फट्टू :- भाग १२ वा - मराठी भयकथा
MARATHI HORROR STORY |
सूचना :- ही एक काल्पनिक भय कथा असून , वाचकांच्या सोयी साठी ही दीर्घ भयकथा २० भागात विभागली आहे ! प्रत्येक भाग ,प्रत्येक प्रसंग भयचकित करणारा ,हूर हूर लावणारा ,आपल्याशी जवळीक साधणारा , गूढ गोष्टींकडे आकर्षित करणारा , आपल्या अवती भवती बघायला भाग पाडणारा आहे . वाचकांना विनंती आहे की त्यांनी पूर्ण कथेचा आनंद घ्यावा . तुम्हाला नक्कीच आवडेल .
पूर्वार्ध :- तो जो कोणी होता तो तिथे जाऊन थांबला ,त्याला कळेना काय जाळलं ते ? पण वास यायला लागला तसा तो घाबरला . 'काहीतरी लफडं हाय ! पळा !' तो पळून गेला . दिप्याने सुटकेचा निश्वास टाकला . ते आडोश्यातून बाहेर आले . बराच वेळ जाळ चालू होता . एक प्रकरण संपलं होतं ! पण खरंच संपलं होतं का ? याचं उत्तर काळच ठरवणार होता . .....
आता पुढे :- या सर्व गोष्टी दिप्यानं काशीबाईला सांगितल्या नाही . आम्ही तिचा बंदोबस्त केला ! एवढं सांगून तो पूजा विधी आणि फरशी लावायच्या बाकीच्या कामांना लागला . दोन दिवसात ही कामं आटोपली . विशेष म्हणजे या दोन रात्रीत सुगीने काही त्रास दिला नाही . त्यामुळे काशीबाईची ही खात्री झाली कि आता सुगी पासून धोका नाही .
"कासू .माझ्या डोक्यात कुणी मारलं होतं ? आणि तुम्ही दोघे ओसरीत काय करत होतात ? आणि तू हरामखोर ,माझ्याकडे ढुंकूनही बघितलं नाही ?" काशीबाईला कळेना याला कसं सांगावं ? "आता बोलते का ? की तुझा ही हलवा करू त्या सुगीसारखा ?" "काही प्रश्नांची उत्तरं नसतात !" "ए ,डोकं खराब करू नको हा ? काय ते नीट सांग ? आणि असं समजू नकोस की तू नाही सांगितलं तर मला कळणार नाही म्हणून ! दिप्याकडून कशी माहिती काढायची मला माहिती आहे ! पण तू सांगितलं तर तुझा पुढचा त्रास वाचेल ! सांग लवकर ! "
"सुगी चा नवरा होता तो ! " "काय ? सुगीचा नवरा ? " "अगं सुगीचं लग्न कधी झालं ?" "ते मला काय माहित ?" पण ज्याने तुम्हाला मारलं तो तोच होता ! म्हणजे त्याने तेच सांगितलं होतं . तुम्ही नसताना दोनतीनदा आला होता . सारखा दम द्यायचा ,तुमच्या बद्दल विचारायचा ! सुगी कुठे आहे ते सांग म्हणायचा !तुम्हाला जिवंत सोडणार नाही म्हणायचा ! त्या दिवशीही तो येऊन गेला होता . धमकी देऊन गेला होता . मी दिपू भाऊजींना तेच सांगण्यासाठी बोलावलं होतं . तेवढ्यात तुम्ही आलात ! आणि तुमच्या मागावर तो होताच वाटतं ,तो ही आला . आणि त्यानेच मागून वार केला .
त्याला अंदाज नव्हता की आम्ही ओसरीत असू म्हणून ,पण तसाही त्याला फरक पडणार नव्हता . त्याने सरळ मला धमकी दिली जर पोरांचा जीव प्यारा असेल तर तुमचा विचार करायचा नाही म्हणून ! त्याला शंका आली होती की कुणी सांगितलं होतं कुणास ठाऊक ? की तुम्ही सुगीचं काही केलं म्हणून ! "
"त्याने सांगितलं आणि तू ऐकलं ? पोरांसाठी नवऱ्याला सोडून दिलं ? ठीक आहे ! तुझं काय करायचं आणि तुझ्या पोरांचं काय करायचं ते मी नंतर पाहीन ! पहिले तो सुगीचा नवरा कोण आहे त्याचा बंदोबस्त करतो ! " "अहो, असं काय बोलताय माझी पोरं आणि तुमची पोरं काय वेगळी आहेत का ? " "हं ! माझी पोरं ? माझी बायको ? कसू या जगात कुणी कुणाचं नाही ! हे मला अनुभवाने समजलंय ! मी तर म्हणेन बरं झालं त्याने मला मारलं ! नाहीतर मला तुझं खरं रूप कसं समजलं असतं ? तू पण माझी मरायची वाट पाहत होती !तुलाही माझ्या कचाट्यातून सुटायचं होतं .पण लक्षात ठेव ,मी एवढ्या लवकर मरणार नाही ! मी तुला मागेही सांगितलं होतं की माझं मरण सावित्रीच्या हातून आहे ! "
"अहो ,काहीही काय बोलताय ? कुणी पोरगी आपल्या बापाला का मारेल ? " "मलाही असंच वाटायचं पण तुझी वागणूक पाहून माझी खात्री झाली की तसंच होईल म्हणून ! आणि त्याला माझी ही तयारी आहे ,पण तोपर्यंत मी मरणार नाही हे निश्चित ! "
बोलण्या बोलण्यात रात्र कधी संपली दिवस कधी उगवला दोघांनाही कळालं नाही . पहिले काशीबाई भानावर आली ,"अहो ,उठा ! कपडे घाला ! पोरं उठतील एवढ्यात ! सकाळ झालीय ! " तिने भर्रकन साडी गुंडाळली . व अंघोळीला पळाली . रंगाला ही आपल्या अवस्थेचं भान आलं होतं ,तो पटकन उठला ,टॉवेल गुंडाळला ,कपडे आवरले व प्रातर्विधीसाठी गेला .
