आस्वाद - मराठी भय कथा - MARATHI HORROR STRORY

आस्वाद - मराठी भय कथा - MARATHI HORROR STRORY                

                                                         लेखक :योगेश वसंत बोरसे.

   " भरलं का ? पोट भरलं ? आणि उत्तर देण्याऐवजी गरगरेनी मोठ्ठा ढेकर दिला . आणि गरगरेनी आपल्या गरगरीत ढेरीवर हात फिरवला .तसं यजमानांना हसू आलं ! 

" आज थोडं कमीच खाल्लं !" गरगरे बोलत होते .

" आता पाहिल्यासारखं जेवण जात नाही . अलीकडे तब्येत फारशी बरी राहत नाही . पोटाच्या तक्रारी वाढल्यात ."

      यजमान गालातल्या गालात हसले .चार माणसांचं जेवण एका वेळेस खाऊन गेला ,तरी म्हणतो कमी जेवलो ! ढेरी एवढी वाढलीय की  कापलं तर शंभर किलो चरबीच निघेल . एवढं खाल्ल्यावर पोट तक्रार करणारच ."

  त्यांच्या विचारांची शृंखला  गरगरेनी तोडली . 

" बाकी बासुंदी फक्कड होती . असं वाटत होतं अजून दोन तीन वाट्या प्याव्यात ,पण नको म्हटलं आठ दहा वाट्या बस झाल्या, यजमानांनाही काही उरलं पाहिजे . "

      असं म्हणत त्यांनी पुन्हा ढेरीवरून हात फिरवला . ढेकर दिला .ढेकर तृप्ततेचा होता कि गॅस चा गरगरेंनाच माहित ! ढेरी वर  हात फिरवताना  त्यांच्यासमोर एक एक पदार्थ फेर धरून नाचायला लागले . ' पुरण पोळी ,बासुंदी ,पुलाव,भज्या ,पालकपुरी ,बदामाची खीर '

 एक ना अनेक ! बरं एवढं खाऊनही अन्नावरची वासना शमली नव्हती . 

         त्यात यजमानांनी छान पैकी सुगंधित विडा खाऊ घातला . व पायावर डोकं ठेऊन ५०१/रुपये हातात ठेवले . आणखी काय हवं ?गरगरेंची स्वारी निघाली ,तृप्त मनाने ,समाधानाने ,दुपारच्या कडक उन्हात ! सूर्य डोक्यावर होता ,गरगरेंनी धोतर नेसलं होतं ,व वरती उपरणं होतं ,म्हणजे वर उघडेच होते . उपरण्याने डोकं झाकणार कि शरीर झाकणार ? 

   बरं शरीर काही साधं नव्हतं !जवळपास दोनशे किलो तरी असावं ,एक एक पाऊल दाणदाण पणे पडायचं , पण दोनशे किलो शरीर काही कमावलेलं नव्हतं ! त्याचा व्हायचा तोच परिणाम झाला . गरगरेंना गरगरायला लागलं ! तोंड कोरडं पडायला लागलं !घाम फुटायला लागला . 

    आजू बाजू चे लोक ओळखीचे होते ,पण दुपारच्या वेळेस फारसं कुणी बाहेर नव्हतं . एक दोन जण धावले .पण तोवर उशीर झाला होता ,गरगरे  खाली  कोसळले  ते पुन्हा उठलेच नाहीत !

     कुणी तरी त्यांच्या घरी निरोप दिला , तसे दोन्ही मुलं ,व बायको धावत आले .ज्यांच्या घरी जेवायला गेले होते  त्यांनाही निरोप गेला . तेही पोहोचले .' बडबडे ' त्यांचं आडनाव .बडबड करतच आले. त्यांनाही  अपराधीपणा खात होता . पण त्यांची वेगळी बडबड चालू होती .. 'मी जेवायला बोलावलं ,खायचं किती ? याला काही मर्यादा हवी !पण हे महाशय थांबायचं नांव घेईनात ! त्याचाच हा परिणाम !.... '

      आणि गरगरे परिवार  त्यांना दूषणे देत राहिला, 'तुम्हीच काही  खाऊ घातलं म्हणून !' बघता बघता गर्दी जमा झाली . समजदार माणसं मध्ये पडली व परिस्थिती निवारली . तशी दोन्ही कडची मंडळी शांत झाली . जे व्हायचं ते होऊन गेलं होतं ,आता डोकं लावण्यात काही अर्थ नव्हता . आणि गरगरे परिवार ही जाणून होता कि अति खाण्याचाच  हा परिणाम असू शकतो . 

