झील - शापित झील - मराठी भयकथा - Mrathi horror story

                          झील - शापित झील - मराठी भयकथा - Mrathi horror story         

MARATHI HORROR STORIES
 MARATHI BHAYKATHA

                                                लेखक : योगेश वसंत बोरसे.

      खूप वर्षांपूर्वी जेव्हा पिण्याच्या पाण्यासाठी नदी, झरे, विहिरी यांचा वापर व्हायचा. तेव्हा एका गावाजवळ एक झरा वाहत होता. त्या झऱ्याचे पाणी अत्यंत मधुर होते. गावातील सर्व मंडळी या झऱ्याचे पाणी प्यायला वापरायचे व थोडं पुढे मोठा जलाशय निर्माण झाला होता. ते गुरा- ढोरांना प्यायला, धुवायला, कपडे धुवायला, अंघोळीला हे पाणी वापरलं जायचं. मुलं दिवसभर पाण्यात, जलाशयात उडया मारत राहायचे. गाव सुखी होतं. 

       निसर्गात आपल्या सभोवताली काही शक्ती चांगल्या, काही वाईट असतात. त्या वाईट शक्तींना कुणाचं सुख बघवत नाही व त्या आपला प्रभाव दाखवतात. 

     
  अशीच एक शक्ती ! त्या शक्तीने आपला प्रभाव त्या पाण्यावर टाकला व त्याचा परिणाम व्हायचा तोच झाला. ज्यांनी ज्यांनी पाणी पिलं ते तडफडून मेले व ज्यांना नाही मिळालं, ज्यांनी नाही पिलं ते बिना पाण्याने तडफडून मेले. कारण दुसरा कुठलाही पाण्याचा स्रोत नव्हता. जनावरं तडफडून मरू लागली. 

        दोन रात्री, दोन दिवस संपूर्ण गावाला स्म्शानचं रूप आलं होतं. कोण कुणाचा अंत्यसंस्कार करणार ? स्मशान ! पूर्ण स्मशान  !

     
  पुढील रात्र उगवली. भयाण रात्र ! सर्वत्र अंधार ! एवढ्या अंधारात कुणी तरी त्या गावात आलं होतं. हातात उजेड घेऊन. बहुधा कंदील असावा. गावाची दुर्दशा बघून त्याला असुरी आनंद झाला होता. अर्ध काम त्याने केलं होतं. त्याने गावातील गवत, पेंढ्या, लाकडं, सगळ्यांना आग लावून दिली. सर्व गाव आगीच्या भक्षस्थानी पडलं. प्रेतं जळायला लागली. जनावरांची शरीरं जळायला लागली. व मांस जळण्याचा उग्र वास वातावरणात साचायला लागला. पसरायला लागला. त्या वासाने त्याला खूप आनंद झाला असावा. तो हात पसरून खोल श्वास घेऊन वास घेऊ लागला. व थोड्या वेळात गडगडाटी हास्य बाहेर पडले. 

        काही क्षणात त्याला वाटलं, आपण चूक केली. अशीतर यांच्या आत्म्याला शांती मिळेल. हे पूर्ण जळता कामा नये. त्याने त्याच्या इतर शक्ती जागृत केल्या. त्या शक्ती हात जोडून समोर उभ्या राहिल्या. 

        " आज्ञा स्वामी..... " " ही सर्व प्रेतं पाण्यात फेका ! यांच्या आत्म्याला शांती मिळायला नको. मला हे सर्व आत्मे अधीन ठेवायचे आहेत . जा.... ! " आणि त्या शक्ती भराभरा कामाला लागल्या व काही क्षणात सर्व प्रेतांचा खच जलाशयात पडत गेला. अर्धवट जळालेली प्रेतं पाण्यात पडल्याने विचित्र वास सर्व वातावरणात भिनला. एवढं सुंदर गाव एका दुष्ट शक्तीमुळे स्मशानात  परिवर्तित झालं होतं त्या दिवसापासून ती व्यक्ती त्या परिसरात ठाणं मांडून बसली. व आपली अघोरी कृत्य करीत गेली. त्याचा आवाका वाढत गेला व आजूबाजू सर्वत्र हेच चित्र दिसू लागलं. 

        बराच काळ लोटला. बरीच वर्ष गेली.  काळाच्या ओघात ती व्यक्ती नामशेष झाली. पण त्याने केलेलं कृत्य ? त्याचे परिणाम मागे राहिले होते. माणसं मेली होती. गाव नष्ट झालं होतं पण झरा ! तो तर जिवंत होता. त्याचं पाणी वाहातच होतं. फक्त आजूबाजूचा परिसर नकारात्मक ऊर्जा यांनी भरला गेला होता. 

