आवाज - MARATHI BHAYKATHA - MARATHI HORROR STORY

          आवाज - MARATHI BHAYKATHA - MARATHI HORROR STORY


MARATHI RAHASYA KATHA
मराठी रहस्य कथा 

                           

       

   लेखक :योगेश वसंत बोरसे. 

         रंगभूमी , नाट्यक्षेत्र ,ज्या काळात रंगभूमीला सुवर्ण काळ होता . TV मोबाईल नव्हते . तेव्हाचा काळ . चित्रपट प्रेक्षकांच्या ओळखीचा नव्हता . रंगभूमीवरील कलाकार जीव ओतून अभिनय करायचे . पण मानधन म्हणा पैसे म्हणा कमी मिळायचे . पण तरी कलाकार आहे त्यात समाधानी होते .

        जिथे नाट्यगृह होते तिथे नाटक होतच असत ,पण जिथे साधा स्टेज हि नाही अशा ठिकाणी शो करायचे तर अडचण व्हायची . याच काळात तमाशा करणारी मंडळी गावोगाव फिरून प्रेक्षकांचे मनोरंजन करायचे. तमाशा म्हटलं कि त्यात सगळं मसाला आलाच !लोकं पैसे उधळायचे ,पैजा लागायच्या ,कोण जास्त उधळतो  ते ?

          असाच एकदा शो करून सर्व लवाजमा बैलगाड्या भरून दुसऱ्या गावाकडे चालला होता .              बैलगाड्या एकामागे एक पाचसहा बैलगाड्या ,बैलांच्या गळ्यातील घंटांच्या आवाजाने       वातावरणात एक ताल निर्माण झाला होता . लयबद्धता आली होती . 

        प्रवास आता  सुरु झाला होता ,त्यामुळे कुणाला घाई नव्हती . ना बैलांना ,ना बैल गाडीतील मंडळींना !सर्व मंडळी गप्पा मारत चालली होती . मजाक मस्ती ,हसणं ,  मध्येच एखादी गाण्याची लयकारी , प्रवास सुरु होता . जिच्या नावावर तमाशा चालला होता ,ती अत्यंत सुंदर होती . स्वर्गीय लावण्य ! साक्षात अप्सराच ! 

     मध्यरात्र झाली होती . गांव अजून बरच लांब होतं . थांबावं कि पुढे जावं या संभ्रमात मंडळी असतानाच घुंगरांच्या आवाजाने वातावरणात कुतुहल निर्माण झाले . इतका मधुर आवाज कुणी आजवर ऐकला नव्हता . आवाजात गोडवा होता . लय होती , कुणी तरी ताल धरून  नाचत होतं . आपसूकच सर्व मंडळी मंत्र मुग्ध होऊन थांबली व आवाज कुठून येत आहे ,याचा अंदाज घेऊ लागली . रस्त्याच्या दोन्ही बाजूला झाडं होती .

         झाडांच्या सावल्या वातावरणाची गंभीरता वाढवत होत्या . वारा मंद मंद वाहत होता ,वातावरण आल्हाददायक होतं , न सांगता न बोलता एक एक बैलगाडी थांबत गेली . कुणाला काही सांगण्याची गरजच  नव्हती . सर्वजण मंत्र मुग्ध झाले होते . वातावरण भारल्यासारखे झाले होते . आवाजातील गोडवा ,घुंगरांचा मधुर ध्वनी !! वा ! आवाज असावा तर असा !  

        बैलगाडीतून एक एक जण खाली उतरू लागला . व आवाजाचा अंदाज घेऊ लागला . पण नेमकी आवाजाची दिशा कळत नव्हती . जसा काही चारी बाजूनी आवाज येत होता . काही वेळाने आवाज बंद झाला ,घुंगरांचा ताल हि बंद झाला . तशी मंडळी भानावर आली .

