रेल्वे ट्रॅक - मराठी भयकथा | MARATHI HORROR STORY | marathi bhaykatha


                      रेल्वे ट्रॅक - मराठी भयकथा | MARATHI HORROR STORY 

MARATHI HORROR STORIES
 MARATHI HORROR STORIES

 संकल्पना :- रोहित योगेश बोरसे ./ विस्तार व लेखक :- योगेश वसंत बोरसे .  


 
    एक शहर ,ज्या शहरात सर्व सोयी , सुविधा  उपलब्ध होत्या ,जे श्रीमंत शहर म्हणून ओळखलं जायचं ज्यात मेट्रो ,रेल्वे ,विमानं  सर्व काही होतं . या शहरातील एक श्रीमंत व्यक्ती माणिक्य !त्यांनी आयुष्यभर कष्ट करून उभारलेलं साम्राज्य त्यांच्या डोळ्यापुढे दिसत होतं . त्यांच्याहून श्रीमंत त्या शहरात कुणी नव्हतं ,याचा त्यांना सार्थ अभिमान  होता !

         अशाच एका कामासाठी ते बाहेर गावी जात होते . ड्रायव्हरने कार काढली ,ते कार मध्ये    बसले , व निघाले . सहज त्यांच्या डोक्यात एक विचार आला आपण दहा वीस वर्षांपूर्वी कसे होतो ?आणि आता कसे आहोत ? अर्धातास झाला ते रमत गमत खिडकीतून पाहत होते , ,सगळं बदललं ! दहा वर्षपूर्वी  हे शहर कसं  होतं ? पण एक दृश्य .... त्यांच्या मनाला खटकलं !

     हो ! एक दृश्य जसं च्या तसं होतं ,माणिक्यने पाहिलेला तो रेल्वे ट्रॅक . आणि ,त्यांच्या अंगावर सर्रकन काटा आला . आपला तो भूतकाळ आठवला .

     माणिक्य एक कापड विक्रेता होता ,इथे स्थायिक होऊन त्याला फक्त सहा महिने झाले होते . तो असाच कपडे विकून बाहेर गावाहून येत होता , रात्र झाली होती . त्याला त्या दिवशी जास्त नफा झाला होता . म्हणून तो आनंदात होता , पण तो नवीन असल्याने त्याला सर्व रस्ते माहित नव्हते , म्हणून तो नेहमीच्या रस्त्याने जाऊ लागला . पण रस्त्यात काम चालू होतं , पुढे जात येणार नव्हतं ,म्हणून तो चिंतीत झाला . 

      आता कुठून जायचं ?तसं त्याचं लक्ष रेल्वे ट्रॅक कडे गेलं .तसा त्याने विचार केला रेल्वे ट्रॅक वरून गेलेलं बरं , आणि तो तिकडून जायला लागला . रेल्वे ट्रॅक ओसाड होता ,रेल्वे येण्याचं कोणतंही चिन्ह दिसत नव्हतं . माणिक्य गाणे म्हणत चालला होता ,आता आपलंच राज्य आहे ,अशा अविर्भावात .... पंधरा वीस मिनिटे झाली ,व तो अचानक थांबला .

    ते दृश्य पाहुन त्याला थोडं विचित्र वाटलं ,एक शाल पांघरलेली बाई ट्रॅकवर काही करत होती . माणिक्य तिच्याजवळ पोहोचला , तिने माणिक्यला पाहिलं व ती हसायला लागली . टाळ्या वाजवायला लागली ,अचानक थांबली ,माणिक्य कडे रोखून बघितलं ,"जा निघून जा इथून ! बाजूला हो ! " तो बाजूला झाला . 

  माणिक्य ने तिला विचारलं ,"मावशी तुम्ही इथे काय करताय ?ते पण इतक्या रात्री ?" मावशी काही बोलली नाही . ...... ती थोड्या वेळाने ओरडली ,"मुडद्या ,समजत नाही का हो बाजूला म्हणून ?"माणिक्य  बाजूला झाला . तिने माणिक्य ला विचारलं ,"तुला उडायचं का ?" माणिक्यला समजलं नाही ,मावशी पुन्हा म्हणाली ,"मला उडायला आवडतं ! आता एक रेल्वे येईल ,मी इथे झोपेल ,आणि रेल्वे मला उंच उडायला मदत करेल ! तू बाजूला हो !"

