फट्टू - भाग - ७ वा - मराठी भयकथा - marathi horror story

                   फट्टू - भाग - ७ वा - मराठी भयकथा - MARATHI HORROR STORY

मराठी भयकथा 
लेखक :- श्री :- योगेश वसंत बोरसे :- 

       सूचना :- ही  एक काल्पनिक  भय कथा असून , वाचकांच्या सोयी साठी ही  दीर्घ भयकथा २० भागात विभागली आहे ! प्रत्येक भाग ,प्रत्येक प्रसंग भयचकित करणारा ,हूर हूर लावणारा ,आपल्याशी जवळीक साधणारा , गूढ गोष्टींकडे आकर्षित करणारा , आपल्या अवती भवती बघायला भाग पाडणारा आहे . वाचकांना विनंती आहे की  त्यांनी पूर्ण कथेचा आनंद घ्यावा . तुम्हाला नक्कीच आवडेल !

     पूर्वार्ध :-    तेनसिंगला कळेना ,काय करावं ते ! सावित्रीला कुठे शोधावं ते ?  "मामी ,तुम्ही दोघीनी नेमकं काय केलंय ?काय झालंय ? सांगाल का ? सावित्रीला कुठे शोधावं ? " काशीबाईला काय बोलावं कळेना सुरुवात कुठून करावी ते कळत नव्हतं . त्या भूतकाळात हरवल्या . सावित्री आणि तेनसिंगचं लग्न होण्या अगोदरचे दिवस आठवले आणि त्यांच्या अंगावर शहारे आले . 

     "  मामी ,काय विचारतोय ? सांगणार आहात का ? " आणि काशीबाईने सांगायला सुरुवात केली . 

     आता पुढे :- सावित्री ! नक्षत्रासारखी सुंदर पोर ! खरं तर तिचं नांव स्वाती किंवा आश्लेषा ठेवणार होते . पण तिच्या आजीचं म्हणजे वडिलांच्या आईचं नांव सावित्री होतं . आजीचा आपल्या मुलामध्ये खूप जीव होता . म्हणजे सावित्रीच्या वडिलांमध्ये . सावित्रीचा जन्म होण्या अगोदर एक वर्ष आजी वारली .

        सावित्रीच्या जन्मापूर्वी ची गोष्ट ! आजींना म्हणजे सावित्रीबाईंना काळजी वाटत होती . जीवाला घोर लागला होता . आपल्या मुलाला म्हणजे सावित्रीच्या वडिलांना म्हणजे रंगाला मुलबाळ होत नव्हतं . सुरुवातीची दोनतीन वर्ष वाट पाहण्यात गेली . घराण्याला वारस हवा ! संपत्तीला वारस हवा ! पण मुलाची वाट पाहत पाहत तीन वर्ष गेली . आणि आता असं वाटायला लागलं की जे होईल ते चालेल .मुलगा असो की  मुलगी ! 

      पण ते ही  दिव्य ठरत होतं . सावित्रीबाईंनी रंगाला व त्याच्या बायकोला म्हणजे काशीबाईला एके रात्री बोलावलं , आणि सरळ ठणकावून सांगितलं ," हिला मूल होत नाही ! एक तर मूल होईल असं बघ ! नाहीतर दुसरं लग्न कर ! " " दुसरं लग्न ? पण आई हीचा  काय दोष ?" "मग काय तुझ्यात दोष आहे ? " "आईssss  !" "ओरडू नकोस . तुझी मर्दानगी तुझ्या बायकोजवळ दाखव ! नाहीतर दुसऱ्या बाईजवळ ! एक मूल  काढता येत नाही आणि माझ्यावर ओरडतोय ! " 

      रंगाला लाजल्याहून लाजल्यासारखं झालं . त्यानंतर तो तडक बाहेर निघाला . व बरीच रात्र झाल्यावर घरी आला . कुठे गेला होता कुणास ठाऊक ? पण काशी जवळ झोपल्यावर तिला फरक जाणवला . त्याने कसा ध्यासच घेतला होता एकच ! काहीही झालं तरी मूल पाहिजेच !  ना रात्र पाहत होता ना दिवस ! काशीबाई थकून जायची ! पण काय बोलणार ? विरोध केला तर हा दुसरं लग्न करेल ! आणि आपलं भविष्य संपून जाईल ! शेवटी त्याच्या मर्दानगीवर त्याच्याच आईने संशय घेतला होता . तिच्याही बाई होण्यावर बोट ठेवलं होतं . त्यामुळे थोडे दिवस त्रास सहन करावा लागणार होता . तो एकच पर्याय होता . 

        दिवसाढवळ्या दार बंद करून यांचा कार्यक्रम सुरु राहायचा . सावित्री बाई पहारा देत राहायची . कुणी आलं कि काही कारण सांगून बाहेरच्या बाहेर रवाना करायची . रोज रात्री काहीवेळ रंगा  बाहेर जायचा . व आल्यावर 'हे काम ' सुरु व्हायचं ! काशीबाईने बऱ्याचदा विचारलं ,पण तो सांगेल तर शपथ ! 

