सुमसाम रस्ता. अंधारात झाडं  त्याच्याकडे पाहून शांत उभे होते. आम्ही काही पाहिलं नाही असं सांगत होते. 

    अमितला कळेना, बस गेली कुठे ? त्याने बाईक वळवली व त्या स्पॉटवर पोहोचला. काहीही नव्हतं. त्याने सभोवताली नजर फिरवली. अंधारात काही अक्षरं चमकताना दिसली. अक्षरं ओळखीची होती. अमितने बाईकला शांतपणे किक मारली व घराकडे निघाला. आरामात, शिट्टी वाजवत. कारण आता विचार करून उपयोग नव्हता. 

      कारण एक तर ही गोष्ट  आज इथे थांबणार होती नाहीतर शेवटपर्यंत त्याचा पाठलाग करणार होती. हो, त्याच्या शेवटापर्यंत ! त्या बसचं त्याचं काय कनेक्शन होतं त्यालाही कळत नव्हतं. आणि बहुधा कळणारही नव्हतं !

       आपल्यालाही कुठे आयुष्यात प्रत्येक प्रश्नांच उत्तर सापडतं, काही गोष्टी सोडून द्याव्या लागतात. वेळेवर, नशिबावर, दैवावर नाहीतर देवावर ! .....................

                                           THE END

VISIT OUR YOU TUBE CHANNEL                 

लेखक : रोहित योगेश बोरसे / योगेश वसंत बोरसे . 

 ➤➤➤➤➤➤➤➤➤➤➤➤➤➤➤➤➤➤➤➤➤➤➤➤➤➤➤➤➤➤➤➤➤                                ➤➤➤➤➤➤➤➤➤➤➤➤➤➤➤➤➤➤ 

Previous
Next Post »