सावली - मराठी भयकथा - MARATHI HORROR STORY

                     सावली - मराठी भयकथा  - MARATHI HORROR  STORY   


MARATHI HORROR STORY
 मराठी भयकथा 

                                              लेखक : योगेश वसंत बोरसे . 

       
शाळेतून येतायेता संध्याकाळ झाली तशी लतिकाला काळजी वाटायला लागली. तिची           लेक अजून घरी आली नव्हती. हिवाळ्याचे दिवस असल्याने अंधार लवकर पडत होता . लतिका 
शाळेत शिक्षिका होती. तिची चिमुरडी काव्या सुंदर आणि गोड मुलगी होती. 

     

काव्याची देखरेख करण्यासाठी एक केअर टेकर ठेवली होती. काव्याचे पप्पा मोठया कंपनीत मॅनेजर होते. कामासाठी जास्त वेळ बाहेरच राहायचे, त्यामुळे काव्याचा व त्यांचा जास्त संबंध यायचा नाही. लतिका शिक्षिका असल्याने दिवसभर शाळेत जायची , संध्याकाळी घरी यायची , तोवर घरात काव्या व केअर टेकर दोघंच राहायच्या. 

     
  केअर टेकर एक बाई होती. मध्यम वयाची. तिचं नाव छाया होतं छाया प्रथम दर्शनी सौम्य वाटायची. कमी बोलणारी व जास्त करून दाखवणारी अशी होती. 

   
 एक दिवस -  लतिका घरी आली तर घरी दोघी नव्हत्या. बराच वेळ झाला तशी लतिकाची  काळजी वाढायला लागली आणि थोडयाच वेळात दोघी घरी आल्या होत्या. काव्याच्या डोक्याला पट्टी बांधली होती. तिला डोक्याला जखम झाली होती.

        तिला पाहताच लतिका धावली. पाच - सहा वर्षांची गोंडस पोरगी. डोक्याला पट्टी बांधल्याने वेगळीच दिसत होती. चेहेरा कोमेजला होता, ती पण घाबरली होती. लतिकाने तिचे पटापट मुके घेतले व  मिठी मारली. 

         " छाया हिला काय लागलं ? " छाया खाली मान घालून उभी होती ती तशीच बोलली, " अवो हिला घेऊन बागिच्यात गेली होती. म्हटलं पोरगी खेळेल तर बरं वाटेल. घसरगुंडी खेळत होती. तिथून कशी काय पडली काय माहीत ? ती एकटीच होती. तिला उचललं, डॉक्टर कडे नेलं. डॉक्टरने सांगितलं, घाबरायचं काही कारण नाही.जखम किरकोळ आहे फक्त मुलगी घाबरली आहे. " 

              लतिकाने परत तिला मिठी मारली व उचलून घेतलं.  लतिकाची परवानगी घेऊन छाया चालली गेली. " माझं बाळ असं कसं पडलं ? " लतिकाने तिला थोपटत थोपटत बोलत होती. बऱ्याच वेळाने काव्या बोलली, 

          " मम्मी मी नाही पल्ले, मला त्या दीदीने धकललं " तिचे बोबडे बोल ऐकून लतिकाला त्याही अवस्थेत हसू आलं. 

         तिने दोघींचा स्वयंपाक केला व काव्याला आधी खाऊ घातलं. काव्या बेडरूममध्ये पळाली. लतिकाने आवरासावर केली तेवढयात तिला काव्याच्या रडण्याचा आवाज ऐकू आला. लतिका बेडरूममध्ये पळाली. काव्या रडत होती तीच रडणं थांबेना, ती घाबरली होती. " काव्या काय झालं ? " लतिकाने तिला जवळ घेतलं तिचे कान फुंकले व तिची पप्पी घेतली. लक्ष तिच्या हाताकडे गेलं काव्याच्या हातावर नखं उमटले होते. व रक्त येत होतं. लतिका घाबरली. ही तर इथे एकटी होती मग नखं कशे उमटले ? तिने नकळत काव्याची नखं तपासली व आपली तपासली. नाही नखं तर नॉर्मल आहेत ! 

