झोपडी - मराठी भयकथा -JHOPADI - MARATHI HORROR STORY


          झोपडी -  मराठी भयकथा -JHOPADI - MARATHI HORROR STORY 


MARATHI HORROR STORIES
 MARATHI HORROR STORIES

              संकल्पना :-रोहित योगेश बोरसे / विस्तार व लेखक :-योगेश वसंत बोरसे .                          'बालपणीचा काळ सुखाचा ' असं म्हटलं जातं. पण माझ्या बाबतीत ही गोष्ट तेवढी सोपी नाही. त्याला कारण मला आलेले विचित्र अनुभव, ज्यांनी माझा आयुष्यभर पाठपुरावा केला, असाच एक अनुभव.  

   
 अशाच एका वर्षी उन्हाळयाच्या सुट्टया होत्या म्हणून मामाच्या गावाला गेलो होतो. मामाचं गाव छोटं पण टुमदार होतं. बागायती जमिनीमुळे गांव हिरवगार दिसायचं. बरेच लोकं शेतात, मळ्यात, घर करून राहायचे. हिरवीगार शेती व आजूबाजूंनी डोंगर - दऱ्यांनी वेढलेलं गांव.

   मी तेव्हा १४ - १५ वर्षांचा होतो. माझ्यासारखंच इतरही शहरातली मुलं गावात, मळ्यात आलेली होती. खेडेगाव असल्याने जेवणं लवकर व्हायची व नंतर बाहेर मोकळ्या हवेत गप्पा रंगायच्या. आजूबाजूचे लोकही जमा व्हायचे. असंच एका रात्री जेवणं झाली व मामाच्या मळ्यात आम्ही जमिनीवर सतरंजी टाकून बसलो. 

  तशी आजूबाजूची काही मंडळीपण येऊन बसली व गप्पा रंगत गेल्या. हळूहळू रात्र वाढत गेली आणि गोष्टींचा कल, गोष्टींचा विषय जो सगळ्यांना आवडतो तिकडे वळाला. खेडेगावातील जुनी - जाणती माणसं आपले अनुभव, आपण ऐकलेल्या घटना सांगू लागली. कुणी खरं सांगायचं, कुणी तिखट - मीठ लावून सांगायचं पण ऐकायला मजा वाटायची. 

  एक काका मात्र काही बोलत नव्हते. थोडे वयस्कर होते. शांतपणे बसून बिडीचे झुरके घेत होते. एक बिडी संपली की दुसरी पेटवायचे. त्यांची नजर शून्यात हरवलेली होती. मध्येच डोळ्यात चमक यायची व क्षणार्धात भाव बदलायचे. 

  मी विचारलं, " हे काका काही बोलत नाहीत ? " तशी त्यांनी हळूच माझ्यावर नजर फिरवली. बिडी जमिनीवर रगडून विझवली व पुन्हा माझ्याकडे पाहू लागले. तशी माझी हिंमत वाढली मी पुन्हा बोललो, " काका तुमचा एखादा अनुभव सांगा ना ? " "काय सांगणार पोरा ? तुम्ही शिकली ,सवरलेली माणसं ! आमच्या बोलण्यावर कोण विश्वास ठेवणार ?" मी म्हणालो . "तसं काही नाही काका ! तुम्ही सांगा ! मला सांगा ! मी ऐकतो ! " 

   तसे बाकी मंडळींनीही कां टवकारले .सर्व जण सरसावून बसले . कानात जीव आणून काका काय सांगणार त्याची आतुरतेने वाट पाहू लागले . त्यांची नजर दूर डोंगरावर होती ,त्यांनी घसा खाकरला व डोंगराकडे हात दाखवून सांगायला सुरुवात केली . 

 
 "ते डोंगरावर झोपडीसारखं घर आहे , ते दिसतंय का ?" सर्वांच्या नजरा तिकडे वळाल्या . तिकडे अंधुक प्रकाश असलेली झोपडी दिसत होती . "तिथं गेलेला माणूस ,बाई ,परत येत नाही असं म्हणतात . म्हणजे ,तसं झालंय म्हणून म्हणतात ! तुमच्या सारखे शहरातून लोक येतात व गम्मत म्हणून हौसेने पैजा लावतात . व स्वतःच्या जीवाशी खेळतात ."

  "पण असं आहे काय तिथे ?" मी न राहवून म्हणालो . "पोरा, जरा दम धर की ! तिथं एक म्हातारी राहायची . पहिले फॅमिली होती ,पण नंतर एक एक करत सगळे सोडून गेले व शेवटी म्हातारी एकटी राहिली . जो पर्यंत रग होती ,ताकद होती ,तिला काही वाटलं नाही ,पण एकदा आजारी पडली ,जवळ करणारं कुणी नव्हतं ,पाहणारं कुणी नव्हतं . त्यामुळे एक दिवस गेली ! गेली म्हणजे देवाघरी गेली . रात्री मेली कि दिवसा  मेली माहित नाही पण ,गावातील पोरं गुरं ढोरं चारायला ,शेळ्या चारायला तिकडे जायची . 