       राहिला प्रश्न गरगरेचं शरीर उचलण्याचा ! आधीच दोनशे किलोचं  अवाढव्य शरीर  मेल्यानंतर अजून जड झालं होतं. उचलणार कसं ? एक लोटगाडी मागवली गेली व दहाबारा दणकट माणसांनी कसं तरी उचललं . लोटगाडीवर ठेवलं व गरगरेंच्या घरी नेलं . 

    संध्याकाळी अंत्यविधी करण्यात आला . पण बडबडेना अस्वस्थ वाटत होतं . जे झालं त्याला आपणच जबाबदार आहोत असं वाटायला लागलं .ते अस्वस्थ पणे येरझारा घालत होते . रात्रीची जेवणं उरकली होती .. इच्छा अशी नव्हती ,पण शरीर धर्म म्हणून दोन घास पोटात ढकलणं गरजेचं होतं . 

   डोळ्यांसमोरून गरगरेचं शरीर हालत नव्हतं ,त्यात रस्त्यावर पसरलेला त्यांचा अगडबंब देह डोळ्यांसमोरून जात नव्हता . रात्रीच्या अंधारात गुडूप अंधारात त्या आठवणी अंगावर काटे आणत होत्या . बाकी बडबडे परिवार बिनघोर झोपला होता . पण बडबडेंच्या फेऱ्या मारणं चालूच होतं . 

      रात्र वाढत गेली ,फिरून फिरून बडबडेंच्या पोटऱ्यांमध्ये गोळे यायला लागले . तसे ते बंगलीवर विसावले .....  बंगळी  मागे पुढे  व्हायला लागली ,नजर समोर अंधारात स्थिरावत काही तरी शोधत होती . काय ते त्यांना ही  कळत नव्हतं ,असं का होतंय ते ?पण ! अंतर्मन ग्वाही देत होतं ,काहीतरी घडण्याची वाट पाहत होतं , 

  आणि तो क्षण आला ..... अंधाराला नजर सरावली ,तशी दूर काही तरी हालचाल जाणवली . तसे बडबडे डोळे बारीक करून एकटक पाहत राहिले . आणि बडबडेंच्या मणक्यातून थंडगार सणक खालपर्यंत गेली ! एक मोठ्ठच्या मोठ्ठं  धूड त्यांच्या दिशेने येत होतं , डोलत डोलत . 

      हा गरगरे तर नाही ?.....  अंगावर जेवढे केस होते ,तेवढे ताठ झाले . ... हो ... गरगरेच ! समोर  मिट्ट अंधार होता ,पण जी नजर त्यांच्यावर रोखली  होती ती काळजाचा वेध घेत होती . बडबडेंच्या डोक्याला मुंग्या यायला लागल्या . आपण पाहतोय तो आपला भ्रम तर नाही ? कदाचित दुपारपासून तोच विचार करत असल्याने असू शकतं ,भासच ...... !

        ते एवढा विचार करत होते ,तोपर्यंत स्वारी डोलत डोलत बडबडेंच्या कंपाउंड पर्यंत पोहोचली !पण चेहेऱ्यावर मिश्किल भाव होते ,बडबडे घाबरले होते ,पण तोंडातून आवाजच निघत नव्हता . भू...त ! भू....त ! इतकाच काय तो  आवाज बडबडेंच्या तोंडून निघाला . आणि तोपर्यंत .... गरगरेचं जे काही भूत कि काही होतं त्यांच्यासमोर येऊन उभं राहिलं .  