          " काव्या बाळा काय झालं सांगशील का ? " काव्या रडतच राहिली. बऱ्याच वेळाने शांत झाली. लतिकाने तिला कॉटवर टाकलं. सर्व घरातील लाईट बंद केले सर्व चेक केलं व कॉटवर काव्या शेजारी येऊन झोपली काव्या जागीच होती. मम्मीला पाहून तिला बिलगली. 

            लतिकाने तिला जवळ घेतलं, थोपटत थोपटत विचारलं, " काव्या बाळा हाताला काय लागलं ? " " मम्मी ती दीदी आली होती. " " कोण ? " ती जिने मला धकललं होतं. " " काव्या अगं काय बोलतेस ? इथे तर कुणी नव्हतं. " 

            " नाही ती दीदी आली होती तिने मला धकललं होतं. मी बेडरूममध्ये आली तर ती दारामागे लपली होती. तिने मला भॉ ..... केला आणि माझा हात धरला नंतर मला मारलं मग मी रडायला लागली तर ती पळून गेली. " 

            " कुठे गेली ? " " त्या खिडकीतून पळून गेली. " आणि लतिकाचं लक्ष गेलं, बेडरूमची खिडकी उघडी होती. आपल्या लक्षात कसं आलं नाही ! तिने खिडकी बंद केली. पडदा ओढला व कॉटवर येऊन झोपली. काव्याला थोपटत थोपटत विचार करत करत झोप लागली. कोण आहे  ती बघावं लागेल. सकाळी डोरबेल वाजली तशी जाग आली अरे छाया आली वाटतं ! म्हणजे अलार्म वाजला नाही ? डोरबेल पुन्हा वाजली. तिने घाईघाईत दरवाजा उघडला , छाया आली होती. " बाईसाहेब आज उशीर झाला ? " 

             
  " हो अगं रात्री ना.........  आणि लतिकाने सर्व काही सांगितलं. छाया आश्चर्याने म्हणाली, " अहो बाईसाहेब काव्या बेबी पडली तेव्हा तिथं कुणी नव्हतं मी घसरगुंडीजवळ उभी होती अनं तिच्यामागे काय पन आसपास बी कुणीच नव्हतं. "

                   " काय ? " लतिकाला नवल वाटलं. " अगं मग ती एवढीशी पोर खोटं बोलेल का ? तिला खरं खोटं तरी काय कळतं अजून ? " " बाईसाहेब तुम्ही म्हणतायेत ते खरं हाय पन मी माझ्या पोराची शपथ घेऊन सांगते. काव्या बेबी पडली तेव्हा मी जवळच होती आनं तिच्यामागं कुणीच नव्हतं. " 

               
 " मम्मा मम्मा.... " आवाज ऐकू आला. " ती दीदी आली होती मला सॉरी म्हणाली. " " काय ? " " हो सॉरी म्हणाली संध्याकाळी खेळायला ये म्हणाली, तू ये नाहीतर मला यावं लागेल म्हणाली. "

                 लतिकाला समजेना काय चाललंय. " कुठेय ती ? " " खिडकीतून गेली. " लतिका बेडरूमकडे पळाली. बेडरूमची खिडकी उघडी होती. आपण तर खिडकी उघडली नाही. काव्याला शक्य नाही, मग कुणी उघडली ? 

               आता लतिकाला भीती वाटायला लागली. तिने काव्याला उचलून घेतलं. " छायाबाई हे काय चाललंय काहीच समजत नाहीये. " छाया विचारात पडली होती. तिला वेगळाच संशय आला पण ती काही बोलली नाही. " बाईसाहेब तुम्ही काळजी करू नगा. मी काळजी घेईन बेबीची. " 

