हळद - मराठी भयकथा - Horror story marathi

                          हळद - मराठी भयकथा - Horror story marathi 

marathi horror story

लेखक :- श्री .योगेश वसंत बोरसे 

                "पोरी ,हळद लागलीय !  एकटी कुठं फिरू नकोस ! कुठं जायचं असेल तर कुणाला सोबत घेऊन जा ! " सीमाच्या आईने म्हणजे राधाबाईने सीमाला सांगितलं .तशी तिने हसून मान डोलावली . आणि त्या निघून गेल्या . ताशा एक दोन मैत्रिणी तिच्या जवळ बसलेल्या होत्या . राधाबाई गेल्यानंतर सर्व खळाळून हसल्या . 

         सीमाला संध्याकाळी हळद लागली होती . आणि उद्या लग्न होतं . आजची रात्र जपणं गरजेचं होतं . खेडेगांव असल्याने टॉयलेटला बाहेर जावं लागत होतं . आणि म्हणूनच तिच्या आईने ताकीद दिली होती . की कुठे एकटी फिरू नकोस म्हणून ! तेव्हा पोरींनी गोष्ट हसण्यावारी नेली होती . 

          पण .... त्यांच्या ही  नकळत सीमाच्या आसपास कुणी वावरत होतं . ज्याची कुणालाही कल्पना नव्हती . पाहुणे मंडळी म्हटल्यावर कुणी ओळखीचे ,कुणी नवीन घरात येणारच ! समजा कुणी नवीन दिसलं तरी कुणी लगेच हटकत नाही . त्यात दिसायला व्यवस्थित असेल , कपडे व्यवस्थित असतील , तर विचारणारा चारदा विचार करतो . ती ,तशीच होती . तिने राधिका नांव सांगितलं होतं स्वतःचं ! 

        नवरदेव कडून हळद घेऊन आली होती ! त्यामुळे मनाची पाहुणी होती. पण एकटी आली म्हणून बऱ्याच जणांना खटकत होतं . आणि ,जास्त बोलता ही येत नव्हतं . जास्त चौकशी न करता तिच्या जवळची हळद घेतली व सीमाच्या अंगाला लागली . हळद लागली आणि तासाभरात नवरदेवकडची दोन तीन पाहुणी मंडळी हळद घेऊन आली . तशी ही मंडळी विचारात पडली . आणि नवरीला हळद लागलेली पाहून त्यांनाही समजेना . 

          नवरदेवाकडची उष्टी हळद नवरीला लावण्याची काही ठिकाणी प्रथा आहे . जी यांच्याकडेही होती . पण असं असताना नवरीला अगोदर हळद लागली होती . हळद नवरदेवाकडची आहे हे समजल्यावर जास्त गोंधळ उडाला . कुणी आणली विचारल्यावर सर्वजण राधिकाला शोधू लागले . पण ती सापडेना !

         राधाबाईच्या मनात धडकी भरली ! काहीतरी वेगळं घडलं होतं ,घडत होतं ! जे कुणाच्या लक्षात येत नव्हतं . आलं नव्हतं . ही गोष्ट सीमा आणि तिच्या मैत्रिणींपर्यंत पोहोचली आणि ती ही हादरली .तिला याचा नेमका अर्थ उमगला जो तिने आईला सांगितला . तिला लागलेली हळद दुसऱ्या कुणाची होती ! जी चुकून किंवा जाणून बुजून तिच्या पर्यंत पोहोचली होती किंवा पोहोचवली गेली होती . आणि जिने आणली ती गायब होती . यावरचा उपाय कुणाकडे नव्हता . कुणाला काही सांगता येत नव्हतं . 

      तोपर्यंत सीमाला जाणवायला लागलं होतं की  आपल्या अवतीभवती कुणी वावरतंय ! पण समोर दिसत नाहीये ! तिने एक धाडसी निर्णय घेतला . रात्र बरीच झाली होती . तिने एका मैत्रिणीच्या कानात सांगितलं . तशा दोघी उठल्या व मागच्या दारी आल्या . सीमाने बाहेर नजर फिरवली . सोबत गायत्री होती . तसं आपल्या मागे कुणी घरातून बाहेर पडलं हे तिच्या लक्षात आलं . म्हणजे कुणीतरी आपल्यावर लक्ष ठेऊन आहे . हा तिचा अंदाज बरोबर होता . टॉयलेटचं निमित्त करून दोघी बाहेर पडल्या . आणि अंधारात वाट काढत जाऊ लागल्या .तशी काही अंतरावर ती दिसली . 

     हो ! राधिका ! राधिकाच होती ती ! जिने हळद आणली होती ! आणि नंतर गायब झाली होती . सीमा गायत्रीला म्हणाली ," ए ,ती बघ ! तिथे अंधारात काय करतेय काय माहित ? " "कोण गं ?" "अगं ,तीच ! हळद आणणारी !" एवढं बोलून सीमा तिकडे धावली . गायत्री तिला आवाज देत तिच्या मागे ! पण राधिका ? ती हातात येणार नव्हती ! ती सीमाला कुठे घेऊन जात होती . तिच्या मागे पळवत होती . तसं गायत्री आणि सीमा ,दोघींमधलं अंतर वाढत गेलं ! आणि त्या एकमेकींपासून वेगळ्या झाल्या . 

