ढिंच्याक - मराठी भयकथा - marathi horror story

                               ढिंच्याक - मराठी भयकथा - marathi horror story


MARATHI RAHSYA KATHA
मराठी भयकथा 

                                          लेखक : योगेश वसंत बोरसे .

     रात्रीची वेळ ,रस्ता आडमार्गाचा .सौरभ आपल्या कारमधून आरामात चालला होता . कारमध्ये जुनी शांत गाणी चालू होती . कसलीही घाई नव्हती . रस्त्याच्या दुतर्फा गर्द  झाडी होती . शेतमळे होते . मधूनच एखादं घर डोकवायचं ,मळ्यात बांधलेलं . 

   खूप दिवसांनी सौरभ आपल्या गावी चालला होता . आई - वडिलांना भेटायला . त्याने त्यांना कळवलं नव्हतं . अचानक जायचं आणि आश्चर्याचा धक्का द्यायचा ! सरप्राईज द्यायचं असं ठरवलं होतं . डोक्यात आई - वडिलांचे विचार तरळत होते . 

आणि अचानक......

 वेगळं MUSIC ऐकायला आलं ! सौरभ दचकला , आपण तर जुनी गाणी ऐकत होतो . मध्येच  'ढिंच्याक ' कुठुन सुरु झालं ? म्हणून त्याने अविश्वासाने CD PLAYER कडे बघितलं . आवाज वाढवून चेक केलं . 

   नाही ! इथे जुनी गाणीच चालू आहेत . मग ? याचा अर्थ आवाज बाहेरून येत होता . पण नेमका कुठून ? आसपास तर कुणी दिसत हि नव्हतं . पण एवढा मोठा आवाज जवळूनच येत असला पाहिजे . त्याने कार साइड ला थांबवली , व बाहेर आला. 

    चारही बाजूला नजर फिरवली. आवाजाच्या दिशेने एकटक बघितलं. समोर मळ्यात एक जुनं घरासारखं काही दिसत होतं. अंधार असल्याने नीट समजत नव्हतं. पण आवाज निश्चित तिथूनच येत होता. सौरभ नकळत पणे तिकडे जायला लागला . उत्सुकता होती किंवा त्यालाही कळत नव्हतं. पण तिकडे जायला लागला . आवाज जवळ जवळ यायला लागला. तसं खरं तर वाढायला हवा होता पण नाही आवाज कमी कमी होत गेला. 

       बरं म्युझिक ही असं वाजत होतं की एवढ्या रात्री ही अशा अनोळखी जागी, एकांतात नाचावंसं वाटत होतं !  रक्त सळसळत होतं ! जास्त  म्युझिक वाढलं असतं तर कदाचित सौरभ तिथेच नाचायला लागला असता. पण त्या जुन्या घरापर्यंत पोहोचत पोहोचत म्युझिक हळूहळू  बंद व्हायला लागलं व तो तिथं पोहोचला आणि शांतता. 

भीषण शांतता ! तिथे कुणी नव्हतं. त्याने घरात डोकावून बघितलं, चिटपाखरू ही नव्हतं. सौरभचा मूड गेला. ' काय यार ! कसलं ढिंच्याक वाजत होतं ! असं वाटत  होतं की नाचत राहावं ! जाऊ दे ! आपलं कुठलं आलय  एवढं नशीब ! '  असा विचार करून तो परत फिरला. 

     आणि रस्त्याच्या दिशेने  जिथे त्याने कार पार्क केली तिकडून म्युझिक वाजायला लागलं. सौरभला एवढा आंनद झाला की तो जवळजवळ पळतच तिथपर्यंत पोहोचला. पुन्हा तेच ! तिथे कुणीही नव्हतं. सौरभ डोकं खाजवत उभा राहिला. 

' सालं लफडं काय आहे ? कुणी आपली मस्करी तर  करत नाहीये ! हां  तसंच वाटतंय. पण इथे तर कुणी आपल्याला ओळखतही नाही. मग.............' 

      आणि तेवढ्यात मळ्यातल्या घरातून आवाज यायला लागला. 

" आयला काय म्युझिक आहे ! " तो घराकडे पळाला आणि रस्त्यावरूनही आता म्युझिक सुरु झालं होतं. सौरभ अक्षरशः वेडा झाला. इकडे जावं की तिकडे जावं ! समजत नव्हतं. पण म्युझिक एवढं झिंग आणणारं होतं की तो तिथेच नाचायला लागला. असं नाचत होता की कधी आयुष्यात नाचलाच नसेल ! 

       नाचता नाचता त्याला लक्षात आलं की कुणीतरी आपल्याकडे पाहून हसतंय !

 त्या म्युझिकच्या आवाजात त्याला अगोदर कळलं नाही. पण त्याने सर्वलक्ष त्या हसण्याकडे केंद्रित केलं. हसणं स्त्रीचं होतं. हसणं एवढं मादक होतं तर  ही स्त्री कशी असेल ? 

म्युझिक बंद झालं , नाचणं बंद झालं !

     " ए अरे नाच की ! कशा पायी बंद केलं ? " तो आवाजाने दचकला. हा आवाज पुरुषाचा होता. म्युझिक पुन्हा सुरूं झालं. पण आता सौरभला नाचावंसं वाटत नव्हतं.