     
वर्षानुवर्ष उलटली. निसर्गच तो, परिवर्तन होत गेलं, व या ठिकाणी जिथे नरसंहार झाला होता, तिथे निसर्गाने आपली किमया दाखवायला सुरुवात केली होती. नवीन बहर, नवीन लता - वेली, झाडे - झुडुपे, पाने - फुले. झरा असल्याने त्या परिसराला स्वर्गाचे स्वरूप प्राप्त झाले होते. इतके की असं सौंदर्य जगात कुठेही नसेल. बघता बघता तिथे जंगल होत गेलं. 

       पण एक आश्चर्य होतं, एक ही प्राणी नव्हता. पक्षी यायचे, दिवसभर चिवचिव करायचे व आपलं अन्न घ्यायचे आणि दिवस मावळायला लागला की दुसरीकडे निघून जायचे. निसर्गाने सर्व बदललं होतं पण तिथली नकारात्मक ऊर्जा तो कमी करू शकला नाही. 

      आणि..... एक दिवस..... त्या परिसरात, वातावरणात मुलामुलींचा गप्पांचा, हसण्याचा - खिदळण्याचा आवाज ऐकू यायला लागला. एक ग्रुप तिथे फिरायला आला होता. पाच - सहा जणांचा. त्या सौंदर्याने मोहित झाला होता. त्यांना हे माहीत नव्हतं की सौंदर्य शापित असतं, किंमत मोजायला लावतं त्या मोहात जो पडतो त्याला किंमत मोजावीच लागते. कुठून आले होते, कुणास ठाऊक ? आले होते की आणले गेले होते की ओढले गेले होते, देव जाणे ! 

      मुलं यंग होती पण सिन्सिअर होती, सिरिअस होती. काहीतरी अभ्यास करण्यासाठी काही शोधण्यासाठी इथे आली होती. त्यांच्या बोलण्यावरून कळत होतं. त्यांचं काम चालू होतं. एकीच्या लक्षात आलं की, " एवढ्या मोठ्या जंगलात एक ही प्राणी नाही ! दिसला नाही की साधा आवाजही नाही. पक्षी आहेत पण त्यांची घरटी नाहीत. काही निवडक पक्षी आहेत जे लांबवर स्थलांतर करू शकतात असेच पक्षी इथे दिसतायेत याचा अर्थ काय ? "

     इतर मुलांना पण फरक जाणवला होता. फक्त सांगता येत नव्हता. हिने सांगितले सर्वांनी होकार दिला. खरोखर आश्चर्य आहे, Amezing ! पण या विषयावर किती वेळ बोलणार ? मनाच्या कप्प्यात नोंद झाली,  सगळं विचित्र आहे, सुंदर आहे पण विचित्र आहे ! 

     " फ्रेंड्स ! ' ग्रुप लीडरने आवाज दिला. " आपण ज्या कामासाठी आलो होतो ते झालंय ! परत निघायला हरकत नाही. दिवस बराच वर आलाय, बाहेर पडता पडता संध्याकाळ होईल, अंधार होईल. " इतरांनाही पटलं ते निघाले. बोलता बोलता ग्रुप पडले, मागे - पुढे झाले. 

      " फ्रेंड्स ! इकडे या ! व्हॉट अ ब्युटीफुल लेक ! " तिच्या आवाजाने सर्व जण तिकडे पळाले. व पाहातच राहिले. स्वर्ग ! अक्षरशः स्वर्ग ! याहून काय वेगळा असणार ! Untouch Beauty  !

        कितीतरी वेळ पाहातच राहिले. व या वातावरणाचा व्हायचा तोच परिणाम झाला. दडपलेल्या भावना उफाळून वरती आल्या. मोह दुसरं काय ? एका मुलीने जलाशयात उडी मारली. तसे इतरांनी तिचे अनुकरण केले. एकाने चवीसाठी थोडं पाणी पिलं. " superb ! what a test ! फ्रेंड्स टेस्ट करून बघा ! Wonderful ! " मनसोक्त पाणी प्यायले. 

        एकीच्या डोक्यात पुन्हा आलंच, " इथेही आपल्याशिवाय कुणीही नाही, एकही प्राणी नाही. " ती दचकली. संध्याकाळ झाली होती. पण एका ही पक्षाचा आवाज येत नव्हता. एवढं मोठं जंगल, उलट संध्याकाळी पक्षांचा किलकिलाट वाढतो पण इथं आपल्या ग्रुपच्या आवाजाशिवाय इतर काहीही आवाज नाही. फक्त शांतता, सळसळ झाडांची, पानांची, वाऱ्याची ! '

                           
                             
something wrong hear ! 

