कावेरी - मराठी भयकथा - marathi HORROR STORY

                          कावेरी - मराठी भयकथा - MARATHI HORROR STORY


MARATHI HORROR STORIES
मराठी भयकथा 

                                      लेखक : योगेश वसंत बोरसे .


   उन्हाळा  संपून पावसाळा लागला होता . काळ्याशार ढगांनी आकाशात गर्दी केली होती . शेतात काम करणारी बाया माणसं पावसाच्या चाहुलीने सुखावली होती . असंच एका शेतामध्ये काम करणारी गडी माणसं व बाया .

   त्यातील एक कावेरी . काबाड कष्ट करून आयुष्य उतरणीला लागलं होतं . परिस्थिती जेम तेम होती . जोपर्यंत घरचे होते ,दोघं जण राब राब राबले . एक वर्षांपूर्वी घरचे गेल्यानंतर कावेरीबाई एकट्या पडल्या . 

आयुष्यभर सोबतीची सवय . पण आता एकटं राहण्याची वेळ आली होती . तशी मुलं होती . तीन मुलं , दोन मुली. परिवार मोठा होता . पण यांची परिस्थिती जेम तें असल्याने मुलं पण जास्त शिकू शकली नाहीत .

   मोठी झाली तशी काम धंद्यासाठी बाहेर पडली . त्यालाही बरीच वर्ष उलटली . जमेल तेव्हा गावाकडे यायची . हळू हळू ते हि बंद झालं . कावेरीबाई व त्यांच्या घरचे विठ्ठल आप्पा जोवर सोबत होते ,तोवर काही वाटलं नाही . 

पण विठ्ठल आप्पा गेल्यावर कावेरी बाई सर्वार्थाने एकट्या पडल्या . तेव्हा मुलं आली होती . आईला सोबत न्यायचं म्हणत होती , पण कावेरी बाईंना पहिल्यापासून काम करून जगण्याची सवय ! स्वभाव मानी  होता . त्यांनी नकार दिला अगदी ठामपणे !मुलांचा नाईलाज झाला .

      एक एक करत सर्व मुलं परत गेली . मुलीही आपल्या घरी गेल्या . कावेरी बाई घरात एकट्या राहिल्या . हळू हळू एकटेपणाची सवय झाली . पण कामं असली कि जास्त वेळ बाहेरच काढत . शेतातच संध्याकाळ पर्यंत थांबत . तेवढेच दोन पैसे जास्त मिळत . आजही तेच झाले .

 संध्याकाळ व्हायच्या आधीच पावसाचे वातावरण तयार व्हायला सुरुवात झाली होती . व तासाभरात आकाशात काळ्या ढगांनी  गर्दी केली होती   थंडगार वारा वाहायला  लागला . रोजची कामं भराभरा आवरून बाकी गडी माणसं ,  बाया  काही घराकडे गेली , काही आडोशाला थांबली .

 कावेरी बाईचं काम बाकी होतं . त्यांचा प्रामाणिकपणा व मानीपणा जगजाहीर होता . कदाचित प्रामाणिकपणा असल्यानेच मानीपणा आला असावा . त्यांचं काम चालू होतं . बायांनी बऱ्याचदा आवाज दिला पण त्या ऐकतील तर शपथ ? एक एक करत शेत रिकामं झालं !आजूबाजू ची शेतं रिकामी झाली . ढगांची गर्दी वाढत गेली . वारा शांत झाला . व काही क्षणात पाऊस सुरु झाला .

              सुरवातीला थेंबथेंब पडणारा पाऊस काही वेळात मुसळधार कोसळू लागला . तसा         कावेरीबाईचा नाईलाज झाला . 

त्या शेतातीलपडवीत , झोपडीकडे पळाल्या . काही वेळात पावसाचा जोर आणखीन वाढला . विजांचा कडकडाट काळजात धडकी भरवत होता . वाऱ्याच्या झोतामुळे पावसाच्या सरी आडोश्याला ही अंगावर येत होत्या . संध्याकाळ सरून रात्र झाली . पण पावसाचा जोर कमी होत नव्हता . 

       कावेरीबाई एकट्या होत्या . मनात विचार येत होता .

