एक लग्न असंही - मराठी भयकथा - MARATHI HORROR STORY


एक लग्न असंही - मराठी भयकथा  - MARATHI HORROR STORY


MARATHI HORROR STORY
 MARATHI BHAY KATHA 

                                             लेखक : योगेश वसंत बोरसे. 

    " मित्रांनो, नमस्कार, मला भानगावला जायचंय, कसं जाता  येईल ? " दोन - तीन खेडूत रस्त्याच्या कडेला बसले होते. बसची वाट पहात. मी बसमधून उतरलो व त्यांच्याजवळ येऊन विचारलं. तोपर्यंत बस निघून गेली. हे काही गेले नाही. त्या तिघा शिवाय  तिथे कुणी नव्हतं. त्यांनी माझ्याकडे विचित्र नजरेने पाहिलं. " कुठला रं तू ? " " मी नाशिकचा. " " मग इथे काय मरायला आलास व्हय ! जाय, निघ इथून. " एकाने काठी उगारली. मला समजेना,  हे असे विचित्र का वागतायेत. मला वाटलं एक वेडा असेल, म्हणून दुसऱ्याला विचारलं, " भाऊ तुम्ही सांगाना भानगावला कसं जायचं ? " " आरं येडया, तू एक स्टाप पहिले उतरलास. " तो माझी कीव करत म्हणाला. 

      " पुढच्या स्टापला उतरला असता तर तिथून जवळ होतं. आता जाय इथून पायीपायी ! " आणि ते हसायला लागले. त्यांच्या मते मी जगातला सर्वात मोठा मूर्ख माणूस होतो. तरी मी माझा मूर्खपणा चालूच ठेवला. " दुसरी बस नाही का आता ? " त्या माणसाने माझ्याकडे रागाने बघितलं. " तुझ्या तं आता..... " म्हणत त्याने एक दगड उचलला व माझ्याकडे भिरकावला. " जातो का न्हाई ? " मी कसातरी बचाव केला व तिथून पळ काढला. 

     
  ' मूर्ख साले ! नुसती चौकशी केली तर एवढं चिडायला काय झालं ? आपणही बसमध्ये असतांना विचारायला हवं होतं. आता कसं जायचं ? ' थोडं लांब जाऊन थांबलो. बरं वेळ दुपारची. भर उन्हाळा, वैशाख वणवा. ऊन असं ,की चटके बसत होते. रस्ता डांबरी होता, लहान होता, सिंगल रोड. 

       
 रस्त्याच्या कडेला थांबलो. एखाद्या खासगी वाहनाची वाट बघत. एक गाडी डुगडुग करत येतांना दिसली. गचागच भरलेली. दोन लोकं मागे लटकलेली होती. गाडी थांबवावी की नाही, या विचारात पडलो. तर ती मागेच थांबली. दोन - तीन जण उतरले व हे तिघं वेडे माझ्याकडे हात दाखवत त्या गाडीत बसले. 

       ' कॅन्सल ! या गाडीत बसणं कॅन्सल ! या येड्यांचा भरवसा नाही. चालू गाडीतून ढकलून देतील ! ' गाडी माझ्याजवळ येऊन थांबली. मी तोंड फिरवून घेतलं. " अय आरं भानगावला येतुस ना ! मग चल की ! गाडी तिकडेच चाललीया. " मी ठामपणे नकार दिला. " नाही, मला नाही यायचं. " " आरं काय डोक्यावर पडलायेस ? इथे दोन - दोन घंटे गाडया मिळत नाही आम्ही सकाळचे बसलोया. तवा आता भेटली. चल, बस लवकर. " " नाही मला नाही यायचं. " त्याला राग आला. त्याने माझ्याकडे रागाने पाहिलं व म्हटलं, " जाय मर तिकडं ! " आणि ड्रायवर ला इशारा केला. " चल रं ! " ड्रायवरने गाडी पळवली. डुगडुग करत गाडी निघून गेली. 

