फट्टू - मराठी भयकथा - भाग - १६ - HORROR STORY MARATHI
MARATHI HORROR STORY |
सूचना :- ही एक काल्पनिक भय कथा असून , वाचकांच्या सोयी साठी ही दीर्घ भयकथा २० भागात विभागली आहे ! प्रत्येक भाग ,प्रत्येक प्रसंग भयचकित करणारा ,हूर हूर लावणारा ,आपल्याशी जवळीक साधणारा , गूढ गोष्टींकडे आकर्षित करणारा , आपल्या अवती भवती बघायला भाग पाडणारा आहे . वाचकांना विनंती आहे की त्यांनी पूर्ण कथेचा आनंद घ्यावा . तुम्हाला नक्कीच आवडेल .
सॅनेटायझर - MARATHI HORROR STORY
रिकामटेकडा भाग -१ - MARATHI HORROR STORY
रिकामटेकडा - भाग -२ - MARATHI HORROR STORY
पूर्वार्ध :-
" माझी काळजी करू नका ! पोरीची काळजी घ्या ! आणि लग्न शक्यतो लवकर आवरा ! आणि तिला माझ्यापासून दूरच ठेवा ! आणि तुम्हीही दूरच राहा ! त्यातच तुमचं भलं आहे ! " तेनसिंगच्या पाठीवर थोपटून रंगा निघून गेला . त्याचा बदललेला रंग पाहून तेनसिंग गारच झाला . त्यानेही बाईक काढली व रात्री काय होईल याचा विचार करत अंदाज लावत घराकडे निघाला . पुढच्या तयारीला !
आता पुढे :-
रात्र झाली आणि रंगाची पावलं टेकडीच्या दिशेने पडायला लागली . हातात काठी होती फक्त ! आणि ती ही काशीबाईने जबरदस्ती दिली होती . काशीबाईने जबरदस्ती टॉर्च ही दिला होता . पण तो रंगा होता ! त्याचं आणि अंधाराचं जन्मजात सख्य होतं . जणू तो अंधारातील कामं करण्यासाठीच जन्माला आला होता !
रंगाच्या डोक्यात एक प्रश्न खदखदत होता . ' आपण आईला मारलं ! हे सुगीला कुणी सांगितलं ? तिला कसं माहित पडलं ?आपण तर कधी बोललोच नाही कारण काही संबंधच नव्हता . कासू ने सांगितलं असेल ? नाही !तिलाही नेमकं माहित नव्हतं आपण काय केलं होतं ते ! आणि माहित असतं तरी ती बोलली नसती ! मग कोण सांगू शकतं ? 'आणि त्याची खात्री पटली . तो त्या घराकडे वळाला . त्याला टेकडीवर जायची घाई नव्हती ,आणि गरज ही नव्हती ! सुगीला आपल्याला गाठायचं तर बरोबर गाठेल आणि वेळ पडल्यास इथेच भेटेल जिथे आपण चाललोय !
तो त्या पडक्या घराजवळ पोहोचला . दाराची कडी वाजवली . थोड्या वेळात दार उघडलं गेलं . एका कोपऱ्यात चूल पेटली होती . एक म्हातारी भाकऱ्या ठोकत होती . तिने न बोलता एक भाकरी आणि ठेचा एका ताटलीत ठेवला आणि रंगा कडे सरकवला . "जेवण झालंय माझं . " थोडं खाऊन घे ! " "आजे ,मी इथं जेवायला नाही आलो ? मला सुगीपासून सुटका करून घ्यायची हाये ! लै हैराण करतेय ! नाहीतर तिच्या नादात उगाच माझ्या हातून माझी पोरगी मारली जाईल ! "
"आर पोरा ,किती लोकांना मारशील ? पहिले आईला मारलं ! मग सुगीला ! मग तिच्या याराला ! आता पोटच्या पोरीला मारशील होय ?" "आजे ,जास्त बोलू नकोस ! नाहीतर तू बी जेवायच्या पहिले वर जाशील ! मला सांग ,सुगीला माझ्या आई बद्दल कुणी सांगितलं ? आणि ती मोकळी कशी ? तिचा बंदोबस्त कर !मी आजच करणार होतो पण तिने भेटायला टेकडीवर बोलावलं ! मी जर घरी राहिलो असतो तर ती घरी तरफडली असती ! अन पोरीला त्रास दिला असता ! अन एक गोष्ट , माझ्या आईला मी नाही मारलं ! तिचा बंदोबस्त तूच केलास ! हे फक्त आपल्याला दोघांना माहित होतं ! तसा सुगीचा बंदोबस्त कर ! नंतर पोरीचा !"