 'बोलता बोलता एक वर्ष झालं ! कामाच्या नादात यांचे पित्तर , वर्ष श्राद्ध राहून गेलं . पोरांना भान नाही . पण कामाच्या नादात आपणही विसरलो ? काय म्हणावं आपल्याला ? धन्यांना काय वाटल ?   कावेरी   विसरली आपल्याला ? '

    अपराधीपणाची भावना मनात बळ धरू लागली . ज्याच्याबरोबर आयुष्य काढलं , त्याचं श्राद्ध हि विसरलो ? कि आपलं हि आयुष्य शेवटच्या टप्प्यात आलंय ? 

     याच विचाराने त्या दचकल्या . व पहिल्यांदा त्यांना परिस्थितीचं भान आलं . शेतात आजूबाजूच्या शेतात आपल्याशिवाय कुणीही नाही . पाऊस थांबायचं नाव घेत नाही . रात्रही झाली . आता घरी कसं जाणार ? त्यांना पहिल्यांदा शहारून आलं . अंगावर काटे आले . सर्व जण आपल्याला सांगत होते चला म्हणून ! आपण ऐकलं नाही . 

  आता एकटं कसं राहणार ? एकटं कसं जाणार ? पण आपण घरी गेलो असतो तरी एकट्या राहिलो असतो . पाऊस तर तिथेही असेलच ! मग असं का वाटतंय ? का निघायचं पावसात ? असंही ओलं झालोय . व त्या निघाल्या .

    भर पावसात निघाल्या . मधेच एखादी वीज चमकायची . नंतर  पुन्हा अंधार . अंधाराची डोळ्यांना सवय झाली कि पुन्हा वीज चमकायची . त्यामुळे परत पाच मिनिटं काही कळायचं नाही . तरीही थांबत थांबत हळूहळू त्या शेतातून निघत होत्या. आणि काही वेळात त्यांना जाणवलं आपल्या मागे कुणी आहे ! 

त्यांनी घाबरून मागे बघितले. अंधार फक्त अंधार !

 पण मनाला असुरक्षित वाटत होतं. सारखं जाणवत होतं कुणीतरी मागे आहे म्हणून. त्यांनी मागे वळून बघितले. अंधार फक्त अंधार ! पण आता जाणीव प्रखर झाली होती. नव्हे आता खात्री झाली होती., मागे कुणीतरी असण्याची.

      त्या थांबल्या, मागे बघत राहिल्या !

 ' कावेरी ' 

   शब्द आसमंतात घुमले व क्षणात विरले. कावेरीबाईच्या अंगावर सर्रकन काटा आला !

   आवाज ओळखीचा होता. आपल्याला भास झाला असावा असं त्यांना वाटलं. व त्या तरातरा चालायला लागल्या. आता चालण्याचा वेग वाढला होता. पण खात्रीही होती, मागे कुणीतरी येतंय 'कावेरी' पुन्हा आवाज आला. व त्या थबकल्या . मागे वळून उभ्या राहिल्या आणि क्षणात वीज चमकली व त्यांना समोर उभं असलेलं व्यक्तित्व दिसलं !

 म्हणजे हा भास नाही !

" धनी ! तुम्ही ? "

 " हो मीच ! " 

" पण तुम्ही इथे कसे ? " 

" तू मघाशी घाबरलीस, म्हटलं तुला सोबत करावी म्हणून आलो. 

      एकटी होतीस, एकटी राहतेस, एकटी पडलीस ! सर्व आयुष्य तुझ्यासोबत काढलं. मलाही         एकट्याला राहावेना म्हटलं हिला सोबत करावी म्हणून आलो. "

 कावेरीबाई चालायला लागल्या, त्यांचे धनी त्यांच्याबरोबर चालत होते. कावेरीबाईंच्या डोळ्यात पाणी आलं, हुंदका फुटला. 

" कावेरी काय झालं ? "

  " धनी मी चुकले. तुमचं वर्षश्राद्ध करायचं राहून गेलं. पोरं लाख विसरले असतील. पण माझं काम होतं. मी चुकले मला माफ करा !"

