the cat मांजर -मराठी भयकथा - MARATHI BHAY KATHA | HORROR STORY MARATHI

                        मांजर - मराठी भयकथा  | HORROR STORY MARATHI 


MARATHI RAHASYA KATHA
 मराठी भयकथा 

   VISIT OUR YOU TUBE CHANNEL ALSO                                        

                                                    लेखक :योगेश वसंत बोरसे.

          पूर्वी  खिडक्यांना दरवाजे असायचे. काचेचे तावदान असायचे. आतासारखा स्लायडिंग           प्रकार पूर्वी नव्हता. तेव्हाची गोष्ट. खिडकीचा दरवाजा एकसारखा आपटत असल्याने झोपेतून जागा झालो. अगोदर वाटलं हवेने आपटत असेल उठून बघितलं, डोळे चोळत चोळत लक्ष घड्याळ्याकडे गेलं. रात्रीचे दोन वाजले होते. हवा चांगलीच येत होती.

      उठलो, डोळे चोळत चोळत खिडकीजवळ गेलो व खिडकी बंद करण्यासाठी हात घालणार तेवढ्यात लक्ष समोर गेलं व झोप उडाली. पटकन हात मागे घेतला. अंगावर काटा उभा राहिला. घाबरलो नाही पण दचकलो. खिडकीत एक मांजर बसलं होतं.

   काळंशार, फक्त डोळे चमकत होते म्हणून समजलं. मांजर म्हटलं की का कोण जाणे मला पहिल्यापासून आवडत नाही. कारण माहित नाही ,पण नकोस वाटतं. जसा जसा मोठा होत गेलो, तसा अभ्यास वाढत गेला, वाचनही वाढत गेलं, खरं की खोटं ,पण एक गोष्ट प्रकर्षाने जाणवली की हा प्राणी निगेटिव एनर्जी, नकारात्मक ऊर्जेचा स्रोत आहे. नकारात्मक शक्तींच माध्यम आहे. 

    ज्या आपण भूत - प्रेत आत्मा म्हणून ओळखतो त्यांचं माध्यम म्हणून मांजर काम करतं. हे तर मोठं झाल्यावर समजलं. पण लहानपणापासून मांजर दिसली नजर भिडली की अंगावर काटे येतात. बऱ्याच लोकांना आपल्यापैकी असं होत असेल किंवा काहींना मांजर खूप आवडत असेल. 

        पण माझा अनुभव माझ्या मताशी साम्य असणारा ठरला म्हणून खात्री झाली. तर ! मांजराने माझ्याकडे बघितलं. एकटक बघितलं. मी हाकललं तसं बाहेर न जाता घरात उडी मारून पळालं. आता याला हुसकवायला गेलो तर अंगावर येणार ! एकतर  घरात माझ्याशिवाय कुणी नव्हतं. आई - वडील गावाला गेलेली. आमचं तीन रूमचं घर. घर जुनंच होतं. आजूबाजूला झाडं झुडुपं होती. त्यामुळे त्याच्या मागे न लागता परत बेडवर आलो. खिडकी उघडीच ठेवली म्हटलं स्वतःहून गेलं तर बरंच होईल.

       
कॉटवर आडवा झालो ,चादर पांघरली व झोपून घेतलं . आणि थोड्या वेळाने पुन्हा जाग आली . लक्ष खिडकीकडेच होतं ,बाहेर हालचाल जाणवली . खिडकी बाहेर अंगणात कडू निंबाचं झाड होतं , झाड मोठं होतं .सावली देणारं ! हवा देणारं  ! पण आज ते काही वेगळंच देत होतं . मी खिडकी जवळ जाऊन उभा राहिलो .व झाडाकडे एकटक बघितलं . बघत राहिलो . लक्ष हळू हळू वर शेंड्याकडे गेलं व अंगाला दरदरून घाम फुटला . 

