आसरा :- मराठी रहस्यमय भयकथा | MARATHI HORROR STORY

 आसरा :- मराठी रहस्यमय भयकथा | MARATHI HORROR STORY 

MARATHI HORROR STORY
MARATHI HORROR STORY


लेखक :- श्री . योगेश वसंत बोरसे . 

           सकाळच्या प्रसन्न वातावरणात मंदिरातील घंटेचे स्वर ऐकून प्रसन्न वाटत होते . मंदिरा शेजारी नदी वाहत होती . नदीला पाणी चांगल्या पैकी होतं . नदीकाठी थोडं मोकळं मैदान होतं . तिथं गावातील मुलं  व्यायाम करायची . त्यांचा नित्य क्रम असायचा . व्यायाम झाला की नदी मध्ये उड्या मारायच्या . व मन भरे पर्यंत पोहत राहायचं . 

       असाच एक पहलवान गडी ! रामसिंग ! रोज च्या जोर बैठका सूर्य नमस्कारामुळे त्याचं शरीर पिळदार बनलं होतं . असं की बाया माणसं पहातच राहायची . याची रामसिंगलाही सवय झाली होती. तो गावातील मुलांचा आदर्श होता . त्याला पाहूनच मुलं व्यायामाला यायची . 

      एक दिवस रामसिंग पहाटे पहाटे नदीवर हजर झाला . मंदिरात जाऊन देवाचं दर्शन घेतलं व व्यायामाला लागला . व्यायाम पूर्ण झाला ,तरी कुणाचा पत्ता नव्हता . त्याला नवल वाटलं ! त्याने अंग पुसलं ,घाम पुसला . व नदीमध्ये उडी मारली . काही वेळ पोहोता पोहोता त्याच्या लक्षात आलं की काहीतरी नदीवर तरंगत येत होतं . कुणीतरी बाईमाणूस ! 

     त्याने क्षणाची उसंत न घेता तिकडे झेप घेतली . ती एक मुलगी होती ! सुंदर होती ! पण तिची प्राणज्योत आता विझली होती . रामसिंगने तिचं शव उचलून बाहेर काढलं . कुणीतरी नदीकडे येताना दिसलं . त्याने आवाज देऊन बोलावलं . त्याचा निरोप घेऊन पोरगा गावात पळाला . काही वेळात तिथे गर्दी जमा झाली . त्याने आजपर्यंत स्त्री शरीराला स्पर्श केला नव्हता . 

    आणि साधं टक लावून बघितलं ही नव्हतं , कधी त्या गोष्टींचा विचार ही केला नव्हता . सकाळी पण जेव्हा त्याने तिचं शरीर उचलून बाहेर आणलं तेव्हा ही त्याला काही वाटलं नाही . पण रात्री ? रात्री रोम रोम पुलकित झाला ! अंतर्मनात कुठेतरी सर्व प्रसंग सर्व स्पर्श खोलवर रुजले होते ! त्यांची जाणीव आता होत होती . ती इतकी की त्याला स्त्री शरीराची ओढ लागली  ! मन सैरभैर झालं ! 

     रात्र वाढत गेली . पण झोप लागेना . अस्वस्थता , बेचैनी वाढत गेली . तो माडीवर येरझारा घालायला लागला ,फिरत राहिला . काही वेळाने त्याचे वडील वीरसिंग जागे झाले . त्यांनी याला बघितलं ! त्याच्या जवळ येऊन विचारलं ,काय झालं ? रामसिंग दचकला . त्याला अपेक्षा नव्हती की वडील जागे असतील म्हणून . पण त्यांना काय सांगणार ? त्यांना सांगण्यासारखं काही नव्हतं . त्यांनी पुन्हा विचारलं , " झोपत का नाहीस ?" 

