फट्टू एक अकल्पित - भाग १४ मराठी भयकथा | marathi bhaykatha | marathi horror story

 फट्टू एक अकल्पित - भाग १४ | मराठी भयकथा - HORROR STORY MARATHI

HORROR STORY MARATHI
MARATHI HORROR STORY 

    लेखक :- श्री .योगेश वसंत बोरसे .

सूचना :-  ही एक काल्पनिक  भय कथा असून , वाचकांच्या सोयी साठी ही  दीर्घ भयकथा २० भागात विभागली आहे ! प्रत्येक भाग ,प्रत्येक प्रसंग भयचकित करणारा ,हूर हूर लावणारा ,आपल्याशी जवळीक साधणारा , गूढ गोष्टींकडे आकर्षित करणारा , आपल्या अवती भवती बघायला भाग पाडणारा आहे . वाचकांना विनंती आहे की  त्यांनी पूर्ण कथेचा आनंद घ्यावा . तुम्हाला नक्कीच आवडेल 

 फट्टू - एक अकल्पित - भाग - १


  पूर्वार्ध :- 

    आणि तो दिवस उगवला . कुठून कोण जाणे ? सावित्री साठी  स्थळ सांगून आलं . सावित्री अठरा वर्षांची होऊन गेली होती . आणि तिचं तेज अधिक वाढलं होतं . मुलगा ही चांगला होता ! घरंदाज होता ! नाही म्हणण्याचा प्रश्न नव्हता !आणि तेनसिंग आणि सावित्रीचं लग्न ठरलं ! 

 आता पुढे :-  

  जास्त वेळ वाया न घालवता तेनसिंग आणि सावित्रीचा  साखरपुडा झाला . सावित्रीच्या सौंदर्याने तेनसिंगला भुरळ घातली होती . त्यांच्या हितचिंतकांनी त्यांना खरा प्रकार सांगितलं होता . म्हणजे रंगाविषयी त्यांना सर्व काही माहित पडलं होतं . तेनसिंगचे आई वडील तयार नव्हते . पण सावित्रीच्या तेजापुढे रंगाचं कृष्णकृत्य फिकं पडलं होतं . आणि मुलाच्या आनंदासमोर तेनसिंगच्या आई वडिलांचं काही चाललं नाही . 

      मुख्य म्हणजे सावित्रीच्या सौंदर्याने त्यांनाही भुरळ घातली होती . अशी सुंदर सून आपल्या घरात यावी हि गोष्ट त्यांना भूषणावह वाटत होती . त्यामुळे हो नाही करता करता साखर पुडा झाला . पण तो हि रंगाच्या अनुपस्थितीत ! तो जेलमधून बाहेर आला होता पण आताशी त्याला स्वतःची लाज वाटत होती . त्यामुळे तो जास्त वेळ घराबाहेरच राहायचा . भटकत राहायचा . एकतर तो ही काहीतरी शोधत होता ,किंवा योग्य वेळेची वाट बघत होता . पण कशासाठी हे रहस्यच होतं . त्याची शोधक नजर सर्वत्र फिरायची . लोकांना तो वेडा वाटायचा . पण तो वेडा नव्हता ! 

      साखरपुडा झाला आणि दोन महिन्यात लग्नाची तारीख निघाली . तेनसिंगला तर लगेच लग्न करायचं होतं . पण ते शक्य झालं नाही . मुहूर्त दोन महिन्यानंतरचा निघाला .सावित्री आणि तेनसिंग यांच्या रोज भेटी व्हायला लागल्या . असंच एक दिवस तेनसिंग बाईक घेऊन आला . आणि सावित्रीला सोबत घेऊन फिरायला गेला . पूर्ण दिवस मनसोक्त फिरले . घरी येत येत सूर्य मावळतीकडे झुकला . दिवस थंडीचे असल्याने अंधार लवकर पडला . तशी सावित्रीची धडधड वाढली . अजून ते गावाबाहेरच होते . जवळच एक टेकडी होती . सावित्रीचं लक्ष टेकडीकडे गेलं . तिला हालचाल जाणवली . काहीतरी वेगाने तिच्या दिशेने येत होतं . 