             एक दिवस काशीबाईने ठरवलं ,त्याच्या  मागे जायचं , नकळतपणे जायचं ! रात्र झाली तसा रंगा बाहेर पडला ,काशीबाईला कळेना ? सासूबाईला चुकवून त्याच्यामागे कसं जायचं ते ? पण सासूने स्वतः विचारलं ,"हा रोज कुठे जातो गं ? आणि काही फरक वाटतोय का ? काशीबाईने लाजून मान खाली घातली . सावित्रीबाईंना गहिवरून आलं . त्यांनी प्रेमाने काशीबाईला जवळ घेतलं . मायेने  डोक्यावरून हात फिरवला . त्यांच्या डोळ्यांत आनंदाचे अश्रू होते . त्यांनी काय पाहिलं कुणास ठाऊक ? "पोरी ,लवकरच आनंदाची बातमी देशील असं दिसतंय !" त्या काशीकडे डोळे भरून पाहत होत्या . 

     तेवढ्यात रंगा आला . या दोघीना सोबत बघितलं ,त्याला आश्चर्य वाटलं . त्याच्या आईने कधी नव्हे ते मायेने बघितलं होतं . पण रंगाला  आता माया दाखवणं शक्य नव्हतं . तो तडक आत गेला . व काशीबाईला आवाज दिला . तिच्या अंगावर सर्रकन काटा आला .' आता परत ? ' पण नाईलाज होता . तिने मदतीसाठी सावित्रीबाईकडे बघितलं . सावित्रीबाईला तिच्या नजरेतील भाव समजला असावा . त्यांनी नजर फिरवून घेतली . काशी समजली याना आपल्या त्रासाशी काही घेणं नाही . नाईलाज झाला .ती आत गेली व दार लावून घेतलं . 

    काहीवेळात काशीचे उसासे सावित्रीबाईंच्या कानावर यायला लागले . त्यांच्या नजरेत चमक होती . ' आपण हेच पहिले का बोललो नाही ? तीन वर्ष वाट बघायची गरज पडली नसती . पण .... अचानक सावित्रीबाईंचा जीव घाबरायला लागला . श्वास घ्यायला त्रास व्हायला लागला . " रंगाsss ,रंगा ssss " पण आवाज तोंडातच राहिला . समोर जे काही होतं ते भासमान होतं ,कि सत्य ? पण जीव घेण्यास पुरेसं होतं !

            काशीबाई सकाळी उठली . दार उघडलं आणि तिने आरोळी ठोकली . "सासूबाई ssss " सावित्रीबाईंचे डोळे सताड उघडे होते ! त्यांचा प्रवास संपला होता . त्या अनंतात विलीन झाल्या होत्या . त्यांना देवाज्ञा झाली होती . त्यांचं जीवन कार्य संपलं होतं . तिच्या आवाजाने रंग उठून बसला . तडक बाहेर आला . आईकडे बघितलं . त्याच्या नजरेतील चमक पाहून काशीबाईला आश्चर्य वाटलं . यांची आई वारलीय ! आणि यांच्या नजरेत समाधान दिसतंय ? म्हणजे यांनी तर काही ... ? 

    काही वेळात गावात बातमी पसरली . गाव जमा झालं . सावित्रीबाईंचे रंगाशिवाय आता  कुणी नव्हतं . त्यामुळे वाट बघण्याची थांबण्याची गरज नव्हती . लवकरच अंत्यविधी आटोपला . संध्याकाळ पर्यंत जो तो आपल्या घरी गेला . 

    काशीबाईला हा त्रास सहन होईना ! आणि ताणही सहन होईना ? याचा इलाज काय करायचा ? रात्र झाली , रंगा जवळ आला . पण आता काशीबाईचा निर्धार झाला होता . तिने रंगाला स्पष्ट शब्दात खडसावलं . " अहो ,काय माणूस आहेत कि जनावर ? सकाळीच तुमच्या आई वारल्या ! आणि तुम्ही ... ? हे बघा मला हा त्रास सहन  करणं शक्य नाही . सासूबाई होत्या म्हणून सहन केलं ! आता नाही ! तुम्ही दुसरं लग्न करून घ्या ! माझी हरकत नाही ! " 

    रंगाने शांतपणे ऐकून घेतलं . तो अलगद काशीजवळ सरकला . तिच्या डोक्यावरून मायेने हात फिरवला . तिचा चेहेरा आपल्या ओंजळीत धरला . आणि तिच्या  डोळ्यात पाहत म्हणाला ,"त्याची काही गरज नाही कासू ! आता आई नाही ! आणि लवकरच आपल्या घरात नवीन पाहूणा  येईल ! "

     काशीला आपल्या बोलण्याचा पश्चाताप झाला . तिने अलगद रंगाचे हात बाजूला केले . त्याच्या छातीवर डोकं ठेऊन डोळे मिटले . " एक विचारू ?" "काय गं ?" " तुम्ही तर काही केलं नाही ना ?" रंगा काही बोलला नाही . तो विचार करत राहिला . " कासू ,एक सांगू ? काही प्रश्नांची उत्तरं न दिलेलीच बरी असतात . तू ताण घेऊ नकोस ! स्वतःला सांभाळ !" 

    रंगा एकटक कुठेतरी पहात राहिला . आपण केलं ते चुकीचं की बरोबर ? ते त्याला समजत नव्हतं . पण त्याचं उत्तर काळच देणार होता .....     

        

                                         TO BE CONTINUED ...... 

FATTU - PART - 8 - WATCH HERE


WATCH MUSICAL COVER SONGS ON OUR YOU TUBE CHANNEL 'MUSICAL RAITA '



           
                 👰👰👰👰👰👰👰👰👰👰👰





     



Previous
Next Post »