सुटका - मराठी भयकथा - MARATHI HORROR STORY

सुटका - मराठी भयकथा - MARATHI HORROR STORY                                                               

MARATHI HORROR STORY
 MARATHI BHAYKATHA

                                          लेखक : योगेश वसंत बोरसे.  

    सकाळी ३ - ४ चा प्रहर. सगळं जग साखर झोपेत असताना एक व्यक्ती मात्र हातात दोर घेऊन गावाबाहेर चालली होती. गावाबाहेर आली एक जुना वटवृक्ष होता तिथे येऊन थांबली व झाडाचा अंदाज घेतला. फास तयार केला व झाडाच्या मोठया फांदीला दोर बांधला. गळफास घेऊन त्या व्यक्तीचे शरीर अधांतरी लटकू लागले. 

   
 शरीर संपले होते. पण आत्म्याचे काय ? आत्मा तर अमर आहे ! ' नैनं छिंदन्ति शस्त्राणि, नैनं दहती पावकः ' आत्म्याला  ना कोणतं शस्त्र मारू शकतं ना अग्नी जाळू शकते. तो तर अजर आहे, अमर आहे. 

      या देहातील आत्मा बाहेर पडला व शरीराभोवती घुटमळू लागला. याला अशी बुद्धी का सुचली ? जे शरीर आयुष्यभर दुसऱ्यांसाठी झटलं त्याची अशी दुर्दशा का ? शेवटी यालाच प्रारब्ध म्हणतात. 

       येणार शरीर संपवलं, पण माझं काय ? मी तर किती यातना भोगल्या याच्या शरीरात असताना ? मी तर मरू ही शकत नाही कारण मी अमर आहे. फक्त शरीर बदलतात. प्रत्येक शरीराबरोबर जे भोग आहेत ते मलाच भोगावे लागतात. 

         मग मी काय करायचं ? आत्मा शरीराभोवती घुटमळत राहिला. तसे आजूबाजूला इतर आत्मे जमा झाले. आपल्या जुन्या मित्राला समजावत होते, " हेच आपले भोग आहेत, यातून सुटका नाही. " 

      " पण आपण हे का भोगावं ? जे काही करतं ते शरीर करतं , मग त्याची फळं आपण का भोगावी ? " उत्तर कोणाकडेच नव्हतं. काही वेळात आत्मे पांगले. कुणी झाडावर, कुणी झाडाच्या ढोलीत, कुणी पिंपळावर, कुणी चिंचेवर ! 

     
  हा आत्मा परत एकटा झाला होता. आता आपण कुठे जायचं ? घराची आठवण झाली तसा आत्मा घराकडे वळला. सकाळची शांत वेळ. आत्माच तो, त्याला कोण रोखणार ? तो घरात गेला. घर बऱ्यापैकी होतं,  मध्ये मोकळी जागा होती. तिथे दोन खाटांवर घरातील वयस्कर मंडळी झोपली होती आतील खोलीत ती बाई व तिची दोन लेकरं शांत झोपली होती. 

         यांना काहीच माहीत नाही, काय झालं ते ! पण माहित पडेल तेव्हा काय करतील ? का हे पण जीव देतील ? नाही, असं काही होत नाही. एक गाणं पण आहे..... ' मरने वाले के साथ कोई मरता नहीं ! ' याचे आई - वडील यांचं काय होईल ? काय हे यांच्या नशिबी ? आत्मा घरभर आजूबाजूला भटकत राहिला व जसा दिवस उगवायला लागला तसा धान्याच्या अंधाऱ्या खोलीत हा जाऊन बसला. पुढच्या भोगांची वाट पाहत. 

         
 सकाळ झाली, गाव जागं झालं, तशी काही वेळात बोंबाबोंब झाली. याच्या घरी बातमी आली. गळफास घेण्याची, व आख्ख घर हादरलं. बायको मटकन खाली बसली. तिला धड रडू ही येईना. मुलं लहान होती, ती कावरी बावरी झाली, त्यांना समजलंच नाही नेमकं काय झालं ते. आईने हंबरडा फोडला, वडील शून्यात पाहत राहिले. पुढे काय ? 

