फट्टू - भाग १३ वा - मराठी भयकथा - Marathi horror story
मराठी भयकथा |
"नाही ! मी हे होऊ देणार नाही ! माझ्या साऊ ला काही होऊ देणार नाही ! मग मला काहीही करावं लागलं तरी करेन ! अगदी काहीही !.........
आता पुढे :- " दिप्या ,ए दिप्या ! बाहेर ये ! " "रंगा दादा तू ? अरे तू कसा काय आलास ? " " ते मरू दे ! आधी इकडे ये ! माझ्याबरोबर चल. " दिप्या लगेच निघाला . रंगाने आजूबाजूला बघितलं ,कुणी नव्हतं . " दिप्या ,खरं खरं सांग ! सुगीचं काय केलं ? आणि तिचा नवरा कुठून आला ? " दिप्या विचारात पडला . पण त्याचं डोकं काम करत नव्हतं ,अर्थात त्याला जास्त डोकं वापरायची सवय नव्हती .
त्याने त्या रात्री जे घडलं ,ते जसं च्या तसं सांगितलं .म्हणजे काशीबाईने त्याला सांगितलं होतं तिथून ते माळरानावर सुगीचे प्रेत जाळीपर्यंत ! सगळं काही ! रंगा विचार करायला लागला . "म्हणजेकासू सांगत होती ते खरं होतं तर ! "दिप्या ,हा सुगीचा नवरा कुठून आला ? अन पूजा कुणी घातली फरशी लावल्यावर ! "
"रंगा दादा ,पूजा कोण घालणार ? आपल्या गावात जो पूजा करतो त्यानेच केली . " "अरे ,पण काही उपयोग झाला नाही . " दिप्याने भोळेपणाने विचारलं , "का काय झालं ?" रंगाने सर्व प्रकार सांगितला . ते ऐकून दिप्याचं डोकं चक्रावले . " रंगा दादा हे काय भलतंच ? मला वाटलं मिटलं प्रकरण ? पण पोरीपर्यंत पोहोचेल असं वाटलं नव्हतं . "
"अरे ,तेच विचारतोय चारदा ,सुगीचा नवरा कुठून आला तो हाये कुठे ? त्याला धरू पहिले ! त्याने मला मारलं होतं तोच काहीतरी करत असणार ! चल ,मला दाखव तो कुठे आहे ते ! " "दादा ,थोडं दमाने घे ! तू घरी आलास हे त्याला माहित पडलं ना तर तो आक्ख घर जाळून टाकेल ! लई बिनडोक आहे तो ! आणि तो सुगीचा नवरा नाही ! "
"नवरा नाही ? "
" नाही ! जशी सुगी तुला जवळची ,तशी त्याला जवळची ! पण तो जेल मध्ये गेला आणि सुगीवर तुझी नजर पडली . आणि ती तुझ्या कडे आली . तो जेल मधून बाहेर आला तर त्याला सुगी दिसेना . गडी यडापीसा झाला . ज्याला त्याला विचारू लागला . कुणीतरी सांगितलं . तुझ्याघरी पाहिली म्हणून ! म्हणून तो तुझ्या घरी जाऊन वहिनीला त्रास द्यायचा . पण त्या माऊलीने तोंड उघडलं नाही .
पण त्याला कुठून तरी माहित पडलं कि सुगी आता तुझ्या घरात पण नाही . तू तिचं काही तरी केलस म्हणून ! त्याचं डोकं फिरलं तो तुला शोधायला लागला . अन नेमका त्या दिवशी तू सापडलास ! त्याने घाव जोरात घातला होता त्याला वाटलं तू मेला म्हणून ! पण तुला आम्ही पाहिलं ,तो तुला अजून मारणार होता . पण वाहिनीने हातपाय पडल्या , तेव्हा त्याने दम दिला . की पोरांचा जीव प्यारा असेल तर याला असंच मरू द्या म्हणून ! मी त्याच्या विनवण्या केल्या आणि तुला उचलून ओसरीत ठेवला . तो माझ्याकडे बी लक्ष ठेऊन होता . मला बी विचारायचा ,सुगीचं काय केलं म्हणून ! पण मी बी काही कमी नाही ! त्याला पत्ताच लागू दिला नाही ! "
" आरं येड्या ,पण त्या गोणीत काय होतं तू बघितलं होतं का ? की नुसते गोणी जाळायचे पैसे दिले ? " "पैसे कुठे दिले अजून ? म्हणजे थोडे होते तेवढे दिले सगळे नाही दिले ! " " का ?" " अरे दादा ,ते पैसे घ्यायला तयार नाहीत ! " "का ? " "त्यांना माहित पडलं की ते प्रेत सुगीचं होतं म्हणून ! " "मग ? " "मग काय, सुगी त्यांना पण जवळची होती . "
रंगाने कपाळावर हात मारून घेतला . " च्यामारी या सुगीच्या ! ही अशी असेल असं वाटलं नव्हतं ! अरे पण त्या प्रेताच काय ? ते जाळलं की नाही ? " रंगा आता वैतागला होता . उत्तर तर दिप्याकडेही नव्हतं . आणि रंगाने जे सांगितलं ते ऐकून त्याला वाटलं होतं की काहीतरी गडबड झाली . त्यांनी गोणीत काय भरलं ? आणि काय जाळलं ते आपण पाहिलं ही नाही ! पण मग वास कसला येत होता ?
