सावज - THE HUNT- PART - 2 - MARATHI BHAYKATHA - HORROR STORY

     सावज  - THE HUNT- PART - 2 - MARATHI BHAYKATHA - HORROR STORY


MARATHI HORROR STORIES
 MARATHI HORROR STORIES


                                     







             

 

   "अहो ,एक मुलगी सापडत नाहीये ! जरा मदत कराल का ? " सागर कळकळीने त्या माणसांना म्हणाला . " साहेब काय करायचं ते बोला . " "तिला शोधावं लागेल !" "अहो पण शोधणार कसं आणि कुठे ?" "किल्ला काय लहान आहे का जवळ पास  १० किलोमीटर चा एरिया असेल . आणि आता अंधार ही  होत आला . काही टॉर्च वगैरे आहे का ?" ते माणसं चौकशी करू लागले . "मोबाईल आहेतच . " "मोबाईल आहेत हो ,पण मोबाईल ची बॅटरी किती वेळ पुरणार ? आणि संपल्यावर काय करायचं ?" दुसरा माणूस समजदार होता ," ठीक आहे चला ,बघू सापडते का ! "

      "अहो असं काय बोलताय ?" सागर आता घाबरला होता . " साहेब हा किल्ला आहे ! गार्डन नाही संध्याकाळचं फिरायला ! इथे बऱ्याच घटना घडल्या आहेत ! तुम्हाला  माहित नाही का ?" सागर ला माहित होतं ,पण तो काही बोलला नाही , त्याला आता रश्मीची काळजी वाटत होती . पण निधी ने विचारलंच ,"पप्पा काय झालंय  इथे ? " तसा  एक जण पुढे आला ,"पोरी ,या किल्ल्यावर रात्रीचं फिरणं धोक्याचं ठरतं ,काहीही होऊ शकतं ! " निधीला कळेना हे कोड्यात का बोलतायत ,"पप्पा हे नेमकं काय सांगतायत ? " "बेटा ,तू लक्ष नको देऊस .  चला ,आपण रश्मीला शोधू !" 

    इकडे रश्मी त्या भूल भुलैया मध्ये अडकली होती . बऱ्याच वेळाने चाचपडत चाचपडत एका मार्गातून बाहेर निघाली . आजूबाजूचा पूर्ण भाग पडलेला होता . व एक मोठा वट वृक्ष समोर आ वासून उभा होता . संध्याकाळ च्या अंधारात तो भीषण दिसत होता . झाडाजवळ खाली बसायला एक पार होता . पार एकदम सुस्थितीत होता . 

   रश्मीला हि विसंगती लक्षात आली . 'सर्व भाग पडलेला असताना हि जागा एवढी नीट नेटकी कशी ? इथे कुणी राहत असेल का ?' तिला जरा बरं वाटलं . तिने आवाज दिला . "कुणी आहे का ? हॅलो ,कुणी आहे का ?" जवळच कुठून तरी तिला चाहूल लागली . एक कंदील घेतलेला हात प्रथम पुढे आला . व नंतर एक म्हातारी पुढे आली ,म्हातारी खूप वयस्कर होती . एका हातात काठी ,एका हातात कंदील घेऊन समोर आली . 

      तिने कंदील वर केला . रश्मीचा चेहेरा न्याहाळला . तिचा अवतार पाहून रश्मी थरारली . 'हि एवढी वयस्कर बाई इथे काय करतेय ?' " काय गं पोरी इथे काय करतेस ?" "मी किल्ला बघायला आले होते मैत्रिणींसोबत .पण चुकामुक झाली . रस्ता सापडेना ? मला परत जायचंय !" "कशी जाशील ?" तशी रश्मी चमकली . "काय ?"  "मी विचारलं कशी जाशील ?" "का ? " रश्मी ने घाबरून विचारलं . " पोरी, मला इथे शंभर वर्ष झाली असतील ,मी पण इथे किल्ला पाहायला आले होते . या भागात आले ,आणि इथली होऊन राहिले !"