            " जाऊ दे असाही उशीर झालाय शाळेला आणि माझं मन ही लागणार नाही. मी आज घरीच थांबते काव्याजवळ. वाटल्यास तू पण थांब . किंवा गेलीस तरी चालेल. छायाने काळजीने काव्याकडे बघितलं, " बाईसाहेब एक बोलू का ? " " काय गं ? " " न्हाई तुमी विश्वास ठेवणार नाही  पन सांगते. " " बोल ना ! " काव्या बेबीवर कुणाची तरी सावली पडलीय ! " 

              लतिकाला काहीच कळलं नाही. " सावली पडली म्हणजे ? " " म्हणजे काव्या बेबीवर कुणीतरी नजर ठेऊन आहे. तिच्यामागं कुणी लागलंय जे आपल्याला बी दिसत न्हाई. " " छायाबाई कळेल असं बोलशील का ? " " बाईसाहेब काय सांगू ? मला नेमकं सांगता येत नाहीये, तुमी ते पिक्चर नाटक पाहात नाही का ? त्यात दाखवतात तसं काही तरी वाटतंय. " " अगं काहीही काय सांगतेय ? ते खोटं असतं, असं कुठे होतं का ? " मग बाईसाहेब तुमी सांगा हे कसं काय झालं ते ? " लतिकाकडे याचं उत्तर नव्हतं. विचार करता करता बोलता बोलता संध्याकाळ झाली. 

           
 " मम्मा आपण गार्डनमध्ये जायचं ? " काव्याने विचारलं. " हो बाळा जाऊ थोडया वेळाने. " आणि लतिका व काव्या गार्डनमध्ये गेल्या. गार्डन बंद होतं. काव्या हिरमुसली. " मम्मा आता काय करायचं ? " " अगं बाळा गार्डन बंद आहे आपण उद्या येऊ. " " पण ती दीदी मला बोलली होती संध्याकाळी खेळायला ये म्हणून. " 

            लतिकाला काव्याचं बोलणं आठवलं, ' ती मुलगी सांगून गेली होती तू ये नाहीतर मला यावं लागेल म्हणून. ' अन नकळतपणे लतिकाच्या अंगावर काटा आला. घरी जायची भीती वाटू लागली. 

           
  थोडा वेळ बाहेर फिरून झाल्यावर ते घरी आले. नकळतपणे लतिकाने घर चेक केलं घर रिकामं होतं. आपण उगीच घाबरलो. तिने चहा घेतला व काव्याला दूध पाजलं व टीव्ही पाहत बसली. तेवढ्यात डोरबेल वाजली. लतिकाने दरवाजा उघडला कुणी नव्हतं. 

           तिने बाहेर डोकावून पाहिलं. कुणी नव्हतं. बराच वेळ गेला. पुन्हा बेल वाजली. लतिकाने दरवाजा उघडला ! कुणी नाही ! मग बेल कोण वाजवतंय ? लतिकाने दरवाजा लावला. काव्या घरात उड्या मारत होती. " मम्मा दीदी आली, दीदी आली ! " लतिकाने बघितलं कुणी नव्हतं. " काव्या अगं बाळा कुणी नाहीये. " मम्मा ती बघ दीदी ! " काव्याने बोट दाखवलं. " बाळा अगं कुणी नाहीय तिथं. " लतिका घाबरली होती. 

         
  " तिने काव्याला उचललं व दरवाजा बंद करून बाहेर निघून गेली. छायाबाईला फोन करून बोलावून घेतलं. " छायाबाई ती मुलगी काव्याला घरात दिसतेय. आता काय करायचं ? तू आजचा दिवस आमच्यासोबत राहशील का ? " 

             " बाईसाहेब मी येईन पण काही उपयोग होईल असं वाटत नाही. तुम्ही सकाळी ऐकलं नाही, नाहीतर काही करता आलं असतं, बरं चला बघू या काय करायचं ते. " 

                लतिका, काव्या व छाया घरात आल्या. लतिकाने व छायाने पुन्हा घर चेक केलं,त्यांना काही वाटलं नाही. पण काव्या काही बोलली नव्हती याचा अर्थ घर रिकामं होतं. लतिकाने व छायाने घाईघाईत स्वयंपाक केला पण दोघींचं लक्ष काव्याकडेच होतं काव्या पण त्यांच्या अवतीभवती घुटमळत होती. तिघींची जेवणं झाली व हॉलमध्ये झोपायचं ठरलं. 