"आरं पोरा ,तू पार येडा झाला हायेस ! आरं ,पोटच्या पोरीवर उठलास ! " "आजे ,पैले ऐकून तर घे ! मी तिला मारायला सांगत नाही ! फक्त तिला मुलबाळ होणार नाही ,असं बघ ! " "काय ?" "हो ! पुढं काय करायचं ते मी नंतर सांगेन ! अन एक ध्यानात ठेव ! जावई चांगला हाये ! त्याला धक्का लागायला नको . नाहीतर गाठ माझ्याशी हाये ! ही लढाई माझी आणि माझ्या आईची आहे . मी तिला मारलं म्हणून तीनं बदला घेण्यासाठी माझ्या पोटी जन्म घेतला ! आता ती माझ्या जीवावर उठलीय ! काहीतरी निमित्त शोधतेय ! तू जे करायचं ते आजच कर ! मला माहिताय ,हे काम तूच करशील ! "
"नाही केलं तर ?" "नाही केलं तर आत्ताच मरशील ! " म्हातारी तिला शोभणार नाही अशा आवाजात हसली . "माझ्या जीवावर उड्या मारतोय आन मलाच धमकी देतोय ? मी तुझी वाट लावू शकते हे ध्यानात ठेव ! " आता हसायची पाळी रंगाची होती . "मला मारून तू कशी जगशील गं ? तुला हाये कोण माझ्याशिवाय ? हे बघ ,थट्टा मस्करी बस झाली . कामाचं काय ते बोल ? का आता तुझ्याकडून काही होत नाही ? ते सांग! तुझं वय झालं म्हणून ! " रंगा पुन्हा खदाखदा हसला .
"माझं वय झालं ? तुला माझं वय तरी ठाव हाये का ? आरं ,तुझा आजला माझ्याकडं यायचा आणि तुझा बा , बी ! " " आजे ,काही काय बोलतेस ?" "का ? खरं बोलली तर मिरच्या लागता ,व्हय रं ! माझ्या दिसण्यावर जाऊ नगस ! हे माझं खरं रूप न्हाई ! " "आजे ,बस झालं आ ! आज कोणत्या धुंदीत हायेस ? काय भांग खाल्ली का ?" "आरं ,धुंदीत तू जगतोय ! मी न्हाई ! मी म्हातारी न्हाई ! " "म्हनजे ?.... म्हनजे ?" म्हातारी पुन्हा हसायला लागली . न शोभणारं हसू होतं ते ! पण हे हसणं रंगाच्या ओळखीचं होतं ! 'असं कोण हसायचं ? पण ही हसणारी दुसरी आहे ! ' आणि त्याला धक्का बसला ! "सुगी ?" त्याच्या अंगावर काटा आला आणि काहीवेळात सुगी समोर आली ! "तुला टेकडीवर बोलवलं होतं , इथं कशाला आला ?"
तोपर्यंत रंगा बराच सावरला होता . "तू कोण मला विचारणारी ? हे बघ ! तुझा बंदोबस्त करायलाच आलोय इथं ! आजे, हिला आवर घाल ! नाहीतर आजपर्यंत जे झालं नाही ते आज होईल ! " आजे ,ही इथं कशी आली ?"
"आरं ,माझी सोबतीण हाये ती ! " "ही ? तुझी सोबतीण ?" "आरं हीच न्हाई अशे बरेच सोबती हायेत माझे ! एकट्याने सारे कामं होता का ?"
रंगाने अचानक रंग बदलला ,"सुगी ,माझं काय करायचं ते कर ! पण माझ्या सावूला त्रास देऊ नको ! " "अरे ,तू आता आजीला सांगत होतास ना की तिला मुलबाळ व्हायला नको म्हणून ? " "सुगी ,तुला माझ्या आईबद्दल कुणी सांगितलं ? माझ्या आईला मी नाही आजीनं संपवली ,अन तू माझं नाव सांगितलं सावूला ! मी मारली म्हणून ! ती एवढीशी पोर, पार बिथरून गेली ! आन तिला घाबरवायची काय गरज होती ? काय करायचं ते माझं कर ! मी समोर आहे !"
" नाही ! तुला इतक्या सहज नाही मारणार ! मला कसं संपवलं ते विसरला का ? तू माझ्या शरीराचा छळ केला ? जशी पाहिजे जेव्हा पाहिजे तेव्हा भोगायचा ! माझे लचके तोडायचा ! जोपर्यंत गरज होती तोवर भोगलस आणि नंतर पायाखाली तुडवलं ? नंतर जे हाल केले ते माणसाचं कामच नाही ! कुणी हैवान ही लाजेल असं केलं होतं तू ! मी तुझा असा काय गुन्हा केला होता ? की तू माझे एवढे हाल केलेस ? तुझी भूकच भागवली ना ? पण तू तर काहीच कसर सोडली नाही ! जशी मी तळमळतेय ना ,तसा तू ही तरफाडला पाहिजेस ! आणि त्यासाठी मी तुझ्या सावूला निवडली ! आणि तू जिला आजी , आजी म्हणतो ना ! ती आजी नाही ! चेटकीण हाये चेटकीण ! चेटूक करून आजवर जगलीय ! अन अजून किती जगेल कुणास ठाऊक ? "
"अरे ,तू काय किंवा कुणी काय ? कुणाला मारायला सांगितलं कि त्या व्यक्तीचं आयुष्य ही तुझी आजी तिच्याकडे करून घेते ! त्यासाठी लोकांना फुसलावते आणि तिचं आयुष्य वाढवते . तुझ्या आईला हिनेच मारली ! आणि तिचं उरलेलं आयुष्य हिला मिळालं ! एवढंच काय तुझ्या बापाला सांगून तुझ्या आजल्याला मारलं ,तेव्हा तू पैदा झालास ! आन तुझ्या आईला मारल्यावर साऊचा जन्म झाला . तू नाही म्हटलं तर हिनेच तिला संपवली पण तुझा वापर करून ! आता तुझ्या पोरीला तुला मारल्याशिवाय पर्याय नाही ! नाहीतर ती तशीच राहील वांझोटी ! आणि ते सांगायला तू इथे आलास ? पोरीला वांझोटी ठेव म्हणून ? आरे ,बाप हेस की हैवान ? पोटच्या पोरीची बी दया येत नाही तुला ? काय खाऊन काढला रे तुझ्या आईने तुला ? का ते पण हिनेच केलं ? आर ,हेच सांगायला मी तुला टेकडीवर बोलावलं होतं ! पण तुझा तुझ्या आजेवर लै विश्वास ! आता तुझी यातून सुटका नाही ! " असं बोलून सुगी जोरजोरात हसायला लागली .
