पाळणा - मराठी भयकथा - MARTHI HORROR STORY


                               पाळणा - मराठी भयकथा - MARATHI HORROR STORY


MARATHI BHAYKATHA
 MARATHI HORROR STORIES

                                                   लेखक : योगेश वसंत बोरसे . 

        स्वामीची वाट पाहून रक्मा कंटाळली होती. तिला भूक लागली होती. सकाळचा कामासाठी बाहेरगावी गेलेला स्वामी रात्र झाली तरी परत आला नव्हता. स्वामी व रक्मा नवरा बायको होते. गावातील एका झोपडीवजा घरात त्यांचा संसार चालला होता.. लग्न होऊन बरीच वर्ष झाली पण मुलबाळ नव्हतं. 

       स्वामी स्वभावाने भोळा होता. कुणी काही सांगितलं की पहिले घरी येऊन बायकोला सांगायचा. मुलबाळ होण्यासाठी अशा तऱ्हेने भरपूर प्रयोग करून झाले होते. पण घरात पाळणा हालला नव्हता. 

       पण अजून दोघं जवान होते. अंगात मस्ती होती, रग होती, त्यामुळे त्यांचे प्रयोग चालू राहणार होते. असाच एक प्रयोग करून पाहण्यासाठी स्वामी सामान घ्यायला जवळच्या मोठ्या गावात गेला होता. समुद्र किनारा, नारळाची झाडं, झावळ्या, मासे यातच आयुष्य चाललं होतं. जास्त काही नव्हतं. पण काही कमी पण नव्हतं. म्हणून त्यांना मूल हवं होतं.

         असाच कुणीतरी त्यांना उपाय सांगितला होता. मूल हवंय ! मग घरात पाळणा आहे का ? घरात जर पाळणा हलला नाही तर तुमचा पाळणा कसा हलणार ? काही जणांनी त्यांच्या जवळचा पाळणा देऊ केला पण रक्माला पसंत नव्हतं, जसं मूल आपलं हवं तसा पाळणाही  आपलाच हवा. 

          रक्माला आणखी जास्त वाट पाहावी लागली नाही. काही वेळात स्वामीचा आंनदी स्वर तिच्या कानावर आला. तो सामानासोबत पाळणाही  घेऊन  आला होता. त्याने दारात गाडी थांबवली होती. पाळणा व सामान खाली उतरवलं व रक्मा  पाहातच राहिली. पाळणा चांगलाच जड असावा. लाकडी पण दणकट होता उचलायला दोघे माणसांना दम  लागला होता.  

          शेवटी त्यांनी कसातरी पाळणा घरात नेला, व सामानही ठेवलं. पैसे घेऊन गाडीवाला              निघून गेला. घराच्या हिशोबाने पाळणा मोठा झाला होता.    पण चूक स्वामीची नव्हती.  रक्मासुद्धा आणल्यापासून पाळण्याकडे पाहात होती. तिला राहावलं नाही व तिने जवळ जाऊन पाळण्याला धक्का दिला. पाळणा हालला. आता त्यात झोपणारा, झोपणारी आणणं गरजेचं होतं. 

          दोघांनीं सहुतेक एकमेकांकडे पाहिलं. एक उपाय केला होता. दुसरा उपाय करायचा होता. सामान आणलं होतं. पण भूक दोघांनाही लागली होती. म्हणून दोघांनी न बोलता जेवणं उरकली. व झोपी गेली .  झोपता झोपता रक्माने पाळण्याला दोरी बांधली होती व दोरी ओढून ती झोका देत होती. 

         जणूकाही पाळण्यात कुणी झोपलच होतं. हो ! पाळणा रिकामा नव्हता ! त्यात कुणीतरी झोपलं होतं फक्त त्यांना रिकामा वाटत होता. पण झोका देताना रक्माच्या चेहेऱ्यावरील समाधान पाहून स्वामीपण खुश होता. म्हणजे आपण योग्य गोष्ट घरात आणली म्हणायची. व दोघे एकमेकांच्या कुशीत शिरले व .....  काही वेळात झोपी गेले. 

         रात्री कसल्याशा आवाजाने जाग आली म्हणून स्वामी उठला. तर रक्मा पाळण्याकडे तोंड करून बसली होती. तो दचकून उठून बसला." रक्मा काय झालं ? " रक्माचं जणूकाही भान हरपलं होतं. " ए रक्मा काय झालं ? " त्याने तिला जोरात हलवलं तशी ती भानावर आली व हासऱ्या चेहेऱ्याने तिने स्वामी कडे बघितलं व पाळण्याकडे बघितलं व बोट दाखवत म्हणाली, " त्या पाळण्यात आपलं बाळ आहे त्याला झोका देतेय. " 

         " रक्मा अगं शुद्धीवर आहेस का ? काल संध्याकाळी तर पाळणा आणला मग एका रात्रीत बाळ कसं येईल ? हे बघ तुला स्वप्न पडलं असेल, सारखा तोच विचार करते म्हणून तस झालं असेल. आता शांत झोप. " रक्माने नकार दिला, " नाही ! मी बाळाला झोपवते तुम्ही झोपा. " स्वामी उठला ,त्याने बल्बचं बटन दाबलं , लाईट नव्हती. त्याने माचीस पेटवली कंदील लावला. कंदील घेऊन पाळण्याजवळ गेला. पाळणा रिकामा होता. " बघ रक्मा पाळणा रिकामा आहे.  रकमा बघ ! पाळणा रिकामा आहे. "

         तशी रक्मा  भानावर आली व उठून स्वामीजवळ येऊन उभी राहिली. पाळणा रिकामा होता. तिने घाबरून तोंडाला हात लावला.

