चाहूल - मराठी भयकथा - MARATHI HORROR STORY

                                        चाहूल - मराठी भयकथा - MARATHI HORROR STORY  

MARATHI HORROR STORIES
 MARATHI HORROR STORIES

   

                                                लेखक : योगेश वसंत बोरसे. 

    रात्रीची निरव शांतता. सुधीर आपल्या घरात बेडवर शांत झोपलेला होता. मध्ये कशल्याश्या आवाजाने झोप चाळवली पण कूस बदलून परत झोपला. आणि काही वेळात करकरत दरवाजा उघडला. पाठोपाठ त्याच्या कानापर्यंत शब्द पोहोचले, " सुधीर........." 

               सुधीर बहुतेक स्वप्नात असावा. स्वप्न व आवाज एक झाले असावेत. सुधीरच्या चेहेऱ्यावर गोड हास्य तरळलं. तो स्वप्नातच बडबड करू लागला. " मानसी तू आलीस ? शेवटी आलीसचं ! मला खात्री होती माझी मानसी मला सोडून जाणार नाही म्हणून. आय लव यु मानसी !" "सुधीर......." परत आवाज आला. 

          वातावरणातील बदलांची नोंद सुधीरच्या शरीराने घेतली होती. उघड्या दरवाज्यातून थंडगार हवेसोबत काहीतरी आलं होत. तशी त्याने झोपेतच रजई अंगावर ओढली. "काय हे मानसी... झोपू देना ! " त्याने पुन्हा कूस बदलली. तसा  दरवाजा हळूहळू बंद व्हायला लागला. 

         
सुधीरचं मांजर त्याच्या पायाशी झोपलं होतं . त्याने काही पाहिलं असावं ,ते म्यांव म्याव करत उठून बसलं व दरवाजा बंद व्हायच्या आत बाहेर पळालं .दरवाजा बंद झाला तसा  आवाज ही बंद झाला . काही क्षणात सुधीरला जाग आली .तो डोळे चोळत उठला . बाथरूमला जाणं गरजेचं होतं .त्याच्या मनात विचार आला 'मानसी आली होती ? पण स्वप्नात की प्रत्यक्षात ? त्याला आठवत नव्हतं. 

            आपल्याला स्वप्न पडलं त्यात ती दिसली. व कानावर आवाजही आला. मग नेमकं काय घडलं ? त्याने लाईट लावला व बाथरूमकडे जायला लागला. तर घरात त्याला कचरा व मातीचे कण व घाण दिसली. 

              " ही म्याऊ पण ना, बागेत फिरते. तशीच घरात फिरते. सगळी माती माती केली." पण त्याच्या लक्षात आलं, माती व पालापाचोळा जसा दिसत होता, त्यावरून म्याऊचा याच्याशी काही संबंध असेल असं वाटत नव्हतं. बहुतेक हवेने दरवाजा उघडला असेल व कचरा मध्ये आला असेल. तो बाथरूमकडे निघाला आणि त्याला स्पर्श जाणवला. सुधीर..... " मानसी ! तू ? अगं कुठेस तू ? मला दिसत का नाहिएस ? " तो वेड्यासारखा स्वतः भोवती फिरायला लागला. 

                 
" कारण मी अस्तित्वात नाही. पण तुझ्या प्रेमाने मला इथपर्यंत ओढून आणलं ! " " अस्तित्वात नाहीस ? अगं काय बोलतेस ? कळतंय का ? " " कारण दादाने मला संपवून टाकलं ! " " काय ? " " हो. त्याला तू पसंत नव्हतास व मी पण हट्टाला पेटले होते. 

            "  त्याने कुऱ्हाड डोक्यात घातली आणि मला मळ्यात खड्डा करून त्यात गाडलं. त्याने मला मारलं त्याचा त्याला पश्चाताप झाला पण याला तू कारणीभूत आहेस असं त्याला वाटतंय म्हणून तो इकडे निघालाय. " " मानसी अगं काय बोलतेस तू ? म्हणजे तू जिवंत नाहीस मग मी जागून काय करू ? " सुधीर रडवेल्या स्वरात म्हणाला. 