       सुनसान रस्ता. रस्त्यावर कुत्र  पण नव्हता. नुसतं उजाड वाळवंटासारखं रखरखीत ऊन. स्वतः चाच राग आला. ' आपल्याला लग्नाला यायची भारी हौस, पत्रिका आली की जा लग्नाला. जवळचं असो की लांबचं. ओळखीचं असो वा नसो. पत्रिका आली ना मग जायचं. हया गावाला जा, त्या गावाला जा. मग हा असा त्रास भोगावा लागतो. '

       उभं राहून राहून कंटाळा आला, चटके बसायला लागले. चालत राहिलो. म्हटलं जेवढं जमेल तेवढं चालत राहू म्हणजे ऊन लागणार नाही. आणि गाडी आली की निघून जाऊ. थोडयावेळाने एक फटफटी आली. आवाज ऐकून मागे वळून बघितलं. 

      एक म्हातारा बाबा फटफटी चालवत होता. बाबा चांगला होता. मला पाहून थांबला. " कारं पोरा, एवढ्या उन्हाचा कुठं फिरतुया ? " " मला भानगावला जायचंय. " मी सांगितलं. भानगावचं नाव ऐकताच त्याच्या चेहेऱ्यावरचे भाव बदलले. " तिथे कशाला मरायला चाललास ? "

     " मरायला नाही लग्नाला चाललोय. " मी धीटपणे उत्तर दिलं. " कुणाचं लग्न हाय ? " मी नाव सांगितलं. " आरं येडा की खुळा तू ! या नावाचं तिथं कुणीबी न्हाई. मी त्याच गावचा हाय. एक एक घर ओळखतो. मला आनंद का झाला कळालं नाही. मी म्हटलं, " एक मिनिट. " व बॅगेतून पत्रिका काढून दाखवली. पण बाबाला वाचता येत नव्हतं. मी नावं वाचून दाखवली. तशी त्याच्या चेहेऱ्यावर भीती दिसायला लागली. 

      " लेका, थांब जरा ! काय खरं नाही. अरे ही पत्रिका जुनी आहे तुला कवा मिळाली ? " मला समजेना बाबा असं काय बोलतोय. " अहो बाबा याच्यावर आजची तारीख आहे. संध्याकाळी हळद व उद्या लग्न आहे. " तो बाबा गयावया करू लागला. " पोरा माझं ऐकशील ? इथून परत जा. हे काही खरं नाही. " 

         बाबा काहीतरी लपवत होता. सांगायला तयार नव्हता. " मी परत जाणार नाही मी लग्नाला आलोय. तुम्हाला सोबत न्यायचं नसेल तर नका नेऊ. " मी पण आता रागाने बोललो. बाबा काही बोलला नाही. गाडीला किक मारली व थांबला. मी समजलो, काही न बोलता बसलो. 

       
 बराच वेळ झाला, बाबा काही बोलला नाही. फटफटीच्या आवाजाने असंही डोकं उठलं होतं. एका बाजूला छोटं झाड होतं व तिथून फाटा होता. मध्ये जायला. बाबाने फटफटी थांबवली. " पोरा ऐक माझं, कशाला जीव धोक्यात घालतोयेस. इथून माघारी फिर. तिथं काही नाही रं ! "

          मी उतरलो. काही बोललो नाही. फटफटी घेऊन बाबा सरळ निघून गेला. हा तर भानगावचा, मग सरळ का गेला ? काही काम असेल. फाटयाकडे नजर गेली. एका दगडावर ' भानगाव - ३ ' असं लिहिलं होतं. का कोण जाणे. तो दगड पाहताच पाय आपसूकच त्या रस्त्याला लागले.. आजूबाजूला शेतं होती. रस्ता कच्चा होता. बैलगाडयांच्या वापराने खड्डे पडतात खड्डे पडले होते. 

