फट्टू - भाग - ४- मराठी भयकथा - HORROR STORY MARATHI

                              फट्टू  - भाग  - ४- मराठी भयकथा  - HORROR STORY MARATHI 









फट्टू :- भाग -४-मराठी भयकथा -

          सूचना :- ही  एक काल्पनिक  भय कथा असून , वाचकांच्या सोयी साठी ही  दीर्घ भयकथा २० भागात विभागली आहे ! प्रत्येक भाग ,प्रत्येक प्रसंग भयचकित करणारा ,हूर हूर लावणारा ,आपल्याशी जवळीक साधणारा , गूढ गोष्टींकडे आकर्षित करणारा , आपल्या अवती भवती बघायला भाग पाडणारा आहे . वाचकांना विनंती आहे की  त्यांनी पूर्ण कथेचा आनंद घ्यावा . तुम्हाला नक्कीच आवडेल !

           सावित्रीने प्रेमाने आईकडे बघितलं .पण तिला कोडं पडलं होतं की आई एवढी कशाला घाबरलीय . तिने पुन्हा विचारलं . " काही स्वप्न पाहिलं का ? " आता हिला काय सांगणार ? "हो स्वप्नंच होतं . बरं तू जरा पड ,मी चहा झाला की उठवते तुला . " "बरं !" असं म्हणून सावित्री शांत झोपली . 
       काशीबाईंनी तिच्या डोक्यावरून मायेने हात फिरवला . तशी लहान मुलासारखी ती त्यांना बिलगली . काशीबाईंना गहिवरून आलं . त्या हात फिरवत राहिल्या ,थोपटत राहिल्या . काही वेळात सावित्रीला झोप लागली . तसा त्यांनी हळूच तिचा हात बाजूला केला . व अलगद उठल्या . स्वयंपाक घरात गेल्या . 
      स्वयंपाक घर चकाचक होतं . म्हणजे हिने सर्व आवरलं तर ? त्या पटकन बाथरूममध्ये गेल्या . दोन तांबे अंगावर ओतले . कपडे बऱ्यापैकी वाळले होते . देवाजवळ जाऊन प्रार्थना करू लागल्या . तेवढ्यात दार वाजलं . 
     त्यांनी दार उघडलं . बाहेर समशेर व जावईबुवा उभे होते . तेनसिंगने काशीबाईंना विचारलं . " मामी एवढ्या रात्री पावसात कशाला  येत बसलात ? सकाळी आला असतात तरी चाललं असतं ! काही कमी जास्त झालं असतं मग ? " समशेर घरात पळाला ,त्याच्या आईकडे . "जावईबापू ,थोडं बोलायचं होतं ! " 
       तेनसिंगला हे नवीन होतं . लग्न होऊन पाच सहा वर्ष झाली होती .पण सासूचं काय ,सासरचं कुणीच त्याच्याशी धड  बोलत नव्हतं . कदाचित मुलबाळ नसल्याने असावं . तशी त्यांनाही सवय  झाली होती आणि यालाही ! व तीन वर्षांनंतर पाळणा हलला . त्यात पण मुलगाच व्हावा अशी तेनसिंगची इच्छा होती . व देवाने पूर्णही केली . आणि आता दुसऱ्यांदा पाळणा हलणार होता . म्हणजे तो योगायोग नव्हता . 
       आपण परिपूर्ण असल्याचं तेनसिंगने सिद्ध केलं होतं . व तो सुखावला ही होता . आता मुलगा हो कि मुलगी काहीही चालणार होतं . 
    "मामी ,बोलाना ! काय म्हणता ? " पण तेवढ्यात सावित्रीचा आवाज आला . व काशीबाई न बोलता तिकडे गेल्या . तेनसिंगला कळेना ? 'या तर काहीच  बोलल्या नाहीत ? ' पण त्याला एक गोष्ट समजली ,जाणवली . या घाबरल्यात म्हणून ! समशेरने रात्री पुन्हा काही  पराक्रम केला की काय ? नक्कीच !' पण डायरेक्ट कसं बोलणार ? त्याला राहवलं नाही ! त्याने सावित्रीला विचारलं . 
     "समशेरने रात्री काही त्रास नाही ना दिला ? " "नाही ! तो तर शांत झोपला होता . पण तुम्ही असं का विचारताय ?बरं ,आई आणि तुम्ही बसा बोलत ! मी चहा आणते ." 