      "तुम्हाला राहायचं  तर  राहा ,मी जाते !" "मी तेच विचारलं ,की कशी जाशील ? " " आजी ,तुम्हीच मदत करा ! " रश्मी रडवेली होऊन म्हणाली . "पोरी ,तुला वाटतं तेवढं सोपं नाही ते ! तू इथे नव्हतं यायला पाहिजे !" "पण असं का?" "इथे राणी मधुमती चा आत्मा वास करतो ! " "काय ?" रश्मी किंचाळली . "आत्मा ? आजी असं काही असतं का ?" "हो असतं ना ! तुला खरं वाटत नाही ना ! रात्र होई पर्यंत तुला कळेलच ! " "पण मी कशाला थांबू ? मी जाते ! " "ठीक आहे ! तुझी इच्छा !" इतकं बोलून आजी कंदील घेऊन निघून गेली . 

   रश्मीला वाटलं ,आजी कडून कंदील घ्यायला पाहिजे होता . तिने आवाज दिला . व त्या दिशेला पळाली ,जिकडे म्हातारी गेली होती.  पण म्हातारी दिसली नाही. तीच कुठं ही  अस्तित्व नव्हतं. रात्र झाली होती. चंद्र डोक्यावर होता. पौर्णिमा होती. त्यामुळे थोडाफार प्रकाश होता त्या प्रकाशात हळूहळू रश्मी फिरू लागली. थोडी पुढे गेली, दगडी पायऱ्या दिसल्या. पायऱ्यांवर अंधार होता. काही पायऱ्या वरच्या दिशेने जात होत्या. काही खालच्या दिशेने . रश्मीला समजेना, आपल्याला नेमकं कुठं जायचंय ते ! " इकडून वर ये ! " वरच्या बाजूने आवाज आला तिने दचकून वर बघितलं. वर कुणीतरी उभं होतं. चेहेरा दिसत नव्हता. आवाज पुरुषी होता. 


  रश्मीला धोका लक्षात आला. ती उलटया दिशेने पळाली. " मुली तिकडे जाऊ नकोस, तिकडे धोका आहे. इकडे वर ये ! " पण रश्मी ऐकायला  तयार नव्हती. ती पळत राहिली. समोर बहुतेक विहीर असावी, कारण चंद्राचं प्रतिबिंब त्यात पूर्ण दिसत होतं. विहिर  तुडुंब भरलेली होती. रश्मीला आश्चर्य वाटलं, ' एवढी उंचावर विहीर आणि एवढं पाणी ! ' 

  पण विचार करून उपयोग नव्हता. तिने विहिरीत हात घातला. हाताला सहज पाणी लागलं. पाणी थंडगार होतं. तिने दोन - तीन सपके चेहेऱ्यावर मारले. बरं वाटलं. " पाणी थंड आहे ना ! फक्त पिऊ नकोस. " मागून आवाज आला. आवाज स्त्रीचा होता. रश्मीला समजेना, हे एक एक कुठून उगवतायेत ? तिने मागे वळून बघितलं व बघतच राहिली. 

  साक्षात अप्सराच ! समोर सौंदर्याची खाण उभी होती ! आपण सुंदर आहोत, हे रश्मीला माहित होतं . पण समोरच्या सौंदर्यापुढे आपलं सौन्दर्य फिकं आहे ,हे तिला लगेच जाणवलं . पेहेराव पाहून हावभाव पाहून वाटत होतं की ती एखादी राणी असावी . 

  'राणी ?' आपल्याच विचाराने दचकली .' म्हणजे आजीबाईने सांगितलं ती राणी .... राणी मधुमती ! ' हो राणी मधुमतीच !' पण कसं शक्य आहे ? आपण एकविसाव्या शतकात वावरतो आहोत ! कॉम्पुटरचा .मोबाईलचा जमाना आहे ! हां , मोबाईल ... आपल्या लक्षात का आलं नाही ? तिने मोबाईल चालू केला , निधीला ,गार्गीला .... फोन लावला . पण फोन लागला नाही . तिने टॉर्च सुरु केला , समोर फिरवला . कुणीही नाही . आजूबाजूला फिरवला ,कुणीही नव्हतं ! लक्ष बॅटरीकडे गेलं ,बॅटरी संपत आली होती . म्हणजे टॉर्च बंद करणं ,गरजेचं होतं . टॉर्च बंद केला . 