             गायत्री घाबरली ,आपण मूर्खपणा केला . हिच्या सोबत एकटं नव्हतं यायला पाहिजे ! तिने सीमाला बऱ्याचदा आवाज दिले . पण सीमाचा पत्ता नव्हता . तशी गायत्री मागे फिरली . धावत पळत लग्न घरी पोहोचली . तिने घडलेला प्रकार सीमाच्या आईला सांगितला ! राधाबाईंना समजेना ,नेमकं काय करावं ते ? नवरदेवकडची काही मंडळी आली होती . त्यांना जर माहित पडलं तर वेगळा अर्थ निघणार होता . जे काही करायचं ते गुपचूप करावं लागणार होतं !

           त्यांनी सीमाच्या बाबांना म्हणजेच नामदेव रावांना मागच्या दारी बाजूला बोलावलं ! घडलेला प्रकार सांगितला . त्यांच्या पायाखालची जमीन सरकली . हळद अंगाला लागलेली पोर रात्री अपरात्री बाहेर असणं धोक्याचं होतं ! जो प्रकार घडत होता , तो भयानक होता . पुढे अजून काय होईल सांगता येत नव्हतं . 

         त्यांनी दोन तीन विश्वासातली माणसं सोबत घेतली ,हातात काठ्या घेतल्या . आणि बाहेर पडले . मागच्या दारानं ! कुठे जायचं ?कुणी विचारलं नाही , ज्या अर्थी आत्ता जातोय त्या अर्थी काम महत्वाचं असणार होतं . बराच वेळ गावात शोध घेतला , पण सीमा सापडली नाही . मध्य रात्र उलटून गेली होती ! त्यात आज चंद्रग्रहण होतं . त्यामुळे नामदेवरावला काहीतरी वेगळंच वाटत होतं . 

          गावाच्या वेशीबाहेर मोकळं माळरान होतं तिथे दूरवर अग्नी पेटलेला होता . एवढ्या रात्री इथे अग्नी कोण पेटवणार ? म्हणून तिकडे झपाझप निघाले ! काही अंतर पुढे गेल्यावर त्यांची पावलं पुढे सरकेनात ! समोरचं दृश्य पाहून ते सर्व हादरले होते ! 

      समोर ... काही अंतरावर अग्नी पेटलेला होता ! एका बाजूला सीमा होती ! हो सीमा .... पण ती आता त्यांची राहिली नव्हती . तिच्या पूर्ण अंगाला हळद फासलेली होती . हो ! पूर्ण अंगाला ! अंगावर एक ही  कपडा नव्हता ! ती मांडी घालून बसली होती . डोळे बंद होते ! केस मोकळे होते  ! आणि शेजारी एक प्रेत पडलं होतं ! ज्याचं पूर्ण अंग हळदीने भरलं होतं . पूर्ण अंग ! प्रेतावर एक ही कपडा नव्हता !

       नामदेवराव ची तळ पायाची आग मस्तकाला गेली ! कुणीतरी प्रसंगावधान राखून गावाकडे पळालं होतं ! व सीमासाठी कपडे आणले होते . तो गडी आला तसे सर्व जण काठ्या घेऊन पुढे धावले ! पण व्यर्थ ! ते सीमा पर्यंत पोहोचू शकले नाहीत ! उचलून लांब फेकले गेले ! 

       आणि ... पुढच्या क्षणी सीमाने डोळे उघडले . तसे समोर बसलेल्या राधिकेच्या तोंडून विकट हास्य बाहेर पडले . तिच्या हास्याने आसमंत दुमदुमला . सीमाच्या डोळ्यातून जशी आग बाहेर पडत होती . तिचा आवाज हि वेगळा येत होता . तिने गर्जना केली . " निघा इथून ! माझ्या लग्नात विघ्नं आणायचं नाही !नाहीतर एक हि जिवंत परत जायचा नाही ! माझं लग्न यांच्याशीच होणार ! निघा म्हणतेंना !" 

       आणि .... तिने समोरच्या अग्नीतून एक लाकूड काढून यांच्या दिशेने फेकले . ते नेमकं एका गड्याला लागलं ! तसं त्याचं शरीर जाळायला लागलं . तसा तो बोंब मारत गावाकडे पळाला ! बाकीचे त्याच्या मागे ! त्याला वाचवायला ! आग विझवायला ! 

       नामदेवराव ला कळेना ,  हे जे चाललंय ते कसं रोखावं ? मुलीला कसं वाचवावं ? लग्न तर तिचं मोडणारच होतं ! इतकं सगळं झाल्यावर तिच्याशी कोण लग्न करणार ? पण मुलीचा जीव वाचवणं ,तिला या संकटातून बाहेर काढणं ,जास्त गरजेचं होतं ! त्यांनी निकराची लढाई लढायचं ठरवलं . आकाशाकडे बघत दोन्ही हात पसरून आपल्या कुलदेवतेला साकडं घातलं ! आवाहन केलं ! " हे माते ,मला शक्ती दे ! या दुष्ट शक्तीपासून माझ्या मुलीचं संरक्षण करण्याचं मला सामर्थ्य दे ! ताकद दे ! त्यांनी हातातील कपडे एकत्र गुंडाळले . 

