टिंगल - टवाळी - kids entertainment

                                        टिंगल - टवाळी - Kids Entertainment

KIDS STORIES

   मित्रांनो , नमस्कार ;- 


  मी योगेश बोरसे तुमचं सर्वांचं ' BORSE GROUPS SUCCESS MISSION ' मध्ये व आमची WEBSITE ;- 'borse groups.tech' मध्ये हार्दिक स्वागत करतो .

     आज मी तुम्हाला एक छान गोष्ट सांगणार आहे ,कदाचित तुम्ही कधी ऐकली असेल पण पूर्ण गोष्ट संपल्यावरच तुम्हाला त्यातील नावीन्य समजेल ,त्यातील गम्मत समजेल ,व शेवटी एक छान बोध ही होईल . तर चला सुरुवात करूया ! 

     
 तर ,एका गावात दोन मित्र होते . एक लाकूड तोड्या त्याचं नांव रमेश , व एक टोपीवाला , त्याचं नांव संजय . आणि त्याला एक मुलगा होता त्याचं नांव पारस होतं . संजय आणि पारस टोप्या विकून आपला उदरनिर्वाह भागवत होते . म्हणजे त्यांचा उद्योग टोप्या विकणे हा होता .आणि रमेश जंगलात जायचा किंवा ,रस्त्याने सुकलेली झाडे दिसली कि तोडायचा व बाजारात जाऊन विकायचा . पण तो वेन्धळा होता , कुऱ्हाड त्याच्या हातातून खाली पडून जायची . 

   
 एके दिवशी काय झालं ,संजय टोप्या विकून घरी आला ,तर घराबाहेर त्याला रमेश दिसला . "रमेश तू ? अरे ये,ये,घरात ये ना ! " रमेश संजयच्या मागे मागे त्याच्या घरात गेला , "बस . " " नाही बसायला वेळ नाही . तू चल ना माझ्या बरोबर ." "अरे पण काय झालं ते तर सांग ?"  "संजय माझी कुऱ्हाड पाण्यात पडली !" "काय ? तुझी कुऱ्हाड सारखी पाण्यात कशी पडते रे ? " 

     "अरे रस्त्याच्या कडेला एक विहीर होती ,आणि शेजारी एक झाड होतं त्याच्या फांद्या तोडताना कुऱ्हाड पाण्यात पडली ." "तू चांगलं झाड तोडलंस ?" "नाही रे बाबा , झाड सुकलं होतं म्हणून तोडत होतो ." "पण विहिरीजवळ झाड सुकेल कसं ?""ते मला नाही माहित ,तू असं कर ना ,माझ्या सोबत चल ,त्या झाडालाच विचार, आणि मला माझी कुऱ्हाड काढून दे ." " अरे रमेश मला विहिरीत पोहोता येत नाही ,तुझं तू बघ ,काय करायचं ते ." रमेश तिथून विचार करत बाहेर पडला ,'आता काय करायचं ?' विचार करत करत त्याच विहिरीजवळ जाऊन उभा राहिला .

           
त्याच रस्त्यावर ,थोड्या अंतरावर ,संजय चा मुलगा पारस टोप्या विकून दमला होता ,एका झाडाखाली आराम साठी  थांबला . त्या झाडावर काही माकडं बसली होती ,ती याला पाहून  हसायला लागली . त्याला चिडवायला लागली . " हा त्या टोपीवाल्याचा मुलगा . याचा बाप पण टोप्या विकायचा ,हा पण टोप्या विकतो ."असं म्हणून उड्या मारायला लागली व पुन्हा म्हणाली ,"तुम्हाला टोप्या विकण्याशिवाय दुसरं काही येत नाही कारे ?" पारस ला त्यांचं बोलणं ऐकून राग आला . आणि त्याने सर्व टोप्या तिथेच फेकून दिल्या .व तिथून चालता झाला . 