     "बाबा झोप येत नाही ! " "का ?" "ती मुलगी सारखी डोळ्यासमोर दिसतेय ." त्याच्या वडिलांना ही काय बोलावं ,ते कळेना ! पण त्यांना वेगळं वाटलं होतं ,आणि खरा प्रकार वेगळा होता . जो त्यांना माहित नव्हता . आणि तो सांगू शकत नव्हता . त्यांनी रामसिंगची पाठ थोपटली . "बघ ,झोपायचा प्रयत्न कर ! " एवढं बोलून ते निघून गेले .  बराच वेळ जागून रामसिंग बिछान्यावर पडला . सकाळी सकाळी झोप लागली . उठला .तोवर सूर्य उगवला होता . घाईघाईत नदी तिराकडे गेला . देवाचं दर्शन घेतलं . आणि व्यायामाला सुरवात केली . डोक्यात विचार येत होते . पण तीव्रता कमी होती . 

     अंग पुसलं ,नदीत झेप घेतली . काहीवेळ मनसोक्त पोहोल्यानंतर जरा प्रसन्न वाटायला लागलं . आणि ! आपल्याला कुणीतरी पाहतंय ,एक सारखं बघतंय ,असं त्याला वाटायला लागलं .त्याला अगोदर वाटलं कि भास असेल पण नंतर लक्ष गेलं ! कुणीतरी मुलगी होती ! आणि ... तो अंतर्बाह्य थरारला ! ती तीच होती ,जिचा काल  अंत्य विधी झाला होता .रामसिंगला वाटलं आपल्याला भास झाला असेल पण भास असा कितीवेळ होणार ? 

    तिने त्याच्या समोर नदीत उडी मारली . व पाण्यात दिशेनाशी झाली . हा सैरभैर झाला . कुठे गेली ? कळेना ! काही क्षणात त्याच्यासमोर पाण्यातून वरती आली . रामसिंग दचकून मागे सरकला . एवढ्या जवळून ? ते पण ओल्या अंगाने त्याने कोणत्याही  स्त्रीला ,मुलीला पाहिलं नव्हतं . 

     त्याने मोठ्या परिश्रमाने स्वतःला आवर घातला व नदीबाहेर निघाला ती त्याच्याकडे पाहत राहिली . पूर्ण दिवस तिचा विचार करण्यात गेला .नजरेसमोर  तिचं ओलं अंग थिरकायला लागलं . रामसिंगला स्वतःवर ताबा ठेवणं अवघड जात होतं . त्याची नजर दिवसभर तिला शोधत राहिली . तो न राहवून दिवस मावळल्यावर पुन्हा नदीवर आला . ती पलीकडच्या काठावर बसलेली दिसली . 

     रामसिंगने पाण्यात झेप घेतली . नदीवर त्यावेळेस कुणीही नव्हतं . तिने ही पाण्यात उडी घेतली .व काही क्षणांत रामसिंगसमोर प्रकट झाली . संध्याकाळच्या संधी प्रकाशात गूढ वातावरणात ती वेगळीच वाटत होती . रामसिंगचा स्वतःवरचा ताबा सुटला व त्याने हात पसरून  तिला जवळ करायचा प्रयत्न केला . तशी ती खाली पाण्यात बुडाली . तिने रामसिंगलाही खाली ओढलं . 

    रामसिंग जरी पैलवान गडी असला तरी पाण्यात, पाण्याखाली , किती वेळ राहणार ? त्याचा श्वास गुदमरायला लागला . एवढा पैलवान गडी ! पण तिची पकड एवढी मजबूत होती आणि हवीहवीशी वाटत होती की रामसिंगला इच्छा असूनही पाण्याबाहेर निघता येईना . त्याने बराच वेळ प्रयत्न केला . नाका - तोंडात पाणी जायला लागलं . पण ती सोडेल तर शपथ !जणू काही तिने मगर मिठी मारली होती . 