 " ए अरे नाच की ! नाच म्हनलं ना ! " आवाज जवळून येत होता. पण कुणी दिसत नव्हतं. आणि पुन्हा तोच मादक हसण्याचा आवाज यायला लागला आता हसण्याचा आवाज इतका वाढला की सौरभने  कानावर हात ठेवले. 

        त्याच्या लक्षात आलं की हा काही  वेगळा प्रकार आहे. त्याला दरदरून घाम फुटला. तो गाडीच्या दिशेने पळायला लागला.

 ' ही नक्की भुताटकी आहे. छे  ! भुताटकी असते का ? काय माहित ? ' तो विचार करत करत पळत  होता. 

' नाहीतर मग काय चाललंय ? ' रस्त्यावर पोहोचला. गाडी दिसेना.

 ' आयला ! कार इथेच तर होती. ' त्याच लक्ष समोर गेलं, आवाजाच्या दिशेने, म्युझिकच्या दिशेने, कारच्या दिशेने. 

" ए माझी कार , ए अरे थांब ! "

      म्युझिक जवळजवळ यायला लागलं. आवाज वाढायला लागला. कार पुढंपुढं जात होती. थोडं जवळ गेल्यावर त्याच्या लक्षात आलं की कारच्या समोर कुणीतरी नाचतंय. म्युझिक तेच. 

' पण हे अंधारात का नाचतायेत ? कमीत कमी कारचे हेडलाईट........... ' 

त्याच्या विचाराने तोच शुद्धीवर आला. 

" ए माझी कार , ए अरे थांब ! " तो पळत पळत कारच्या मागं पोहोचला. आणि जागच्या जागी थांबला. पावलं जागची हालेनात. ना पुढं ना मागं.

      त्याला पाहून ते नाचणारे त्याच्या दिशेने सरकायला लागले आणि त्यातले कुणीही जिवंत नव्हते. हे त्यांच्याकडे पाहून समजत होतं. इनफॅक्ट ते माणसं नव्हते, सापळे होते. तर काहींचे देह कुजलेले होते. घाणेरडा वास येत होता. सौरभला आता धीर धरवेना तो उलट्या दिशेने पळायला लागला. आणि ही भुतावळ त्याच्या मागे नाचत नाचत येत होती !

 त्यांच्यातील अंतर कमी होत नव्हतं. हा किती वेळ पळणार ? पळायची जास्त सवय नाही. व्यायाम करायचा, पण व्यायाम करताना पळणं वेगळं आणि घाबरलेलं असतांना पळणं वेगळं. जस्ट इम्पॉसिबल !

      आणि खरोखर ते त्याच्यासाठी इम्पॉसिबल ठरलं होतं. पळून पळून थकला आणि खाली पडला. भीती मुळे मनावरचं, हृदयावरचं प्रेशर वाढत गेलं. भुतावळ जशी जशी जवळ यायला लागली, तसं प्रेशर वाढत गेलं. आपण पळू शकत नाही हे त्याला कळून चुकलं. आपला अंत जवळ आला आहे असं त्याला वाटायला लागलं. 

      भुतावळ जवळ जवळ यायला लागली , त्याच्या अवतीभवती फेर धरून बेभान नाचायला लागली. त्या घाणेरड्या वासाने सौरभचा जीव गुदमरायला लागला. श्वास घेणं मुश्किल झालं. हळूहळू कमी होत गेलं. म्युझिकचा आवज वाढत गेला , वाढतच गेला. इतका की कानांना असह्य होत गेलं. नंतर सर्व शांत, सर्व आवाज बंद, श्वास बंद. शांतता भिषण शांतता ! 

" अरे उठ नाच की ! " तोच अगोदर ऐकलेला आवाज......... पण आता तो समोर दिसत होता. आपल्याला आपलं शरीरही दिसतंय आणि हे नाचणारे ही दिसतायेत पण मग....... 

       म्युझिक पुन्हा सुरु झालं आणि नवीन पाहुणा इतका नाचत होता की बाकीचे थक्क झाले व बाजूला होत गेले व ती मादक हसणारी आता समोर दिसायला लागली. त्याचं नाचणं पाहून तिला राहावलं नाही ती पण त्याच्यासोबत नाचायला लागली ! 

        सौरभ कधी तिच्याकडे कधी आपल्या खाली पडलेल्या शरीराकडे बघत राहिला. पण हू केअर !........................ आणि ओरडले, 

" अरे नाचों, जमके नाचों ! " .......................... 


                                                                                                                                                        THE END  

VISIT OUR YOU TUBE CHANNEL                        

                                           लेखक : योगेश वसंत बोरसे.  

            ⇪⇪⇪⇪⇪⇪⇪⇪⇪⇪⇪⇪⇪⇪⇪⇪⇪⇪⇪⇪⇪⇪⇪⇪⇪⇪⇪⇪⇪⇪⇪⇪⇪⇪⇪⇪⇪⇪⇪⇪⇪⇪⇪⇪⇪⇪⇪

























   

Previous
Next Post »