खोपडी - मराठी भय कथा -THE SKULL- MARATHI HORROR STORY

    खोपडी - मराठी भय कथा -THE SKULL- MARATHI HORROR STORY    


MARATHI BHAY KATHA
 MARATHI HORROR STORIES

                                               लेखक : योगेश वसंत बोरसे .

       सविता व रमेश ने नवीन जागी प्रवेश केला . लग्न होऊन ७ ते ८ वर्ष झाली होती . एक छान मुलगा होता . ५ ते ६ वर्षांचा .' रोहन '. त्यांच्यासाठी तो बंगला  ती जागा नवीन होती . पण बंगला  नवीन नव्हता ,बरेच वर्ष पडून होता ,त्यामुळे कमी भाड्याने मिळाला होता . 

          माणसं लावून बंगल्याची साफसफाई झाली होती , पण आजूबाजूचा परिसर राहिला होता ,धड पहिला हि नव्हता . झाडाझुडपांनी व्यापलेला होता . साफ सफाई राहिली होती . रमेश काही कामासाठी बाहेर गेला होता. सविता घरातलं आवरुन स्वयंपाकाला लागली होती .दुपारची वेळ ,जेवण झालं कि थोडा आराम करू . असा विचार तिने केला . 

           
स्वयंपाक उरकला आणि रोहन ला आवाज दिला . पण रोहन घरात नव्हता ,बाहेरच्या मोकळ्या जागेत खेळत होता . तिने त्याला बाहेर येऊन आवाज दिला . तसा  रोहन पटकन पळत आला .त्याच्या हातात काही होतं ,सविताने लक्ष दिलं नाही . तो हात धुवायला पळाला ,हातातली वस्तू स्वच्छ धुतली . हात धुतले रुमालाने पुसले ,ती वस्तू पण स्वच्छ पुसली  व हातात घेऊन आला . आणि मम्मीला मागून बिलगला .

          तशी ती वस्तू खाली पडली , व सविताचं लक्ष गेलं ,तिने जोरात किंकाळी फोडली . व रोहन ला जवळ ओढलं .ती घाबरली होती . कारण रोहनने एक खोपडी ,माणसाची कवटी  उचलून आणली होती ! "रोहन हे कुठून आणलं ?" "मम्मी बाहेर बागेजवळ भिंत आहे ना ,तिथे माझा बॉल गेला  होता ,मग तिथे गेलो तर सापडलं , छान आहे ना ?"

          रोहन च्या चेहऱ्यावर आनंद मावत नव्हता . सविताला समजेना ,याला काय सांगावं ? हसावं कि रडावं ?जी कवटी रोहनने  अगदी सहज उचलून आणली होती ,स्वच्छ धुतली होती ,तिला पाहून सविता घाबरली होती . हात लावायची तर हिम्मतच नव्हती . "रोहन त्याला हात लावू नकोस . जा ! साबण लावून हात धू ! आणि हॉल मध्ये बस !"

        तिने घाबरत घाबरत  सांगितलं , पटकन दोन ताटं वाढली व किचनचे दार बंद करून हॉल मध्ये आली .हॉल मध्ये कसंतरी जेवण  उरकलं . ती रमेश ची वाट पाहत बसली . रोहनची बडबड चालू होती ,तो त्याच कवटीच्या गोष्टी करत होता , सविता रडकुंडीला आली . तिने गोड़ बोलून रोहनला हॉल मधेच  झोपवलं व त्याच्या शेजारी ती पण आडवी झाली.  

             
 थोड्या वेळाने तिला जाग आली , रोहन शेजारी नव्हता . ती दचकून उठली ! तिला   त्या कवटीची आठवण झाली  व अंगावर शहारे आले . अंगाला घाम फुटला . रोहनच्या काळजीने .  ती किचन कडे पळाली . किचनचं दार बंद होतं , तिला हायसं वाटलं ,तिने दार लोटलं ,मध्ये गेली , घोटभर पाणी पिलं . आणि तिचं लक्षं कवटीकडे गेलं तिच्या हातातून ग्लास खाली पडला .कवटी आपल्याकडे पाहून हसते आहे ,दात विचकते आहे ,असं वाटलं व ती तशीच बाहेर पळाली .