           थोडा वेळ चालत राहिलो. काही वेळात बैलांच्या गळ्यातील घुंगरांचा, घंटांचा आवाज यायला लागला. मागून बैलगाडी येत होती. रमत गमत. मी चालत राहिलो. हळूहळू अंतर कमी होत गेलं. बैलगाडीचा आवाज वाढत गेला. माझ्याजवळ येऊन त्याने बैलगाडी थांबवली. " यायचं का ? ' नाही म्हणण्याचा प्रश्नच नव्हता. पाय तोडत जाण्यापेक्षा बैलगाडीत बसणं चांगलं म्हणून लगेच बसलो. 

          " कोणाकडं चालले ? " मी नाव सांगितलं. त्याने गाडी थांबवली. " उतरा. " " काय झालं ? "  " उतरा म्हणलं ना ! उतरा अनं नीट निघा परत. पुन्हा फिरून पाहू बी नका. " आता माझं ही डोकं फिरलं होतं. म्हटलं, " काय झालं ? मी जेव्हापासून इकडे आलोय. प्रत्येक जण असंच बोलतोय. तुम्हा लोकांना काही आजार आहे का ? " 

         
 " ए पोरा, जास्त हुशाऱ्या करू नको. तुझी काळजी वाटली म्हणून सांगितलं अनं मरायचं असेल तर जा, माया बापाचं काय जातंय ? " मी शांत होत म्हटलं, " प्लीज, हे बघा, माझ्याकडे पत्रिका आहे. मी इथे लग्नाला आलो आहे. " मी पत्रिका दाखवली. त्याला वाचता येत होतं. " पत्रिका बरोबर हाय पण जुनी हाय. " " अहो काल पत्रिका मिळाली. आज हळद, उद्या लग्न मग जुनी कशी काय ? " 

           " कारण या नावाचं इथं आता कुणीबी राहत नाही. " " कुणी राहत नाही म्हणजे ? कुठे गेले सगळे ? " त्याने वर बघितलं. " वर गेले. ' मला समजेना. मी बावळटासारखा चेहेरा करून त्याच्याकडे बघितलं. " आरं येड्या वर म्हंजे ढगात. हे समदे मेलेत. " " काय ? " माझा विश्वास बसेना. " अहो कसं शक्य आहे ? " " गाडीत बस, सांगतो. " याचा विचार कसा बदलला मला समजेना बैलगाडीत बसून घेतलं व बैलगाडी चालायला लागली. 

             " चार - पाच वर्षे झाली असतील.  या पत्रिकेत जी नावे आहेत ना तिथे लग्न होतं. संध्याकाळी हळद लागली. रात्री उशिरा नवरदेवची बस आली. जेवणं उरकली व आख्ख गाव झोपी गेलं. अचानक कशी काय माहीत, मंडपाले आग लागली. घराले आग लागली. बसले आग लागली. आग लागली का कुणी लावली समजलं नाही पण जेवढी लोकं तिथे होती समदी आगीत जळून गेली. एक बी उरलं नाही. 

            आग एवढी मोठी होती की अर्ध गाव जाळून खाक झालं. कुणाले काहीबी करता आले न्हाई. " तो शांत झाला. मी सुन्न झालो. तो पुढे बोलायला लागला. " तवापासून दरवर्षी या टाईमाला लोकांना पत्रिका जाते. कोण पाठवते कुणाला माहीत, ज्यांना माहितीये ते येत न्हाई पण ज्यांना माहीत नाही ते तुझ्यासारखे चुकून माकून येऊन जातात व तिथे गेल्यावर चाट पडतात. 

           
 एवढं बोलून तो शांत बसला. माझा विश्वास बसेना. हा मजाक करतोय असं वाटलं. " भाऊ मजाक बस झाली. " तो काही बोलला नाही. गाडी चालत राहिली व भानगावात पोचता पोचता संध्याकाळ झाली. तसा उतरलो व पत्रिकेवरील पत्त्यावर जायला लागलो. तिथं सगळी सामसूम होती. म्हणून गावकऱ्यांना विचारलं. ते विचित्र नजरेने पाहायला लागले.