           काही वेळात पुढील सर्व सोपस्कार पूर्ण झाले. काही वेळात घर रिकामं झालं. आता खऱ्या अर्थी रिकामं झालं. घरातला कर्ता माणूस गेला होता. सगळ्यांच्या मनात तोच विचार, हा असा का गेला ? याने काहीच विचार केला नाही, की विचार करून करूनच गेला ? 

          हे सर्व तो आत्मा पाहत होता व तळमळत होता. एका भल्या माणसाचं घर असं उध्वस्त झालेलं पाहात राहणं शक्य नव्हतं. आत्मा पेटून उठला. ज्यांच्यामुळे आपला देह गेला त्यांना सोडायचं नाही, त्यांचेही आत्मे आपल्यासारखे तड्फडले पाहिजे. 

         
 पैशापायी याचं मरण झालंय याच्या कुटुंबाला पैसा पाहिजे होता. गरज भागवण्याकरिता. तेच कारण आहे, पैसा. सावकारी कर्ज, बँका यांना आपण काय शिक्षा देणार ? विचार बरोबर होता, उत्तर काहीच नव्हतं. 

         विषण्ण अवस्थेत आत्मा भटकत राहिला. रात्र झाली होती. भटकत भटकत सावकाऱ्याच्या वाड्याजवळ आला. वाड्यात कुजबुज चालू होती. " आरं तो मेला आता आपल्या पैशांचं काय ? " " आर बरं झालं की उलट, त्याच्या घरच्यांना कुठं माहीत हाय, किती कर्ज हाय ते ! एवढं घर हाय, ते त्यांच्या दुःखात आहेत. सहज घर खाली करून देतील. मानुस नाही राहिला मंग काय उपयोग ? "

           " ठरलं तर, दोन - चार दिवस जाऊ दे, मंग जाऊ त्याच्या घरी अनं घेऊ कब्जा ! " आणि मनसोक्त हसण्याचा आवाज आला. आत्मा सूडानं पेटून उठला. दोन - चार दिवस काय ? ठीक हाय ! अनं आपल्या मित्रांकडे जायला लागला. 

     

   जिथं जीव गेला होता, तिथं परत आला, त्याला आलेला पाहून बाकी आत्मेपण जमा झाले. याने सर्वांना सांगितलं. इतर आत्मे चिडले. " काय ही माणसाची जात ! टाळूवरचं लोणी खाणारी ! यांना लाजा कशा वाटत नाही, यांना अद्दल घडवलीच पाहिजे. " " पण हे काम लवकर कोण करेल, दोन - चार दिवसात ? आज लगेच करावं लागेल. " 

           तसे दोन आत्मे पुढे आले. " मित्रा आम्ही बघतो काय करायचे ते. " आणि निघून गेले. सावकाराचा वाडा ! वाडा मोठा होता. पिढ्यांपिढ्या सावकारी होती. लोकांच्या रक्ताचं पाणी करून ओढलेला पैसा होता. पण ते त्यांच्या रक्ताचं असल्याने सावकाराला काही  वाटलं नाही. तो बिनघोर झोपला होता. 

             तोच दारावर ठकठक झाली. " च्या मारी ! एवढ्या रात्री कोण तरफडलं ? " असं म्हणून सावकार चरफडला. दरवाजा उघडला कुणीच नाही. दोन शिव्या हासडल्या. दार बंद केलं, झोपायला गेला. परत ठकठक करत दार वाजवलं गेलं. दार उघडलं कुणीच नाही ! पन दूर नजर गेली. तिथं कुणीतरी बसलं होतं. बाई माणूस असावं. एवढ्या रात्री ? आपल्या वाड्याबाहेर ? सावकाराची कळी खुलली चेहेऱ्यावर आनंद दिसायला लागला. " बरं झालं असं बी घरी कुणी न्हाई ! आयतं शिकार गावलं म्हणायचं ! "

         
   त्यानं पायात खेटरं अडकवली व निघाला . नजर समोर होतीच अंतर कमी वाटत होतं पण संपत नव्हतं. बाई लांबच होती. " हा काय प्रकार हाय ? काही दुसरं लफडं तर न्हाई ? " सावकाराची धुंदी उतरली तो खाड्कन भानावर आला व परत निघाला. 