        किचनचं दार परत बंद केलं ,रोहनला आवाज दिला ,लक्ष्य घड्याळाकडे गेलं ,पाच वाजून     गेले होते ,संध्याकाळ झाली होती .तिला आश्चर्य वाटलं ,'बापरे !आपण इतका वेळ झोपलो ?     पण रोहन कुठे आहे ?' "रोहन ए रोहन " तिने रोहनला आवाज दिला ,पण रोहनचा पत्ता नव्हता ,तिला वाटलं बाहेर असेल अजून अंधार पडला नव्हता ,पण बंगल्याची झाडं  एवढी मोठी होती कि त्यांच्या सावलीने वातावरण अंधारलेलं राहायचं . ती पुढच्या दारात येऊन उभी राहिली . लक्ष समोर गेलं,समोर अंगणात रोहन उभा होता ,त्याच्या हातात काही होतं ,व तो एकटक त्याच्या मम्मीकडे बघत होता. सविताला वेगळंच वाटलं हा असं काय करतोय ? 

         तिने विचारलं, " रोहन, हातात काय आहे ? " रोहनने हात मागे केला.  " मी नाही जा ! तू फेकून देतेस माझी खेळणी. मी तुला नाही देणार !" आणि तो तिला चुकवून बाथरूममध्ये पळाला. सविता त्याच्या मागे धावली. 

       त्याच्या हातातील वस्तू हिसकावली. व पुन्हा आरोळी ठोकली. रोहनच्या हातात एक हाड होतं. तो ते धुवायला घेऊन गेला होता. " रोहन हे काय चालवलय ? " ती रडवेली होऊन म्हणाली. " फेक ते. " पण रोहन ऐकायला तयार नव्हता. तसा तिने एक धपाटा घातला. पण रोहन रडला नाही. तिच्याकडे एकटक पाहात राहिला. ' आपण कधी रोहनला मारत नाही. पण तरी हा कधी धडपडला, काही लागलं की लगेच रडतो. शक्यतो सगळेच मुलं रडतात या वयातले. 

        आणि हा असं काय करतोय ?' त्याने तिच्याकडे बघत हात पुढे केला. " आण इकडे ! " आवाज ऐकून सविताला नाही म्हणताच आलं नाही. तिने ते हाड रोहनला दिलं व तिथेच बाथरूमजवळ  मटकन खाली बसली. रोहनने तिच्याकडे लक्ष दिलं नाही. ती पाहातच राहिली. व तो किचनकडे गेला. पण त्याच चालणं  ही वेगळच वाटलं, मोठ्या माणसासारखं. तो किचनमध्ये गेला व अंधारातच ती कवटी उचलून आणली. आणि सविताकडे बघत रूमकडे गेला. 

       सविता सुन्न झाली होती. चूक केली, काहीतरी भयंकर चूक झाली. भाडं कमी आहे म्हणून हा बंगला घेतला पण कुणाचा, काय ?काहीच चौकशी केली नाही. तिला काही सुचत नव्हतं. ती तशीच बसून राहिली. आता अंधार पडला होता.  पूर्ण घरात अंधार होता. 

       काही वेळात रमेश आला. अंधार पाहून त्याने सविताला आवाज दिला. व लाईट लावून सवितापर्यंत पोहोचला. त्याला काळजी वाटत होती. ही अशी काय बसलीय म्हणून. रमेशने तिला गदागदा हलवलं. दोन - तीनदा आवाज दिला. तशी ती भानावर आली आणि घाबरून इकडे तिकडे पाहू लागली. " रोहन ? माझा रोहन ? " रमेशने विचारलं , " सविता रोहन कुठे आहे ? " ती रोहनच्या रूमकडे पळाली. रमेश तिला आवाज देत तिच्या मागे पळाला त्याला समजेना, नेमकं काय चाललंय?

        सविताने रोहनच्या रूमचा दरवाजा ढकलला आत अंधार होता. लाईट लावायला गेली, लाईट लागला नाही. रमेशला कळेना, लाईट का लागत नाही ? त्याने पटकन मोबाईलचा टॉर्च चालू केला व रूममध्ये मारला. 

