मराठी भयकथा |
भाग :- १ला
लेखक :- श्री .योगेश वसंत बोरसे .
सूचना :- ही भयकथा तुमच्या काळजाचा ठोका चुकवू शकते . कथा काल्पनिक असली तरी वास्तवाशी निगडित आहे ! कमजोर व्यक्तींनी वाचू नये ! TAKE CARE OF YOUR SELF ...
त्याचं नाव गणू होतं . पण त्याला आणखी नावे मिळाली होती ! रिकामटेकडा ,सांड ,फुकट्या .... आणि बरीच काही ...
पण बिचारा सगळं सहन करायचा ! कोणाला विरोध करणं त्याच्या रक्तातच नव्हतं ! समोरचा जे काही बोलेल , ते खाली मान घालून ऐकायचा . त्याची आई तो लहान असतानाच वारली ! आणि वडील ? ते कधी फारसे वाट्यावर आलेच नाहीत ! याची आई वारल्यावर त्यांनी फारसा विचार न करता दुसरं लग्न केलं आणि प्रपंच वाढवला . दुसऱ्या बायकोला दोन मुलं झाली , मुलं वाढली ! आधीच याला कधी बापाचं प्रेम मिळालं नाही !
त्यात दुसऱ्या आईने दुसरं रूप दाखवलं नसतं तर नवल होतं ! बिचारा गणू ! सांगितलं गेलेलं प्रत्येक काम करायचा ! समोर जसं वाढलं जाईल ,तसं खायचा ! शिळं -पाकळ असो कि उष्टं असो ,कधी मान वर करून बोलायचा ही नाही !
तरीही ती माउली त्याला मुक्ताफळं उधळायची ! फुकटचं खातो ,काम धंदे करत नाही ! सांड सारखा फिरतो ! रिकाम-टेकडा मेला ! तिचं पाहून तिची मुलंही तशीच वागायची ! पण गणू ,प्रारब्ध समजून सर्व सहन करत गेला . पण ... त्याच्या नशिबात अजून काही होतं .... जे व्हायचं बाकी होतं ... घडणार होतं .
घर मोठं होतं ! सर्व घर आवरायचं ,झाडायचं ,विहिरीतून पाणी काढायचं ,भरायचं ! गोठ्यातील गाई - म्हशींचं आवरायचं ! एक ना अनेक ,हजार कामं ! तरी पण गणू काट्यासारखा त्याच्या सावत्र आईच्या डोळ्यात सलायचा ! तो तिला समोर ही नको होता . फक्त ती योग्य संधीची वाट पाहत होती !
आणि एक दिवस ... तिला संधी मिळाली ! वेळ संध्याकाळची होती . गणू व त्याची सावत्र आई कुसुम दोघंच घरी होते . त्याचे बाबा काही कामानिमित्त बाहेर गेले होते . कुसुम ने त्याला पाणी भरायला सांगितलं . थंडीचे दिवस असल्याने अंधार लवकर पडायचा . त्यात खेडेगाव ! कसली वीज न कसलं काय ? त्यात बऱ्यापैकी अंधार होता .
गणूने बादली विहिरीत फेकली . धपदिशी पाण्यात पडली . बुडबुड करत बादली भरली . गणूने दोर वर ओढला व नेहमीच्या सवयीने हौदात पाणी ओतलं . दोन तीनदा असं करून बादली पुन्हा विहिरीत फेकली .पण मध्ये पाण्यात पडल्याचा आवाज झाला नाही . बादली कुठेतरी अडकली होती . त्याने दोन तीनदा झटके मारले . पण बादली निघाली नाही .
तो पुढे वाकून पाहू लागला . कुसुमचं याच्याकडे लक्ष होतं . ती संधीची वाट पाहत होती . आणि .... तिने डाव साधला . गणू विहिरीत डोकावला तसा कुसुमने पटकन मागून जाऊन त्याला धक्का दिला . विहीर खोल होती . पण पाणी भरपूर होतं ! गणू विहिरीत पडला ,गटांगळ्या खायला लागला . त्याला पोहोता येत नव्हतं ! हात पाय मारत राहिला पण दैव साथ देणार नव्हतं ! किंवा त्याची आयुष्याची दोरी बळकट नव्हती .