             
  बेडरूमच्या खिडक्या लतिकाने बंद केल्या गाद्या उचलल्या व हॉलमध्ये घातल्या बेडरूमचं दार बंद केलं. हॉल मोठा होता, मोकळा होता. किचन ऍटॅच होतं. काव्या झोपली लतिका व छाया गप्पा मारत मारत झोपी गेल्या. 

                बेल वाजली. वाजतच राहिली. लतिकाला दचकून जाग आली तिने छायाला उठवलं. लाईट लावला. घड्याळ बघितलं रात्रींचा दीड वाजला होता. या वेळेस कोण आलं असेल ? अनं लतिका दचकली. ती मुलगी तर नसेल ? पण एवढया रात्री ? " छायाबाई तीच मुलगी असेल, आपण उघडला तर ती मध्ये येईल!" " दरवाजा उघडू नका !" 

              पण डोरबेल वाजतच राहिली. शेवटी कंटाळून लतिकाने दरवाजा उघडला कुणी नव्हतं. पण लतिका समजून चुकली ती मध्ये आली असेल. म्हणून तिची दार बंद करायची हिंमत झाली नाही . तिने काव्याला उचललं व घाबरत छायाबाईला सांगितलं, " आपण जाऊ, इथं थांबणं धोकादायक आहे ! " पण तोवर उशीर झाला होता. दार खाड्कन बंद झालं होतं !

           छायाबाईच्या चेहेऱ्यावर हसू चमकलं. लतिकाला कळेना, ही का हसतेय ते ? तेवढ्यात काव्या चुळबुळ करत जागी झाली. तिने लतिकाकडे बघितलं, छायाकडे बघितलं. बोट दाखवून म्हणाली,  " मम्मा दीदी आली, दीदी आली. " लतिकाने घाबरत घाबरत विचारलं, " कुठेय गं बाळा ? " " ती काय मावशीच्या मांडीवर बसलीय. " ते ऐकलं अनं  लतिका दरवाजाकडे पळाली. पण दरवाजा उघडेल तर शपथ ! तिने बेडरूमचं दार उघडलं. खिडकी उघडली पण बाहेर कसं जाणार  ? पण बाहेर पडायची वेळ आली नाही. 

             ती पाय अडकून खाली पडली व काव्या लांब फेकली गेली भिंतीवर. तिच्या डोक्यातून रक्त वाहत होतं. लतिका धडपडून उठली व काव्याकडे पळाली, तिला उचललं. काव्याचं रक्त थांबत नव्हतं. ती बेडरूममधून बाहेर जायला वळली. दारात छाया उभी होती. तिच्या डोळ्यात वेगळीच चमक होती. 

              " बाईसाहेब बरं झालं, आज तुमच्यामुळे मला माझी लेक परत भेटली ! " तिच्या मागून ती मुलगी बाहेर आली. लतिकाला कळेना ही आपल्याला कशी दिसतेय ते ? 

                पण तिला काव्याची काळजी होती. तिने काव्याला बेडवर टाकलं. तिच्या लक्षात आलं काव्याचा श्वास बंद झाला होता  !काव्या या जगात नव्हती !' काव्या काव्या ' करत करत लतिका बेशुद्ध पडली. 

                  छायाने काव्याला उचललं व ती दार बंद करून बाहेर पडली ! आता तिच्याजवळ दोन पोरी होत्या, एक तिची लेक व दुसरी काव्या ............

                                            THE END 

                                               लेखक : योगेश वसंत बोरसे. 

         

⇎⇎⇎⇎⇎⇎⇎⇎⇎⇎⇎⇎⇎⇎⇎⇎⇎⇎⇎⇎⇎⇎⇎⇎⇎⇎⇎⇎⇎⇎⇎                                               ⇎⇎⇎⇎⇎⇎⇎⇎⇎⇎









  

Previous
Next Post »