  तेवढ्यात काशीबाई आल्या ,"अगं ,तुम्ही बसा ,तू मघाशी मला सांगितलं  होतं चहाचं ! विसरलीस की काय ? बसा बोलत,मी आणते ." "बाळा तू दूध घेणार ना ? चल ! " समशेर उड्या मारत आजीमागे पळाला .तसं तेनसिंगने घाईघाईत विचारलं ," सावित्री ,रात्री काय झालंय ? तुझी आई कशाला घाबरलीय ? " 
     अहो ,मलाही काही कळत नाहीय ! आणि काही आठवत हि नाही . सकाळी उठले तेव्हा सर्व घरात उष्टे भांडे खरकटं पडलेलं होतं . आवरता आवरता माझं कंबरडं मोडलं . मी आईला विचारलं ही , पण तिने सांगायचं टाळलं . तेवढयात काशीबाईंनी चहा आणला . व हा विषय बंद झाला. 
      " बरं तायडे मी काय म्हणते, पाऊस उघडलाय थोडं मंदिरात जाऊन यायचं का ? " " हो चालेल ना ! जाऊ आपण ! " सावित्री आनंदाने म्हणाली. तेनसिंगने ही होकार दिला. " तुम्ही जाऊन या, मी झोपतो जरा. " काशीबाईंचा हिरमोड झाला. त्या काही बोलल्या नाही पण तेनसिंगला ते समजलं, की यांना नक्की काही बोलायचंय. " चला मग मी पण येतो, जरा वेळ ! बरीच वर्ष झाली, सासूबाईंशी मोकळ्या गप्पा मारल्या नाहीत. आज संधी मिळालीय. " त्याने मिश्कीलपणे सांगितलं. 
        तसं काशीबाईंना बरं वाटलं. आणि सावित्री खळाळून हसली. आणि तिच्या मोहक रूपाकडे काशीबाई व तेनसिंग पाहात राहिले. फक्त दोघांच्या मनातील विचार वेगळे होते. रात्री तिचं भयावह रूप काशीबाईंनी पाहिलं होतं. ते खरं की हे लोभसवाणं रूप खरं ? हाच विचार त्या करत होत्या. 
       आणि तेनसिंग, त्याची नजर तिच्या पूर्ण अंगावरून फिरली. ' कशी भरलीय ! गच्चं ! खव्याच्या  करंजीसारखी, असं वाटतं.... ' " ओ SSSS चला, काय पाहताय ? मंदिरात जायचंय. " तेनसिंगच्या नजरेने सावित्रीही सुखावली होती. "मी ,चूक केली ! रात्रीच घरी यायला पाहिजे होतं . तेनसिंग सावित्रीकडे सूचक पहात म्हणाला . "" अहो आई आहे समोर ! काही वाटतं  की  नाही ? चला !" सावित्री चा चेहेरा पुन्हा आरक्त झाला .  समशेरला दूध पाजून सर्वजण बाहेर पडले. 
          दार बंद करून कुलूप लावलं व रमत गमत इकडच्या, तिकडच्या गप्पा मारत जवळच एक मंदिर होतं. तिथे पोहोचले. समशेरची आज मज्जा होती. आज दुसऱ्यांदा फिरायला आला होता. पण तो मंदिरात जायचा नाही. घंटेचा आवाज ऐकला की घाबरायचा व रडायचा. तशी मंदिरात वर्दळ कमीच असायची. पण सावित्री व तेनसिंग शक्यतो घंटा वाजवायचं टाळायचेच. आणि मंदिरात गर्दी असली  तर एकजण बाहेरच थांबायचा व एकजण जाऊन दर्शन घ्यायचा. 
      '  देवाला नवस करून मुलगा मागितला होता पण हा जगावेगळा नमुना पदरात पडला होता. असं म्हणतात की घंटेचा ध्वनी वातावरणातील निगेटिव्ह एनर्जी नष्ट करतो व पॉझिटिव्ह एनर्जी वाढवतो. पण याला तो आवाजच सहन व्हायचा नाही. याचा अर्थ काय होता ? हा मुलगा निगेटिव्ह एनर्जी स्टोर करत होता की त्या घेऊनच जन्माला आला होता ?
       पण आता काय करणार ? पर्याय नाही ! मोठा झाल्यावर कदाचित नॉर्मल होईलही पण हा मोठा तरी होईल का ? ' तेनसिंग आपल्याच विचाराने दचकला. 'काय हा अभद्रपणा ! आपण मंदिराच्या आवारात आहोत.' मंदिरात बऱ्यापैकी गर्दी होती, मधेच घंटा वाजत होती.  पण अजूनतरी समशेर शांतच होता व तो शांतच राहावा, याची काळजी घेणं गरजेचं होतं. 