         आणि समोरच दृश्य पाहून दोघं हादरून गेले. रोहन मांडी घालून बसला होता. डोळे बंद होते. मुद्रा ध्यानस्थ होती. काहीतरी पुटपुटत होता. आणि समोर ती कवटी ठेवलेली होती व त्यावर ते हाड आडवं ठेवलेलं होतं. रमेश घाबरला तो रोहनकडे धावला. आणि रोहनला उचलण्यासाठी वाकला. पण रोहन त्याच्याकडून उचलला गेला नाही. साधा हलला ही नाही. 

       आता रमेशलाही काळजी वाटायला लागली. आणि रोहनच्या काळजीने डोळ्यात पाणी आलं. त्याने विचारलं, " सविता हे सगळं काय चाललंय ? " सविता जवळच होती. तिने थोडक्यात सर्व सांगितलं व रडायला लागली.  

      रमेशला कळेना नेमकं काय करायचं ते. तो एकटक रोहनकडे  पाहात राहिला. तेवढ्यात त्यांना चाहूल लागली. दारात कुणी होतं पण अंधारामुळे चेहेरा  दिसत नव्हता. आपल्याच घरात आपल्या परवानगी शिवाय कुणी कसं येऊ शकत ? तेही बेडरूमपर्यंत ? रमेश बोलणार, एवढ्यात समोरून आवाज आला , आवाज धीर गंभीर होता. 

     " राग येतो ना ! आपल्या घरात आपल्या परवानगी शिवाय कुणी कसं येऊ शकतं ? राग येतो ना ! मग मला नाही का येणार ? हे माझं घर आहे. ही माझी वास्तू आहे. इथे कुणीही राहिलेलं मी सहन करत नाही. "

       " मुलगा हवाय ना परत, नाहीतर मुलाला मी नेतो इथे तुम्ही खुशाल राहा. आणि हो ती कवटी व ते हाड माझं आहे. इथली प्रत्येक वस्तू माझी आहे. मुलगा व तुम्हाला जिवंत राहायचं असेल तर इथून लगेच निघायचं. "

      " चला निघू का ? " आणि ते दिसेनासे झाले. इकडे हाड कवटीवरून खाली पडलं तसा रोहन डोळे चोळत चोळत उठला. व मम्मी मम्मी करत रडायला लागला. आणि अशा परिस्थितीतही सविताच्या चेहेऱ्यावर आनंद दिसत होता. आणि रमेशच्याही.

         का नाही ! त्यांचा मुलगा त्यांना जसा होता तसाच परत मिळाला होता. रमेश पटकन उठला. सविताही उठली तिने रोहनला उचलून घेतलं छातीशी धरलं लक्ष कवटीकडे गेलं आणि ते डोळे जे काही होतं ते आपल्याकडे रागाने पाहातय असं तिला वाटलं. 

         
 
ते बाहेर आले. लक्ष घड्याळ्याकडे गेलं.  रात्रीचे  बारा वाजत होते. तडक बाहेर निघाले, थांबण्यात अर्थ नव्हता. कुलूप लावलं व  बंगल्याच्या बाहेर आले. मागे वळून पाहिलं. आणि अंगावर काटे आले. ती खोपडी ! ती कवटी बंगल्याच्या  पायऱ्यां पर्यंत आली होती !

  .....  व त्यांच्याकडे पाहात होती ! एकटक !  त्यांना सोडायला आली होती की बाहेर घालवायला देव जाणे ! 

            आणि तो बंगला आ वासून बघत होता. जणू काही तो जिवंत झाला होता !................  

                                                     THE END

VISIT OUR YOU TUBE CHANNEL

                                            लेखक : योगेश वसंत बोरसे. 


⧭⧭⧭⧭⧭⧭⧭⧭⧭⧭⧭⧭⧭⧭⧭⧭⧭⧭⧭⧭⧭⧭⧭⧭⧭⧭⧭⧭⧭⧭⧭⧭⧭⧭⧭⧭⧭⧭⧭⧭






 

  


















Previous
Next Post »