        तशीच संभ्रमात उभी राहिली , रात्र बरीच झाली होती , भूक लागली होती . तहान लागली होती . चंद्र डोक्यावर होता . जीव दमला  होता . थकवा आला होता . मेंदू शिणला होता . काय खरं ? काय खोटं ? काय सत्य ? काय भास ? कळत नव्हतं . समजत नव्हतं . समजून उपयोग ही नव्हता . "पोरी ,राणी सरकारने तुला बोलावलंय !" आवाज आजीचा होता , ओळखीचा होता . रश्मीला आनंद झाला . "आजी तुम्ही ? " " अहो तुम्हाला केव्हा पासून शोधते आहे !" "मला कंदील द्या ! मला जायचंय !" आजीने तिच्या बोलण्याकडे लक्ष दिलं नाही . ती परत म्हणाली " पोरी , तुला राणी सरकारने बोलावलंय !" "राणी सरकार वाट बघतायेत ! चल ,व म्हातारी परत फिरली . 


     रश्मी नकळत पणे तिच्या मागे जायला लागली . तिलाही कळेना आपण कुठे चाललोय ?तिचं स्वतःवर नियंत्रण राहिलं नव्हतं . ती म्हातारी मागे जात राहिली . अंधार पूर्ण अंधार ! म्हातारी पुढे ,रश्मी मागे ! दोघी चालत राहिल्या ..... 

     इकडे सागर आणि पूर्ण टीम रश्मीला शोधून हैराण झाले होते . ती दोन तीन माणसं शोधाशोध करून काही  वेळापूर्वी  निघून गेली होती . आता फक्त सागर व या चार मुली मागे राहिल्या होत्या . त्यांनाही भूक लागली होती . तहान लागली होती . त्या रडकुंडीला आल्या होत्या . भूक होती ,पण खायची इच्छा नव्हती . खायचे पदार्थ थोडेच घेतले होते . जे काही उरले ते तिथे मागेच राहिले होते . 

    गार्गीला कसं सांगावं कळेना ! ती अवघडून गेली होती . तिने निधीला जवळ बोलावलं . व तिच्या कानात सांगितलं ! निधीला पण अवघडल्यासारखं झालं , पण सांगणं भाग होतं . ती सागर जवळ गेली व हळूच सांगितलं ,"पप्पा ,आम्हाला फ्रेश व्हायचंय . '

    सागर ला काय बोलावं कळेना , "आता इथे कुठे सोय पण नाही . तो म्हणाला ," ठीक आहे , मी तिकडे थांबतो . तुमचं आवरलं की  तिकडे या ." एवढं बोलून तो लगेच निघून गेला . काही अंतरावर किल्ल्याची तटबंदीची भिंत होती . तो तिथे गेला व भिंतीला टेकून उभा राहिला व पलीकडे पाहू लागला . किल्ल्यावरून खालचा पायथ्याचा परिसर व सभोवतालचा परिसर चंद्राच्या प्रकाशात सुंदर दिसत होता . 

      'BEAUTIFUL !' त्याच्या तोंडून उद्गार निघाले . "पण रश्मी एवढं नक्कीच नाही !" मागून आवाज आला . त्याने घाबरून मागे बघितलं . काही अंतरावर एक स्त्री उभी होती ! तिचा चेहेरा दिसत नव्हता . 

   "रश्मी ,सुंदर आहे ना रे ? आवडते का तुला ?" पुन्हा आवाज आला . सागरला समजेना ,काय बोलावं ? " कोण तुम्ही ?" त्याने भीत भीत विचारलं . "काही ही, काय बोलताय ? माझ्या मुली सारखी आहे ती !" "पण ,मुलगी तर नाही ना !" आणि जोरात खिदळण्याचा आवाज आला . " आणि त्यात खोटं काय आहे ? तुला आवडते ना ती ? मग जा तिच्या कडे !" 


    असं म्हणत ,ती भर्रकन पुढे आली , व तिचा चेहेरा पाहून सागर ला थरकाप सुटला !  तो लटपटायला लागला ! भीतीने बोबडी वळाली ! तो मागे मागे सरकायला लागला . "अरे थांब ! पडशील !" सागरने घाबरून मागे बघितलं ,तेवढ्यात कुणी तरी त्याला धक्का दिला . तो खाली कोसळला , त्याची किंकाळी , आरोळी हवेत विरली . .... 

                                         TO BE CONTINUED .... 

SAWAJ -THE HUNT -PART -3 - WATCH HERE   

    

⇎⇎⇎⇎⇎⇎⇎⇎⇎⇎⇎⇎⇎⇎⇎⇎⇎⇎⇎⇎⇎⇎⇎⇎⇎⇎⇎⇎⇎⇎⇎⇎⇎


    



 

      
































Previous
Next Post »