बोगदा - मराठी भयकथा - MARATHI HORROR STORY

     बोगदा - मराठी भयकथा - MARATHI HORROR STORY 

MARATHI HORROR STORIES
 मराठी भयकथा 

                                           लेखक :योगेश वसंत बोरसे . 

       मुसळधार पावसाची सुरवात होण्याची लक्षणं दिसत होती . ढगांचा गडगडाट एखादा डोंगर कोसळावा तसा अंगावर येत होता. वारे वेगाने वाहत होते. जसं त्यांना या वातावरणाची भीती वाटत असावी आणि म्हणून ते पळत असावेत. 

    पावसाच्या सोबत वादळ पण येत आहे, असं वाटत होतं. झाडं गदा गदा हालत होती. त्या भयाण वातावरणात त्या झाडांमध्ये जीव भरला की काय असं वाटत होतं. निसर्ग कोपला होता की त्याची ताकद दाखवत होता कुणास ठाऊक ? पण तो ताकद कुणाला दाखवत होता ? आणि त्याचा सामना करायला तिथे होतं तरी कोण ? 

   बिचारे पक्षी होते झाडावर. पण त्यांना कळत नव्हतं की आपला जीव वाचवावा, घरटी वाचवावी की अंडी वाचवावी ! जवळपासचा सर्व परिसर डोंगर - दऱ्या आणि जंगलाने वेढला होता. कदाचित त्यामुळेच निसर्गाची ताकद जास्त वाढली असावी . 

      आणि त्याच्या ताकदीला आवाहन देत एक व्यक्ती एवढ्या जीवघेण्या वातावरणात डोंगर उतरून खाली येत होती. हातात  काठी होती. ती टेकत टेकत भराभर पावलं टाकत रेल्वे ट्रॅकच्या दिशेने येत होती. हो रेल्वेट्रॅक ! 

   

 काही अंतरावर बोगदा होता. संध्याकाळची वेळ होती. तरीही पावसाच्या वातावरणाने सर्व अंधारून आलं होतं. मध्येच एखादी वीज चमकायची. पाठोपाठ काड काड आवाज यायचा. कानठळ्या बसवणारा. असं वाटायचं की कुठेतरी जवळपास वीज कोसळली असावी. आणि कोसळलीच.

        एका झाडावर. ते झाड जाळून खाक झालं. आणि पावसाला  सुरुवात झाली. जणूकाही पाऊस वीज पडायची वाटच पाहत होता. त्याला सिग्नल मिळाला, ग्रीन सिग्नल. आता तो मनसोक्त कोसळणार होता. त्याला कोणाची दया नव्हती. कुणाची तमा नव्हती. गर्व होता आपल्या ताकदीचा ! अभिमान होता आपल्या सामर्थ्याचा !

         पण या सर्व घटनांनी ती व्यक्ती तिळमात्र ही मागे हटली नाही. घाबरली नाही, थांबली नाही. जसं काही त्याला माहीत होतं की हे होणारच. आणि तो तयार होता या सर्व गोष्टींचा सामना करायला. त्या रेल्वेच्या बोगद्यातून एक व्यक्ती बाहेर आली. तिने आभाळाकडे पाहिलं आणि वीज चमकली, कडाडली. जणू काही  त्याच निसर्गाने स्वागतच केलं होतं. आणि त्या विजेच्या प्रकाशझोतात त्याच्या हातातील हत्यार चमकलं. 

       त्याने हात वर केला व काहीतरी पुटपुटला. आणि त्याच क्षणी त्याची नजर समोरून, डोंगरावरून खाली उतरून येणाऱ्या व्यक्तीकडे गेली. आणि त्याच्या भयाण चेहेऱ्यावर न शोभणारं हास्य दिसायला लागलं. जशी तो याचीच वाट पाहत होता. त्याने दोन्ही हात वर आभाळाकडे केले व हसायला लागला. हे हास्य इतकं भयानक होतं की निसर्ग थरारला. पावसाचा जोर अजून वाढला. जसं काही त्याला घाईची  लागली होती. 

         बराच वेळ हा खेळ चालू होता. डोंगरावून उतरून येणारी व्यक्ती जवळ दिसायला लागली तसा हा बोगद्यात शिरला व अंधारात गडप झाला. ती व्यक्ती बोगद्याजवळ येऊन थांबली व त्याने काठी आपटत आरोळी ठोकली, 

        " तस्मक मी आलोय बाहेर ये ! " आतून काहीही आवाज आला नाही. पावसाचा जोर वाढत गेला व अंधारही. पण तस्मक बाहेर यायची  चिन्ह दिसेनात. " तस्मक मी आलोय बाहेर ये. का मी मध्ये येऊ ? " काहीच प्रतिक्रिया उमटली नाही. तशी ही व्यक्ती बोगद्यात शिरली. बोगदा रेल्वेट्रॅकचा होता. पण एखादी रेल्वे दिवसभरात जायची , रात्री तर प्रश्नच नव्हता. 