     "हे ,नेमकं काय होतं म्हनायचं ? " ढोलकीवाला म्हणाला . "असा आवाज कधी ऐकलं नाही !" पेटीवाला बोलला . तसा नाच्या पुढं आला , "ए, गप्प बसा की जरा , काय कौतिक करताय ? आपली सुंदर काय कमी हाय व्हय ? " तसे दोघे गप्प बसले . सुंदराचा  पण काही वेगळा विचार नव्हता . ती पण प्रभावित झाली होती . मोहित झाली होती . तिचा गर्व कुठल्या कुठे पळाला होता . 

     पण जी कुणी हाये ती समोर यायला तर हवी . मानव ,यक्ष ,किन्नर ,कि गंधर्व ? आता आवाज हि बंद झाला होता . तसे सर्वजण भानावर आले . व आपापल्या बैलगाडीत बसले . बैलगाड्या निघाल्या ,तितक्यात आवाज पुन्हा यायला लागला . घुंगरांचा पण आवाज आता जवळून येत होता , स्पष्ट येत होता . कुणीतरी बैलगाड्यांच्या मागून येत होतं . 

     सर्वांचं लक्ष मागच्या बाजूला गेलं ,गाड्या पुन्हा थांबल्या , शेवटच्या गाडीत नाच्या व दोन तीन गडी माणसं होती , त्यांचा अचानक ओरडण्याचा आवाज आला . "ए, अरे निघा लवकर  इथून . आपल्याला आवाजाने फशीवलंय . " एक जण ओरडला , " ए , अरं आता हे काय म्हनायचं ?" इतरांनीही बघितलं होतं ,त्याचा व्हायचा तोच परिणाम झाला . 

    जीव खाऊन बैल पळायला लागले . बैल उधळले होते . बैलगाड्या हेलकावत होत्या . बायांच्या किंकाळ्या ऐकू यायला लागल्या . व ज्या गाडीत सुंदरा  व तिच्या मैत्रिणी बसल्या होत्या ,ती बैल गाडी एका खड्ड्यात जाऊन अडकली . दोन जणी बाहेर फेकल्या गेल्या . तशी सुंदरा जिवाच्या आकांताने ओरडली . " आरं थांबा ,मैना अन रमा खाली पडल्या !" पण जो तो आपला जीव वाचवण्या करीता धडपडत होता . तो इतरांचा काय विचार करणार ?

         काही वेळात सर्वांची वाताहत झाली कोणी कुठे ? कुणी कुठे ? आपल्या मैत्रीण सोडून पुढे जाणं सुंदरला शक्य नव्हतं . तिने बैलगाडीतून उडी मारली . व मैत्रिणींकडे पळाली . त्यांना  लागलं  होतं , त्यात त्या घाबरल्या  होत्या . आता आपण जगत नाही ,हे त्यांना कळून चुकलं . त्यांना सुंदरा  येताना दिसली  तसा जिवात जीव  आला . तेवढाच बुडत्याला काडीचा आधार !             तेवढ्यात त्यांना सुगंध यायला लागला . तो एवढा तीव्र होता कि त्या सर्व काही विसरल्या ,सुगंध वाढत गेला ,त्या धुंद होत गेल्या ,त्यांना ग्लानी आली व त्यांची शुद्ध हरपली . सुंदराची पण काही वेगळी अवस्था नव्हती . फक्त तिला कळालं होतं कि हे आपल्या जीवाला घातक  आहे . पण जे झालं त्यावर तिचा पण इलाज चालला नाही . फक्त तिची इच्छा शक्ती  तीव्र होती ,म्हणून थोडी शुद्धीवर होती . 

