तहान -मराठी भयकथा - MARATHI HORROR STORY

तहान -मराठी भयकथा - MARATHI HORROR STORY                                                      

marathi bhaykatha
 marathi bhaykatha

                                                     लेखक : योगेश वसंत बोरसे. 

    साधारण तीस वर्षांपूर्वीचा काळ. जेव्हा स्वयंपाकासाठी, जळणासाठी लाकडं, शेणाच्या गौऱ्या यांचा खेडेगावात, गावाबाहेरील वस्तीत वापर व्हायचा. गॅस जास्त नव्हते, जरी असले तरी गरिबांना परवडणारे नव्हते. अशावेळी गावाबाहेरील वस्तीत राहणारी दोन मुलं, वय १० ते १२ वर्ष. जवळच्या माळरानात, जंगलात, काडया कामट्या, जळणासाठी उपयोगी पडणारे शेणाचे गोळे जमा करत फिरणारी मुलं. दिवसभर फिरून भटकून जेवढे गोण्यांमध्ये भरता येईल तेवढे भरायचे व नंतर घरी परतायचे. आजूबाजूच्या लोकांना जर लागेल तर यांच्याकडूनच घ्यायचे व पैसे द्यायचे. तेवढीच या मुलांना व त्यांच्या कुटुंबाला मदत. 

   मुलं दिसायला साधी होती, तरी काटक होती, भक्कम होती, निर्भय होती. सहसा कोणत्या गोष्टीला भीक घालणारी, घाबरणारी नव्हती. दिवस, उन्हाळा संपून पावसाळा सुरु व्हायचे होते. म्हणजे धड ऊन नाही, धड सावली नाही,  वारा शांत होता, मध्येच एखादी वाऱ्याची झुळूक आली तरच, नाहीतर उकाड्याने जीव हैरान होत होता. वातावरण ढगाळ होतं, आभ्रट होतं.
 

  अशा या वातावरणात ही मुलं उत्साहाने बाहेर पडली होती. पायात चपला नावापुरत्या, सोबत खायला थोडं घेतलं होतं व एक एक काठी होती, नावं त्यांची तशीच मजेशीर, त्यांच्यासारखीच, उम्या, शाम्या. त्यांची खरी नावं त्यांना पण माहीत असतील की नाही  कोण जाणे, पण जसं समजायला लागलं, तशी याच नावाची ओळख झाली, व अंगवळणी पडली. 

  जेव्हा कुणी दोन व्यक्ती किंवा समूह सोबत असतो तेव्हा आपोआपच त्यातील एक व्यक्ती स्वतः कडे लीड घेते व बाकीचे फॉलो करतात. या दोघांमध्ये उम्या थोडा जास्त धाडसी होता व शाम्याला त्याची सोबत आवडायची, त्यामुळे निर्णय उम्या घ्यायचा व दोघं फॉलो करायचे. 

  दोघांनी हातात काठया घेतल्या, शिदोरी घेतली व उड्या मारत निघाले. सोबत पोतडी, गोण्या होत्या. काड्या- कामट्या, शेणाचे गोळे, सुकलेल्या लाकडाच्या फांदया. माळरानावर बराच वेळ भटकत त्यांनी जवळपास एक गोणी पूर्ण भरली. ही गोणी कुठे आडोशाला ठेवून दयावी व पुढे जावे असे उम्याचे मत पडले कारण अजून बराच वेळ होता. सूर्य बऱ्यापैकी डोक्यावर होता. जवळच्या डोंगरापलीकडे छोटसं जंगल होतं म्हणे. पोरांना उत्सुकता होतीच की नेमकं काय ? पाहून यावं ; पण रोज उशीर व्हायचा म्हणून जाता  यायचं नाही.  आज नशिबाने एक गोणी लवकर भरली होती, तर जाऊन पाहून यायचं असं ठरलं. 

       
डोंगर चढत चढत थकून गेले. जवळ पाणी नव्हतं. तोंड कोरडं पडलं. पहिले पाणी शोधावं लागणार होतं, नंतर पुढचं पुढे. डोंगरावर पोहोचल्यावर उम्याने सभोवताली नजर फिरवली. थोड्या अंतरावर त्यांना झाडीमधून पाणी वाहताना दिसलं. पोरांना आनंद झाला व ते त्या दिशेने जायला लागले. डोंगरावरून पाहिलं तेव्हा पाणी जवळ दिसत होतं पण अंतर बरंच होतं. त्यामुळे तिथे पोहोचायला बराच वेळ गेला. 

       जशीजशी झाडी जवळ यायला लागली तशी घशाला पडलेली कोरड वाढायला लागली व कधी एकदा पाणी पितो असं झालं. अजून पुढे गेल्यावर तो प्रवाह दिसायला लागला व त्याचा खळखळ आवाज यायला लागला. तशी पोरं जोरात पळायला लागली. प्रवाहापर्यंत पोहोचली. मनसोक्त पाणी प्यायली. तहान भागवल्यावर अंगात मस्ती यायला लागली. एकमेकांच्या अंगावर पाणी उडवायचं, पाण्यात उड्या मारायचं चालू होतं. 

