सावज -THE HUNT- 3 - MARATHI BHAY KATHA - HORROR STORY

सावज  -THE HUNT- 3 - MARATHI BHAY KATHA - HORROR STORY 


MARATHI HORROR STORIES
 MARATHI HORROR STORIES


      निधीला आवाज ऐकू आला होता. चौघीनींही ऐकला होता . त्यांनी आपलं कार्य उरकलं व सागर गेला होता , तिकडे पळाल्या . पण सागर तिथे नव्हता . तिथे एक बाई उभी होती . तिची यांच्याकडे पाठ होती . 

       मुलींना समजेना , ही  कोण ? रात्रीची इथे काय करतेय ? आणि ही आपल्याला  पहिले का दिसली नाही . आणि मग पप्पा कुठे गेले ? " पप्पा ,पप्पा sss ... " त्या स्त्री ने मागे वळून बघितलं ,तिला पाहून यांची भीतीने गाळण उडाली . "तो गेला !" "कुठे गेले ?" "कुठे म्हणजे ?" इथून खाली पडला . तिथून कुठे जाईल माहित नाही . " मुली तटबंदीकडे धावल्या . व खाली वाकून पाहू लागल्या . खाली फक्त अंधार होता . त्यांनी मागे वळून बघितलं ,ती बाई होती तिकडे नजर गेली ,पण ती दिसली नाही .


कार्तिकीला राहवेना , ती रडायला लागली . यांना समजेना . अचानक हिला काय झालं ते ? "कार्तिकी अगं काय झालं ?" गार्गीने रडवेल्या स्वरात विचारलं . कार्तिकीचं रडणं चालूच होतं . प्रियाने तिच्या पाठीवरून हात फिरवला . तिला थोपटलं तशी कार्तिकी तिला बिलगली . प्रियाने विचारलं ," कार्तिकी ,काय झालं ?" कार्तिकीने स्वतःला सावरलं ,अश्रू पुसले व थोड्या वेळाने शांत झाली . 

       आणि म्हणाली , " आधीच रश्मी सापडत नाहीये ! आता अंकल चं काय झालं समजायला मार्ग नाही . ती बाई म्हटली ते खाली पडले ! व तीच गायब झाली !" "आता अजून कुणाचा नंबर लागेल काय माहित ? मला वाटत नाही आपण परत जाऊ म्हणून ?" एवढं बोलून कार्तिकी पुन्हा रडायला लागली . 

      प्रियाने तिची पाठ थोपटत सांगितलं ,"तुझा नंबर यायला अजून वेळ आहे !" तिचा आवाज ऐकून कार्तिकीचं  रडणं आपोआप थांबलं . तिघी प्रियाकडे आश्चर्याने पाहू लागल्या . तो आवाज प्रियाचा नव्हता . वेगळाच होता . गार्गी पुढे आली , तिने प्रियाला गदागदा हलवलं . " प्रिया अगं बरी आहेस ना ?

     प्रिया  हसायला लागली . हास्य अमानवी होतं . ती अचानक एका बाजूला अंधार होता तिकडे पळाली व दिसेनाशी झाली . हे एवढं अकस्मात घडलं कि तिघींना समजेना काय झालं ते ! सर्वात पहिले निधी सावरली, ती तिकडे धावली, आवाज देत, " प्रिया.... " दोघी तिच्या मागे धावल्या. अंधार होता तिथे गेल्या. समोर दगडी पायऱ्या होत्या, ज्या खाली  जात होत्या, पायऱ्यांवर कुणी उभं होतं. निधीने आवाज दिला, " प्रिया.... " 

  आवाज आला, "ती खाली गेली!" आवाज पुरुषी होता. तो आवाज काहीतरी बडबड करत खालच्या दिशेने गेला. काय बोलला मुलींना कळेना. त्या पायऱ्यांवरून खाली गेल्या. एकमेकींचा हात धरत. निधी म्हणाली, " प्लीज आता हात सोडू नका. " 

  " शहाणी आहेस ग ! तुझे पप्पा कुठे गेले ते शोधायचे  सोडून इकडे तिकडे फिरतेस. नाहीतर काय ! हिच्या पप्पाला रश्मी आवडत होती ! सारखा रश्मी, रश्मी करायचा. " " शट अप ! " निधी ओरडली. " खबरदार माझ्या पप्पांबद्दल काही बोलाल तर ! रश्मी त्यांना मुलीसारखी होती. " ते ऐकून कार्तिकी व व गार्गी खदाखदा हसायला लागल्या. हे त्यांचं हसणं नव्हतं. निधीला समजेना, काय करावं, पण तिला काही करायची गरज पडली नाही. 

  काही वेळात दोघी नॉर्मल झाल्या व निधी निधी करू लागल्या, निधी ला वेड लागायची पाळी आली होती. आधीच तहान भुकेने जीव व्याकुळ झाला होता. त्यात एकामागे एक घटना धक्कादायक घडत होत्या. थकून एकाजागी बसल्या. " पाणी हवंय का ? "  आवाजाने दचकल्या. पुन्हा आवाज आला. " पाणी प्यायचंय ? " समोर स्त्री होती. शरीर ओळखीचं होतं. पण आवाज नाही. " प्रिया ! " तिघींना आनंद झाला. पण प्रिया तिथे नव्हतीच, पाणी ठेवून निघून गेली होती. जुन्या काळातील  पाण्याचा चंबू व फुलपात्र समोर होतं. पाणी प्यावं कि नाही, काळात नव्हतं. 