          गळ्यातील रुद्राक्षाचा मणी हातात धरला .कपाळाला लावला . डोळयाला लावला . आणि काहीतरी मंत्र पुटपुटला . आणि .. तो रुद्राक्ष त्याच्या माळेसकट गळ्यातून काढला . तशी काही क्षणासाठी त्यातून आभा निर्माण झाली ! काही क्षणासाठी ! व ते रुद्राक्षाचा जप करत रुद्राक्ष मुठीत घट्ट दाबत सीमा बसली होती  तिकडे जाऊ लागले . तसं राधिकेचं रूप बदलायला लागलं ,ती आक्रोश करायला लागली ! ओरडू लागली ! 

      " आज चंद्रग्रहण आहे ! खूप दिवस मी या दिवसाची ,या रात्रीची ,या क्षणाची वाट बघत होते ! खूप वर्षांपासून ! पण तू ! तू माझ्या सर्व कष्टाची तपस्येची माती केली ! " ती चंद्राकडे पाहून हातवारे करून जोरजोरात काहीतरी मंत्र म्हणायला लागली. ग्रहण काल सुरु होता. तोपर्यंत तिचा विधी पूर्ण होणं गरजेचं होतं. पण नामदेवरावांच्या सात्विक भक्तीपुढे तिचं काही चाललं नाही. ते तसेच सीमाकडे धावले. एव्हाना सीमा खाली कलंडली होती. तशी राधिका भेसूर आवाजात ओरडू लागली, रडू लागली. नामदेवरावने सीमाला साडी गुंडाळली. तिच्या गळ्यात रुद्राक्ष घातला. 

    तसा इकडे शेजारी प्रेताने पेट घेतला. नामदेवराव भयाने, संतापाने थरथर कापत होते. पण तशाही अवस्थेत त्यांनी सीमाला उचलून घेतलं आणि जमेल तेवढ्या वेगाने घराच्या दिशेने जायला लागले. तोवर गावातील लोक जमा झाले होते. माळरानावर झालेला हा प्रकार पाहून संतापले होते. प्रेत जळत होतं आणि राधिका भेसूर आवाजात रडत होती. तसं लोकांनी तिच्या अंगावर रॉकेल टाकून पेटवून दिलं. ती किंचाळत, ओरडत माळरानावर पळायला लागली. दोन - तीन जणांनी काठ्या उगारल्या व तिला यथेच्छ झोडपलं. आडवं पाडलं. पुन्हा रॉकेल टाकून तिची व प्रेताची राख - रांगोळी केली. 

    झालेला प्रकार इतका भयानक होता की, नंतर कुणाला काहीच सुचेना. काहीवेळात सीमा शुद्धीवर आली होती. व समोरचा प्रकार पाहून थरथर कापत होती. तिला काही बायांनी व आईने कपडे घातले. साडी नेसवली. आणि घरी नेलं ! दुसऱ्या दिवशी लग्न ! व आज हे झालं ! पण त्यात चूक कोणाचीच नव्हती.   

    सकाळी वरात दारात येऊन ठेपली. त्यांना झालेला सर्व प्रकार समजला होता. पण नवरदेव मोठ्या मनाचा होता. जे झालं त्यात सीमाची काय किंवा कोणाचीही काही चूक नव्हती. असं म्हणून त्याने लग्नाला तयारी दाखवली. 

    त्याने सहेतुक आपल्या आई - वडिलांकडे, नातेवाईकांकडे बघितलं. त्याचं म्हणणं प्रत्येकाला पटत होतं. पण निर्णय त्याला घ्यायचा होता. आणि त्याचा होकार होता. त्याचे वडील पुढे आले, मुलाची पाठ थोपटली आणि त्याच्या आईने सीमाला जवळ घेतलं. बोलण्याची गरज नव्हती. काही वेळात घरात सनई-चौघडे वाजणार होते ! सीमाला पूर्ण शास्त्रोक्त पद्धतीने स्नान घालून तयार करण्यात आलं. व पुन्हा हळद लावण्यात आली ! 

            तिच्या जोडीदाराची ! खऱ्या जोडीदाराची ! उष्टी हळद ! जो तिचा खरा जीवनसाथी होता ! ठरल्या मुहूर्तावर लग्न लागून दोघे पती - पत्नी झाले आणि घरात सनई - चौघडे वाजू लागले ! व सर्व वातावरण मंगलमय झाले !

 

                            THE END 

            💀💀💀💀💀💀💀💀💀💀💀💀💀💀💀💀💀💀💀

visit our youTube channels and enjoy

     


  • ALL RIGHTS RESERVED AT YOGESH BORSE & BGSM
    


💃💃💃💃💃💃💃💃💃💃💃💃💃💃💃💃💃💃💃💃💃💃💃💃💃💃💃



         

       

 






Previous
Next Post »