       मावशीच्या बोलण्याने माणिक्य च्या काळजात धस्स झालं . 'हा काय प्रकार आहे ?ही कशी इच्छा आहे ? ' हा  विचार येत नाही तोच समोरून रेल्वे येताना दिसली . तो ओरडला " मावशी बाजूला व्हा !"पण मावशी रेल्वे ट्रॅक वरच उड्या  मारत राहिली . हसत राहिली ,टाळ्या वाजवत राहिली . माणिक्य तिला वाचवण्यासाठी तिच्याकडे धावला . तिला पकडलं .बाजूला उडी मारली . एक आर्त किंकाळी ऐकू आली . 

     माणिक्य विचारात पडला , ' आपण तर मावशीला बाजूला ओढलं मग ट्रेनने कोणाला उडवलं ? ' ट्रेन निघून गेली होती व रेल्वे ट्रॅक वर ती मावशी उडया मारत होती. टाळ्या वाजवत होती तिच्या चेहेऱ्यावर आनंद दिसत होता. 

      त्याच्याकडे पाहात पाहात मावशी गायब झाली. माणिक्यला दरदरून घाम फुटला. तो पळत सुटला, त्या काम करणाऱ्या माणसांना विनवणी केली, " मला इथून जाऊ द्या. " त्यांनी अखेर ऐकलं आणि काही वेळात माणिक्य घरी पोहोचला. तसं बायकोने विचारलं, " इतका उशीर का झाला ? " तो काही बोलला नाही. 

       त्याचा चेहेरा घामाने डबडबला होता. त्याने जे पाहिलं ते एकदम भयंकर होतं. जेवणं झाली. तो कॉटवर पडला. पण त्याला झोप लागत नव्हती आणि ते शक्य ही नव्हतं. त्याने सहज खिडकीतून बाहेर पाहिलं, ती मावशी त्याला बोलवत होती. " बाळा चल आपल्याला आकाशात उडायचंय,बाहेर निघ ." तो बाहेर पडला . इकडे तिकडे पाहू लागला . त्याला त्या अंधारात एक आकृती दिसली . ती त्याला बोलवत होती ,तो नकळत तिच्याकडे खेचला जाऊ लागला . त्याची बायको मागून आवाज देत राहिली . पण माणिक्य भानावर नव्हता . तो संमोहित झाला होता .

    आणि त्या आकृतीच्या मागे मागे रेल्वे ट्रॅक वर आला , त्याच जागेवर !ती मावशी उड्या  मारत होती .टाळ्या वाजवत होती . आणि .. समोरून एक ट्रेन येताना दिसली ,ट्रेन त्याच्या जवळ पोहोचणार तोच .... त्याला कुणी खेचलं , माणिक्य भानावर आला ,त्याची बोबडी वळाली . 

      एक चौकीदार त्याला विचारात होता "ओ साहेब ,मरायची एवढी घाई काय करताय ? देवाने  आयुष्य दिलंय , ते सुखाने जगा ? "पण माणिक्यचे तिकडे लक्ष नव्हतं . काही वेळात माणिक्य सावरला . तो चौकीदार समोर उभा होता . त्याच्या उत्तराची वाट पाहत . माणिक्य ने त्याला सगळं सांगितलं , तसा त्या चौकीदाराचा चेहेरा गंभीर झाला , व  तो म्हणाला "म्हणजे तुमची पण शिकार होणार होती ! एक काम करा घरी जा आणि शांत झोपून घ्या , असे आवाज आले तर लक्ष देऊ नका . जा ,घरी जा !" आणि चौकीदार शिट्टी वाजवत निघून गेला . आणि काही क्षणात दिसेनासा झाला . 

   माणिक्य विचारात पडला 'हा इथे कुठून आला ?आणि गेला कुठे ?तुमचीपण शिकार म्हणजे नेमकं काय ? म्हणजे अजून कोणी मेलं होतं ?' हे प्रश्न माणिक्यच्या मनात खोलवर रुजले गेले .

    ती  घटना माणिक्यला अजूनही स्पष्ट आठवत होती , त्या आठवणीने त्यांच्या  अंगावर पुन्हा एकदा काटा आला . त्या प्रश्नांची उत्तरे त्याना  अजूनही मिळाली नव्हती .  ज्या कामासाठी  बाहेरगावी गेले होते ते काम आवरता आवरता बरीच रात्र झाली . व ते निघाले . ते त्या ठिकाणी रेल्वे ट्रॅकपर्यंत पोहोचले . व खरखर करत कार बंद झाली !

    ड्रायव्हरने खाली उतरून कार चेक केली . त्याला काही लक्षात आलं नाही . माणिक्यही कार मधून खाली उतरले . आणि ड्रायव्हरला विचारलं "काय झालं ?" साहेब काही प्रॉब्लेम तर वाटत नाही ,तरी कार का  बंद पडलीय ,कारण कळत नाहीये . मी जातो ,जवळपास एखादं गॅरेज असेल  तर  मॅकेनिक घेऊन येतो . तुम्ही इथेच थांबता का ? " ठीक आहे . माणिक्य म्हणाले व ड्राइव्हर निघून गेला . 

