-: श्रद्धा :-
मित्रांनो ,नमस्कार . मी योगेश वसंत बोरसे तुम्हा सर्वांचं www.borsegroup.tech मध्ये स्वागत करतो . तुमच्या समोर आम्ही अशा काही रचना सादर करणार आहोत ज्या आपल्या आयुष्याशी जवळीक साधतात . आमचे ज्येष्ठ मित्र आणि सहकारी श्री .अरुण पाटील सर ,जे अरुण गरताडकर या नावाने प्रसिद्ध लेखक आहेत ,त्यांचे काही प्रसिद्ध लेख आम्ही इथे प्रस्तुत करत आहोत . जे त्यांच्या एका मराठी पुस्तकातून ' धनुकली ' जे खूप गाजलं होतं , त्यातून घेतले आहेत . जे ओघवत्या भाषेत तुमच्या समोर सादर करतोय . यासाठी श्री .अरुण पाटील सर यांनी आम्हाला परवानगी आणि प्रोत्साहन दिले आहे ,की आम्ही त्यांच्या रचना सादर कराव्यात ,ज्या तुम्हाला नक्की आवडतील अशी खात्री आहे आणि त्यासाठी आम्हाला आनंद ही आहे .
आपला :- श्री . योगेश बोरसे
एका स्त्री च्या घरामागे एक टेकडी होती . त्या टेकडीमुळे तिच्या घरात सूर्य प्रकाश येत नव्हता . सदासर्वदा घरात अंधार असायचा . तो घालवण्यासाठी रात्रंदिवस तिच्या घराचे दिवे लागलेले असत . इलेक्ट्रिकचं बिल भरून भरून ती वैतागली होती . उन्हाळ्यात तर कहर व्हायचा . साधी वाऱ्याची झुळूक ही घरात प्रवेश करायची नाही . जीव गुदमरून जायचा . अशावेळी ती घराबाहेर पडायची . थोडी ताजी तवानी व्हायची .
आजही ती तशीच बेजार झाली होती . घराबाहेर पडली तेव्हा कोणीतरी म्हटलं की ,बाजूलाच एक प्रवचन चाललं आहे . अरे वा ! उघड्यावर बसून ऐकण्याचा आनंद घ्यावा , असं तिच्या मनात आलं . ती सरळ श्रोत्यांत जाऊन बसली . 'श्रद्धा ' हा विषय प्रवचनात निरूपणाला घेतला होता . बोलण्याच्या ओघात महाराजांनी येशूचं एक प्रसिद्ध वचन वापरलं .
'यू कॅन मूव्ह माउंटन्स ' 'श्रद्धेने तुम्ही पर्वतालाही हलवू शकता !' ती अर्ध्यातच उठली . तडक घरी गेली . खिडक्या दारे बंद केली . परमात्म्याला म्हणाली . ," हे देवा ,श्रद्धेने सांगते , हा इथून हलवा . " डोळे मिटून बसली . चार -पाच मिनिटं झाली असतील नसतील ,डोळे उघडले . पर्वत जागेवरच होता ,जागचा हलला नव्हता .
ती उठली .हात झटकत म्हणाली , " धत तेरे की ! मला ठाऊकच होतं पर्वत हलणार नाही म्हणून . "
माझीही श्रद्धा याच प्रकारात मोडते . श्रद्धा ही शंभर टक्के श्रद्धाच असते. ९९ पॉईंट ९९ टक्के असली तरी ती पूर्ण ठरत नाही . संदेहाचा अल्पांश असला तरी अपूर्णच ठरते . तिला तर आधीपासूनच संदेहच नव्हे तर शंभर टक्के ठाऊकच होतं की ,पर्वत जागचा हलणार नाही . संदेह नव्यान्नव टक्के होता कि , पर्वत जागचा हलणार नाही . एक टक्का तेवढी श्रद्धा उपजली होती . ती ही तात्पुरती होती. सहज कानावर पडलेलं ते एक फक्त वाक्य होतं.
शब्दांमागे शब्द जुळवून तयार झालेलं वाक्य ! त्यात प्राण घालायचा असतो ,तो प्राण घालण्यासाठी माणसाला श्रद्धेची गरज असते . ती शक्ती माझ्यात नाही म्हणून की काय .... पण भागवत पूर्ण मला गोष्टीं सारखं वाटतं , आणि भगवत गीता केवळ तत्वज्ञान वाटतं . श्रद्धा पूर्णत्वाने उपजली असेल तर पुराण किंवा गीता हे माझं जीवन बनेल ,पण श्रद्धेची परीक्षा देतंय कोण ?