       
 झाडावर काही होतं ,जे एकटक माझ्याकडे बघत होतं .मांजर नक्कीच नव्हतं . असं काहीतरी जे अमानवी म्हणता येईल . ते हळू हळू माझ्या दिशेने सरकायला लागलं . तशी घाबरून खिडकी बंद केली . मागे फिरलो .लक्ष कॉटवर गेलं ! आयला ! आपण हे विसरलोच !ते मांजर कॉटवर होतं अंगावरचे केस पिंजारलेले ,शेपटी पिंजारलेली ,ताठ वर झाली होती . डोळ्यात क्रुद्ध  होते. पण आपण तर हिला काही केलं नाही . मग हि अशी काय करतेय ? मी हाकलायला  गेलो ,तेवढ्यात फिस्कारून अंगावर आलं . मी बाजूला झालो ,तसं खिडकीवर जाऊन आदळलं . 

           तेवढ्यात फटकन काच फुटल्याचा आवाज आला . बाहेरून काहीतरी खिडकीवर आदळलं होतं . व फुटलेली काच रूम मध्ये पसरली . मांजर बाहेर पळालं . तसा सुटकेचा निश्वास टाकला . काचा आवरणं गरजेचं होतं ,काही काचा कॉटवर पडल्या होत्या . त्या उचलायला गेलो ,कशी ? समजलं नाही पण हाताला काच लागली . व भळाभळा रक्त वाहायला लागलं . तसा बेसिन कडे पळालो . हात नळाखाली धरला . थोड्या वेळात रक्त बंद झालं . 

   घरात नेमका एकटा असल्याने समजत नव्हतं ,काय करावं ते ? हॉल मध्ये आलो . सोफ्यावर अंग टाकलं ,झोप लागत नव्हती . काही वेळ पडून राहिलो .  बेडरूम मध्ये आवाज यायला लागले तसा ताड्कन उठून बसलो , आवाज विचित्रच येत होते . काहीतरी वेगळं घडत होतं . जे मी थांबवू शकत नव्हतो . तेवढ्यात बेडरूमचा दरवाजा खाड्कन आपटल्याचा आवाज झाला . मी तर दार लावलं नव्हतं . मग दार आपोआप बंद झालं कधी ? आणि आता उघडलं कुणी ?लक्ष बेडरूमच्या दाराकडे गेलं ,मनाने कौल दिला !

     'some thing wrong here '! बेडरूमकडे न जाता हॉलच्या दरवाज्याकडे सरकलो . पण लक्ष बेडवर होतं ,बेडरूममध्ये होतं , आणि हसावं कि रडावं कळत नव्हतं . कॉटवर कुणीतरी येऊन झोपलं होतं व मला खुणावत होतं . मीच काय माझ्या जागी कुणीही असता तरी आकर्षित झाला असता . असं दृश्य होतं . मनाचा व बुद्धीचा ताबा समोरच्या दृश्याने घेतला . मोह आवरत नव्हता . अंधारात ही दिसणारी स्त्री शरीराची रचना मनाची चलबिचल करण्यास समर्थ होती ,काय चुकीचं ? काय बरोबर ? हा विचारच मनाला शिवत नव्हता .

   एकीकडे आमंत्रण होतं तर दुसरीकडे यातून बाहेर पडायचा मार्ग ! द्विधा मनस्थितीत पावलं बेडरूमच्या दिशेने पडायला लागली . तेवढ्यात दारावरची बेल वाजली , तंद्री भंग झाली , लक्ष विचलित झालं ,दरवाजाकडे सरकलो ,दरवाजा उघडला ,थोडासाच ! मनाची चरफड झाली होती . कुणीतरी मधेच टपकल होतं . पण आता बाहेर कुणी नव्हतं . 

        वैतागून दार बंद केलं. व बेडरूमकडे वळालो. लक्ष कॉटकडे  गेलं. तिथे कुणी नव्हतं. बेचैन होऊन बेडरूमकडे गेलो आणि खचकन पायात काच घुसली व भळाभळा रक्त वाहायला लागलं. कळवळून बेडवर बसलो व पुन्हा बेल वाजली वाजतच राहिली. तसाच लंगडत लंगडत दाराकडे गेलो. दार उघडलं. 