       सावित्री जोरात ओरडली . आणि मागून तेनसिंगला बिलगली . तेनसिंगला कळेना "सावित्री काय झालं ?  " "अहो ,ते बघा ! काय आहे ? तेनसिंगने बाईक थांबवली . व सावित्रीने इशारा केला तिकडे बघितलं . पण तोवर उशीर झाला होता . हे काहीतरी विचित्र आहे . धोकेदायक आहे हे तेनसिंगला जाणवलं . त्याने जोरात बाईक पळवली . व ती भुरकट आकृती त्यांच्या दिशेने सरकायला लागली . गाडी किती पळवणार ? बरं ती आकृती इतका सहज पाठलाग करत होती की  तिला टाळून जाणं शक्य नव्हतं . काही वेळात ती यांच्या सोबत पुढे झेपावत आली . आणि खिदळायला लागली . बीभत्स चेहेरा ! एक डोळा काळजाचा वेध घेणारा ! काही क्षणात एक विचित्र आवाज आला . स्त्रीचा की पुरुषाचा कळायला मार्ग नव्हता . 

        " बरीच मोठी झालीस ! लग्न करतेस पण मुलं होतील का ? नाही ! तुझ्या बापालाही मूल होत नव्हतं. त्याने आईचा बळी दिला . तू कोणाचा बळी देणार ? बापाचा की आईचा ?  बापाचा ? पण तो तर माझी शिकार आहे ! मग आईला मारशील की भावाला ? हं ! भावाला मार ! ते तुला सहज जमेल ! आणि तू रे ! अशा पोरीशी लग्न करतोय जिला मुलबाळ होणार नाही ! मग तुझं काय ? की तू ही आई बापांना मारशील !" आणि ती पुन्हा खिदळायला लागली . व खिदळत खिदळत अदृश्य झाली !   

           तेनसिंगला दरदरून घाम फुटला ! त्याने पुढे जाऊन बाईक थांबवली . सावित्री थरथरत होती . तिचं डोकं सुन्न झालं होतं . 'आपलं लग्न आता मोडणार ? 'त्या भीतीने तिचा जीव कासावीस झाला !आपल्याला मुलबाळ होणार नाही ,हे जर बाहेर पसरलं तर कोण आपल्याशी लग्न करेल ? ' ती विचारात गुंग होती . तेनसिंगला ही कळत नव्हतं . तो बाईकवरून खाली उतरला . खिशातून रुमाल काढला . आणि घाम पुसला . 

         " सावित्री ,हा सर्व काय प्रकार आहे ? " त्याने थरथरत्या आवाजात विचारलं . तेनसिंग घाबरला होता यात त्याची चूक नव्हती . रोमँटिक मूड मध्ये असताना अचानक समोर असं बीभत्स रूप आलं आणि साथीदाराचा भूतकाळ आपलं भविष्य उध्वस्त करणार ! हे कोणत्याही पुरुषाला झेपणारं नव्हतं ! तरी ही  त्याने स्वतःला सावरलं . जे काही झालं आहे त्याला सावित्री डायरेक्ट जबाबदार नाही ! हे त्याच्या लक्षात आलं होतं . आणि सावित्री काय सांगणार ? तिला यातील काहीच माहित नव्हतं ! तिला हा प्रकार नवीन होता . ती नकळतपणे रडायला लागली . तेनसिंगला तिची दया आली . तेनसिंगने तिला प्रेमाने जवळ घेतलं ! ती पण त्याला घट्ट बिलगली . ती प्रचंड घाबरली होती . आधार शोधत होती ! तेनसिंग तिचा आधार बनला !

         "हे बघ सावित्री ,जे झालं त्यात तुझी काय चूक ? आपली काय चूक ? असा कुणाचा बळी देऊन मुलं होतात का ? तसं असतं तर कुणी लग्नच केलं नसतं ? सावित्री ही गोष्ट आपल्या दोघांतच राहील ! मी तुला सोडून आता राहू शकत नाही ! आणि या असल्या गोष्टींवर माझा विश्वास नाही ! काळजी करू नकोस ! मी तुझ्याशीच लग्न करणार ! आता डोळे पूस ! तोंडावर पाणी मार ! आणि फ्रेश हो !" त्याने डिकीतून पाण्याची बाटली काढून दिली .