"आई sss ,आई sss !" काशिनाथ ओरडायला लागला . काशीबाईला कळेना काय झालं ? तिने रंगा ला आवाज दिला . पण त्याचा पत्ता नव्हता . तिने कशीतरी आंघोळ केली . कपडे घातले व काशिनाथ आणि सावित्री झोपायचे त्या रूम मध्ये गेली . " काशी काय झालं ? " "आई ,हि बघ ! कशी करतेय ! " काशीबाईचं लक्ष सावित्री कडे गेलं आणि ती घाबरली . सावित्रीचे डोळे टक्क उघडे होते आणि ती छताकडे बघत होती . एक टक ! पण नजर सावित्रीची नव्हती .
काशीबाईने तिला गदागदा हलवलं . सावित्रीही आता मोठी झाली होती म्हणजे १२ ते १३ वर्षांची ! पण मोठी दिसायची . अंग भरलेलं होतं . त्यामुळे मोठी वाटायची . शिवाय सुंदर होतीच ! कुणाचीही नजर लागावी अशीच ! आणि आता तिची बदललेली नजर पाहून काशीबाई घाबरली . 'आता हिला काय झालं ? ' तेवढ्यात रंगा आला . "का गं ? काय झालं ?" "अहो ,ही बघाना कशी करतेय ! " रंगाचा यायचा अवकाश ! सावित्रीची नजर त्याच्यावर रोखली गेली . "मला मारून मजा मारतोस होय ! तुला काय वाटलं मी तुला सोडून देईन ? नाही ! तुला बी नाही ! आणि तुझ्या पोरीला बी नाही ! "
काशिनाथला कळेना ही काय बोलतेय ? पण काशीबाई आणि रंगा समजले होते की ही सुगीच आहे . पण त्यांना एका गोष्टीचं नवल वाटत होतं की इतक्या दिवसांनी सुगी परत कशी आली ? आणि दिप्याने जर बंदोबस्त केला होता तर हि दिवसा ढवळ्या आपल्या पोरीला त्रास का देतेय ? " आई ,ताईला काय झालं ? बाबानी कुणाला मारलं ? " काशी तू बाहेर जा ! आणि याद राख ! हि जे काही बोलली ते कुणाला सांगितलं तर ! गाठ माझ्याशी आहे ! "
काशिनाथ लहान होता . त्याला बापाचं बोलणं समजलं नाही पण भावना समजल्या . आपल्या बाबानी कुणाला तरी मारलंय आणि ते आपल्याला ही मारतील ! तो घाबरून बाहेर पळाला . तो बाहेर पळाला आणि सावित्री पलंगावर आडवी झाली. काशीबाईची व रंगाची नजरानजर झाली ! याचा अर्थ सुगीचा बंदोबस्त झाला नव्हता ! ती परत आली होती ! काहीतरी चुकलं होतं किंवा राहीलं होतं ! पण कळणार कसं ? कोण सांगणार ? 'दिप्या ! ' रंगाची ट्यूब पेटली .तो तडक बाहेर निघाला . काशीबाईला ही कळालं होतं ,पण बोलून फायदा नव्हता ! तिची नक्षत्रासारखी सुंदर पोरगी तिच्या नवऱ्याच्या कर्तुत्वाला बळी पडणार होती . पडली होती !
"नाही ! मी हे होऊ देणार नाही ! माझ्या साऊ ला काही होऊ देणार नाही ! मग मला काहीही करावं लागलं तरी करेन ! अगदी काहीही !.........
TO BE CONTINUED ......
WATCH MUSICAL COVER SONGS ON OUR YOU TUBE CHANNEL 'MUSICAL RAITA '
- ALL RIGHTS RESERVED AT YOGESH BORSE & BGSM
- ABOUT US
- PRIVACY POLICY
ConversionConversion EmoticonEmoticon