     रस्त्याने जाता जाता त्याला लाकूड तोड्या दिसला . "काका तुम्ही इथे काय करता ?" "अरे पारस ,माझी कुऱ्हाड ना पाण्यात पडली . या विहिरीत पडली ." "काका तुमची कुऱ्हाड सारखी पाण्यात कशी पडते ?" "ते जाऊ दे . तू इथे काय करतोय ? आणि टोप्या कुठे आहेत ?" "काका ती माकडं सारखी चिडवतात ,याचा बाप पण टोप्या विकतो ,आणि हा पण टोप्या विकतो . मला राग आला .मी सर्व टोप्या तिथेच फेकून दिल्या . मला नाही आता टोप्या विकायच्या !"      

 
 "अरे,मला हि कंटाळा आला ह्या कुऱ्हाडीचा !सारखी पाण्यात पडते !" मग आता काय करायचं ? दोघांनी मिळून ठरवलं कि पारस विहिरीतून कुऱ्हाड काढून लाकडं विकणार ,आणि रमेश त्या सर्व टोप्या घेऊन टोप्या विकणार . म्हणून पारस विहिरीत उतरला ,आणि रमेश टोप्या उचलण्याकरता उत्साहाने तिकडे पळाला . 

    माकडं जसं काही याची वाटच पाहत होती ,त्याला पाहताच चेकाळायला लागली. उड्या मारायला लागली ,ओरडायला लागली . "अरे हा बघा ,लाकूडतोड्या ,याची कुऱ्हाड सारखी पाण्यात पडते ,आता हा टोप्या विकणार ,मग याच्या टोप्या हि पाण्यात पडणार ! हा ओल्या टोप्या विकणार ?" आणि सगळी माकडं खिदळायला लागली . "हा लोकांना ओल्या टोप्या घालणार ,ओल्या टोप्या घालणार !" रमेश ला भयंकर राग आला . यांचं काय करावं त्याला सुचेना .तो आजूबाजूला काही मारायला मिळतंय का ते शोधू लागला . 

         
    तितक्यात पारस तिथे आला . "काका काय झालं ? " "अरे ही सगळी माकडं मला  चिडवतायेत ." "काका यांचा बंदोबस्त करावा लागेल ! हि कुऱ्हाड घ्या आणि यांचं झाडच तोडून टाका . म्हणजे सगळा प्रश्नच मिटून जाईल ." रमेश ने एक दोन घाव झाडावर घातले,तशी माकडं दुसऱ्या झाडावर पळाली ."काका जाऊद्या ,यांच्या नादात चांगलं झाड नष्ट होईल ,चला !" रमेशने टोप्या उचलल्या ,व पारस ने कुऱ्हाड घेतली .

   दोघे समाधानी होऊन पारस च्या घरी गेले . संजय बाहेरच ओसरीत बसला होता ,कुऱ्हाड पाहून रमेश ला म्हणाला ,"काढलीस का रे ?" पारस ने व रमेश ने संजय ला सर्व काही सांगितले , संजय हसून म्हणाला ,"अरे माकडंच ती ! त्यांना चेकाळण्याशिवाय दुसरं काय येतं ? त्यांना जे येतं ते ते करतात ,आपल्याला जे येतं ते आपण करायचं ,झालं !.... 

        मित्रांनो , अशीच काही माणसं आपल्या जीवनात माकडांची भूमिका बजावतात ,आपल्या अवती भवती राहतात ,आपली टिंगल टवाळी करतात ,प्रश्न आपला आहे ,आपण त्यांच्याकडे दुर्लक्ष करायचं कि त्यांचं बोलणं मनावर घेऊन त्यांचा बंदोबस्त करण्यात वेळ वाया घालवायचा . विचार आपल्याला करायचाय !

    बघा ! विचार करा ! म्हणजे आयुष्य सोपं होईल ,व जगण्याचा आनंद घेता येईल ,आणि तेच महत्वाचं नाही का ?

                                                         धन्यवाद !  

     आपला :-yogesh 

                     विचार आणि लेखक  : योगेश वसंत बोरसे .  





➤➤➤➤➤➤➤➤➤➤➤➤➤➤➤➤➤➤➤➤➤➤➤➤➤➤➤➤➤➤➤➤➤➤➤➤➤➤➤➤➤➤➤➤➤➤➤➤➤➤➤➤➤➤➤➤➤➤➤➤➤➤➤➤➤➤➤➤➤➤






Previous
Next Post »