   एका पोराच्या लक्षात आलं .तसं त्याने गावात येऊन सांगितलं . दोन चार गावकरी गेले . म्हातारीचा वास यायला लागला होता . पण क्रिया कर्म करणं गरजेचं होतं ,तिचं जवळचं कुणी आलं नाही , तेव्हा त्या लोकांनी सर्व कार्य केलं . तिथे डोंगरावरच चिता रचली व म्हातारीचा अंत्य संस्कार केला !"

   
"पण ती आजी वर एकटी का राहायची ? " मी न राहून विचारलं . "ते तिलाच माहित !असं पण खेडेगांवात कोण विचारतंय ? कुणी कुठेही राहतं ! पण काही दिवसात तो पोरगा मेला ,ज्याने गावात बातमी दिली होती . मेला म्हणजे घाबरून मेला ! आणि ज्या गावकऱ्यांनी म्हातारीचं क्रिया कर्म केलं होतं ,ते पण एक एक करून मेले !

   तेव्हा पासून त्या डोंगरावर कुणी जात नाही . मागं शहरातील दोन तीन हुशार माणसं आली व आपली हुशारी आणि जीव दोन्ही गमावून बसली ! " एवढं बोलून ते काका शांत बसले . थोडा वेळ शांतता पसरली .  कुणीच काही बोलत नव्हतं. मी मामा कडे बघितलं त्याने मला शांत बसायची खूण केली . म्हणून मी पुढे काही बोललो नाही . मामाचं लक्ष एकसारखं त्या काकांकडे जात होतं . त्यांना काहीतरी खटकत होतं. पण मामा काही बोलले नाही . 

  तेव्हा १५ - १६ वर्षांचा एक मुलगा उठून उभा राहिला. सर्वजण त्याला पाहू लागले. पण कुणी काही बोलायच्या पहिले तोच बोलला, " मी जातो. " " ठीक आहे. " बाकीचे म्हणाले. त्याला राहावलं नाही. " मी जातो, म्हणजे त्या झोपडीत जातो. " " कोण रं तू ? " त्या काकांनी विचारलं. " कुणाकडं आलायस ? " 

  " मी विशाल, शहापूरहून आलोय. माझी आजी असते या गावात. तिला भेटायला आलोय. " " ए पोरा, गुपचूप घरी जा,  रिकामे उद्योग करु  नको, तुझ्या आजीच्या जीवाला घोर नको. " त्याला सर्वजण सांगू लागले. पण तो ऐकेना, "काय दोन - चार तासांचा प्रश्न आहे." 

  " अजून कुणी येतंय का ? " कुणी बोललं नाही. थोड्या वेळाने एक जण बोलला. " पण तू तिथं गेला का नाही हे आम्हाला कसं कळायचं ? " विशालने आजूबाजूला बघितलं. तिथे काही लाकडं पडलेली होती. त्यातलं एक उचललं. " काका माचीस द्या ना. " त्या काकाने आगपेटी दिली. " पोरा अजूनही सांगतो, गुमानं घरी जा. म्हातारीला सांग, मग कुठं जायचं तिकडं जा. " पण विशालने लक्ष दिलं नाही. तो म्हणाला, " मी तिथे वर गेलो की थोडा चारा, काड्या हे लाकूड  पेटवून देईन, मग तर झालं ! " कुणी काही बोललं नाही. तो निघाला. त्याने माझ्याकडे बघितलं व म्हणाला, " यायचं का ? "

  त्याची माझी ओळख नव्हती पण तरी त्याला का वाटलं मी येईन, काय माहित. मला नाही म्हणता आलं नाही. मी उठलो तसा मामाने आवाज दिला, " तू नको जाऊ, त्याला जायचंय तर जाऊ दे. " माझा नाईलाज झाला. 

  तसा आणखी एक मुलगा उठला पण तो गावातलाच होता. तो विशालला म्हणाला, " मित्रा मी पण येतो, मला ही बघायचंय, तिथं जर कुणी राहत नाही तर रात्री उजेड कसा दिसतो ते . तसं मला ही जायचंच होतं चल. " " तू ?.........." " मी अजय. " " ठीक आहे चल. " आणि दोघं निघाले.