  गार्गीला राहवलं नाही. तिने घटाघटा पाणी पिलं. निधी नाकारत राहिली, " गार्गी थांब ! " पण गार्गीने ऐकलं नाही. तिने पाणी पिलं बरं वाटलं. " पाणी छान आहे, तुम्हाला प्यायचंय  का ? " कार्तिकीने चंबू बघितला, पाणी संपलं होतं, " पाणी तर संपलंय . " " थांब मी आलेच ! " असं म्हणून गार्गीने चंबू उचलला व मागे वळाली. 

  निधीने आवाज दिला, " गार्गी थांब कुठे चाललीस ? " " पाणी घेऊन येते, लगेच आले. " " अगं पण, इथे पाणी कुठे मिळणार ? " " मला माहित आहे. मी आलेच. " व ती अंधारात निघून गेली ती परत आलीच नाही. निधी वैतागली, " कार्तिकी हे काय चाललंय काही कळत नाही. आपण उगीच आलो इथे  असं झालंय. " " हे सगळं तुझ्यामुळे व तुझ्या पप्पामुळे झालंय, तुम्ही दोघांनी फसवलं आम्हाला. मुद्दाम फसवलं !" व ती रडायला लागली. 

  निधीने तिला सावरलं नाही. ती डोकं धरून बसली, तीच डोकं सुन्न झालं होतं. किती वेळ गेला कुणास ठाऊक ! निधी भानावर आली. मान वर करून बघितलं, कार्तिकी दिसेना. तिच्या अंगावर भीतिने काटा उभा राहिला. 

  " आता हिला कुठे शोधायचं ? कार्तिकी...... " निधीने दोन - तीनदा आवाज दिला. निधीने समोर बघितलं, उजेड दिसला. विचार करून उपयोग नव्हता. उजेड कुठून आला, काय ? जे आहे ते स्वीकारणं भाग होतं. ती उजेडाच्या दिशेने चालत राहिली. बराच वेळ गेला. निधी तिथे पोहोचली. बघितलं तर समोर दोन - तीन जण बसले होते. निधी तिथे जाऊन उभी राहिली. त्यांनी तिची दखल ही घेतली नाही. 

  " मला भूक लागलीय, तहान लागलीय, काही आहे का ? " तिने  विनवणी च्या स्वरात विचारलं. एकजण उठला तिच्याकडे बघितलं व म्हणाला, " चला ! " ती नकळतपणे त्याच्यामागे गेली, मागे वळून बघितलं, कुणी नव्हतं. पुढे बघितलं तो भराभर चालला होता. एका वळणावर वळाला आणि गायब झाला. निधीला आता काही वाटत  नव्हतं. एवढे जण गायब झाले होते. अजून एक गेला काय फरक पडतो ?

   ती तिकडे वळली. समोर टेबल होता. टेबलावर काही फळं होती. कुणी ठेवली, कुठून आली. विचार करून उपयोग नव्हता. टेबलावर पाण्याचा चंबू दिसला. घटाघटा पाणी प्यायली. व एक सफरचंद उचलल खाल्लं. " अहाहा ! अद्भुत, उत्कृष्ट, चविष्ट ! " असं सफरचंद तिने खाल्लं नव्हतं. "  आवडलं का ? " " हो ! " ती अभावितपणे म्हणाली व दचकली समोर बघितलं.  

  " कार्तिकी तू ! " " कोण कार्तिकी ? मी श्यामल. " " कोण श्यामल ? " " मी राणी मधुमतीची दासी. श्यामल.  राणी साहेबांनी बोलावलंय. " अनं ती मागे वळली. व निधी तिच्यामागे ! समोर प्रशस्त टेबल होता, एका प्रशस्त खुर्चीवर राणी साहेब बसल्या होत्या. आणि तिच्या शेजारी रश्मी..... रश्मी ! निधी दचकली तिला आनंद झाला.  तिने रश्मीला आवाज दिला. " रश्मी.... " रश्मीने तिच्याकडे बघितलं, पण तिच्या नजरेत ओळखच नव्हती. ती मान खाली  घालून जेवायला लागली. " बस ! " मागून आवाज आला. " कार्तिकी तू ! " " मी श्यामल कार्तिकी म्हणाली. " जेवायला बस ! ' आवाज हळू होता पण त्यात आज्ञा होती. " तू ही बस ना !   " 

  " आम्ही नंतर बसतो. तुम्ही राणी सरकारचे खास पाहुणे आहात.  तुम्ही जेवा ! " तिने निधीला सर्व वाढलं. व बाजूला जाऊन अदबीने उभी राहिली. निधी ला ठसका लागला. एक दासी पुढे आली. फुलपात्रामध्ये पाणी टाकलं. निधीला दिल. थँक यु म्हणत निधीने फुलपात्र हातात घेतलं व मान वर करून पाणी प्यायला लागली लक्ष तिच्याकडे गेलं. " गार्गी तू ! " " मी गार्गी नाही मी केतकी, राणीसरकारची दासी. " 

  निधीचा ठसका थांबत नव्हता. " घे पाणी पी ! " केतकीने तिच्या पाठीवर हात फिरवला. निधीला पाणी प्यावंच लागलं, भूक चांगलीच लागली होती. ती पोटभर जेवली.... 

                                   TO BE CONTINUED ...  



⇎⇎⇎⇎⇎⇎⇎⇎⇎⇎⇎⇎⇎⇎⇎⇎⇎⇎⇎⇎⇎⇎⇎⇎⇎⇎⇎⇎⇎

 


                                                                       











 

  

 

Previous
Next Post »