        " Hey guys  ! आपण निघूया ! " तिने सर्वांना आवाज दिला. " something wrong hear ! " तिच्या चेहेऱ्यावरील भाव पाहून बाकीचे हसत सुटले. " स्टुपिड ! आपण स्वर्गात आहोत. एवढं सौंदर्य कधी एकसाथ बघितलं नाही. त्याचा आनंद घेऊ दे ! " 

          " मी तेच म्हणतेय एवढी सुंदर जागा, पण इथे आपल्याशिवाय कुणीही नाही. उलट संध्याकाळी पक्षांचे थवेच्या थवे घरट्यांकडे परततात व एकच किलबिलाट होतो. पण इथे एकही पक्षाचा आवाज नाही. 


          Guys , प्लीज माझं ऐका ! something wrong hear ! संध्याकाळ पण झालीय, रात्र व्हायच्या आत आपण जंगलाबाहेर पडणं गरजेचं आहे निघूया लवकर ! प्लीज ! " तिचं बोलणं इतरांनाही पटलं. घाबरले नाहीत पण विचित्र वाटायला लागलं होतं. मुलं भराभर निघाली. एकाला वाटलं की पाणी बॉटलमध्ये भरून घ्यावं त्याने इतरांनाही सांगितलं. नाही म्हणण्याचा प्रश्नच नव्हता. इतकं चविष्ट पाणी त्यांनी यापूर्वी कधीच पिलं नव्हतं. बॉटल्स भरल्या गेल्या. मुलं निघाली. बॉटल्स एका हातात, खांद्यावर बॅग व एक एक हात धरून जायला लागली. 

          बराच वेळ चालल्यावर थकवा यायला लागला. तसे सर्व जण एक मोकळी जागा पाहून बसले. जंगल बरंच बाकी होतं. पण थोडं थांबणं प्रत्येकाला आवश्यक वाटलं आपापल्या बॉटल्स उघडल्या व मनसोक्त पाणी प्यायले. एक प्रकारची धुंदी चढली जी आजवर कधी अनुभवली नव्हती. हळूहळू डोळे बंद व्हायला लागले. प्रत्येकाचं लक्ष समोरच्याकडे होते. सर्वांची अवस्था तीच होती. व काही क्षणात सर्व जमिनीवर आडवे झाले. 

     
 आणि... काही क्षणात तो आला होता. त्याचे काम सुरु झाले होते. जळण्याच्या वासाने व त्रासाने प्रत्येक जण शुद्धीवर आला होता. आपलं शरीर का जळतंय, हे  समजण्यापलीकडचं होतं. कर्णककर्श किंकाळ्यांनी, आरोळ्यांनी जंगल, आसमंत दुमदुमलं व जो तो जीवाच्या आकांताने जलाशयाकडे पळू लागला. जशी त्यांच्यात स्पर्धा लागली होती. कोण पहिले पोहोचतो ? ते. 

        पण....... एकालाही शक्य झालं नाही. जंगलात पळता पळता त्यांची शरीरं जळत होती. कुणी पहिले कोसळलं कुणी नंतर पण सर्वांचे तेच झालं. शेवटी काय झालं ते पाहायला एकही जण उरला नाही. 

      तो...... तिथे आला. त्याने आपल्या शक्तींना आवाहन केलं. शक्ती समोर हात जोडून उभ्या. सांगण्याची गरज नव्हती. इशारा पुरेसा होता. आणि काही क्षणात सर्व फ्रेंड्सच्या जळत्या शरीरांना जलसमाधी मिळाली होती. 

     आणि जंगल एका विराट, गडगडाटी, क्रूर, विकट, अमानवी हास्याने पुन्हा दुमदुमलं होतं. तो आला होता ! परत आला होता ! आता हा खेळ पुन्हा सुरु होणार होता ! 

                     किती वेळ ? किती बळी ? कुणास ठाऊक !.......................

                                    

                                             THE END 

                                              लेखक : योगेश वसंत बोरसे.            

⇰⇰⇰⇰⇰⇰⇰⇰⇰⇰⇰⇰⇰⇰⇰⇰⇰⇰⇰⇰⇰⇰⇰⇰⇰⇰⇰⇰⇰⇰⇰⇰⇰⇰⇰⇰⇰⇰                                                                   ⇰⇰



  

            










  

Previous
Next Post »