  तसे बाकीचे ही उठले. जो तो आपापल्या घरी निघाला. पण मला योग्य वाटे ना, त्याने आपल्याकडे आशेने बघितलं होतं. मी मामाची नजर चुकवून त्यांच्या मागे पळालो. काही वेळात ते समोर दिसले तसं त्यांना आवाज दिला ते थांबले. अजयने विचारलं, " तू ?........" " मी मोहित. मी पण येतो. " " अरे पण तुझे मामा नाही बोलले ना ? " " ते काळजीपोटी बोलले. आपण आपली काळजी घेऊ, थोडं सावध राहू. चला. " त्यांनाही बरं वाटलं, ' एक से भले दो, दो से भले तीन ! ' 

     
आम्ही निघालो. पायाखाली काडया कामट्या येत होत्या. तसा त्यांचा विचित्र आवाज यायचा. आजूबाजूचा अंधार, रातकिड्यांची किरकिर अंगावर शहारे आणत होते. आम्हाला चाहूल लागली,  कुणीतरी येत होतं. आम्ही वळून बघितलं. तर ते काका मागे होते, " काका तुम्ही ! " "  पोरांनो जीव  धोक्यात घालू नका, घरी जा !"

  "माझी आई एकटी मेली.   मी तेव्हा येऊ शकलो नाही. त्यामुळे तिला सगळ्यांचा राग आहे. " आम्हाला कळलं नाही. " आई ? तुमची आई वारली ? " " हो ते टेकडीवरचं झोपडं माझ्या आईचं होतं. तिने मला निरोप पाठवला होता  यायला उशीर झाला. रात्री मी आलो होतो. झोपडीत उजेड दिसला मला वाटलं आपली आई अजून आहे. मला बरं वाटलं म्हणून मी धावत - पळत तिथे पोहोचलो. 

  झोपडीचं दार लोटलेलं होतं. आत अंधुक प्रकाश होता. मी आवाज दिला. आई.... मी आलोय. पण काहीच हालचाल दिसेना. मी झोपडी व आजूबाजूच्या परिसराचा शोध घेतला. तिथं चितेचे अवशेष दिसले. मला लक्षात आलं मी तिथेच मटकन खाली बसलो व हंबरडा फोडला. 

  तेवढ्यात डोक्याला स्पर्श जाणवला. स्पर्शामध्ये आपलेपणा होता. म्हणून वळून बघितलं, माझी आई माझ्याकडे बघत डोळ्यात पाणी आणून म्हणाली. " पोरा उशीर केलास. बायका - पोरांच्या नादात आईला विसरलास. तुझी लई वाट बघितली, आता काही उपयोग नाही, जा इथून चालला जा, परत येऊ नकोस. "  

  आणि  आई जायला लागली. मला राहावलं नाही. मी तिच्या मागे आवाज देत  जाऊ लागलो. पण काही केल्या तिच्यापर्यंत पोहोचता येत नव्हतं. मी पळत होतो. सर्वत्र अंधार होता त्यामुळे पुढचं काही दिसलं नाही. आणि मी कड्यावरून खाली कोसळलो दगडांवर आपटलो, संपलं, सगळं संपलं. "

 
 काही वेळ कुणीच काही बोललं नाही. विशाल पहिले सावरला. तो बोलला, " म्हणजे काका तुम्हाला असं म्हणायचंय की तुम्ही मेले आहात, तरी समोर आहात. " काकांना थोडा राग आला, " आपण शहरातली लोकं ना प्रत्येक गोष्टीत पुरावा शोधतो, खरं, खोटं करत बसतो. ठीक आहे, जा तुम्ही. " आणि काका एका क्षणात अदृश्य झाले. विशाल कावराबावरा झाला, " अरे हे गेले कुठे ? " " ते गेले, गायब झाले. " अजय म्हणाला. " म्हणजे ते खरोखर मेले आहेत ? " " मग ते खोटं कशाला बोलतील ? " " चला असे बरेच धक्के पचवायचे आहेत आपल्याला. " मी म्हटलं. " नाहीतर परत जाऊ. "

  पण विशाल ऐकणारा नव्हता. " परत तर जाणार नाही ! मेलो तरी चालेल ! चला ! " आम्ही निघालो. पायाखाली जे काही येत होतं ते तुडवत आम्ही डोंगराच्या मध्यावर पोहोचलो. " आपण टेंभा बनवून मग जाऊ. " " पण त्यात धोका आहे, झोपडीत म्हातारी आहे की दुसरं कुणी आपल्याला माहित नाही. टेंभा पाहून ते सावध व्हायला नको. " शेवटी अंधारात चाचपडत चाचपडत डोंगरावर पोहोचलो. झोपडीत अंधुक प्रकाश होता. एक गोष्ट मला जाणवली, प्रकाश अंधुक होता तरी दुरूनही  दिसत होता. अगदी मळ्यातूनही ! आश्चर्य आहे. 