      " पण मला नेमकं कळलं नाही ते नेमकं होतं काय ? ते ही  संध्याकाळ च्या वेळेस ? " सावित्री शांत होती . ती विचारात पडली होती ,भविष्याच्या ! तेनसिंगने बाईक काढली . सावित्रीला घरी सोडलं ! काशीबाई बाहेर वाटच बघत होती . तिला यांचं वागणं आवडलं नव्हतं . ती सावित्रीला बोलणार ही होती ! पण तिने सावित्रीकडे बघितलं आणि तिच्या काळजाचा ठोका चुकला . ही  रडतेय ? रडलीय ? माझी सावू रडलीय ! का ? याने काय केलं असेल ? "सावू ,काय झालं ? "सावित्री काही बोलली नाही . ती सरळ बाथरूममध्ये गेली .तोंडावर सतरा वेळा पाणी मारलं . पण आधीच गोरीपान ! चेहेरा लाल लाल झाला . 

     " सावू ,बेटा काय झालं ? जावई बापू काही बोलले का ? " सावित्रीला आवेग सहन झाला नाही . ती आईला बिलगली व फुंदून फुंदून रडायला लागली . काशीबाईला कळेना ? हिला कसं समजवावं ? बराच वेळ रडल्यावर सावित्री शांत झाली . "सावू ,बाळा सांगशील का ?काय झालं ते ?" "काही नाही ! " "मग रडतेस का ?" " काही नाही !" "भांडण झालं का ? " "नाही ! " "मग ?" "मला मुलबाळ होणार नाही ! " "काय ? "काशीबाई चक्रावली . " अगं ,काही वाटतं का ? आत्ता तुझा साखरपुडा झाला ! लग्न व्हायचं अजून बाकी आहे ! आणि तू मुलाबाळांपर्यंत पोहोचलीस ! काही करून नाही आलीस ना ! एक मिनिट तुला कसं कळालं ,की तुला मुलबाळ होणार नाही म्हणून ? म्हणजे जावईबापू ..... " "आई ,काहीही बोलू नकोस ! त्यांची काही चूक नाही ! " म्हणजे ? मग कोणाची ? तुझी ?  पण तुला तर ..... " 

      "आई ,तू पण ना ! " "अगं  भवाने , तू नीट सांगशील  तर ना ! इथे माझा जीव खाली वर होतोय आणि तू  सांगायला जीव घेतेस ! काय आहे ते सांगून मोकळी का होत नाही ! " "आई आमची दोघांची चूक नाही ! " मग कोणाची ?"  "आबांची चूक आहे ! " "काय ? अगं त्यांचा काय संबंध ? ते तर तुच्या समोर ही येत नाहीत ? " "ते येत नाहीत ! पण त्यांनी जे केलं ते समोर आलंय !"  "काय ? " " आबांनी आजीला मारलं तेव्हा माझा जन्म झाला ! " "सावू ! थोबाड फोडीन हं ! काय बोलतेस कळतंय का ? " 

      " हो ! हेच खरं आहे ! आजीचा बळी दिला म्हणून माझा जन्म झाला ! " "तुला कुणी सांगितलं ?" काशीबाईने आश्चर्याने विचारलं . "अगं बोल ना !" सावित्री बोलायला लागली . आणि काशीबाईच्या पायाखालची जमीन सरकली . तिला घाम फुटला . थंडगार घाम फुटला ती सुन्न झाली ! 'म्हणजे आपली शंका बरोबर होती . यांनीच सासूबाईंना संपवलं ! पण कसं ? सासूबाई तर घाबरून मेल्या होत्या ! त्यांनी असं काय बघितलं की जीव सोडला ?' आपल्या विचाराने काशी दचकली . 'म्हणजे आपली सावू सुरक्षित नाही ? तिला धोका आहे ? पण कोणापासून ? माळरानावर यांनी पाहिलं ते भूत होतं की  आणखी काही ? ' 

     "सावू ,तुम्ही पाहिलं ते कसं दिसत होतं ? " काशीबाईने हळूच विचारलं . त्या आठवणीने ही सावित्रीला कसंतरी झालं ! ती थरारली !" आई ,भयानक होतं ते ! भयानक ! अंधारातही त्याची भयानकता जाणवत होती ! एक डोळ्याचं भूत होतं ! पण आई एक डोळा कसा असणार गं  ? कुणीतरी आम्हाला घाबरवण्याकरिता मुद्दाम केलं असेल !" पण एक डोळा ऐकताच काशीबाई चपापली . ' एक डोळा ? सुगी ? ही अजून पिच्छा सोडत नाही ? मेलीचं करावं काय ते कळत नाही ! ' 