  बाहेर एक बाई होती. नऊवारी साडी, कपाळावर मोठा कुंकवाचा टिळा. डोक्यावर टोपली होती. टोपलीत काहीतरी होतं, मला समजेना, ही या वेळेस इथे काय करतेय ? " तुम्ही या वेळेस इथे काय करताय ? " मी विचारलं. " पोरा ते सोड. ते महत्वाचं नाही. "  आणि मला हात धरून बाहेर ओढलं. " पोरा तुझा जीव धोक्यात आहे इथून बाहेर निघ. " तसा मी कळवळून खाली पडलो. व त्यांचं लक्ष माझ्या पायाकडे गेलं. माझ्या पायातून रक्त वाहत होतं. त्यांनी टोपलीतून हळद काढली आणि पायावर टाकली. काही वेळ आग आग झाली व नंतर रक्त थांबलं. 

  " पोरा आजच्या दिवस बाहेरच थांब. घरात जाऊ नकोस.  आणि जे काही दिसलं त्याच्या मागे जाऊ नकोस. " असं म्हणून ती निघून गेली. तसाच बाहेर बसलो. तशी रात्र अंगावर यायला लागली. रात्रीचा सुमार, भयाण शांतता. ओसरीवर बसलो खांबाला टेकून. किती वेळ बसणार, पाठीला कळ लागली. माझं घर असून मी घराबाहेर होतो. तिथेच आडवा झालो. थोड्यावेळाने झोप लागली. 

   
 काही वेळात अंगाला मऊ स्पर्श जाणवला ते मांजर माझ्याजवळ येऊन बसलं होतं व मला खेटत होतं. का माहित नाही पण नकळतपणे हात त्या मांजराच्या अंगावरून फिरायला लागला. हात फिरवता फिरवता कधी त्याला उचललं व कधी घरात गेलो मलाही कळलं नाही. ते म्याऊ म्याऊ करत हातातून निसटलं व बेडरूमकडे पळालं आणि मला काही वेळापुर्वीचं दृश्य आठवलं व मनात अभिलाषा निर्माण झाली. 

             ती संधी पुन्हा मिळाली तर ? मी अभावितपणे बेडरूमकडे सरकलो मांजर बेडवर होतं माझ्याकडे रोखून पाहत होतं ! त्याच्या शेजारी कुणी होतं जे मला आकर्षित करत होतं. बेडवर झोपलं होतं. मी तिकडे ओढला जाऊ लागलो. 

         
 आणि काही वेळात माझी किंकाळी बाहेर पडली. मला पहिले दिसलेली व्यक्ती खरी ! की  आताची खरी कळत नव्हतं. चेहेरा भयाण होता. केस पिंजारलेले मांजरासारखे. ती जी कोणी होती तिने मांजराच्या पाठीवरून हात फिरवला व माझ्याकडे इशारा केला. मांजर क्षणभरही न थांबता माझ्याकडे झेपावलं. माझं नशीब बलवत्तर होतं किंवा मी सावध होतो म्हणून फक्त एक पंजा माझ्या मानेवर लागला. नखं ओढली गेली. आग आग व्हायला लागली. त्याच अवस्थेत लंगडत लंगडत बेडरूममधून बाहेर पडलो. दार पटकन ओढून घेतलं घरात थांबण्यात अर्थ नव्हता, दार उघडून बाहेर ओसरीवर आलो. थकव्याने  व रक्तस्त्रावाने शरीरात त्राण नव्हतं. दार बंद करून बाहेरच ओसरीवर आडवा झालो. 

         
नंतर झोप लागली की शुद्ध हरपली समजलं नाही पण सकाळी उठलो. तेव्हा सूर्य बराच वर  आला होता. शरीरात त्राण नव्हतं. पायाजवळ काहीतरी स्पर्श जाणवत होता. म्हणून उठून     बघितलं. ते मांजर पायाशी झोपलं होतं. म्हणजे याच काम अजून संपलं नव्हतं व जोपर्यंत  काम संपत नाही ते मला सोडणार नव्हतं.............

                                              THE END     

                                                  लेखक : योगेश वसंत बोरसे.            

➤➤➤➤➤➤➤➤➤➤➤➤➤➤➤➤➤➤➤➤➤➤➤➤➤➤➤➤➤➤➤➤➤➤                                                  ➤➤➤➤➤➤➤➤