   " बडबडे मी काय म्हणतो ? ती बासुंदी आहे का हो ?  एकदम फक्कड होती . म्हटलं दोन तीन वाट्या पिऊनच घ्याव्यात  ! " बडबडेचं शरीर बधिर झालं होतं . पण बुध्दी ? ती तर काम करत होती ?मनात विचार आलेच ! 'अरे हा दुपारी खाऊन खाऊन मेला तरी बासुंदी प्यायला परत आला ! माणूस आहे कि काय ? '

  ' नाही !याला माणूस कसं म्हणणार ? हा तर ....... "ओ बडबडे !..... असं म्हणत म्हणत ते जवळ यायला लागले . त्यांची बडबड सुरूच होती . तुमच्या सारखा यजमान महत भाग्याने  मिळतो . जो अतिथींची एवढी ठेप ठेवतो . मला राहवलं नाही ! म्हटलं  शेवटची इच्छा होती ती अपूर्ण राहिलेली , तुमच्याकडूनच पूर्ण करावी ! कराल ना !" "ओ ... बडबडे ...?"

     पण बडबडे जागच्या जागी आडवे झाले होते .कदाचित त्यांची शुद्ध हरपली असावी . काही क्षणात त्यांची  पत्नी  त्यांना बघायला आली ,त्यांनी आरोळी ठोकली . व धावत जाऊन तांब्यात पाणी घेऊन आली .. .. बडबडेंच्या तोंडावर पाणी शिंपडलं . तसे बडबडे शुद्धीवर आले , भू....त ,भ...उ...त ! ते थरथरत होते . 

    " अहो काय बडबडताय ? चला झोपायला ? पण बडबडे जागचे हालेनात . त्यांना सावरायला बराच वेळ लागला , त्यांनी बायकोला विचारलं ,"अगं ,बासुंदी उरलीय का ? " त्यांची पत्नी अनघा , तिला समजेना ,हे असं का विचारताहेत ? "अहो काय बडबडताय ? तब्येत बरीय ना ?रात्रीचा एक वाजत आला , आणि  तुम्ही  झोपायचं सोडून  बासुंदी कसली मागताय ?" 

         "अगं, मला नकोय ,तो गरगरे परत आलाय ,बासुंदी प्यायला ! त्याला आवडली होती म्हणे , दुपारी अजून पिणार होता . पण हे असं झालं , त्याची इच्छा अपूर्ण राहिली शेवटची... "  "अहो ते कसे येतील ?" "कसं ,माहित नाही ? पण तो आला होता !" बडबडे अवती भवती पहात म्हणाले.  पण त्यांना कुणी दिसलं नाही , आणि....  नजर बाहेर गेली . कुंपणाच्या बाहेर तेच गलेलठ्ठ व्यक्तिमत्व उभं राहिल्यासारखं भासत होतं . आपली इच्छा पूर्ण होण्याची वाट बघत !

      बडबडेनी तिकडे हात केला ,"तो बघ तिथे थांबलाय !" अनाघाबाईंनी तिकडे बघितलं "अहो चला ,झोपा आता !तुम्हाला भास होतायेत ! तिथे कुणी नाहीय .  आणि ....  बडबडे ?...  त्या भासमान आकृतीकडे  पाहात पाहात घरात गेले व दार बंद केलं . 

    आणि ... गरगरे  आपली शेवटची इच्छा कधी पूर्ण होणार ,याची वाट पाहात तिथेच थांबले.......  


                                                         THE END

VISIT OUR YOU TUBE CHANNEL 

                                                 लेखक :योगेश वसंत बोरसे. 


  • ALL RIGHTS RESERVED AT YOGESH BORSE & BGSM
  • ABOUT US
  • PRIVACY POLICY  

  •  ⧭⧭⧭⧭⧭⧭⧭⧭⧭⧭⧭⧭⧭⧭⧭⧭⧭⧭⧭⧭⧭⧭⧭⧭⧭⧭⧭⧭⧭⧭⧭⧭⧭⧭⧭⧭⧭⧭⧭⧭⧭⧭⧭⧭⧭⧭⧭⧭⧭⧭




















 










 








 










 

   
Previous
Next Post »