        काही वर्षांपूर्वी वापरात असलेला बोगदा, रेल्वेट्रॅक अतर्क्य, अमानवी घटनांनी चर्चेचा विषय बनला होता. इतका की यातलं खरं किती ? खोटं किती ? हे सुद्धा कळणं अवघड झालं होतं. 

       मग रेल्वे जायच्या कुठून ? तर पर्यायी ट्रॅक उभारण्यात आला होता. निसर्गाला आवाहन देत. बरेचशे मानवी बळी घेत. नवीन ट्रॅक तयार  झाला. व हा दुर्लक्षित झाला. तरीही पर्याय नसला की एखादी गाडी इथून जायचीच आणि गाडी बोगद्यात शिरली की बायामाणसांच्या किंकाळ्या ऐकू यायच्या, प्रवाशांचा भीतीने थरकाप उडायचा. व बोगदा पार करता करता दोन - चार प्रवाशी मेलेले असायचे. ही  संख्या वाढतच गेली .  ज्यांनी ज्यांनी प्रयत्न केले ते संपले होते. नाही तर काही वेडे झाले होते. 

         आणि आता ही व्यक्ती आली होती. हातात फक्त एक काठी घेऊन एका अशा अमानवी शक्तीशी लढायला जो माणसांचे बळी एका मागे एक घेत होता. 

         म्हणजे निसर्ग मगासपासून याचीच परीक्षा घेत होता. की हा किती वेळ तग धरतो की पळ काढतो म्हणून. पण तो टिकला होता. आणि एवढ्या मुसाळधार पावसातही त्या अमानवी शक्तीला आवाहन देत होता. अंगावर भगवी वस्त्र, दाढी वाढलेली, गळ्यात रुद्राक्षांच्या माळा. रुद्राचाच अवतार ! जटा वाढलेला, जटाधारीच !

         आणि कदाचित त्यामुळेच तस्मक बाहेर येत नव्हता. त्यालाही यांच्या शक्तींचा अंदाज असावा. जास्त वाट न बघता जटाधारी बोगद्यात शिरला. बाहेरच्या वातावरणाचा बोगद्यात मागमूसही नव्हता. फक्त अंधाराचं साम्राज्य होतं व भयाण शांततेचं. 

       

 या भयाण शांततेचा भंग जटाधारीच्या आवाजाने झाला, " तस्मक बाहेर ये मी आलोय. बृहस्पती. तुझा नाश करायला ! " आणि बृहस्पतींनी काठी जमिनीवर आपटली. आणि एक प्रकाशझोत पूर्ण रेल्वेट्रॅकवर पसरला, बोगद्यात पसरला. तस्मकाचे हस्तक घात  लावून काना - कोपऱ्यात बसले होते. पण त्याचा कुठेही पत्ता नव्हता. 

         ' एवढ्या सहजासहजी हा हार मानणार नाही. ' बृहस्पतींनी विचार केला, ' मग हा समोर का येत नाही ? की अजून ताकद वाढवण्यासाठी काही उपाय करतोय ! ' 

         त्यांनी काठी वर उचलली तसे सर्व हस्तक किंचाळायला लागले, ओरडायला लागले. भेसूर आवाजात ! त्यांचा आवाज बोगद्यामध्ये घुमू लागला. आवाज वाढत गेला. बृहस्पती पुढे पुढे जात राहिले. बाहेर पाऊस कोसळतच होता. रात्र वाढत गेली. आजूबाजूच्या अरण्यातून जंगली श्वापदांचे आवाज यायला लागले. 

         म्हणजे ही सुरुवात होती. बृहस्पतीनां समजले,  तस्मक जंगलात आहे.  त्याचा नायनाट करायचा तर त्याच्यामागे जाणे भाग होते मग आपले काहीही होवो....................

                        TO BE CONTINEUD............

 VISIT OUR YOU TUBE CHANNEL 

लेखक : योगेश वसंत बोरसे.      


                                                        ➤➤➤➤➤➤➤➤➤➤
⇎⇎⇎⇎⇎⇎⇎⇎⇎⇎⇎⇎⇎⇎⇎⇎⇎⇎⇎⇎⇎⇎⇎⇎⇎⇎⇎⇎⇎⇎⇎⇎⇎⇎⇎⇎⇎⇎




Previous
Next Post »