         सकाळी मुलं नदीकिनारी आली , आणि त्यांना रामसिंगचं प्रेत एका किनारी दिसलं . तशी गावात बोंबाबोंब झाली . आणि नंतर सात दिवस रोज हा प्रकार चालू राहिला . रोज गावातला एक गडी पाण्यात बुडत होता . व सकाळी किनाऱ्यावर प्रेत सापडत होतं . 
         गावात दहशत पसरली ! जागृत देवस्थान नदीकिनारी असताना रोज अघटित घडत होतं . आणि आठव्या दिवशी एक साधू महाराज गावात अवतीर्ण झाले . त्यांच्या कानावर ही गोष्ट गेली . तसा त्यांनी नदीकिनारा गाठला . गावकरी जमा झाले . 
महाराज्यांच्या विनवण्या करायला लागले . साधू महाराजांनी डोळे बंद केले . त्यांना अंतर्ज्ञान प्राप्त होते . त्यांनी थोड्या वेळाने डोळे उघडले . व गावकऱ्यांवर नजर रोखली . त्यांची नजर काही शोधत होती . कुणाला तरी शोधत होती . पण ती व्यक्ती दिसेना . त्यांनी गावातील लोकांना संध्याकाळी नदीवर पुन्हा बोलावलं . 
           पण एक अट घातली . सर्व च्या सर्व या ! एक ही व्यक्ती कमी नको . संध्याकाळी गांवकरी भीत भीत जमा झाले . कुजबुज होत राहिली . महाराज काय सांगतील ? कुणाला अंदाज नव्हता . सर्वजण जमल्यावर साधू महाराजांनी सर्वांवर नजर फिरवली . त्यांना हवी ती व्यक्ती समोर दिसली . त्याच्या लक्षात ती गोष्ट आली असावी . तो खाली मान घालून उभा होता . 
           साधू महाराजांनी बोलायला सुरुवात केली . " तुमच्या गावात पातक घडलं आहे !व्यभिचार घडला आहे . त्या मुलीला संग करून नंतर नदीत फेकलं ! आणि ती मेली ! ज्याने हे कृत्य केलं ,तो इथे उपस्थित आहे . जर त्याला आपल्या कृत्याचा पश्चाताप झाला असेल,होत असेल तर त्याने स्वतःहून नदीत आत्मसमर्पण करावं ,नाहीतर गावात हेच चालू राहील !"
           गावकऱ्यांमध्ये कुजबुज सुरु झाली . नंतर आवाज वाढत गेला ,गोंधळ वाढत गेला ."महाराज कोण आहे  सांगा ! आम्ही त्याला नदीत बुडवतो ! " महाराज शांत होते . गलका वाढत गेला . आणि काही क्षणात पाण्यात कुणीतरी उडी मारल्याचा आवाज झाला . सर्व गावकऱ्यांना समजलं . तसे सर्व नदीकडे जायला लागले . 
           "थांबा !" महाराजांचा धीर गंभीर स्वर वातावरणात दुमदुमला ! "कुणीही जाऊ नका ! ज्याने कृत्य केलं ,त्याने प्रायश्चित्त घेतलं आहे ! त्याला त्याची शिक्षा मिळाली आहे . गांव शाप मुक्त झालं आहे ! " 
       "पण तो कोण होता ?" गावकरी विचारू लागले . "सकाळी कळेलच ! तो पर्यंत धीर धरा ! " 
       
    सकाळची वाट बघत लोक घरी परतले . सकाळी पुन्हा गर्दी झाली . प्रेत नदीकिनारी तरंगत होते . आणि .... ती व्यक्ती पाहून सर्वांना नवल वाटलं ! मंदिरात राहून परिसर साफ सफाई करणारी ती व्यक्ती होती  ! हा असं करेल असं कुणालाही वाटत नव्हतं ! स्वप्नातही  वाटलं नव्हतं ! पण त्या दिवसानंतर ती मुलगी कुणाला दिसली नाही ! आणि कुणाचा बळीही गेला नाही .... !

   

                                                                 -: THE END :-

       visit our you tube channel also

         

        


    💥💥💥💥💥💥💥💥💥💥💥💥💥💥💥💥💥💥💥💥💥💥💥💥💥💥💥💥💥💥💥💥💥💥💥💥💥💥💥💥           







  

Previous
Next Post »