       दोघी दर्शन घेऊन आल्या व तेनसिंगही जाऊन आला. पावसामुळे वातावरण प्रसन्न झालं होतं. सावित्री सुखावली होती व तिच्यासारखी धरित्रीही सुखावली होती, फुलली होती, बहरली होती. समशेर इकडे तिकडे पळत होता. व सावित्रीही फिरत फिरत थोडी लांब गेली. 
      काशीबाई जणू वाटच पाहत होत्या व तेनसिंगही. " जावईबापू.... " " मामी काय झालंय ? " काशीबाईंनी भराभर रात्रीचा प्रसंग सांगितला. तसा तेनसिंगला जबर धक्का बसला. जिचं लोभस रूप पाहून आपण मघाशी सुखावलो होतो. तिने आदल्या रात्री असं काही केलं असेल ? पण समोर तिचीच आई होती. आणि त्यांना खोटं बोलण्याचं काही कारण नव्हतं. 
      सावित्री त्यांच्या दिशेने यायला लागली, तसा काशीबाईने विषय आवरता घेतला. सावित्रीलाही कळालं असावं, की हे काहीतरी आपल्याबद्दल बोलतायत म्हणून. " काय गप्पा चालल्यात ? " तिने पुन्हा मोहकपणे हसत विचारलं. " काही नाही ! मामी म्हणतायेत, पोरीची काळजी घ्या, रात्रीचं असं एकटं सोडू नका आणि डोहाळे जेवणाचं काय करायचं ? " 
       " काही गरज नाही, डोहाळे जेवणाची ! उगाच खर्च नको. एकदा झालंय, पुरेसं आहे. बरं निघायचं का ? मला थकवा जाणवतोय. घरी जाऊन थोडा आराम करते. " सावित्री म्हणाली. तेनसिंगने समशेरला उचलून घेतलं. त्याचे पाय चिखलाने भरले होते. म्हणून धरलं, गणपतीसारखं ! व काहीवेळात घरी पोहोचले. विषय अर्धवट राहिला, पण काशीबाईंना आपल्या जावयाचं भूषण वाटलं, आपला जावई खरोखर हुशार आहे. रात्री घरात थांबणं गरजेचं आहे, हे नेमकं समजलं होतं त्यांना. त्यांनी  तसं स्पष्ट सांगितलंही होतं. 
        काशीबाईंची काळजी मिटली, ' रात्री बघू. एक से भले दो ! ' बघता बघता दिवस मावळला. सुर्याला  झाकून काळ्या ढगांनी आभाळात गर्दी करायला सुरुवात  केली. पाच - सहा वाजताच अंधारून आलं व गडगडाटाने पावसाला  सुरुवात झाली व समशेर पुन्हा खिडकीजवळ जाऊन उभा राहिला. आता तो आवाजाला घाबरत नव्हता. उलट कसलीतरी वाट पाहत होता व सावित्री त्याची रडण्याची वाट पाहत होती. ' कमाल आहे, एवढं अंधारून आलं, एवढे ढग गडगडतायेत पण हा हुं नाही की चूं नाही. म्हणजे हा आता बरा झालाय वाटत ! ' 
         " समशेर, ये बघू इकडे, पाऊस येतोय, आपण खिडकी बंद करू . " सावित्रीने आवाज दिला. पण समशेर जागचा हलला नाही. तेनसिंग खिडकीकडे गेला. " समशेर SSSS"  त्याने पुन्हा इशारा केला. तेनसिंगने समोर बघीतलं. काहीतरी दुरून वेगाने यांच्या दिशेने येत होतं. जे नक्कीच अमानवी होतं. तेनसिंगने घाईघाईने खिडकी बंद करायला हात बाहेर काढला पण तो जोरात मागे फेकला गेला,शॉक बसल्यासारखा ! आणि काहीतरी अमानवी येऊन खिडकीवर धडकलं, असं वाटलं ! व तेनसिंग मागे फेकला गेला आणि त्या सोबतच काशीबाईची किंकाळी हवेत विरली........      

                                            TO BE CONTINUED ...... 





                         👀👀👀👀👀👀👀👀👀👀👀👀👀👀👀👀👀👀👀👀👀👀👀













Previous
Next Post »