        काही अमानवी आकृत्या त्यांच्या आजूबाजूला जमा झाल्या होत्या व थोड्याच वेळात तो सुंदर आवाज पुन्हा आला ,पण आता आवाजात आज्ञा होती . " उचला त्यांना ! व आपल्या जागेवर घेऊन जा . "

       सकाळ झाली .सुंदरा ,रमा व मैना सोडून  इतर सर्व जण  परत एका जागी जमा झाले , त्या तिघींचा कुठेच ठावठिकाणा नव्हता . त्यांच्याशिवाय तमाशा कसा चालणार ? त्यांना शोधणं भाग होतं ,पण कुठे शोधणार ? काल रात्रीचा प्रकार सगळ्यांना  लक्षात होता . आठवणीनेच अंगाचा थरकाप उडाला . अंगावर शहारे आले . त्या जागी परत जाणं म्हणजे मृत्यूला आमंत्रण होतं . पण ते असेही जगू शकणार नव्हते . सुंदराचं लावण्य म्हणजे त्यांच्या  पोटपूजेचं साधन होतं .त्यामुळे त्यांना शोधणं निदान सुंदराला  तरी शोधणं हि त्यांची गरज होती .

      बरीच शोधाशोध केली पण उपयोग झाला नाही . ,काळजी वाढत गेली व इकडे संध्याकाळ वाढत गेली . एक गडी म्हणाला ,

"आता शोधून काही उपयोग नाही . आपण केव्हापासून शोधतोय ,दिस बुडलाय ,परत जाऊ !"  "आरं  काही लाज वाटती का ? " नाच्या ओरडला , आपल्या तीन पोरी गावनांत , अन तुला दिस बुडाल्याची पडलीय ?"

   गडी  परत म्हणाला ,

"न्हाई ,मी तसं न्हाई म्हनलं ,आता संध्याकाळ झालीय ,जे काही होईल ते रात्रीच होईल ,जसं काल झालं तसं , आपण थोडा आराम करू ,पोटापाण्याचं पाहू तयारी करू , मंग रात्री शोधायला निघू !"

 त्याचं हे बोलणं सगळ्यांनाच पटलं .

" पण रात्री इथं परत यायचं म्हणजे ?" एक जण भेदरून म्हणाला ,

"यावं तर लागलंच ,चला ",सगळे निघाले . मुक्कामावर आले .

 "झक मारली अन रात्री निघालो !" नाच्या म्हणाला . 

"मी नाही म्हणलं होतं ,पण सुंदरा  कसलं ऐकते ? गांव लांब आहे वेळ जाईल ,उद्या संध्याकाळी शो करायचंय ! आता कर म्हणा शो ! जंगलात !"

   रात्र झाली . सर्वजण निघाले ,म्हणजे दोघे तिघे गडी माणसं , नाच्या ,ढोलकीवाला ,पेटीवाला . बाकी दोन गडी माणसं ,दोन बाया मुक्कामावर थांबल्या सामानाजवळ ,ते पण महत्वाचं होतं  . कालच्या जागी पोहोचले ,जागा सामसूम होती . आवाज काहीही नव्हता . वाट बघण्याशिवाय पर्याय नव्हता . कुणी रस्त्यावर बसून घेतलं ,कुणी फिरत राहीलं . 

        अन थोड्याच वेळात आवाज यायला लागला .  तोच मनाला मोहून टाकणारा स्वर . नंतर घुंगरांचा लयबद्ध आवाज .बराच वेळ हा खेळ चालू होता . सर्व जण सावध होते ,पुढे काय होणार हे माहित असल्यासारखे . व काही वेळात आवाज बंद झाला ,सर्व जण तयार होते . घुंगरांचा आवाज जवळ यायला लागला व घंटेचा  किणकिणाट झाल्या सारखा हसण्याचा आवाज ऐकू आला . 

     आणि ...  थोड्याच वेळात 'ते ' समोर उभं राहिलं 'ते' ! आवाज त्या आकृतीला न शोभणारा होता ,हसणं कृत्रिम वाटत होतं ,पण घुंगरू पायात होते ,त्याचा आवाज लयबद्धच  येत होता . जसा एखादा नर्तक असावा . समोरच्या आकृतीला पाहून सर्वजण भीतीने गोठले होते . हे नेमकं आहे काय ? ते त्याच्या दिशेने सरकत राहिलं ,तसे गडयांनी  टेंभे  पेटवले .व प्रत्येकाच्या हातात टेंभा दिला . 