आणि श्रद्धेची परीक्षा देणं म्हणजेच संदेहाचं अस्तित्व नाही का ? तुमचा अनुभव काय आहे ?गीता ,पूराण वाचताना तुम्हाला असंच काही वाटतं का ? काय ?... ते हळू बोला . अजून हातात घेतलं नाही ? कसं घेणार ?सारं संदेहाचं शिक्षण घेतलंय तुम्ही . प्रोबॅबिलिटी ,तर्कशास्त्र ,कूटनीती ,राज्यशास्त्र ,चाणक्यनीती इ ... इ ... तेवढंच तुमच्या आयुष्यात येणार . श्रद्धा कुठून येईल ? आली तरी किती टक्के येईल ? तुमचे तर्क तिला हुसकावून लावतील .
मग मात्र संदेहाच्या राज्यातून हाक दिलीत तर कोणाच्याही कानापर्यंत तुमचा आवाज पोहोचणार नाही . आवाज द्यायला श्रद्धा लागते . कोणी 'ओ ' द्यावी म्हणूनच आवाज द्यायचा असतो .
➤➤➤➤➤➤➤➤➤➤
-: धारणा :-
एका प्रवचनात गुरु महाराज म्हणाले ,"दारू हि निंद्य वस्तू आहे .दारूचा निषेध केला पाहिजे . "
एका वयस्कर बाईने ठासून निषेध केला . म्हणाली ," दारू या समाजातून हद्दपार झालीच पाहिजे ."
दुसऱ्या प्रवचनात गुरु महाराज म्हणाले ,"चोरी करणं पाप आहे ,चोरी कधी करू नये . " त्या वयस्कर बाईने तीव्र शब्दात निषेध केला . "चोरी करणाऱ्यांचा निषेध असो . "
पुढच्या प्रवचनात अहिंसेचे महत्व पटवून देत गुरु महाराज म्हणाले . " हिंसेचा निषेध असो . " त्या वयस्कर बाईला हिंसा ठाऊकच नव्हती . तिने त्वेषाने हिंसेचा निषेध केला . पुढल्या प्रवचनात गुरु महाराज म्हणाले , " तंबाखू खाणं अयोग्य आहे , तंबाखू बंद केलीच पाहिजे ."
ती वयस्कर बाई पोक्तपणे म्हणाली ," आता मात्र हे चुकीचं आहे . एवढे मोठे गुरुमहाराज ! परमपिता ,परमात्मा ,आत्मा अशा गोष्टी त्यांनी कराव्यात . हे काय ? तंबाखू सारख्या क्षुद्र विषयावर बोलतात ? आपला आणि भक्तांचा वेळ दवडतात. खरं म्हणजे जगाच्या पाठीवर धर्म म्हणून काही शिल्लक राहिला नाही . "
ती वयस्कर बाई तंबाखू खात होती . वयाच्या पंधरा वर्षांपासून खात असली तरी तिचा संबंध कधीही दारू , चोरी , हिंसा या गोष्टींशी आला नव्हता.
पुण्य, कष्ट ,शुद्धता ,पावित्र्य ,शांती ,समाधान ,संतुष्टी ,ज्ञान , प्रेम अशा कितीतरी गोष्टींचा माझ्याशी संबंध आलेला नाही , म्हणून त्या गोष्टींबद्दल ऐकायला मला मजा वाटते . पण ज्या गोष्टी माझ्या रोमारोमात भरल्या आहेत ,त्यांच्यावर तुम्ही बोट ठेवलं तर मी तुमचा निषेध करतो . खोटं बोलणं हे काही इतकं वाईट नाही . लाचलुचपत घेणं हा तर जगाचा व्यवहार आहे . असं तुम्ही बोलू शकता . मी निषेध करणार नाही . अशा विधानांमुळे मला हिम्मत येते . कारण हे सगळं माझ्या धारणांना सुसंगत असं आहे .
मीच नव्हे , या पृथ्वी तलावरचा माणूस अन माणूस आपल्या धारणांशी एकरूप झालेला आहे . तपासून पहा .त्यात तुम्हीही आहात . तुमच्याही काही विशिष्ट धारणा आहेत. त्यांच्याच बळावर तुमचा जीवन प्रवास चालला आहे . तुमच्या धारणांना ज्या गोष्टींमुळे समर्थन प्राप्त होतं , त्या तुम्हाला योग्य वाटतात . बाकी साऱ्या अयोग्य असतात . योग्य - अयोग्य हे तुम्ही ठरवता . जीवन नाही . जीवनाला तर फक्त प्रवासाचा छंद आहे . ते फक्त पुढे पुढे चालत असतं . योग्य - अयोग्य ते बघत नाही . तुम्ही धारणांचे गाठोडे डोक्यावर घेतले आहे .