  "आई ,कोण सुगी ?" " कुणी नाही !" "अगं कुणी नाही काय ? सांग ना ! " "कुणी नाही ! तू जा ! तोंडावर पाणी मार ! मी जेवायला वाढते ! " "नाही आई तू मला पहिले सांग ? कोण सुगी ते ?" "सावू हट्टीपणा करू नकोस ! तुझे आबा येतीलच एवढ्यात ! त्यांच्या समोर विषय काढू नकोस . तुला माझी शपथ आहे जा ! नाहीतर ते मला पहिले हाणतील मग तुला ! असं रात्रीपर्यंत बाहेर फिरतेस म्हणून ! मी त्यांना माझ्या पद्धतीने समजावून सांगेन ! जा उठ पटकन ! " सावित्रीचा नाईलाज झाला . ती बापाला घाबरत ही  होती ! आणि तिला भूक ही  लागली होती . तेवढ्यात काशीनाथ ही आला . दोघांनी जेवण उरकलं . काशीबाई रंगाची वाट बघत बसली . पण रंगा आला नाही ! काशीबाईला ही  भूक लागली होती . पण जेवायची इच्छा झाली नाही . तीने दार लावलं व पुढच्या खोलीतच सतरंजी टाकून आडवी  झाली. 

      बरीच रात्र झाली होती . दारावरची कडी वाजली . काशीबाईला झोप लागली होती . पुन्हा कडी वाजली तशी ती भांबावून उठली , " कोण ?" "मी आहे ?" आवाज रंगाचा होता . ती उठली ,घड्याळ पाहिलं , बारा वाजून गेले होते. तिने दरवाजा उघडला . रंगा खाली मान घालून बाथरूम मध्ये गेला . हात पाय धुतले आणि जेवायला येऊन बसला . काशीबाईने दोन ताटं वाढले  . रंगाने खाली मान घालून जेवण उरकलं . त्याच्या या वागण्याची काशीबाईला आता सवय झाली होती . तिने जेवताना विषय काढला नाही . 

    रंगा जेवण करून उठला . अंथरूण  टाकून झोपून घेतलं . काशीबाईने आवरासावर केली . आणि ती रंगा जवळ आली ! " आहो ! " ती हळूच म्हणाली . रंगाला आश्चर्य वाटलं . ही  आज कशी काय ? "अहो ! " "काय गं ! " "ती परत आलीय ! कोण गं ? " "सुगी !" "काय ? " रंगा ताडकन उठून बसला . "अहो हळू ,केवढ्याने ओरडताय ? " "तुला कुणी सांगितलं ?" "आपल्या सावू ने ! " "काय ?" "हो ! " आणि काशीबाईने रंगाला सर्व काही सांगितलं . ती सांगत गेली तसे रंगाच्या चेहेऱ्यावरचे भाव बदलत गेले !......... 

                             TO BE CONTINUED ........  

WATCH HERE - FATTU -15

WATCH MUSICAL COVER SONGS ON OUR YOU TUBE CHANNEL 'MUSICAL RAITA '



           

  



            💀💀💀💀💀💀💀💀💀💀💀💀💀💀💀💀💀💀💀💀💀💀💀💀💀💀💀💀💀💀💀💀

  फट्टू - एक अकल्पित - भाग - १

फट्टू - एक अकल्पित - भाग - २

फट्टू - एक अकल्पित - भाग - ३

फट्टू - एक अकल्पित - भाग - ४

फट्टू - एक अकल्पित - भाग - ५

फट्टू - एक अकल्पित - भाग - ६

फट्टू - एक अकल्पित - भाग - ७

फट्टू - एक अकल्पित - भाग - ८

फट्टू - एक अकल्पित - भाग - ९

फट्टू - एक अकल्पित - भाग - १०

फट्टू - एक अकल्पित - भाग - ११

फट्टू - एक अकल्पित - भाग - १२

फट्टू - एक अकल्पित - भाग - १३

फट्टू - एक अकल्पित - भाग - १४

फट्टू - एक अकल्पित - भाग - १५

फट्टू - एक अकल्पित - भाग - १६

फट्टू - एक अकल्पित - भाग - १७

फट्टू - एक अकल्पित - भाग - १८

फट्टू - एक अकल्पित - भाग - १९

फट्टू - एक अकल्पित - भाग - २०


          



Previous
Next Post »