एक होता विचार - MOTIVATIONAL SPEECH
MOTIVATIONAL SPEECH |
विचार आणि लेखक : - योगेश वसंत बोरसे .
मित्रांनो, महाभारत म्हटलं की आपला आवडीचा विषय. अशी व्यक्ती सापडणं मुश्किल आहे ज्याला महाभारता बद्दल काही माहित नसेल, रामायणाबद्दल काही माहीत नसेल. भारतीय संस्कृतीचे हे मुख्य आधारस्तंभ.
त्यात मुख्य म्हणजे ' भगवद्गीता ' जी स्वतः परमेश्वराने सांगितली. महाभारताचं महत्व अनन्य साधारण वाढलं. रामायण आपल्याला त्याग करायला शिकवतं. दिलेला शब्द पाळायला शिकवतं. त्यासाठी अगदी प्राण गेले तरी बेहत्तर. आणि महाभारत आपल्याला हक्काचं जे काही असेल ते हक्काने मिळवायला शिकवतं.
तसं तर आपण पावलो पावली काही न काही शिकत असतो. कळत, नकळतपणे. कुणी मान्य करतं कुणी नाही. जिथे लोकं देवाचं अस्तित्वच प्रश्नचिन्हात ठेवतात तिथे आपल्यासारख्याच्या मताला कोण विचारात घेतो !
पण काही व्यक्तिरेखा अशा असतात, की त्या त्यांच्या मताशी ठाम असतात. इतक्या ठाम असतात की त्यामुळे सभोवतालचं वातावरण ढवळून निघतं. गढूळ होतं. इतिहास घडतो, बिघडतो. साम्राज्य उभी राहतात, नष्ट होतात. जगाचा नकाशा बदलण्याची ताकद या लोकांच्या विचारात असते.
आणि आपल्याला आपल्या विचारांवर ठाम राहता येत नाही. दिलेला शब्द पाळता येत नाही. त्यामुळे आपल्या शब्दाला किंमत मिळत नाही. मग आपण इतरांना कोसतो. व जग आपल्याला कोसतं . जग म्हणजे पृथ्वी नव्हे. ज्यांच्या सोबत आपण राहतो, वावरतो आयुष्य काढतो तेच आणि तेवढंच आपलं खरं खुरं जग असतं. आपण ज्या समाजात राहतो, ज्या देशात राहतो त्या गोष्टी सामान्य माणसावर जास्त परिणाम करत नाही.
ज्याची व्याप्ती मोठी, पसारा मोठा, स्वप्न मोठे, महत्वकांक्षा मोठी, त्याला तर जग ही कमी पडतं. पृथ्वी पादाक्रांत करायला कमी पडते.
पण समजा एखाद्या आडबाजूच्या गावातील एखादा मेंढपाळ असेल, गुराखी असेल, सामान्य रोजंदार असेल त्याच्यावर इतर जगाचा फारसा प्रभाव पडत नाही. समजा एखादा गुराखी असेल तर त्याचं विश्व तेवढंच. आपल्या गुरांची, मेंढयांची, बकऱ्यांची कळपाची राखण करणं. त्यात त्याची वर्षानुवर्ष, पिढयानपिढया संपून जातात. पण त्यांचा जीवनक्रमात फारसा काही फरक पडत नाही.
थोडक्यात काय, तर ज्या व्यक्ती आपल्यावर अवलंबून असतात, किंवा आपण ज्यांच्यावर अवलंबून असतो तेच आपलं जग. मग त्यांचीही फरपट होते. कधी चांगलं पदरात पडतं, कधी वाईट. बहुधा वाईटच अधिक असतं.
रामायणात ,महाभारतात जगाच्या इतिहासात अशी अनेक उदा. आहेत . ज्यांनी जग बदललं . आपल्या सभोवतालचं . आपल्यावर अवलंबून असणाऱ्या लोकांचं . काहींचे परिणाम दूरगामी ठरले .
अगदी महाभारत म्हटलं तर राजा भरत पासून ते युधिष्ठिर राजा होईपर्यंत जेवढे व्यक्तिमत्व त्यात होते त्या प्रत्येकाने त्या वेळच्या समाजावर परिणाम केला . म्हणजे अगदी युधिष्ठिर राज्य जिंकेपर्यंत .
महाराज शंतनूंना उतारवयात एका स्त्री चा मोह पडला . जी मत्स्यकन्या म्हटली जायची , 'सत्यवती '! ज्या वेळेस मुलगा लग्न करण्यासारखा होता त्या वेळात स्वतःचा विचार करणे कितपत योग्य होतं ? सत्यवती जर शंतनूला भेटली नसती तर कदाचित महाभारत घडलं हि नसतं .
पण महाराज शंतनू तोच विचार सतत करत राहिले . एक दिवस त्याच विचाराने देवव्रत ला जाणीव झाली . कि आपले वडील दुःखी आहेत . त्याने मुलाचं कर्तव्य म्हणून विचारपूस केली ,इथपर्यंत ठीक होतं , ते त्यांचं कर्तव्य होतं . पण त्या वयात वडिलांचं लग्न लावून द्यायचं ,सावत्र आईच्या सुखासाठी ,समाधानासाठी स्वतः आजीवन ब्रह्मचर्याची भीष्म प्रतिज्ञा करणं ,हा पण एक विचारच होता . तो एक विचार नसता आला तर आणि त्यावर ते ठाम नसते राहिले तरी पुढचा अनर्थ टळला असता .