मी माझ्या डोक्यावरचे गाठोडे परवाच खाली फेकून दिलं . सगळ्या धारणांचा त्याग केला . लोक मला वेडा म्हणतात ते ठीक आहे ; कारण आताच मला जीवनाशी तादाम्य होण्याची कला अवगत झाली आहे . जीवनाच्या गतीचं गणित सुटलं आहे . योग्य ही तेच,अयोग्यही तेच . का खेळ करायचा या जीवनाचा ?
➢➢➢➢➢➢➢➢➢➢➢➢➢➢➢
-: भ्रम :-
आलिशान कार चालवत तो रस्त्याने गंभीर पणे जात होता . बाजूला एक मोटर सायकल वर बसून तिकडेच निघाला होता . कारच्या खिडकीतून त्याने मोठ्या ऐटीने कार मालकाला विचारलं ,"तू कधी 'हिरो होंडा ' चालवली आहे का ? " ' मूर्ख माणूस !' एवढी आलिशान कार घेणाऱ्याला हिरो होंडाची ऐट दाखवतो . कार मालकाने प्रत्युत्तर दिलं नाही . आपल्या कार चा वेग वाढवला आणि पुढे निघून गेला . हीरोनेही तेवढा वेग साधला . पुन्हा खिडकी जवळ जाऊन तोच घमेंडखोर प्रश्न विचारला , " कधी चालवली आहेस हिरो होंडा ?"
कार मालकाने प्रत्युत्तर दिलं नाही . पुन्हा कारचा वेग वाढवला . पार ऐंशीचा वेग . पुन्हा पुनरावृत्ती झाली . पुन्हा तेच . आता मात्र कार शंभरच्या पुढे गेली . त्यानेही प्रयत्न केला पण एका दगडावर ' होंडा ' आदळली . हिरोची घमेंड तुटली . तो जमिनीवर ठेचकाळला . उठताही येत नव्हतं .
कार मालकाला दया आली . तो गाडी थांबवून खाली उतरला . त्याला उचललं . ठीक ठाक केलं . मूर्ख असला म्हणून काय झालं ? त्याची विचारपूस केली . कण्हत कण्हत त्यानेही उत्तरे दिली .अगदी शेवटी न राहवून त्याने विचारलं, " तू सारखं सारखं असं का विचारत होता ? हिरो होंडा काय चीज आहे माझ्यासाठी ! अशा तीन कार आहेत माझ्याकडे. "
तो केविलवाणा होऊन म्हणाला, " अहो तसं नाही. हिरो होंडाचा ब्रेक कुठे आहे, हे मला ठाऊक नव्हतं. मला वाटलं तुम्ही सांगाल. एवढी गाडी वापरतात तर हिरो होंडा तुम्हाला नक्कीच ठाऊक असेल. " तेवढाच केविलवाणा मी आहे. मला तरी कुठे ठाऊक आहेत या ईश्वर निर्मित जीवनाचे ब्रेक ? कोण सांगेल मला या जीवनाच्या महत्वाच्या अंगाविषयी ?
मी तुम्हाला काल विचारलं होतं . तुम्हीही मला मुर्खात काढलं . मी पर्वा त्यांना विचारलं , तेरवा यांना विचारलं . कोणीही सांगितलं नाही . सांगितलं ते तर सारे भ्रम होते . इथेही ब्रेक नाहीत . तुम्ही सांगितल्याप्रमाणे मी तिथंही तपासलं . तिथंही ब्रेक नाहीत . मला शंका आहे की , तुम्हालाही ठाऊक असतील का म्हणून . पण तुम्ही ते उघड करणार नाहीत . तुम्ही मूर्ख ठरायला घाबरता आहात . घाबरा . घाबरत राहा . माझं काय जातं ?
घमेंड खोर म्हणा किंवा आणखी काही म्हणा . जगाला वीट येई पर्यंत मी विचारात राहीन . भ्रमनिरास होईपर्यंत हे विचारणं चालूच राहणार . कारण हे भ्रम मिटवणारा कोणीतरी जादूगार या दुनियेत अवतरला आहे , असं नुकतंच माझ्या कानावर आलं आहे . त्याच्या भेटीची केवळ प्रतीक्षा आहे .
जीवनाला वेग असेल तर त्या जीवनाविषयी सत्य माहित नको का ? भ्रमात तर घात होणारच !
➣➣➣➣➣➣➣➣➣➣➣➣VISIT OUR YOU TUBE CHANNEL ALSO
- ALL RIGHTS RESERVED AT ARUN GARTADKAR & BGSM
- ABOUT US
- PRIVACY POLICY
ConversionConversion EmoticonEmoticon