सॅनेटाईझर - मराठी भयकथा - MARATHI HORROR STORY
मराठी भयकथा |
लेखक :- श्री . योगेश वसंत बोरसे
रात्रीच्या त्या भयानक वातावरणात एक कार वेगाने जात होती . पुढे घाटाचा रस्ता लागला ,तसा गाडीचा वेग मंदावला. आणि कार हळू हळू रस्त्याच्या एका कडेला थांबली . पूर्ण घाट डोंगर दऱ्यांनी वेढलेला ! गाडी थांबली तिथे निरव शांतता होती . दरीमध्ये किंवा आसपास कुत्री असावीत , ती वेगवेगळा आवाज काढून वातावरणाची भयानकता वाढवीत होती !
त्या कार मध्ये दोन माणसे होती . दोघे पुढच्या सीटवर बसले होते . आणि मागच्या बाजूला सॅनिटायझर च्या स्प्रे बॉटल होत्या . हो ! सॅनिटायझर !
एका जीवघेण्या आजाराने जगभर थैमान घातलं होतं , त्यापासून बचाव करण्यासाठी सॅनेटाईझर चा वापर होत होता . तर ... मध्यरात्र झालीच होती . रात्रीचा दोनचा सुमार ! सूर्याचे दर्शन व्हायला चार ते पाच तासांचा अवधी बाकी होता .
दोघे गाडीतून खाली उतरले . बाहेरचा थंडगार वारा अंगाला झोम्बला . तसा सुखद अनुभव दोघांनी अनुभवला .दिवसभराचा कामाचा थकवा आणि हवेतील गारवा ! झोप येणं साहजिकच होतं. गाडीत माल भरलेला म्हणून त्यांनी पुढच्या सीटवरच बसून डुलकी घ्यायचं ठरवलं . झोपण्यापूर्वी चारही काचा पूर्ण बंद केल्या . गाडीतील लाईट बंद केला आणि डोळे मिटले .
काही वेळात ड्राइवर साईड च्या काचेवर टकटक झाली . ड्रायव्हरने डोळे किलकिले करून विचारले . - "yes ?" त्याला आवाज पोहोचला नाही बहुतेक . तशी ड्रायव्हरने म्हणजेच सुशान ने थोडी काच खाली केली .
"सॅनेटाईझर ?" बाहेरच्याने प्रश्न केला . सुशानने होकार दिला . त्यांचा आवाज ऐकून शेजारच्या सीटवरील दिवाण हि जागा झाला . त्याला काहीतरी खटकलं . तो पटकन बोलला ," सुशान काच वर घे ! " पण सुशानला कळालं नाही ! दिवाण पुन्हा ओरडला ," सुशान ,काच वर घे ! हे काहीतरी वेगळंच आहे . आता सुशान च्या हि लक्षात आलं होतं , कारण बघता बघता कारजवळ गर्दी जमा झाली होती .
" सर , एक स्प्रे मारा ! मला हा फ्लेवर खूप आवडतो . ज्याचा तुमच्या अंगाला वास येतोय ! सुशान ने जास्त विचार न करता एक स्प्रे त्याच्या हातावर मारला ! हातावर की ... सुशानला समजेना 'याने काचेतून हात मध्ये कसे घातले ?' कारण काच वरून फक्त दोन इंच फार तर उघडी असेल !
स्प्रे मारताच तो नाहीसा झाला . दिवाण ला राहवलं नाही ,"सुशान ,गाडी काढ ! आपण ट्रॅप झालोय !" सुशानला ही वेगळेपणा जाणवला ,पण कार स्टार्ट होईना .
पुन्हा काचेवर टकटक झाली . पण आता दोन्ही बाजूने ! ... "सॅनेटाईझर ? आम्हाला द्या ना ! फ्लेवर खूप छान आहे .फक्त एक स्प्रे द्या ! "
"ठीक आहे ." दिवाण ने रेट सांगितला ,"पैसे द्या आणि खुशाल घेऊन जा ! " "सर ,पैसे नाहीत हो!" "नाही ,मग मिळणार नाही ! " तेवढ्यात एका बाईचा आवाज आला ,"साहेब ,असं काय करताय ? थोडंतरी द्या ना ! आमच्या जवळ पैसे असते तर आम्ही मेलो असतो का ? "
'म्हणजे ? हे मेलेले आहेत ? म्हणजे आपला अंदाज बरोबर होता !'"सुशान ,गाडी काढ यार ! " "अरे स्टार्ट तर व्हायला पाहिजे ! काय झालंय ते बघावं लागेल ! पण त्यासाठी खाली उतरावं लागेल ! बाहेर जावं लागेल ! " " नाही ! बाहेर नको जाऊस !"
तेवढ्यात ,कार च्या काचांवर काहीतरी आदळलं . काचा फुटल्या . आणि गाडी पुढच्या दिशेने ढकलली जाऊ लागली . "अरे ,हा काय प्रकार चाललाय ?" दोघांना समजेना . सुशानने ब्रेक मारून गाडी थांबवण्याचा प्रयत्न केला ,पण व्यर्थ ! गाडी पुढे जात राहिली ,काही अंतरावर दरी होती. खोल दरी !
अचानक कार मध्ये कुठून कुठून हात येऊ लागले . आणि सॅनेटाईझर चे स्प्रे उचलू लागले . जीव वाचवावा की सॅनेटाईझर ? दोघांना समजेना !
पण आज ... दोन्ही गोष्टींचा शेवट होणार होता बहुतेक !
शेवटच्या जोरदार धडकेने कार दरीत कोसळली . आणि पाठोपाठ आवाज दुमदुमला . "दोन बॉटल तुमच्यासाठी आहेत ! दोघे वापरा !फ्लेवर खूप छान आहे !" आणि हास्याचा भीषण गडगडाट ,सोबत दोघांच्या किंकाळ्यानी दरी आणि घाट दुमदुमला !
आणि ... सॅनेटाईझर चा वास पूर्ण परिसरात दरवळत राहिला ! सोबत ... चित्र विचित्र हास्य ! धिंगाणा ! आणि .. बरंच काही .....
लेखक :- श्री . योगेश वसंत बोरसे
-: THE END :-
ConversionConversion EmoticonEmoticon