  झोपडीच्या दरवाजा लोटलेला होता. आत कुणी होतं आम्ही दार लोटलं. तसं त्या व्यक्तीने आमच्याकडे बघितलं. आमची पायाखालची जमीन सरकली. समोर ते काका होते. तेच काका जे आम्हाला थोड्या वेळापूर्वी भेटले होते. त्यांचा आवाज वेगळाच वाटला. 

  " शेवटी तुम्ही ऐकलं नाहीच ! " आणि त्यांनी आवाज दिला, " आई... ही पोरं आली बघ तुला भेटायला. " मागून झोपडीचं दार कधी बंद झालं आम्हालाही कळालं नाही. 

     
एक आजीबाई आमच्यासमोर येऊन उभी राहिली. तिचं ते रूप बघून आमची बोबडी वळाली. अजय जोरात ओरडला, " ए अरे पळा इथून, नाहीतर फुकट मरायचो, चला. " " पण पळणार कसं ? " दार बंद होतं. मागून दोघांचा हसण्याचा आवाज आला. " आई यांना पळू दे, बघू कोण जोरात पळतं ते. " अनं झोपडीचं दार उघडलं गेलं. आम्ही ...  पाय लावून पळालो. तसा मागे हसण्याचा आवाज येत राहिला. आवाज आमचा पाठलाग करत राहिला. 

  अजयचा धीर सुटला होता. तो वेड्यासारखा पळत होता. मी आवाज दिला, " अरे थांब जरा. " पण त्याने मागे वळून पाहिलं नाही. विशाल तर घामेघूम झाला होता. त्यांना वाटलं मी माझ्याकरिता थांबायला सांगतोय. विशालही पळतच होता. आणि काही क्षणात अजयची कर्णकर्कश किंकाळी ऐकू आली .  तो कड्याच्या दिशेने पळाला होता व खाली कोसळत होता. 

  विशाल व मला जास्त पळण्याची, डोंगर - दऱ्याची सवय नव्हती. आम्ही डोंगरावर धडपडलो तोल गेला व घरंगळत ठेचकाळत खाली आलो. डोंगराकडे लक्ष गेलं. ती म्हतारी व ते काका आमच्याकडे बघत होते. भीतीने आणि श्रमाने शरीरात त्राण राहील नव्हतं. 

  विशालला तर धाप लागली होती. त्याची भीती कमी व्हायचं नाव घेत नव्हती. तो डोळे फाडून वर त्यांच्याकडे पाहत होता व तसाच पाहात राहिला. आणि काही क्षणात त्याने एका बाजूला मान टाकली व तो खाली कोसळला. माझं डोकं गरगरायला लागलं. शरीरात त्राण नव्हतं. 

  काही वेळापूर्वी सोबत असलेले मित्र आता अस्तित्वात नव्हते. मी कसा जिवंत राहिलो, कुणास ठाऊक ? डोळ्यावर अंधारी आली व शुद्ध हरपायला लागली. तेवढ्यात काही अंतरावर कंदील घेऊन येताना कुणीतरी दिसलं व डोळ्यात आशेची किरणं चमकली. येणारी व्यक्ती ओळखीची होती. माझा मामा मला शोधत शोधत दोन - तीन लोकांसोबत इथं पोहोचला होता आणि माझी शुद्ध हरपली. 

 
सकाळी शुद्धीवर आलो तेव्हा रात्रीचा प्रसंग डोळ्यासमोर आला आपण आता कुठे आहोत म्हणून नजर फिरवली. मी मामाच्या घरात होतो व मामा शेजारी बसला होता, तसा मी उठून बसलो. मामाने हळूच विचारलं, " बरं वाटतंय का ? " मी खाली मान घालून हो म्हणालो. " मोहित तुला जायला नाही संगितलं होतं पण तू ऐकलं नाहीस काही झालं असतं मग ? " " मामा ते दोघं ?....... " मामाने उसासा टाकला व म्हणाला, " ते दोघं आता या जगात नाही. तुझं नशीब चांगलं तू आम्हाला सापडलास, नाहीतर...... " 

  मी पटकन मामला बिलगलो व रडायला लागलो. " थँक्यू मामा, तू वाचवलंस. " मामाने मला रडू दिलं. माझी पाठ थोपटत म्हणाला, " आता एकंच करायचं ! इथून पुढे या गावात परत यायचं नाही. कारण तू सांगून ऐकणारा  नाहीस . " आणि मामा पाठ थोपटून निघून गेला व मी त्याच्या पाठमोऱ्या आकृतीकडे पाहात राहिलो............... 

                                           THE END 

VISIT OUR YOU TUBE CHANNEL 

                       


➤➤➤➤➤➤➤➤➤➤➤➤➤➤➤➤➤➤➤➤➤➤➤➤➤➤➤➤➤➤➤➤➤➤                                  ➤➤➤➤➤➤➤➤➤➤➤➤➤➤➤