  आपल्याला कुणीतरी बघतंय हे पहिल्यांदा शाम्याला जाणवलं. तसं त्याने उम्याला पण सांगितलं, उम्या कसला ऐकतोय ! तो शाम्याची टिंगल करायला लागला व हसायला लागला तसा त्याचा हसण्याचा प्रतिध्वनी उमटला. तो ऐकून दोघं गार झाली. 

  इथून निघालं पाहिजे, तसंच पाणी ही  पिऊन झालंय, जंगलही पाहायचंय, मग उशीर करून उपयोग नाही, पण तोपर्यंत सूर्य मावळतीकडे झुकला होता. वातावरण ढगाळ असल्याने व पोरं त्यांच्याच मस्तीत असल्याने त्यांना समजलं नाही व ते प्रवाहाच्या कडेकडेने जंगलाकडे सरकू लागले. 

  दाट झाडी, मोठेमोठे हिरवेगार वृक्ष त्यांना आकर्षित करत होते. ओढ लावत होते, स्वतःकडे बोलवत होते. माळरानावर सर्व उजाड असताना इथे एवढी हिरवळ कशी ? हा दोघांना प्रश्न पडला. तसं उम्याला उमजलंच. पाण्यामुळे इथं सर्व हिरवगार आहे. 

  " आपली शिदोरी खायची बाकी हाय ! " शाम्या म्हटला, आपण परत जावू, इथं नंतर येवू.  " याला अचानक काय झालं ? म्हणून उम्या त्याच्याकडे पाहायला लागला. " आरं जंगल पाहायचं ठरलंय ना ! मंग थोडं मध्ये जावू अनं परत येवू. " " नाई आपण परत जाऊ. " " का रं घाबरतोस व्हय ? " " मी कायला घाबरू ! पण काय तरी विचित्र वाटतंय चल जावू परत. " " आरं घाबरू नगंस मी हाय ना ! " शाम्याला उम्याचं ऐकावंच लागलं. 

       
 आणि ते जंगलात शिरले. कुणीतरी आपल्या मागं आहे हे शाम्याला सारखं वाटत होतं पण सांगून उपयोग नव्हता. " उम्या भूक लागलीया, खाऊन घेऊ. " " हा थांब जरा, एखादी जागा पाहू मंग बसू. " उम्या म्हणाला. ते एका झाडाखाली साफसूफ करून बसले व शिदोरी उघडली. भाकरी, चटणी, लोणचं व कांदा पोरं उघडून खायला बसली. सूर्य मावळण्यास सुरुवात झाली होती. 

  " मला पण दे ना ! " कोणीतरी बोललं ,त्या  आवाजाने ते दचकले. " उम्या तुला म्हणलं नव्हतं, इथं काही खरं नाय. चल जाऊ. " शाम्या बोलला. " अरे घाबरतो काय, मी हाय ना ! थांब ! कोण हाय रे, समोर ये की, तुला बी देतो. " 

  " मी समोरच हाय, मला पण दे ना ! "  पोरांनी दचकून चारही बाजूला पाहिलं आवाज येत होता पण कुणी दिसत नव्हतं. आता उम्याला ही जाणवलं काहीतरी लफडं हाय ! कुणीतरी मुद्दाम आपल्याले घाबरवतुया ! " शाम्या भराभर खाऊन घे, मंग निघू आपण. " 

  " मला पण दे ना ! " परत आवाज आला. अन त्याचवेळी शाम्याचं लक्ष आवाजाकडे गेलं होतं, आवाज झाडातून येत होता. " उम्या ते पाय, झाड बोलतंय ! " अनं उम्या खदाखदा हसायला लागला. " आरं काय लेका, झाड कधी बोलतं व्हय ! "  " अरे ते पाय ना ! "  अन शाम्याचा चेहेरा रडकुंडीला आला तसा उम्या शांत झाला व शाम्याने दाखवलं तिकडे पाहू लागला. अनं पाहातच राहिला. " आरं हे काय ? " तो अनावधानाने झाडाकडे जाऊ लागला. " उम्या तिकडं जाऊ नको, आपण परत जाऊ, पळ ! " पण उम्याचं लक्ष तिकडं. त्याच्या बोलण्याकडे लक्षच नव्हतं. तो झाडाकडे एकटक पाहत पुढे सरकला, समोर झाडातून एक चेहेरा डोकावत होता. त्याची जीभ बाहेर होती व आवाज येत होता, " मला पण दे ना !