सुगीची बडबड आजीला सहन होत नव्हती ! "ए ,गप काही काय सांगते माझ्या लेकराला ? तुझं म्हणणं जर खरं असेल तर मग काशिनाथ कसा काय जन्माला आला ? त्यासाठी कोणाला मारलं ?" " हे त्याच्या बायकोला विचार ?" " का ? काशिनाथ याचा पोरगा नाही ? " "नाही ! " "सुगी sssssssss !" रंगा भयानक संतापला ! त्याला हा आघात सहन झाला नाही ! तो जोर जोरात ओरडायला लागला . आणि त्याचे हाल पाहून सुगी खदाखदा हसायला लागली .
"मी काशीला जित्ता सोडणार नाही !" सुगीचं काम झालं होतं . ती निघून गेली . " पोरा , शांत हो ! हिच्या नादी लागू नकोस ! ही तुझ्या हातून एकेक जण संपवतेय आणि तुझा बदला घेतेय ! तिच्या याराला हिनेच सांगितलं होतं की तिला कसं हाल करून मारलं ते ! म्हणून तो ही तुला मारायला उठला होता ! पण तूच त्याला संपवलं ! तुझा संसार चांगला आहे ,त्यात विष कालवू नकोस ! " "पण ती तर म्हटली की काशिनाथ माझा नाही म्हणून ? " " अरे पोरा ,येडा झालास का ? चांगल्या बाईवर संशय घेतोय ते ?" "आजे , पण ती तुझीच सोबतीण आहे ना मग ती खोटं का बोलेल ? आन तू माझ्या आईसारखी का दिसते ते मला आता कळालं ! सुगी सांगत होती ते खरं होतं ! तू चेटकीण हेस चेटकीण ! आजी नाही ! "
"हा ,हाये मी चेटकीण ! अन तू माझं काही वाकडं करू शकत नाही हे तुला बी माहितीय ! मग कशाला दगडावर डोकं आपटतोय ? तुझं भलं कशात आहे ते बघ आणि कामाला लाग ! रिकामे उद्योग बंद कर ! आणि काही दिवस घरी जाऊ नकोस ! कुठं लांब जा ! निदान पोरीचं लग्न होईपर्यंत घराकडं फिरकू नकोस ! " "पण तू का सांगते हे सगळं ? आणि ती सुगी माझ्या पोरीला त्रास देईल ! ती तिचं लग्न होऊ देणार नाही ! " "पोरा तुझी माय असताना काळजी करू नकोस !मी पहाते काय करायचं ते ! " "पण तू माझी माय कशी काय ? माझी आई तर सावू म्हणून जन्माला आलीय ?" "पोरा ,तुला नाही कळायचं ! अन एक सारखी लामण लावू नकोस ! तुझ्या कामाला लाग ! घरी जाऊ नगस ! पोरीचं लग्न होईपर्यंत !"
एवढं बोलून आजी घराबाहेर निघून गेली . बराच वेळ झाला पण ती परत आली नाही . आजीचं म्हणणं रंगाला पटलं होतं . तो घरी जाणार नव्हता . आणि आता आजी परत यायची नाही याची त्याला खात्री होती . तो ही निघाला . आपलं सामर्थ्य वाढवण्यासाठी ! कारण त्याला आज त्याची लायकी समजली होती . समोरचा शत्रू सामर्थ्यवान होता . त्यामुळे तो निघाला एका अज्ञाताच्या शोधात , सामर्थाच्या शोधात !.........
TO BE CONTINUED.........
- ALL RIGHTS RESERVED AT YOGESH BORSE & BGSM
- ABOUT US
- PRIVACY POLICY
💀💀💀💀💀💀💀💀💀💀💀💀💀💀💀💀💀💀💀💀💀💀💀💀💀💀💀💀
ConversionConversion EmoticonEmoticon