"रंगा दादाsssss ! "दिप्या जोरात ओरडला , आणि त्याने रंगा ला बाजूला ढकललं ! पण तो स्वतःचा जीव वाचवू शकला नाही . रंगावर ज्याने हल्ला केला तो तोच होता ! दिप्यावर लक्ष ठेऊन होता . त्याला माहित होतं की रंगा याच्यापर्यंत येईलच ! नाहीतर घरी येईल ! हॉस्पिटल मध्ये होता तेव्हाच मारायला पाहिजे होता . पण असं वाटलं की हे हातपाय वाकडं होऊन पडलंय आता उठायचं नाही म्हणून ! पण यानं यड्यात काढलं . पण आता नाही ! पण दिप्याने जमू दिलं नाही ! त्याने रंगवरचा घाव आपल्यावर घेतला . घाव वर्मी बसला . आणि दिप्याने जागीच जीव सोडला .
घाव कुऱ्हाडीचा होता . त्यामुळे जगणं शक्य नव्हतं . आपल्यामुळे आपला मित्र मेला ! हे रंगा ला सहन झालं नाही ! तो रागाने लाल झाला . व त्या सुगीच्या तथाकथित नवऱ्यावर तुटून पडला . दोघे ही आडदांड ! माजलेल्या सांडासारखे एकमेकांना भिडले . पण रंगा तो रंगाच ! त्याने शिताफीने समोरच्याचा खेळ संपवला .
बघता बघता गर्दी झाली . बातमी वणव्यासारखी पसरली . व काही वेळात पोलीस घटनास्थळी पोहोचले . रंगाला अटक झाली ! केस चालली ! साक्षी पुरावे सर्व काही झालं ! आणि रंगा ला पाच वर्ष सक्त मजुरी झाली ! पण यात त्याने कुठेही सुगीचा उल्लेख होऊ दिला नाही ! की केला नाही ! त्याच्या हितशत्रूंची तर इच्छा होती की याला फाशीच व्हावी ! त्यांचीच काय ? खुद्द काशीबाईला ही तेच वाटत होतं . पण रंगाने असं काही केलं की सक्तमजुरीवर निभावलं ! जेव्हा रंगाला शिक्षा झाली ,तिला कळेना ,मुलांना कसं सांभाळावं ? त्यात सावित्रीची काळजी होती ! काशीबाईला एक कळून चुकलं होतं की सावित्रीच्या एका हरकतीने रंगा जेल मध्ये पोहोचला होता . म्हणजे त्याच्या मृत्यूलाही सावित्रीच कारणीभूत ठरणार होती ! पण कधी आणि कसे ते काळच ठरवणार होता !
मुलं मोठी होत होती ! काशीबाई जमेल ती कामं करून त्यांना मोठं करत होती ! सावित्री दिवसेंदिवस उजळ होत चालली होती . तिचं सौंदर्य खुलत चाललं होतं . हिचे हात लवकर पिवळे करावे लागतील नाहीतर एखाद दिवशी ....... काशीबाईला पुढचा विचारच सहन झाला नाही . पण एका खुन्याच्या पोरीशी कोण लग्न करणार ? बरं ,रंगला जेमतेम पाच वर्ष शिक्षा झाली होती ! तिने रंगाला जेलमध्ये जाऊन एकच सांगितलं की पोरींचे हात पिवळे होईपर्यंत तिच्या समोर येऊ नका म्हणून !
रंगालाही आता आपली चूक कळाली होती . जेलमध्ये राहून तो बराच शांत झाला होता . चरबी आणि माज दोन्ही उतरले होते . बोलणं कमी झालं होतं ! दिवसभर खाली मान घालून बसायचा ! पण डोक्यातून सुगीचे विचार जात नव्हते . यांनी सुगीला जाळली की नाही ? ते रहस्यच राहिलं होतं . त्यात दिप्या मेला ! ज्यांनी जाळलं त्यांना हा ओळखत नव्हता . बरं घरी जायची वेळच आली नव्हती ! त्या दिवशी जो बाहेर पडला तो सरळ जेलमध्ये ! आणि काशीबाईने पुन्हा सुगीचे नाव ही काढलं नव्हतं ! याचा अर्थ सध्या तरी त्यांना काही त्रास नव्हता .
पण त्याचं मन त्याला खात होतं ! आपल्यामुळे कुटुंबाची वाताहात झाली . ही बोच त्याला सतावत होती . त्याने काशीबाईची माफी ही मागितली ! पण तिला आता काही फरक पडत नव्हता ! तो असून नसल्यासारखा होता . पण तिने रंगाकडून गोड बोलून हळूहळू सर्व पैशांची व्यवस्था करून घेतली . त्या बाबतीत तो हुशार निघाला होता . त्यात काशिनाथ आता हाताशी आला होता . त्यामुळे तिला आता सावित्रीच्या लग्नाची म्हणजे खर्चाची चिंता उरली नव्हती . फक्त मुलगी देताना तिच्या बापाची करणी आडवी येणार नाही याची काळजी घ्यायची होती .
आणि तो दिवस उगवला . कुठून कोण जाणे ? सावित्री साठी स्थळ सांगून आलं . सावित्री अठरा वर्षांची होऊन गेली होती . आणि तिचं तेज अधिक वाढलं होतं . मुलगा ही चांगला होता ! घरंदाज होता ! नाही म्हणण्याचा प्रश्न नव्हता !आणि तेनसिंग आणि सावित्रीचं लग्न ठरलं !
TO BE CONTINUED .....
WATCH MUSICAL COVER SONGS ON OUR YOU TUBE CHANNEL 'MUSICAL RAITA '
- ALL RIGHTS RESERVED AT YOGESH BORSE & BGSM
- ABOUT US
- PRIVACY POLICY
ConversionConversion EmoticonEmoticon