  संध्याकाळच्या अंधुक प्रकाशात समोर जे दिसलं त्यावर विश्वास ठेवायचा की नाही हे पोरांना कळत नव्हतं. उम्या झाडाकडे सरकत होता. तसा शाम्या भानावर आला त्याने उम्याचा हात धरला व ओढायला लागला. " उम्या तिकडं नगं जाऊस !, तिकडं नगं जाऊस ! " उम्या भानावर आला. झाडातून आवाज येतच होता, " मला पण दे ना ! इकडे ये........ " " आरं हे काय मागतंय ? " " आरं उम्या मरू दे, इथून पळ. " अन उम्याला पण ते कळालं इथं धोका हाय. दोघं पळायला लागले. पळता पळता अजून आत जंगलात घुसले, वाट चुकले. आवाज येतंच राहिला, " मला पण दे ना....... इकडे ये.... " आवाज घुमतच राहिला. 

  किती पळणार ? जंगल त्यामानाने बरंच मोठं होतं. शरीरं पळत नव्हते, पाय थांबू देत नव्हते. रात्र व्हायला लागली. " उम्या आपण रस्ता चुकलो. " शाम्या म्हणाला, " आता परत कसं जायचं ? " 

  तेवढ्यात एक आकृती समोरून हात पसरलेली त्यांच्या दिशेने सरकत होती. जणू सारं जंगलच त्यांच्या जीवावर उठलं होतं. माकडं किंकाळ्या मारायला लागले, पक्षी कलकलाट करायला लागले. जंगलात एकच गलका उडाला. 

     
" उम्या तुला म्हणलं होतं, आपण परत जाऊ, तू ऐकलं नाहीस ! आता घरी कसं जायचं ? " " शाम्या रडू नगंस, आपण पाणी प्यायला आलतो. तिथं पाण्याचा आवाज येत होता ! पाण्याचा कुठं आवाज येतूय का जरा का देऊन ऐक. " पण माकडांचा आवाज काही कमी होईना. " आपण परत मागं जाऊ. पळ ! " ते परत उलटया दिशेने पळायला लागले. माकडांच्या आवाज हळूहळू कमी होत गेला. 

  पुढं आले तोवर शांतता होती पण आवाज डोक्यात घुमत होता. " मला पण दे ना ! " उम्यानं डोळे बंद करून काही आवाज येतोय का म्हणून प्रयत्न केला. काही अंतरावर पाण्याची खळखळ ऐकू येत होती. पण नेमका दिशेचा अंदाज येत नव्हता. अंदाजाने दोघं हळूहळू त्या दिशेने सरकू लागली.  खळखळ आवाज जवळ येत गेला तशी दोघांच्या डोळ्यात चमक आली. 

  अंधारात दोन डोळे चमकत होते. उम्याला दिसलं, " शाम्या पळ ! " त्यानं सांगायच्या आत शाम्या जीव खाऊन पळाला. उम्याही पळाला. पळत पळत प्रवाहापाशी आले. तसे ते डोळे जवळजवळ चमकायला लागले. " शाम्या पाण्यात उडी मार. " उम्या म्हटला व  पाण्यात उडी मारली. शाम्या ही कुदला. पोहायची सवय नसल्याने नाकातोंडात पाणी जायला लागलं तसे एकमेकांचे हात धरून पुढे सरकायला लागले, पण थकलेलं शरीर, किती वेळ साथ देणार ! बराच पुढं गेल्यावर उम्याला वाटलं आता इथं काही धोका नाही ! 

         
  म्हणून दोघं जवळ किनाऱ्याकडे सरकले व एका मोठ्या दगडावर शरीर टाकत धापा         टाकू लागले. काही क्षण गेले....... " इकडे ये...... मला पण दे ना !..... " अन आपल्याला कुणीतरी ओढतंय असं दोघांना वाटायला लागलं. शरीरात ताकद राहिली नव्हती. विरोध करण्याची ना मनाची तयारी होती ना शरीराची ! दोघं ओढले जात होते. शरीरावरील, मनावरील ताणाने दोघांची शुद्ध हरपत चालली होती व डोळ्यासमोर तो झाडातून डोकावणारा चेहेरा दिसत होता, जीभ काढून  जसं काही भक्ष खायला आतुर होता व आता आवाज चारही बाजूंनी यायला लागला, " मला पण दे ना !..... " 

  वातावरणात शाम्याचे शेवटचे शब्द घुमले. " उम्या तुला म्हणलं होतं आपण परत जाऊ पण तू ऐकलं नाहीस ! .................."

                                           THE END        

VISIT OUR YOU TUBE CHANNEL

                                                  लेखक :योगेश वसंत बोरसे. 


➤➤➤➤➤➤➤➤➤➤➤➤➤➤➤➤➤➤➤➤➤➤➤➤➤➤➤➤➤➤➤➤➤➤                                                         ➤➤➤➤➤➤