         " अहो माझं बाळ कुठे गेलं ? मघाशी तर होतं, कुणी नेलं ? " व ती रडायला लागली. स्वामीचं डोकं फिरण्याची वेळ आली होती. त्याने गदागदा रक्माला हालवलं पण ती रडत बसली. रडता रडता झोपून गेली. स्वामीला काही समजेना ' हे काय चाललंय ? उगीच पाळणा आणला असं झालं. '  

       विचार करता करता तो पण झोपला आणि थोड्या वेळाने त्याला फुसफुसण्याचा, फुंदण्याचा आवाज आला. त्याला वाटलं रकमा रडत असेल त्याने रक्माला थोपटलं " रक्मा अगं झोप, रडणं बंद कर. त्याच्या लक्षात आलं रक्मा खरोखर झोपली होती. मग कुणाचा आवाज ? त्याने परत कंदील पेटवला. लक्ष पाळण्याकडे गेलं, पाळणा हालत होता. व त्यातूनच आवाज येत होता.

           ' अरे पाळणा तर रिकामा आहे मग हालतोय कसा ? ' रकमा झोपलेली, मी झोपलेलो. वाऱ्याने तर हलणार नाही. आणि आवाजाज कुणाचाय ? त्याने कंदील हातात घेतला व पाळण्याजवळ गेला. पाळणा रिकामा नव्हता त्यात छोटं बाळ होतं व ते फुंदत होतं, रडत नव्हतं, फुंदत होतं. स्वामी काही क्षण पाहाताच राहिला. बाळ फुंदण बंद करून त्याच्याकडे पाहात होतं. लहान मुलं  तर रडतात मग हे काय आहे ? अन हे इथं कस आलं ? ' 

           अन ! त्याच्या हातातून कंदील खाली पडला. खाली अंथरून होतं ते पेटलं. त्याने जोरात आरोळी ठोकली. " रक्मा, रक्मा अगं उठ. " त्याच्या आवाजाने रक्मा  जागी झाली. आग पाहून स्वामीकडे पाहायला लागली. " अहो पाणी टाका नाहीतर घर जळून जाईल. " स्वामी पटकन पाणी घ्यायला धावला. रक्माही उठली होती. दोघांनीं पाणी टाकून आग विझवली. 

   " रक्मा अगं त्या पाळण्यात छोटं पोरगं होतं. " " काय ?अहो काल तर पाळणा आणला. आज पोरगं कसं येईल ?" " कसं म्हणजे ? तू पण नाही का रात्री झोका देत बसली होतीस. तुझ्या चाहुलीने मी उठलो. तूच मला पहिले सांगितलं. आपले बाळ आहे म्हणून. पण दोघांनी बघितलं तर पाळणा रिकामा होता म्हणून तू रडायला लागली व रडता रडता झोपून गेली. " 

    " अहो काय बडबड करताय ? काही टाकून बिकून आला की काय ? अन मी कशाला रडत बसू ? मला कळत नाही, इतकी वर्ष मूल झालं नाही एक दिवसात होणार का ? हे पहा तुम्ही थकला असाल ! झोपा शांत. " स्वामी विचारात पडला. ' काय खरं काय खोटं ? ही खरं बोलतेय, का आपण पाहिलं ते खरंय ? ' 

        विचार करता करता झोप लागली. काही वेळ गेला. पुन्हा खुडबुड ऐकू आली. कुणीतरी अंगाई गीत म्हणून बाळाला थोपटत होतं. स्वामी घाबरला होता, त्याची उठायची हिंमत झाली नाही.  त्याने कूस बदलली आणि बघितलं व बघतच राहिला. रक्माच्या मांडीवर मूल होतं. ती मांडी हालवत होती, बाळाला थोपटत होती व अंगाई गात होती. 

        स्वामींच्या डोक्याला मुंग्या यायची वेळ आली होती. एक उपाय केला तर ही परिस्थिती, दुसरा उपाय केल्यावर काय होईल देव जाणे ! आणि तो रक्माकडे बघत बसला. पण रक्माचं त्याच्याकडे लक्ष नव्हतं ती वेगळ्या विश्वात रममाण झाली होती.....................................  

                                                        THE END

VISIT OUR YOU TUBE CHANNEL                                             लेखक : योगेश वसंत बोरसे.

➣➣➣➣➣➣➣➣➣➣➣➣➣➣➣➣➣➣➣➣➣➣➣➣➣➣➣➣➣➣➣➣➣➣➣                                                          ➣➣➣➣➣➣








     





































 











  

Previous
Next Post »