                " नाही सुधीर, तुला माझी शप्पथ  आहे ! तुला जगावंच लागेल. फक्त दादा यायच्या आत तू इथून निघून जा. नाहीतर तो तुलाही संपवेल. " " चालेल मला.  निदान तुला तरी भेटता येईल. " तेवढ्यात बाहेरचं दार धाडधाड वाजायला लागलं. " बघ तुला म्हटलं होतं दादा इथे कधीही पोहोचेल." मानसीचा रडवेला स्वर कानी आला. तसा  सुधीरला ही गहिवरून आलं. " मानसी रडू नकोस, तुझ्या शिवाय मी ही जगू शकणार नाही. "

                   दारावर लाथा पडू लागल्या, जसं काही बाहेरची व्यक्ती दरवाजा तोडण्यास आतुर झाली होती. " ए भ्याडा ! दरवाजा उघड ! कुठे लपून बसलास ? " आवाज येत राहिले. तसं   सुधीरचं रक्त उसळलं. " माझ्या मानसीला संपवलं या नालायकाने ! याला जगण्याचा काही अधीकार नाही ! त्याने दाणकं काढलं व दरवाज्याच्या दिशेने धावला मानसी त्याच्यामागे आर्जव करत राहिली. आणि तेवढ्यात दादाची किंकाळी ऐकू आली. सुधीरने  पटकन दरवाजा उघडला. समोर बघितलं, मानसीचा दादा रक्ताच्या थारोळ्यात पडला होता, तडफडत होता.

           
' याला कुणी मारलं ? ' त्याची अवस्था पाहून सुधीरला राहावलं नाही. त्याने हातातलं दाणकं खाली फेकलं व दादाकडे गेला. दादा  शेवटच्या घटका मोजत होता. सुधिरने  रडक्या स्वरात विचारलं, " दादा काय केलं हे ? " 

           " सुधीर मला माफ कर. मी जे केलं त्याची शिक्षा मला मिळाली. मी असं नव्हतं करायला पाहिजे. माझ्या लाडक्या बहिणीला मी रागाच्या भरात संपवलं व तिचं प्रेत घाईघाईत मळ्यात पुरलं. " तो हाथ जोडून म्हणाला, " मानसीला मुक्ती दे. तिचा अंतिमसंस्कार कर नाहीतर तिचा आत्मा....... दादा...... मानसी........ मानसी.... कुठे आहेस..... " दादा काय झालं रे ! " मानसीचा रडवेला स्वर कानी आला. " तुला कुणी मारलं ? " 

           
    " मानसी आपले हितशत्रू कमी असतात का ? त्यातीलच एकाने संधी साधली. जाऊ दे, नशीब दुसरं काय ? " हळूहळू दादाची धडधड कमी व्हायला लागली. व मानसीचं  धूसर रूप त्याच्यापुढे हळूहळू स्पष्ट व्हायला लागलं. 

             
  अर्थ स्पष्ट होता तो मृत्यूच्या जवळ पोहोचला होता. काही वेळात सायरन वाजवत पोलिसांची व्हॅन आली व सुधीरच्या दारात थांबली. तशी एवढ्या रात्री पोलीस काय करायला आले म्हणून लोक जमायला लागले. आणि पोलिसांना दारात दोन प्रेतं पडलेली दिसली.  

                  हो एक दादाचं व एक सुधीरचं....... त्याची मानसी गेली होती तो तरी जागून काय करणार होता. त्याने कुऱ्हाडीनें स्वतः ला संपवलं होत. पोलीस सुधीरला अटक करायला आले  होते. पण आता तो या सगळ्यांच्या पलीकडे गेला होता. तो व मानसी आता सोबत राहणार होते. जगातील कोणतीही ताकद त्यांना एकमेकांपासून आता वेगळं करू शकणार नव्हती ...........


                                                      THE END 

VISIT OUR YOU TUBE CHANNEL

                                               लेखक:योगेश वसंत  बोरसे 

➣➣➣➣➣➣➣➣➣➣➣➣➣➣➣➣➣➣➣➣➣➣➣➣➣➣➣➣➣➣➣➣➣➣➣                                                 ➣➣➣➣➣➣➣➣➣➣

               





             ⧭⧭⧭⧭⧭⧭⧭⧭⧭⧭⧭⧭⧭⧭⧭⧭⧭⧭⧭⧭⧭⧭⧭⧭⧭⧭⧭⧭⧭⧭





    


Previous
Next Post »