बरं ,देवव्रताने जी प्रतिज्ञा केली त्याचा कुणाला खूप काही फायदा झाला असं हि नाही . आयुष्यभर भीष्माला त्रास झाला आणि त्याच्या अवती भवती वावरणाऱ्या सर्वांना ,पर्यायाने संपूर्ण भारत वर्षाला त्रास झाला . मग हा अट्टाहास कशासाठी ? 'मीच बरोबर !' हि वृत्ती किती संयुक्तिक आहे ?
भीष्म बलवान होता ,पराक्रमी होता , शूर होता ,धाडसी होता . जर त्याचं लग्न झालं असतं तर येणारी पिढी बलवान राहिली असती . सामर्थ्यवान राहिली असती . व भारताला सौष्ठव पूर्ण राजे मिळाले असते . पण नाही . हम करे सो कायदा ह्या वृत्तीने पूर्ण भारत वर्षावर त्याचे दूरगामी परिणाम झाले . कदाचित त्यामुळे आपला भारत आज असा असावा .
चित्रांगद व विचित्र वीर्य हि शंतनू ची दोन्ही मुलं वारल्यावर राज्याला वारस नव्हता . सत्यवतीला आपली चूक कळाली होती . तिने भीष्माला भरपूर समजावलं पण त्याने माघार घेतली नाही . परिणाम काय झाला तर सत्यवतीला शंतनुशी लग्न होण्याअगोदर झालेल्या मुलाकडून वंश वृद्धी करावी लागली .
शंतनुशी लग्न होण्या अगोदर सत्यवती एकदा पराशर मुनींच्या संपर्कात आली होती . तिने त्यांची मनोभावे सेवा केली . त्यांनी तिच्यावर प्रसन्न होऊन तिला पुत्र प्राप्तीचा वर दिला . पण त्याच बरोबर तिचे कौमार्य अबाधित राहील असाही वर दिला .
बरं ,जेव्हा अम्बा , अंबिका , अंबालिका यांचं स्वयंवर होत होतं तेव्हा तिथे भीष्माने आमंत्रण नसताना जाऊन सर्व राजांचा अपमान करून त्यांचा पराभव करून तिन्ही राजकन्याना बळजबरी उचलून आणलं . बरं ,स्वतः त्यांच्याशी लग्न केलं असतं तर त्यांना हि काही वाटलं नसतं . पण नाही इथेही घोळ घातला .
अम्बाचं शाल्व नरेश वर प्रेम होतं ,त्यामुळे सत्यवतीने तिला परत पाठवलं . व या दोघींचा विवाह आपल्या मुलाशी लावून दिला . पण शाल्व नरेशाने अंबाला स्वीकारलं नाही ,तेव्हा ती पुन्हा भीष्माकडे आली . तर भीष्माने आपल्याला बळजबरीने पळवून आणलंय तर आपल्याशी विवाह करावा . हि तिची सार्थ अपेक्षा होती . पण घोडं पुन्हा अडलं . भीष्म ब्रम्हचर्यावर ठाम राहिला . आणि एका निरागस राजकन्येचा विनाकारण बळी गेला. तिने पुन्हाशिखंडीच्या रूपाने जन्म घेतला व भीष्माच्या मृत्यूला कारणी भूत ठरली .
अंबिका ,अंबालिका विधवा झालेल्या , कुरुवंशाला वारस नाही , भीष्म अडून बसला प्रतिज्ञेवर ! तेव्हा सत्यवतीच्या पहिल्या मुलाला म्हणजे महर्षी व्यास याना पाचारण करण्यात आलं . वंश वृद्धीसाठी . व त्यांची सेवा करण्यासाठी प्रथम अंबिकेला पाठवण्यात आलं . तिला याची कल्पना नसावी कि आपल्याला पुत्र प्राप्तीसाठी व्यासांकडे पाठवण्यात आलंय . पण हेतू समोर येताच ती घाबरली व तिने डोळे बंद करून घेतले .
परिणाम काय तर एका आंधळ्या पुत्राचा जन्म झाला ,ज्याने पुढे सत्यानाश केला . अंबिके नंतर अंबालिकेला व्यासांकडे पाठवण्यात आलं ,तिला ही उद्देश माहित नसावा . ती तर भयाने पांढरी फट पडली . परिणाम अंबालिकेचा पुत्र पंडुरोगी निपजला . त्याचं नांव पांडू ठेवण्यात आलं . दोघीही सासूच्या आज्ञेचा विरोध करू शकल्या नाहीत . तिसऱ्यांदा सेवेसाठी दासीला धाडलं अंबिकेने तिच्याजागी . पण दासी म्हटल्यावर तिचं काम सेवा करण्याचं होतं ,त्यामुळे ती पूर्ण समर्पित होती . व तिने महर्षी व्यासांची मनोभावे सेवा केली . परिणाम असा झाला कि एक कुशाग्र बुद्धीचा पुत्र जन्मला ,जो पुढे विदुर नावाने प्रसिद्ध झाला .
यावरून एक गोष्ट सिद्ध होते कि स्त्री व पुरुष जेव्हा एकत्र येतात तेव्हा त्यांच्या मनातील विचार त्या गर्भावर परिणाम करतात . त्या जीन्स वर परिणाम करतात . जर मिलनाच्या वेळेस दोघांच्या मनात प्रेम भाव असेल तर अपत्य प्रेमळ निपजतं . जर मनात द्वेष ,तिरस्कार ,भीती ,भय ,राग ,असंतोष असेल तर अपत्यावर त्याचाही परिणाम होतो .
याची महाभारतात वारंवार प्रचिती येते .....
THE END
विचार आणि लेखन : योगेश वसंत बोरसे .
- ALL RIGHTS RESERVED AT YOGESH BORSE & BGSM.
- ABOUT US
- PRIVACY POLICY
ConversionConversion EmoticonEmoticon