    " कावेरी अगं श्राद्धाचं काय घेऊन बसलीस ? मला पण तुझ्याविना राहावेना. म्हणून मीच आलो. आता मी ठरवलंय, तुला एकटीला सोडायचं नाही !"

 पाऊस कोसळत राहिला. माती-चिखल तुडवत कावेरीबाई बऱ्याच  वेळाने घरी पोहोचल्या. त्यांच्यामागे त्यांचे धनी बी आले.

 कावेरीबाईंनी कापडं बदलली. अंगात थंडी भरली होती. घरात घोटभर दुध होतं. दोन कप चहा टाकला व घेतला.
  " धनी घ्या की ! " पण विठ्ठल आप्पा फक्त त्यांच्याकडे पाहात राहिले.

 " धनी घ्या की ! " 

" कावेरी कसं घेणार ? मी वासानेच तृप्त झालो. "

 थोड्या वेळाने दोन भाकरी टाकल्या व थोडया मिरच्या ठेचल्या. दोन ताटं वाढून घेतली.
" धनी घ्या की ! "
 " कावेरी तू घे. तू खाल्लंस म्हणजे मला पोहोचेल...." विठ्ठल आप्पा बोलत राहिले, कावेरीबाई जेवत राहिल्या. पाऊस थांबायचं नाव घेईना. त्यांना थन्डी वाजायला लागली. त्यांनी कसं तरी 
जेवण उरकलं व गोधडी पांघरून बसल्या पण थन्डी  थांबेना.

    " कावेरी गारठलीस ? " 

" व्हय धनी.  थंडी वाजतेय, अंगात कसकस हाय. " 

" बरं मग तू झोप मी बसतो तुझ्या उशाशी. " 

कावेरीबाईंची थंडी वाढत गेली. दोन गोधड्या अंगावर घेऊन पण थंडी थांबेना, पाऊस थांबेना. जसा काही पूर्ण वर्षभराचा पाऊस आजचं कोसळणार होता. विठ्ठ्लाआप्पांच्या गप्पा चालल्या होत्या. त्यांना किती बोलू किती नाही असं झालं होत. वर्षभराचा साठा ते रिकामं करीत होते. रात्र वाढत गेली. हळूहळू पावसाचा जोर कमी होत गेला.   

             सकाळ झाली. वातावरण पावसाने भरलेलंच होतं. आजूबाजूची लोकं कामाला निघाली. बरोबरीच्या काम करणाऱ्या बायांनी आवाज दिला, 

" मावशे ! " एक नाही दोन नाही उत्तर आलंच नाही. रोज सर्वांच्या अगोदर कामाला निघणारी कावेरीबाई आज दिसत नव्हती.          

  दोन - तीन बाया झोपडीजवळ आल्या. आवाज दिला, दार लोटलं. दार लावलेलं नव्हतं. नुसतं ढकललेलं होतं. बाया मध्ये आल्या. खाटेवर कावेरीबाई निपचित पडल्या होत्या. अंगावर दोन - तीन गोधड्या घेऊन. एक बाई पुढे आली. अंगाला हात लावून पाहिला. अंग थंडगार  पडलं होतं. हालवून पाहिलं तशी मान एका बाजूला कलली.

       कावेरीबाई हे जग सोडून गेल्या होत्या. त्यांच्या चेहेऱ्यावर  समाधान ओसंडून वाहात होतं. का नसावं ? त्यांचे धनी स्वतः जातीने त्यांना घ्यायला आले होते. त्यांच्या सोबतीला कायम राहणार होते. त्यांचं एकटं पण संपलं होतं. त्यांच्या जोडीदाराने त्यांचा हात पुन्हा धरला होता, 

                                कधीही न सोडण्यासाठी !   

     VISIT OUR YOU TUBE CHANNEL
लेखक  
: योगेश वसंत बोरसे . 

  • ⍇⍇⍇⍇⍇⍇⍇⍇⍇⍇⍇⍇⍇⍇⍇⍇⍇⍇⍇⍇⍇⍇⍇⍇⍇⍇⍇⍇⍇⍇⍇⍇⍇⍇⍇⍇⍇⍇⍇⍇⍇⍇⍇⍇⍇⍇⍇⍇⍇⍇⍇⍇⍇⍇⍇⍇



 

Previous
Next Post »