पॉपकॉर्न - मराठी भय कथा - POPCORN - MARATHI HORROR STORY

     पॉपकॉर्न - मराठी भय कथा - POPCORN - MARATHI HORROR STORY


marathi rahsya katha
 मराठी भयकथा 

                         

 




     खूप वर्षांपूर्वीची गोष्ट. तेव्हा मी आठवीला होतो. शाळा दुपारची असायची. शाळा शहरात असल्याने रस्त्याने रहदारी खूप असायची. मी व माझे  दोन तीन मित्र रोज सोबत जायचो व फूटपाथवरून शक्यतो चालायचो, त्यामुळे काही वाटायचे नाही. 

      असचं एक दिवस आम्ही शाळेत जात होतो व रस्त्यावरून एका बाजूने एक पॉपकॉर्नवाला त्याची छोटीशी गाडी ढकलत आवाज देत जात होता. तेवढयात अघटित घडले व त्या घटनेने माझ्या आयुष्यावर, अंतर्मनावर खूप परिणाम केला. 

     एक भरधाव गाडी येऊन पॉपकॉर्नवाल्यावर व त्याच्या छोट्या गादीवर आदळली. धडक इतकी जोरात होती की पॉपकॉर्नवाला फूटपाथवर फेकला गेला व सर्व पॉपकॉर्न रस्त्यावर विखुरले गेले. 

      पॉपकॉर्नवाल्याच्या डोक्यातून रक्त वाहात होतं व तो तडफडत होता. तो आमच्यापासून काही पावलांवरच पडला होता व आमच्याकडे आशेने पाहत होता. आम्हाला कळत नव्हतं नेमकं काय करावं ? काही क्षणात तिथे गर्दी जमा झाली व पॉपकॉर्नवाल्याने जीव सोडला. 

        आमच्यासाठी ही घटना खूप धक्कादायक होती. आम्ही त्याचं कंडिशनमध्ये शाळेत गेलो. आमचं कोणाचंच शाळेत लक्ष लागलं नाही. डोळ्यासमोर सारखा पॉपकॉर्नवाला दिसायचा. 

        शाळा सुटली, संध्याकाळी घरी आलो. रात्र झाली, जेवण करून झोपलो. तसा पॉपकॉर्नवाला डोळ्यासमोर यायला लागला. कशीतरी झोप लागली. थंडी वाजायला लागली तशी तोंडावर गोधडी पांघरली. थोड्या वेळाने अचानक ओरडून उठलो. अंगाला दरदरून घाम फुटला होता. काहीतरी स्वप्न  पडलं होतं. पडलं होतं ते भयानक होतं. पण काहीच आठवत नव्हतं. फक्त ते मनावर, बुद्धीवर, शरीरावर परिणाम करून गेलं होतं. 

        मी उठलो व लाईट लावला. लक्ष घड्याळाकडे गेलं, पहाटेचे तीन वाजले होते. माझी रूम  सेपरेट होती व रूमला बाल्कनी होती. मी दरवाजा उघडून बाल्कनीत गेलो, थंडगार हवा लागली. तसं काही वेळात बरं वाटलं. 

       परत घरात जाणार तोच.... लक्ष खाली रस्त्यावर गेलं. रस्त्यावर कुणीतरी उभं होतं व मला असं वाटलं की तो माझ्याकडेच पाहतोय. मी घाबरून घरात गेलो. दार लावून घेतलं, कॉटवर जाऊन गोधडी पांघरली, आणि...... डोक्यात लख्ख प्रकाश पडला. 

     तो चेहेरा ओळखीचा होता, तो पॉपकॉर्नवाला होता ! माझ्या डोळ्यासमोर सकाळचं दृश्य उभं राहिलं. झोप लागणं शक्य नव्हतं.  मी पप्पा - मम्मीला आवाज दिला, माझा चेहेरा पाहून ते समजले की हा घाबरला आहे. 

      त्यांनी मला विचारलं, " काय झालं ? " व पप्पा जवळ येऊन बसले. तस त्यांना मी दिवसभरात जे काही घडलं ते सांगितलं तसे पप्पा माझ्याबरोबर बाल्कनीत आले. रस्त्यावर नजर टाकली, कुणीही नव्हतं.  

     पण हे इथे संपणारं नव्हतं. नंतर हे नित्याचंच झालं. रात्री - अपरात्री तो पॉपकॉर्नवाला दिसू लागला व माझी भीती वाढत गेली. तशी पप्पा - मम्मीची काळजी वाढली.

       हे असं नेमकं काय होतंय कळायला मार्ग नव्हता. अशातच एकदा भरदुपारी, दारावरची बेल वाजली. सुट्टीचा दिवस असल्याने मी घरीच होतो, आणि मम्मी घरात होती. मी दार उघडलं. दारात एक व्यक्ती उभी होती. दाढी व केस वाढलेले होते. हातात मोरपिसांचा गुच्छ होता आणि ढगळा अंगरखा घातला होता. 

     त्यांना पाहून मी दचकलोच. दोन पावलं मागे सरकलो, पण आमची नजरानजर झाली, तेवढ्यात मम्मी बाहेर आली. ती बहुतेक त्या बाबांना ओळखत असावी. मम्मीने त्यांना नमस्कार केला व घरात बोलावलं, पाणी दिलं माझी ओळख करून दिली व माझ्या बाबतीत घडलेला प्रकार सांगितला. 