     एकाने सांगितलं, " शहाणा असशील तर लांबच थांब. अन मरायचं असेल तर तिथे जा. " दोन्ही पर्याय माझ्याकडे होते. मी पहिला पर्याय निवडला. एका झाडाखाली पार होता तिथं काही लोकं बसले होते. नजर जिथे लग्न होतं त्या घरावर होती. मला वाटलं सहज बघत असतील म्हणून मीही बघत राहिलो आणि काही वेळात तिथलं वातावरण बदलायला लागलं.

    लग्नघरी गडबड असते ,तशी गडबड दिसायला लागली . मंडप टाकला गेला ,काही वेळाने हळद लागली . बसून बसून कंटाळा आला होता पण तिथे आता गर्दी झाली जमा होती . म्हणजे काही तरी घडणार होतं . जे या लोकांना माहित असावं . 

   सर्व जण फक्त बघत होते ,काही वेळाने नवरदेवाची बस आली . जेवणं उरकली व सर्व मंडळी  झोपी गेली . तेवढ्यात कशी कोण जाणे मंडपाला आग लागली ,घराला आग लागली . बस पेटली .माझ्याकडून पाहवेना . मी ओरडायला लागलो . 'आग ,आग ' 'वाचवा ,वाचवा ' असं म्हणून पाणी घ्यायला पळालो . गावकरी माझ्याकडे सहानुभूतीने पाहायला लागले . 

  एका बाबाने माझा हात धरला . "आरं ,लेका  हे काही बी खरं नाही . दरवर्षी या टाईमाले असंच होतंया . कुणी बी काही बी करू शकत नाही . "पण मी ऐकलं नाही ,पाणी घ्यायला पळालो ,दोन -चार बादल्या पाणी ओतलं ,पण काही उपयोग होत नव्हता . आग वाढतच गेली . गावकरी मागे सरकायला लागले . हळू हळू नजरेसमोर अर्ध गांव जाळून खाक होत होतं. ते मला सहन झालं नाही. मी तिथे चक्कर येऊन पडलो. 

    जाग आली तेव्हा सकाळ झाली होती. उठून बघितलं तर मी झाडाखाली पारावर झोपलो होतो. उठून बसलो व समोर बघितलं त्या घराकडे तर तिथे काहीही खुणा नव्हत्या. म्हणजेसंध्याकाळी आलो तेव्हा बघितलं तसंच सगळं होतं. 

     जे बघितलं ते मनाला न पटणारं होतं. पण आता परत जाण्याशिवाय पर्याय नव्हता. तहान भुकेने जीव कासावीस झाला होता. आणि तिथं थांबायची इच्छा राहिली नव्हती. म्हणून जड पावलांनी निघालो. मागून फटफटीचा आवाज आला. फटफटी येऊन माझ्याजवळ थांबली. तोच बाबा होता. त्याच्या डोळ्यात माझ्याबद्दल सहानुभूती होती. त्याने मायेने विचारलं, " कारं पोरा चाललास ? " मी फक्त ' हो ' म्हटलं आणि काही न बोलता फटफटीवर बसलो. 

       
 काही वेळात फटफटी गावापासून दूर निघाली. फाटयावर पोहोचली. बाबांनी फटफटी थांबवली. तसा मी उतरलो व बाबा डोळ्यात पाणी आणून म्हणाला, " पोरा तुला काय म्हणू ? परत ये असं बी म्हणता येत न्हाई पन स्वतः ची काळजी घे. असा कुठं बी फिरत जाऊ नगंस " व माझ्या डोक्यावरून हात फिरवून बाबाने गाडीला किक मारली व सरळ निघून गेला. 

         व मी त्या दिशेने एकटक पाहात राहिलो...........      

                                                        THE END 

                                               लेखक :योगेश वसंत बोरसे. 




➤➤➤➤➤➤➤➤➤➤➤➤➤➤➤➤➤➤➤➤➤➤➤➤➤➤➤➤➤➤➤➤➤➤➤➤➤➤➤➤                                                                      ➤➤➤➤➤➤


Previous
Next Post »