एका निष्पाप जीवाचा असा करूण अंत झाला ! त्याने शेवट पर्यंत चांगुलपणा सोडला नाही ! पण ... पुढे काय ?
अपघात झाला म्हणून कुसुम ऊर बडवून घ्यायला लागली . पण तिचं वागणं सगळयांना माहित होतं ! आणि मुख्य म्हणजे गणू च्या वडिलांवर त्याचा काही परिणाम झाला नव्हता . होणार नव्हता ! कारण ते रसायन वेगळंच होतं ! पहिले बायको गेली ! आता मुलगा ! पण हा ढिम्म !
एक अध्याय संपला होता !
रात्रीची जेवणं उरकून घर झोपी गेलं . आणि काही वेळाने ... खराट्याचा खर खर आवाज यायला लागला . कुणीतरी अंगण झाडत असावं ! इतक्या लवकर पहाट झाली ? गणू असेल . गणू sss ? कसा असेल ? त्याला तर ... तो तर ... कालच ... आपल्याच विचाराने कुसुम दचकली ! अंगण झाडण्याचा आवाज येत राहिला ! कुसुमने बघितलं रात्रीचे दोन वाजले होते . आवाज येत होता ! भास असणं शक्य नव्हतं !
झाडण्याचा आवाज बंद झाला . कुसुमची बघायची हिम्मत नव्हती . तिने वडिलांना दोन तीनदा उठवलं . पण तो पठ्ठया बिनघोर झोपला होता . पोटचा पोरगा मेला होता , पण याच्यावर काही असर दिसत नव्हता .
गवताची सळसळ ,गाई -म्हशीचं हंबरणे सुरु झालं . त्यांना कुणीतरी गवत देत होतं ! नंतर विहरीत बादली पडल्याचा आवाज झाला ! नंतर पाणी हौदात टाकण्याचा ! बराच वेळ हा कार्यक्रम चालू होता . नंतर सर्व आवाज बंद झाले !
कुसुमला एवढ्या थंडीतही घाम फुटला . आणि दारावरची कडी वाजली ! तशी कुसुम दचकली . पाठोपाठ आवाज आला ! " आई ,काही खायला दे ना ! जे असेल ते दे ! ए आई ,खायला दे ना ! "
एवढं ऐकलं आणि कुसुमचा धीर सुटला ! बोंबलायला लागली . तसा गणूचा बाप उठून बसला . त्याला कळेना ? ही का बोंबलतेय ते ? ती फक्त ओरडत राहिली . 'गणू ,गणू , ' करत राहिली .
गणूच्या बापाला वाटलं , आपल्या पोरामध्ये हिचा किती जीव आहे ! बिचारीला पोरगं गेलं ,ते सहन झालं नाही ! तो तिला समजवू लागला . बऱ्याच वेळाने ती शांत झाली . व लहान पोरा सारखी पोटात पाय घालून झोपली ! लक्ष खिडकी कडे गेलं ! खिडकीच्या बाहेर कुणी होतं ! आणि जे कुणी होतं, ते ओळखीचं होतं !त्याचा आवाज कानात घुमत होता. कुसुमला वेड लागायची पाळी आली पण हि सुरुवात होती. कसातरी दिवस उगवला. प्रचंड मानसिक थकव्याने कुसुम सकाळी झोपी गेली. बऱ्याच वेळ झोप काढल्यानंतर तिला जरा बरं वाटलं. उठली व सर्व काम आवरली. दिवस लहान व रात्र मोठी. त्यामुळे रात्र व्हायला वेळ लागली नाही. कुसुम नवऱ्याला सांगून थकली, पण तो ऐकणार नव्हता. घरी थांबणार नव्हता , तो निघून गेला.