         " काय सावकार ? काय झालं ? घाबरला व्हय ! आओ अजून तर रात्र काढायची हाय असं कसं चालेल ? " अनं खळखळून हसली. बाईचं हसणं मोहक होतं. सावकार मोहात पडला. ' आयला आपण उगाच घाबरलो ! ही एवढी सुंदर हाय, एकटी हाय, उलट हिनंच घाबरायचं तर आपणच घाबरतोय ! ' " बाई काय झालं ? अशी रात्रीची का फिरतीस ? " 

       " आओ माझ्या धन्यानं मला घराबाहेर काढलं. " " का बरं ? " त्याला संशय हाय की मी वाईट चालीची हाय म्हणून. " " पण तुला कधी या गावात पाहिली न्हाई. " " न्हाई माझं गाव तिकडं लांब हाय. " तिने गावाचं नाव सांगितलं. " नवरा काय करतो ? " " काय करणार ! फिरतो उनाडक्या  करत. काम न्हाई, धंदा न्हाई. "  " मग आता कुठं जाणार ? " कुठं म्हंजी ! तुमच्या कडेच आलते. तुमच्याबद्दल बरंच ऐकलंय तुमि मदत करता म्हणून. म्हणून तुमच्याकडेच आलते. " " चल तर मग वाड्यावर ! " " असं कसं ?त्यानं मला घराबाहेर काढलं, त्याला असा सोडणार थोडीच ! " 

       " ठीक आहे. आपण करू काहीतरी. " अनं दोघं वाड्याकडे निघाली. सावकार खुश होता. तेवढ्यात दुरून कुणीतरी येताना दिसलं. कुणीतरी तावातावानं येत होतं. ती बाई घाबरून सावकाराच्या मागं लपली. सावकाराला स्फुरण चढलं. त्याने हात आडवे करून बाईला लपवलं.   तो गडी समोर येऊन उभा राहिला. " कुनी बाई पाहिली का इकडं ? " " न्हाई. " " मंग हात अडवून का उभा हाईस बाजूला हो. " अनं चालला गेला. सावकाराच्या जीवात जीव आला. यानं पाहिलं नाही वाटतं . त्यानं मागे वळून पाहिलं मागं बाई नव्हती. समोर पाहिलं कुणीही नव्हतं. सावकार चरकला, ' काय तरी लफडं हाय. साली ही गेली कुठं  म्हनायची ! '

              थकल्या पावलांनी सावकार वाड्यात परत आला. समोर पाहिलं तर ती बाई खाटेवर बसलेली.  ' च्या मारी ! बाई लई पुढची निघाली ! आपल्या पहिले आपल्या घरी हजर ! ' त्यानं आनंदाने दरवाजा लावून घेतला व कडी अडकवली व बाईच्यादिशेनेजाऊलागला. दारावरठकठक झाली. सावकार चरफडला. दार उघडलं तर समोर तो उभा होता तिचा नवरा ! " काय रंसावकारा ! जास्त माज आला व्हय रं ! माझ्या बाईला फुसलवतो व्हय रं ? तुला जित्ता सोडनार न्हाई ! " अनं त्याच्या अंगावर धावून आला. 