       माणिक्य कारला  टेकून  उभे राहिले . लक्ष समोरच्या रेल्वे ट्रॅकवर होतं आणि एका जागी नजर स्थिर झाली . रेल्वे ट्रॅकच्या मधोमध कुणी तरी उडया मारताना  दिसत होतं. माणीक्यच्या लक्षात आलं व ते ठामपणे त्या दिशेने निघाले.

        उडया मारणारी व्यक्ती  ओळखीची होती. त्यांच  लक्ष समोर गेलं, समोरून ट्रेन येताना दिसली. तसे  माणिक्य ट्रॅक वर चढले व ट्रेनच्या दिशेने, त्या आकृतीच्या दिशेने जाऊ लागले.  काही  क्षणात ट्रेन त्यांच्या  जवळ पोहोचली होती. आणि..... त्यांना  उडवणार तोच....... कुणीतरी त्यांना  ओढलं होतं आणि वातावरणात एक किंकाळी ऐकू आली. ट्रेन निघून गेली. ज्याने हात ओढला त्याने माणिक्याला ओळखलं व म्हणाला, "साहेब तुम्ही ! " " हो मीच ! " माणिक्य म्हणाला. " आता परत काय झालं ?" " काही नाही, तुला भेटायचं होतं म्हणून परत आलो. " " पण मग स्वतः च्या जीवाशी का खेळता ? " त्याने विचारलं. माणिक्य म्हणाला, " कारण तू वाचवणार याची खात्री होती, विश्वास होता. 

         तो चौकीदार होता आणि एकटक माणिक्यकडे पाहात होता. माणिक्यने विचारलं," तू त्यादिवशी मला वाचवलंस आणि सांगून गेलास की तुमची पण शिकार होणार होती, याचा नेमका अर्थ काय ? अजून कोणाची शिकार झाली होती. ? " चौकीदार म्हणाला, 

        " माझी ! त्या दिवशी मी डयुटीवर होतो. बरीच रात्र झाली होती. तसं ट्रॅक कडे लक्ष गेलं.  कुणीतरी ट्रॅकवर उडया मारताना दिसलं. माझं लक्ष समोर गेलं, दुरून ट्रेन येताना दिसली. मी शिट्टी वाजवून त्या व्यक्तीला सावध करण्याचा प्रयत्न केला व पळत तिकडे गेलो. ती बाई होती, मला वाटलं कुणी वेडसर असेल म्हणून मी हात धरून बाजूला ओढलं आणि तेवढ्यात......... ट्रेन आली व मला उडवलं आणि ती बाई टाळ्या वाजवत राहिली. तेव्हापासून मी इथे पहारा देत आहे व लोकांना वाचवत आहे. " आणि तो शांत झाला. काही वेळाने बोलला, " साहेब तुम्ही मोठी माणसं, इथला काही बंदोबस्त करता आला तर करा म्हणजे माझं काम सोपं होईल. " व तो शिट्ट्या मारत निघून गेला व काही क्षणात दिसेनासा झाला व माणिक्य त्या दिशेने पाहात  राहिला................  

                 मित्रांनो, रेल्वे ट्रॅकवर बरेच ऍक्सीडेन्ट होतात, आत्महत्या होतात,खून होतात. खून करून रेल्वेट्रॅक वर फेकले जाते व आत्महत्या भासवली जाते. काही ठिकाणी रेल्वे फाटक नसते, त्यामुळे काही आगाऊ लोकं ट्रेन येताना दिसली तरी ट्रॅक क्रॉस करतात. त्यांना ट्रेनच्या वेगाचा अंदाज येत नाही. ट्रॅक समजत नाही, त्यामुळे हकनाक मरतात. 

            हे कसे रोखता येईल, त्यासाठी काही करता येईल का ? याच विचाराने केलेला हा लेखन प्रपंच ! आवडल्यास जरूर कळवा............

                                                  आपला... रोहित बोरसे. 


VISIT OUR YOU TUBE CHANNEL   


  • ALL RIGHTS RESERVED AT YOGESH BORSE & BGSM


                ➤➤➤➤➤➤➤➤➤➤➤➤➤➤➤➤➤➤➤➤➤➤➤➤➤➤➤➤➤➤➤➤➤➤                                                                                        ➤➤➤➤


 




Previous
Next Post »