रात्री कुसुम व तिची दोन मुलं घरात झोपी गेले आणि....... अंगणात झाडण्याचा आवाज सुरु झाला. कुसुमला थंडगार घाम फुटला. घड्याळ रात्री दोनचा टाईम दाखवत होतं. काही वेळात गाई- म्हशी हंबरायला लागल्या. त्यांना कुणीतरी गवत देत होतं. कुसुमला काय करावं कळेना, काही वेळात बादली विहिरीत पडली. सपासप पाणी वर ओढलं गेलं. हौदात टाकलं गेलं. कुसुमला वेड लागायची पाळी आली. हौद भरला गेला. पावलं दाराच्या दिशेने जवळ यायला लागली. कुसूमचं भान सुटलं. दारावरची कडी वाजली.
आणि आवाज आला. " आई खायला दे ना ! जे असलं ते दे ! शिळं - पाकळ, उष्ट - वाष्ट जे असलं ते दे ! ए आई खायला दे ना ! कुसुम भयाने थरथर कापत होती. बडबड करायला लागली, " मेला रिकामटेकडा ! मेला तरी वणवण करतोय ! सांड कुठला ! जा मरना, झोपू दे ! " तिच्या बडबडण्याने मुलं जागी झाली. आई अशी का करतेय हे त्यांना कळेना ! कुणाशी बोलतेय, हातवारे करून शिव्या देतेय. हे पाहून मुलं घाबरली. एका कोपऱ्यात दबकून बसली व हिच्याकडे पाहत राहिली.
कुसुमची बडबड चालू होती. शिव्या देत राहिली.. उठली ताट काढलं, सकाळची भाकरी घेतली, एक कांदा घेतला, तांब्या भरला व तरतर चालत दाराजवळ जाऊन दार उघडलं , " घे मेल्या अनं मर ! " दाराजवळ कुणी नव्हतं. विहिरीच्या कठड्यावर कुणी होतं जे तिला जवळ बोलवत होतं. कुसूमच भान सुटलं होतं. ती तशीच तांब्या व ताट घेऊन विहिरीकडे जायला लागली.. त्या आकृतीकडे पाहत शिव्या देत राहिली.
आणि काही क्षणात धपकन विहिरीत पडण्याचा आवाज आला, नंतर किंकाळ्या ऐकू आल्या. नंतर शांतता, भयानक शांतता ! मुलांचं लक्ष बाहेर होतं. ते थरथर कापत होते. काही वेळात अंधारात त्यांच्या जवळ कुणी आलं. त्यांना समजलं नाही. पण आवाज समजला. " अवि - नीरज घाबरू नका. तुमचा गणू दादा आहे ना ! घाबरायचं नाही ! " मुलं तिथंच झोपली, की बेशुद्ध झाली त्यांनाही कळालं नाही. सकाळी घरात गोंधळ ऐकू आला. तेव्हा उठून बसले. त्यांची आई अंगणात निपचित झोपलेली दिसली.
त्यांना कळेना ही अशी का झोपली व विहिरीवर कुणी बसलं होतं, " अरे हा तर आपला गणू दादा ! रात्री भेटला ना आपल्याला ! अरे दादा तिथे बसू नको, विहिरीत पडशील ! " असं म्हणत मुलं विहिरीकडे पळाली आणि विहिरीच्या आतून अजून दोन किंकाळ्या ऐकू आल्या..........
TO BE CONTINUED......
RIKAMTEKDA - PART -2 -MARATHI BHAYKATHA WATCH HERE
💀💀💀💀💀💀💀💀💀💀💀💀💀💀💀💀💀💀💀💀💀💀💀💀
VISIT OUR YOU TUBE CHANNEL ALSO
- ALL RIGHTS RESERVED AT YOGESH BORSE & BGSM
- ABOUT US
- PRIVACY POLICY
ConversionConversion EmoticonEmoticon