        सावकार त्याचा आवेश पाहून पार भेदरला. त्यानं गयावया करून सांगितलं, " आरं बाबा इथं कुणी बी न्हाई. " " सरक बाजूला मला पाहू दे. " अनं तो वाड्यात घुसला. पूर्ण वाडा शोधला वाड्यात कुणीही नव्हतं.  सावकार आता खरोखर घाबरला होता. ' आरं ही हाय तरी कोण ? सारखी कुठं गायब होती ! ' पूर्ण वाडा शोधल्यावर तो निघून गेला. सावकारला दरदरून घाम फूटला. त्यानं वाड्याचा दरवाजा लावला, कडी लावली. ' आता काही झालं तरी दरवाजा उघडायचा नाही. ' 

          घरात गेला, तांब्याभर पाणी भरून आणलं व खाटेवर येऊन बसला. " आयला ही गेली कुठं ? आख्खी रात्र खराब केली. " " सावकार मी इकडं हाय. " आवाज तर आला ,पन बाई दिसत नव्हती. सावकार जाम घाबरला. त्यानं आख्खा वाडा शोधून काढला, पण बाई दिसेल तर शपथ! 

       " ओ सावकार असं काय करताय ? मी इकडं हाय. " आवाज वरून येत होता. सावकाराने वर बघितलं,सावकाराचा वाडा जुना होता. लाकडी खांबांचा होता. छताला पण मोठे मोठे लाकडी खांब होते. आडवे पिलर सारखे. अनं एका खांबावर ती बसली होती अन हसत होती. सावकार समजून चुकला हे काहीतरी वेगळंच हाय. अन तो दाराकडे पळाला. दरवाजा उघडला तर समोर तो उभा. 

        " सावकार काय झालं ? " सावकार आधीच घामेघूम झाला होता याला पाहून आणखी घाबरला. " ती घरातच हाय. " " कोन ? " " तुझी बायको घरातच हाय. " तो खवळला, " मंग मघाशी खोटं का बोलला रं ? कुठंय ती दावं. " आता तो रिकाम्या हाती   नव्हता त्याच्या हातात दोरा होता. 

      " ती तिथं वर बसलीय. " " कुठं ? चल दावं  कुठंय ती. तिला न्हाई सोडणार आज. " त्याने दोराचा फासा तयार केला. ती खांबावर बसली होती. याला पाहून त्याच्याकडे धावत सुटली. व त्याचे पाय धरून म्हणाली " बरं झालं धनी तुमी आला ते. नाहीतर आज माझं काही खरं नव्हतं. या सावकारानं मला बेअब्रू केलं असतं. " व ती रडू लागली. 

         सावकाराला कळायला मार्ग नव्हता, काय चाललंय ते. तो कळवळून म्हणाला, " ओ बाई काहीही काय सांगताय ! मी तर हात बी लावला न्हाई. "  सावकाराचं  बोलणं ऐकून त्याच्या डोक्यात तिडीक  गेली, " जित्ता राहशील तर हात लावशील ना ! " अन सावकाराला काही कळायच्या आत गळफास त्याच्या गळ्यात पडला व शरीर आडव्या खांबाला अधांतरी लटकलं होतं !

       हा सर्व खेळ तो आत्मा पाहत होता. सावकाराचं लटकलेलं शरीर पाहून थोडा शांत झाला होता. त्याने दोघांचे आभार मानले व तिथून निघाले, " मला नाही येऊ देणार ? " मागून आवाज आला. सावकाराचा आत्मा त्यांना विनवत होता. " या नराधमाला मारून तुम्ही माझी आज सुटका केली, त्याबद्दल धन्यवाद !  " 

         व काही क्षणात चारही आत्मे त्यांच्या नेहमीच्या जागी आले होते. व त्यांचा विषय एकच होता, अजून अशी किती जणांची सुटका करावी लागेल, देव जाणे !

   ओम नमः शिवाय ! .................

                                              THE END 

                                                    लेखक : योगेश वसंत बोरसे. 

  • ALL RIGHTS RESERVED AT YOGESH BORSE & BGSM
  • ABOUT US 
  • PRIVACY POLICY 
  • ➤➤➤➤➤➤➤➤➤➤➤➤➤➤➤➤➤➤➤➤➤➤➤➤➤➤➤➤➤➤➤➤                       ➤➤➤➤➤➤➤➤➤➤➤➤➤

                        

                        


     










   

Previous
Next Post »