     त्या बाबांनी सर्व शांतपणे ऐकून घेतलं व नंतर माझ्याकडे प्रेमाने बघितलं आणि म्हणाले,  "बेटा सांग, नेमकं काय झालं होतं ? " मी जे जे घडलं ते सर्व  सांगत गेलो. त्यांनी शांतपणे ऐकून घेतलं, व डोळे मिटले.

      काही वेळात डोळे उघडले व म्हणाले, " बेटा त्या माणसाचा मृत्यू तुझ्यासमोर झाला व मरतांना त्याला दोन घोट पाणी मिळणं गरजेचं होतं  म्हणून त्याने तुझ्याकडे बघितलं होतं व तसाच प्राण सोडला. "

       माझ्या मनात एक प्रश्न होता मी तो त्यांना विचारला, "बाबा त्या वेळेस मी एकटा नव्हतो, माझे मित्र सोबत होते. नंतर इतर लोकं ही आले. असे असतांना ते मलाच का दिसतात ? "

      बाबांनी माझ्या डोक्यावर मोरपिसं फिरवली व प्रेमाने म्हणाले, " बेटा त्याने शेवटच्या क्षणी तुला बघितलं होतं. त्याच्या आत्म्याला तुझ्याकडून अपेक्षा होती किंवा अजूनही असावी. " 

      मला अर्थ कळला नाही. मी पुन्हा म्हटलो, " बाबा काहीच कळत नाही. " " बेटा तुला त्याला एकदा सामोरं जावं लागेल व त्याला भेटून विचारावं लागेल. त्याला नेमकं काय हवंय ते. " " पण हे कसं करणार ? "

     " तुला तो कोणत्या दिवशी दिसला होता ? " मी तारीख, दिवस सांगितला. " म्हणजे आज महिना झाला. " तुला आज तो पुन्हा भेटेल. तेवहा घाबरू नकोस. त्याला सामोरा जा. " व बाबा आशीर्वाद देऊन निघून गेले. 

        बोलणं सोपं होतं. पण करणं अशक्य, भयावह होतं. रात्री पप्पा आले. त्यांना मम्मीने संगितलं. त्यांचा विश्वास नव्हता पण माझासाठी तयारी दाखवली. सोबत येण्याची.

      जेवणं झाली. झोप येणं शक्य नव्हतं. मम्मी - पप्पा बरोबर गप्पा मारत बसलो. झोप येत होती त्यामुळे रूममध्ये जाऊन थोडा पडलो व झोप लागून गेली. व काही वेळात अचानक जाग आली. उठून बसलो, बाल्कनीचा दरवाजा उघडला. माझा अंदाज बरोबर ठरला. पॉपकॉर्नवाला रस्त्यावर खाली उभा होता. मी पळत मध्ये गेलो, घड्याळ्याकडे नजर गेली. पहाटे ३ चा सुमार होता. मी पप्पांना उठवलं व सांगितलं.  

      ते व मम्मी तडक उठले व  उघडून खाली आलो. पॉपकॉर्नवाला रस्त्यावर उभा होता असं वाटलं. खरं होतं की भास कळायला मार्ग नव्हता.  पण जाणीव प्रखर होती. 

       त्यांच्याकडे पाहून आता भीती वाटत नव्हती. काही क्षणात थंडगार स्वर कानी आला," बाळा पाणी पाजशील ? " मला नाही म्हणवलं नाही. मी पळत घरात गेलो तांब्या भरून आणला खाली आलो, पप्पा - मम्मी तिथेच उभे होते. पण तांब्या खाली पडला व पाणी रस्त्यावर सांडलं. तिथी आता कुणी नव्हतं, मला कळेना ते कुठे गेले. मी घाबरून   पप्पांकडेबघितलं  त्यांनी माझ्या  पाठीवरून हात फिरवला. व मला हात धरून घरात नेलं. 

       त्यांनतर बरेच दिवस हा प्रकार चालू राहिला व नंतर अचानक बंद झाला .   बरीच वर्ष झाली. मी मोठा झालो, लग्न झालं,  मुलगा  झाला.

      एक दिवस रात्री मुलगा  रडत होता. म्हणून त्याला घेऊन बाल्कनीत उभा  होतो.   वेळ रात्रीची होती. थंडगार वारा वाहात होता. अवतीभवती नजर फिरवली. व लक्ष अनावधानाने रस्त्याकडे गेलं, रस्त्यावर कुणीतरी उभं होतं. व्यक्ती ओळखीची होती. हो !....  तो पॉपकॉर्नवाला .. 

परत दिसला होता. आता त्याला  कसली  तहान  होती कुणास ठाऊक ? त्याने  माझ्याकडे एकटक बघितलं व हात हालवला आणि काही क्षणात नाहीसा झाला. माझी नजर त्याचा शोध घेत राहिली.     

       काही वेळात मुलगा शांत झाला  मी त्याला थोपटत घरात गेलो. दार बंद केले. पण डोळ्यासमोर अजूनही तो पॉपकॉर्नवाला येत होता.................

                                                           THE END 

 VISIT OUR YOU TUBE CHANNEL

                                                   लेखक : रोहित योगेश बोरसे . 

➤➤➤➤➤➤➤➤➤➤➤➤➤➤➤➤➤➤➤➤➤➤➤➤➤➤➤➤➤➤➤➤➤➤                                                       ➤➤➤➤➤

 






                                                




  

Previous
Next Post »