   एक गडी हिम्मत करून पुढे आला ,

" आमची सुंदरा  कुठं हाय ? " तोच बारीक आवाज आला 

" सुंदरा ssss " अन नंतर हसण्याचा , घंटेच्या किणकिणाटासारखा आवाज आला . 

"ए , हसणं बंद कर ! सुंदरा  कुठं हाय ते सांग नाहीतर इथंच जाळून टाकू . "

 "सुंदरा गेली ,रमा गेली , मैना गेली , आता तुमची पाळी !"

 "गेली म्हणजे ? "

"मेली ! मला पाहूनच मेली ! मला ज्यानं एकदा पाहिलं तो एकतर वेडा होतो , नाहीतर मरतो !" परत तेच किणकिण करत हास्य बाहेर आलं . 

   "आरं ,पन तू हाईस  तरी कोन ? बाई का माणूस का भूत हायेस ? का गंधर्व ,का किन्नर हाईस  ?" 

"तुमि काही म्हणा , तुम्ही मरणार हे नक्की !"

 "सुंदरा  कुठाय सांग !" 

"सांगितलं ना , त्या तिघी मेल्या ,खोटं वाटत असेल तर पुढं एक वडाचं  झाड आहे , तिथं जाऊन पहा . "

 आणि ते गायब झालं !

"आर ,हे कुठं गेलं ? " 

वेड लागायची पाळी होती प्रत्येकावर , त्याच अवस्थेत ते वडाचं झाड शोधायला लागले .   टेंभे हातात होतेच !

     "मावशे !ए ,मावशे ! इकडे ये ! " नाच्याला कुणीतरी आवाज दिला होता , आवाज ओळखिचा होता. झाडाच्या एका फांदीवर  सुंदरा ,दुसऱ्या बाजूला मैना व रमा बसल्या होत्या  व त्यांना बोलवत होत्या !

 खिदळत होत्या ! हसणं अमानवी होतं ! विचित्र होतं !  ते पाहून यांचा धीर सुटला . व ते पळायला लागले . आणि या तिघी त्यांच्या मागे पळायला लागल्या . 

     "मावशे , अगं थांब ! पळतीस काय ? ओ  ढोलकीवालं , ओ पेटीवालं , अवो तमाशा करायचाय ना ! थांबा कि जरा !" 

पण कोण थांबणार होतं ? जो तो जीव घेऊन पळत होता . ठेचकाळत होता ,धडपडत होता . 

    आणि आवाज यायला लागला ,घुंगरू वाजायला लागले ,सुगंध यायला लागला . आणि त्या सुगंधाने सर्व जण भारल्यासारखे झाले . व काही वेळात निद्रावस्थेत गेले . आवाज जवळ येत गेला . आज्ञा झाली ,

" उचला यांना ! आपल्या जागेत घेऊन जा !" आज्ञेचं पालन झालं व गाण्याचे स्वर घुंगरांचे स्वर आसमंतात घुमू लागले , मधेच घंटेच्या किणकिणाटासारखं हसू  ऐकू येत होतं ! जे अजून किती बळी घेणार होतं कुणास ठाऊक ?.....           


                                                         THE END

लेखक : योगेश वसंत बोरसे . 



⇘⇘⇘⇘⇘⇘⇘⇘⇘⇘⇘⇘⇘⇘⇘⇘⇘⇘⇘⇘⇘⇘⇘⇘⇘⇘⇘⇘⇘⇘⇘⇘⇘⇘⇘⇘⇘⇘⇘⇘⇘⇘⇘⇘⇘⇘⇘⇘⇘⇘

 







 

 



Previous
Next Post »